गेला संपूर्ण महिना गाजला तो पेपर फुटी प्रकरणाने, मिलिटरी सर्व्हिसचे पेपर फुटले, पेपर फुटी होईल म्हणून म्हाडा परीक्षा रद्द झाली, एमपीएससीचे, टि.ई. टी.चे, आरोग्य खाते किंवा मेडिकलचे असे अनेक पेपर फुटीचे प्रकार ढगफुटी झाल्याप्रमाणे अचानक की ठरवून घडले ते ईश्वर जाणे. ज्या यंत्रणेने परीक्षा घ्यायच्या ती यंत्रणाच भ्रष्ट असेल तर बोल कोणाला लावणार?

परीक्षेसाठी मेहनत न घेता, तसेच योग्य ते ज्ञान न मिळवता केवळ पैसे फेकून उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, तहसीलदार बनू लागले तर ते पदावर कार्यरत झाल्यावर जनतेच काम करतील की नोटा छापण्याच काम करतील? याचा अंदाज घ्यायला ज्योतिष ज्ञानाची गरज नाही.

गेल्या पाच सहा महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी पडल्या आणि स्रोतापेक्षा कितीतरी जास्त रोख रकमा आणि मालमत्ता या अधिकारी वर्गाने गैरमार्गाने साठवली होती ती ताब्यात घेण्यात आली. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी सुपे यांच्या घरी धाड पडली आणि गैरमार्गाने कमावलेली सुपभर संपत्ती आयकर विभागाला सापडली. हे वानगीदाखल उदाहरण, हे फक्त हिमनगाचे टोक, भ्रष्टाचाराचा हिमनग किती अवाढव्य असावा ते सामान्य माणसाला कळणार देखील नाही. शिक्षण खाते, पोलीस खाते यांच्याकडून प्रामाणिकपणाची आदर्शाची अपेक्षा ठेवायची नाही तर मग कोणाकडून ठेवायची? या वेगवेगळ्या सरकारी खात्यातील अधिकारी वर्गाची एवढा भ्रष्टाचार करण्याची हिम्मत झालीच कशी? याचे कारण अतिशय स्पष्ट आहे. या भ्रष्टाचारात मंत्री आणि त्यांचे नातलग सहभागी असावे अशी सामान्य नागरिकांची धारणा आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की आजतरी कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही.

पुरेशी पात्रता नसतांना पैसै चारून उमेदवार डॉक्टर बनू लागला, इंजिनिअर बनू लागला, तर तो माणसाचा जीव वाचवेल की आजारी माणसाला वेगवेगळ्या उपचार पध्दती देऊन त्याची लुटमार करेल? किंवा सिव्हिल इंजिनिअर, ब्रिज- इमारत उभारेल की लोकांच्या मृत्यूचे सापळे तयार करेल? आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल. गेल्या करोना काळात अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागून अनेक लहान मुले, रुग्ण दगावले. चुकीचे इंजेक्शन दिल्याने काही अत्यावस्थ झाले तर Remdesivir, Tocilizumab, Monoclonal Antibody ,Casirvimab,Imdevimab ही इंजेक्शन रुग्णांना प्रंचड किंमत देऊन खरेदी करावी लागली. काही रुग्णांना इंजेक्शनची मात्रा अधिक झाल्याने ते दगावले. रुग्ण दगावला तरीही हॉस्पिटलने मृत व्यक्तीचा देह देण्यासाठी हजारो, लाखोंचे बिल आकारले. करोना काळात या सर्व औषधांचा काळा बाजार करून अनेक औषध पुरवठादारानी लाखो कमावले आणि माणुसकीला कलंक लावला. ही रुग्णसेवा की गरीबाची लूट! मेलेल्या मढ्यावरचे लोणी खाणे म्हणजे काय? ते नातेवाईकांनी प्रत्यक्ष अनुभवले.

करोना काळात, हॉस्पिटलमध्ये चुकीने ज्यांचे निधन झाले त्यांना आर्थिक भरपाई करून गेलेला जीव परत येईल? आणि कुटुंबाला झालेले दुःख कमी होईल? पण अधिकारी वर्गाने गेंड्याचे कातडे पांघरले आहे. या घटनेची जबाबदारी एक दुसऱ्यावर ढकलण्यापलीकडे काही घडले नाही. आमच्या जाणीवा किती बोथट बनल्या आहेत. दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखा बाबत संवेदना नष्ट झाल्या आहेत हेच या प्रसंगातून दिसते.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात घडलेल्या अनेक घटना, आघाडी सरकारच दुर्दैव की अपयश हे त्यांनाच माहिती. गेल्या दोन वर्षांत विशेषतः करोना काळात, अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागून त्यात कित्येक बालक आणि वृद्ध रुग्ण होरपळून मेले. मंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांनी भेट देऊन सांत्वन केले पण त्यानंतर तरी या हॉस्पिटलमध्ये अग्नी विरोधी यंत्रणा कार्यरत झाली का ? या काळात अशा अनेक घटना घडल्या ज्या महाराष्ट्रासाठी हानीकारक होत्या. या प्रकरणाने जगात महाराष्ट्र राज्याची नाचक्की झाली.

अँन्टलिया प्रकरण असो, शंभर कोटीचा हप्ता असो की मंत्र्यांचे बलात्कार प्रकरण असो, विविध विभागातील पेपर फुटी असो की कोविड काळात रुग्णाची झालेली लूट. सर्व प्रकरणे लोकांनी मिडीयामुळे चवीने चघळली. विधानसभेत तारांकित प्रश्न विचारले गेले. आंदोलने झाली पण यामुळे ज्या नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई कोण करून देणार व कशी? गेले दोन महिने किंवा जास्त काळ बंद असलेली एसटी वाहतूक आणि सामान्य माणसाची फरफट काय दर्शवते? शासन जागृत असल्याची खूण कुठे दिसते का?

जे मंत्री किंवा अधिकारी, गैरव्यवहार किंवा अनियमितता प्रकरणात गोवले असा संशय होता त्यांनी न्यायालयीन चौकशीला सामोर जाण्याऐवजी, तब्येत बरी नसल्याची खोटीनाटी कारण सांगावी, फरार होण योग्य समजावं आणि पोलीस खाते त्यांचा शोध घेण्यात अपयशी ठराव हे काय दर्शवते? कधीतरी त्यांच्यावर खटला भरलाच तर गुन्ह्यातील साक्षिदार फोडून केस कमकुवत करायची आणि सबळ पुराव्या अभावी निर्दोश सुटका करुन घ्यावी हे त्यांच कौशल्य. त्यांच्या खऱ्या गुन्ह्यासाठी शिक्षा होऊ नये म्हणून अनेक नामचित वकील आपले कौशल्य पणाला लावून केस मधील कमकुवत दुवे शोधून त्यांची निर्दोष सुटका करण्यासाठी सज्ज असतात. अंध न्याय संस्थेकडे काय आहे? तिचा न्यायाचा काटा झुकवण्याचे तंत्र आणि मंत्र वकील महोदयांनी विकसित केलेलाच असतो. खरच शासन यंत्रणा जिवंत आहे?

आज अनेक भारतीय नागरिक परदेशात स्थायिक झाले आहेत आणि तेथे त्यांनी नावलौकिक कमावला आहे. तेथील संसंदेत त्यांना मानाचे स्थान आहे. अमेरीकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस हे एक बोलकं नाव, त्यांचा जन्म ऑकलांड येथील आहे आणि त्या यापूर्वी कॅलिफोर्निया राज्याच्या अँटनी जनरल होत्या. त्या अमेरिकन नागरीक असल्याने त्या देशाचे हित जपण्यात कोणतीही कुचराई करत नाहीत.

पदावर असणाऱ्या व्यक्तीला आपल्या पदाचे आणि त्या अनुशंगाने असणाऱ्या जबाबादारीचे भान असायला हवे की नको? त्या पदाला योग्य न्याय देता यावा यासाठी त्यांनी सजग असणे गरजेचे आहे की नाही? एखादी जबाबदारी स्वीकारली की त्या पदाची काही कर्तव्य आणि मर्यादा ह्या पाळणे ओघाने आलेच पण, परीक्षा घेणाऱ्या किंवा त्या संबंधीत काम करणाऱ्या संस्थेने गोपनियतेचा भंग करत परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका गैरमार्गाने देणे, उत्तर पत्रिका लिहून देणे, परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्याऐवजी अन्य डमी विद्यार्थ्यास बसू देणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. केवळ झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी असे प्रकार खुलेआम आणि सर्वत्र सुरू असतांना सर्व क्षेत्रात नैतिकता लोप पावली की काय असे वाटू लागते. आपल्या काही राजकारण्यांनी खोटे मुद्रांक दाखले, खोट्या चलनी नोटा छापून त्या वितरित केल्या, त्यासाठी त्यानी शिक्षा भोगली आणि तरीही पुन्हा काहीच घडले नाही अशा थाटात राजकीय बस्तान बसवले. उजळ माथ्याने फिरू लागले पुढील पिढी त्यांच्याकडून कोणता कित्ता गिरवणार?

वर्तमानपत्रात सतत येणाऱ्या बातम्यांनी दिवसेंदिवस माणसाचे अधःपतन होत आहे की काय? असे वाटत आहे. उच्च पदस्थ व्यक्ती पदाची आब न राखता व्यवहार करू लागली तर आदर्श म्हणून पाहावे कोणाकडे? ज्येष्ठ साहित्यिक आणि उच्चशिक्षित उच्च पद विभूषित, महानायक, संभाजी, पांगीरा या कादंबरीचे लेखक, पानिपतकार विश्वास पाटील ज्यांना ह्या वर्षी नाशिक येथील मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष घोषित केले होते. पदभ्रष्ट माणसाला सन्मान म्हणजे त्याच्या भ्रष्टाचाराला आणि दुर्गुणांना राजमान्यताच. त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने समाजातून टीका झाली. त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी जमीन व्यवहारातील आक्षेपार्ह अनेक फाईल अखेरच्या दिवशी मार्गी लावून बिल्डर लॉबीचा फायदा करून दिला होता. त्यांच्या बाबत चौकशी सुरू होती पुढे त्याचे काय झाले? कोणाचे हित संबंध त्यात होते त्यामुळे चौकशी बंद झाली ते न कळे.

सैनिक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर किंवा अन्य पेशातील यशस्वी उमेदवारांना त्यांनी शिक्षण पूर्ण केले की पदवीदान समारंभात शपथ घेतांना, “मी माझ्या शिक्षणाचा आणि मिळवलेल्या ज्ञान, कौशल्य याचा विवेकी वापर समाजाच्या भल्यासाठीच करेन. देशासाठी किंवा समाजासाठी हानीकारक असा कोणताही निर्णय मी घेणार नाही.” या किंवा अशा स्वरूपाची प्रतिज्ञा स्नातकांना घ्यावी लागते. अशीच शपथ मंत्रीमहोदय यांनाही घ्यावी लागते परंतू यातील काही लोकांची नैतीकता अचानक कुठे हरवते? ते देशाशी, समाजाशी असणारी आपली बांधीलकी कसे विसरतात न कळे? पण काही माणसे आपल्या पदाशी आणि नैतिकतेशी बांधील असतात. जे.एफ.रिबेरो, अरविंद इनामदार, गो.र. खैरनार, मीरा बोरवणकर यांची नावे आजही प्रामाणिक आदर्श अधिकारी म्हणून लोक घेतात.

हे सर्व लिहिण्याचे कारण की आज देशात आणि विशेषतः आपल्या राज्यात रोज एक नवा घोटाळा, नवा गोंधळ उघड होत असतांना, इतका सारा अंधार असतांना समाजात खेडोपाडी दूरदूर कुठे कुठे काही पणत्या अंधकार हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक अशीच व्यक्ती म्हणजे डॉक्टर राजेशकुमार गुप्ता, ते जुन्या सावंतवाडी संस्थानातील स्वर्गीय राजमाता जानकीबाईसाहेब हॉस्पिटल, सावंतवाडी, कोकण येथे कार्यरत आहेत. हे हॉस्पिटल १९२५ मध्ये म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात तेव्हाच्या खेम सावंत यांनी नागरिकांना रुग्णसेवा देता यावी म्हणून सुरू केले होते हे विशेष. राजा असावा तर असा दूरदृष्टी असणारा.

सावंतवाडी येथे डॉक्टर राजेशकुमार गुप्ता आयुर्वेद विद्यालयात जेष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सर्जन म्हणून ते येथे प्रसिद्ध पावले. अर्थात डॉक्टरी पेशा असल्याने तेव्हाही रुग्णसेवा करत होते. ईश्वराने त्यांच्या हाताला यश दिले आहे. माझ्या मोठ्या भावाच्या शस्त्रक्रिया निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला.

अतिशय साधा पेहराव, निगर्वी. आपण सर्जन, तेही प्रसिद्ध ग्रामीण हॉस्पिटलमध्ये, याचा कुठेही अभिनिवेश नाही. समोरून गेले तरी तेच डॉक्टर गुप्ता सर आहेत हे सांगूनही पटणार नाही इतका सहज वावर. अंत्यत व्यस्त वेळापत्रक सांभाळून ते सेवा देत आहेत. आयुर्वेद महाविद्यालयातून प्रोफेसर म्हणून ते २०१७ साली निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे दोन पर्याय होते. त्यांना सावंतवाडी येथे स्वतंत्र प्रॅक्टिस करणे शक्य होते किंवा आपल्या गावी जाऊन सेवानिवृत्त जीवन शांतपणे जगणे व तेथेच प्रॅक्टिस करणे शक्य होते परंतु सावंतवाडी येथील काही मान्यवरांनी डॉक्टर गुप्ता यांना विनंती केली की त्यांनी जानकीबाई हॉस्पिटलमध्ये सेवा द्यावी. डाक्टरांनी हॉस्पिटलची गरज लक्षात घेऊन मानधनावर येथे सेवा देण्यास होकार दिला आणि आज या हॉस्पिटलमध्ये ते निवृत्त झाल्यानंतर गेले पाच वर्षे कार्यरत आहेत.

ते सावंतवाडीत रुग्णांना रोज किमान आठ ते दहा तास समर्पित होऊन सेवा देत आहेत. Hernia, Hydrocele, appendices असे आजार झालेल्या शेकडो नव्हे हजारो रुग्णांचे दुःख ते कमी करत आहेत. गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, आणि कोकणातील शेकडों रुग्णांच्या शस्त्रक्रिया त्यांनी लीलया केल्या आहेत. रुग्णाला धीर देण्यासाठी त्याच्याशी सहज गप्पा मारून प्रसंगी त्याच्या पाठीवर थाप मारत ते त्याचा आत्मविश्वास वाढवतात ऑपरेशन करतांना local anaesthesia दिला असल्याने रुग्ण हा पूर्ण शुद्धीत असतो, रुग्णांचे मन divert करून त्याच्याशी गप्पा मारता मारता ते ऑपरेशन करण्यात ते माहीर आहेत, त्यामुळे रुग्णांचे ऑपरेशन कधी झाले हे त्याला कळतही नाही.

दररोज OPD साठी किमान तीस ते चाळीस तर कधी कधी त्यापेक्षा जास्त, चक्क Half Century ते पूर्ण करतात. आठ ते दहा शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडणे म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे. परंतु हे शिवधनुष्य ते रोज लीलया पेलतात हीच मोठी गोष्ट. यामुळे त्यांनी असंख्य रुग्णांचे मन जिंकून घेतले आहे. जो रुग्ण त्यांच्याकडून ठणठणीत बरा होऊन जातो तो त्यांना कधीच विसरत नाही. डॉक्टर गुप्ता हे जनमानसात प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या शास्त्रक्रियेतील कौशल्य आणि साध्या पेहरवामुळे म्हणूनच ते प्रत्येकाला आपले वाटतात.

मुख्य म्हणजे जानकीबाईसाहेब रुग्णालयात या शस्त्रक्रिया अतिशय अल्प खर्चात आणि अत्यल्प उत्पन असणाऱ्या रुग्णाला निशुल्क आहेत हे विशेष. ज्या रुग्णाची किंवा रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती खुपच गरीबीची आहे त्याला डॉक्टर स्वतः ही शस्त्रक्रिया अतिशय कमी खर्चात किंवा निशुल्क होऊ शकते या बाबत माहिती देऊन आश्वस्त करतात.

ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे व ज्यांच्याकडे दारिद्रय रेषेखालील रेशन कार्ड आहे त्यांनी, तहसीलदार कार्यालयातून वार्षिक रुपये एक लाख ऐशी हजारापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला मिळवला की त्यांच्या घरातील रूग्णाला ही सेवा जवळजवळ निशुल्क मिळू शकते ही माहिती समाजापर्यंत पोचवणे गरजेचे आहे. ज्या रुग्णाकडे किंवा त्यांच्या नातलागकडे शासकीय लाभ मिळवण्यासाठी कोणताही दाखला नाही त्यांनाही अतिशय वाजवी खर्चात येथे सेवा उपलब्ध होते हे विशेष.

जी हॉस्पिटल धर्मदाय म्हणून रजिस्टर झाली आहेत म्हणजेच ट्रस्ट द्वारे चालवली जातात अशा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णासाठी काही कॉट आरक्षित असतात. दुर्दैवाने कोणी त्याची माहिती रुग्णांना देत नाही. या संस्था सेवाभावी म्हणून सरकारी लाभ घेतात तेव्हा एक जागरूक नागरिक म्हणून आपण ट्रस्ट द्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गरिबांना निशुल्क सेवा मिळावी यासाठी लक्ष पुरविले पाहिजे. जी हॉस्पिटल धर्मदाय म्हणून रजिस्टर झाली आहेत तिथे सामान्य रुग्णांना ५०% सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे.
दुर्दैवाने याची माहिती रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक यांना नसल्याने रुग्णालये आर्थिक लूट करतात. मात्र डॉक्टर राजेशकुमार गुप्ता या रुग्णालयात नेहमी गरजू व गरिबांना न्याय देतात.

एकीकडे स्वतः च्या हॉस्पिटलमध्ये रुग्णास दाखल करून व विविध सेवांसाठी वेग वेगळी बिले लावून रुग्णांच्या नातेवाईकाना वेठीस धरणारे डॉक्टर पाहिले की गुप्ता डॉक्टर यांची रुग्णाविषयी आस्था कळते. असा साधा, सरळ, रूग्णांना सहाय्य करणारा डॉक्टर म्हणजे कोकणातील गोरगरीबसाठी देवदूतच. याच बरोबर जानकीबाईसाहेब हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय यांना ते राखत असलेल्या स्वच्छतेबद्दल मनापासून दंडवत. काम कोणतेही असो ते निष्ठेने केले तर त्याची वाहवा होणारच. येथील वॉर्डबॉय रुग्णालयाची स्वच्छता उत्कृष्ट पाहतात. अर्थात या बारीक सारीक गोष्टीकडे जानकीबाईसाहेब हॉस्पिटल प्रशासनाचे लक्ष आहे ही कौतुकाची बाब.

डॉक्टर गुप्ता यांच्या संबंधी एक घटना ऐकायला मिळली आणि त्यांची असमान्यता मनाला भावली. २०१५ साली डॉक्टर त्यांच्या विश्वासू वॉर्डबॉय नारायण सोबत देवगड येथे जात होते. गाडीने कणकवली रस्त्याने देवगड वळण गाठले आणि त्यांची टाटा नँनो रस्त्यावरून खाली उतरली आणि तिने पलटी खाल्ली. एक नव्हे दोन नव्हे तीन वेळा गाडीने पलटी खाल्ली आणि ती चिऱ्यांच्या ढिगावर आदळली. वॉर्डबॉय ही कथा सांगत होता. तो म्हणाला, “मी मनातच म्हणालो आता काही वाचत नाही आणि मी डोळे मिटून घेतले. टाटा नँनो गाडीच्या बाबतीत तेव्हा इंजिन पेट घेण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे मी हादरून गेलो होतो. थोड्या वेळाने सावरून डोळे उघडले तर, गाडीची चाके वर झाली होती आणि डॉक्टर बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. लोकांनी आम्हाला बाहेर काढले. डॉक्टर लवकरच सावरले आणि तो विचित्र अपघात घडल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या गाडीने देवगड येथे जाऊन डॉ. नारकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आठ ऑपरेशन केली. रात्री उशिरा आम्ही घरी आलो.” खरं तर चमत्कार घडला होता. ईश्वराने रुग्णांना जीवदान देणाऱ्या देवदूताला वाचवले होते.

वॉर्डबॉय नारायण जाधव आजही जानकीबाई हॉस्पिटलमध्ये सेवेत आहेत. त्यांच्या तोंडून हा प्रसंग ऐकतांना अंगावर शहारे येत होते. डॉक्टरांच्या छायेत नारायण असल्याने त्याला परिसस्पर्श झाला आहे. तो त्याचे अनुभव सांगून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना धीर देतो. चांगल्या सवयी बाळगाव्या यासाठी रूग्णांना आपल्या अनुभवाचे बोल ऐकवतो. धन्य ते डॉक्टर गुप्ता आणि त्यांचा सेवक नारायण.

जाधव यांनी अपघात कसा घडला या प्रसंगाबाबत डॉक्टर गुप्ता यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले, “खरे तर मी दादर डिसिल्वा शाळेचा विद्यार्थी. माझे शिक्षण पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात झाले. १९८६ ला मी सावंतवाडी येथे सेवेत गेलो त्यापूर्वी मी कधीही चिपळूण पुढे गेलो नव्हतो पण गेले ३० ते ३५ वर्ष मी आयुर्वेद महाविद्यालयात सेवा केली. या काळात मला अनेक जेष्ठ डॉक्टर मित्रांचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडली. या संपूर्ण जिल्हयात माझे नाव झाले.त्यामुळे मला जिल्हात अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी जावे लागते.”

२०१५ साली देवगड रस्त्यावर अपघात कसा झाला ते सांगताना डॉक्टर म्हणाले, “तो अपघात कसा झाला ? ते आजही मी सांगू शकत नाही. आम्ही कसे वाचलो ते ही समजले नाही. पण त्या अपघातात माझ्या गाडीची जी स्थिती झाली होती ती पहिली असता आम्ही त्या अपघातात जिवंत राहणे ही एक दैवी घटनाच असावी. लोकांची सेवा करता यावी म्हणून ईश्वराने मला जीवदान दिले असावे. अपघातून सावरल्यावर मी देवगड येथे जाऊन शांतपणे आठ opration केली. रात्री १२ वाजता आम्ही घरी परतलो.”

डॉक्टर गुप्ता यांचे लग्न १९९० साली उच्च विद्याविभूषित तरण यांच्याशी झाले. त्या एम.ए, सायकॉलॉजी,एल.एल.बी होत्या परंतु डॉ गुप्ता यांना असलेली गरीब रुग्णांची कणव पाहून त्यांना हॉस्पिटलची जबाबदारी नैतिकतेने पार पाडता यावी यासाठी मॅडम यांनी हाऊस वाईफ होणे पसंत केले. त्यांना ऋतुजा, अश्विनीकुमार आणि योगेश अशी मुले आहेत. ऋतुजा एम आय टी पुणे येथे लेक्चरर आहे. अश्विनीकुमार फाईन आर्ट करतो आहे. योगेश रोबोटिक्स करतो आहे. त्यांच्या मुलीवर त्यांचे अतिशय प्रेम आहे.

सुरवातीच्या काळात डॉ.अजय स्वार, डॉ. इंद्र तळेगावकर, डॉ. प्रशांत बाळ, डॉ.राघवेंद्र तळेगावकर, यांच्याशी त्यांची गाढ मैत्री होती. डॉक्टर गुप्ता यांना ट्रेकिंगची आवड आहे. त्यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत माथेरान पर्यंत अनेक ट्रेक केले आहेत.

डेक्कन सर्जीकल सोसायटी, रेड स्वस्तिक सोसायटी, अटल प्रतिष्ठान अशा अनेक सेवाभावी संस्थेचे ते सक्रीय सदस्य आहेत. १९९६ पासून डॉक्टरांनी ३०,०००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. २००२ साली त्यांना Shushrut Young surgeon award, कोल्हापूरच्या संस्थतर्फे त्यांना धन्वंतरी पुरस्कार, २०१७ साली Best Ayurved surgeons म्हणून D. Y. Patil संस्थेकडून पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळाली. डॉक्टर गुप्ता यानी एक दिवसात ३०० शस्त्रक्रिया करून लिम्का बुक रेकॉर्ड नोंदवला आहे. डॉ. गुप्ता यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोकण भूषण पुरस्कार दिला आहे. डॉ. नगराळे हे डॉ. गुप्ता यांचे सर्जरी मधील गुरू होते. अशी चतुरस्त्र कामगिरी असूनही डॉक्टर आजही Bound to Ground आहेत हेच त्यांचे वैशिष्ट्य.

डॉक्टर म्हणाले, “मी २०१७ ला निवृत्त झाल्यानंतर जानकीबाईसाहेब हॉस्पिटलचे अध्यक्ष नॉर्वेकर साहेब यांनी मला येथे सेवा देण्याची विनंती केल्यामुळे मी गेले चार, पाच वर्षे कार्यरत आहेत. गेले अनेक वर्षे मी रोज चाळीस ते पन्नास पेशंट OPD मध्ये पाहतो. रोज किमान सात आठ ऑपरेशन करतो. सध्या मी काही मान्यवरांनी विनंती केली म्हणून दिल्ली येथे नव्याने स्थापन होणाऱ्या आयुर्वेद हॉस्पिटलसाठी व्हीझिटिंग फँकल्टी म्हणून महिन्यातून आठ ते दहा दिवस सेवा देतो. कोकणातील बऱ्याच सेवाभावी तसेच खाजगी रुगणालयासाठी सेवा देतो.”

डॉक्टरांनी माहिती दिली पण त्यात कुठेही गर्व नव्हता. त्यांचे व्यस्त कामकाज पाहता ते सहज फोनवर भेटतील, बोलतील असे वाटले नव्हते. मी डॉक्टरना फोन केल्यानंतर तो अगोदर उचलला गेला नव्हता तेव्हा क्षणभर मला वाटले डॉक्टर माझा फोन उचलणार नाहीत पण पुढील दहा मिनिटात त्यांनी स्वतः मला कॉल केला. मला आवश्यक ती माहिती दिली त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

आज समाजात घडणाऱ्या वाईट बातम्या वर्तमानपत्रे आणि दूरदर्शन वाहिन्या सतत दाखवत असतात. डॉक्टर सारख्या पवित्र पेशातही लोक गैरमार्गाने पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जात असतांना डॉक्टर सावंतवाडी सारख्या भागात अविरत रुग्ण सेवा देत आहेत. वर्तमानपत्र आणि वाहिन्या खून, दरोडे, बलात्कार यांच्या त्याच त्याच बातम्या, अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या दाखवून TRP वाढवून धंदा करत असतात आणि आम्ही त्या चवीने पहात असतो पण दुर्गम भागात सेवा देणाऱ्या व्यक्तींची माहिती फारशी कोणी देत नाही. तेथील अंधकार हटवून गरीबांचे दुःख कमी करणाऱ्या “पणत्यांची” माहिती कोणी जगाला सांगत नाही. डॉक्टर राजेशकुमार प्रकाश गुप्ता सारख्या ऋषितुल्य सेवाभावी व्यक्तीची माहिती समाजाला होणे गरजेचे आहे म्हणून हा लेखन प्रपंच. सामाजिक बांधिलकी आणि नीतीमत्ता म्हणजे नक्की काय ते या डॉक्टर महोदयांच्या सेवेतून शिकावं.

“डॉक्टर, मी स्वतः आपल्या सेवेचा अनुभव घेतला आहे. गरीब रुग्णाविषयी आपली तळमळ पहिली आहे. आपली सेवा अशीच अविरत सुरू राहावी यासाठी ईश्वराने आपल्याला बळ आणि सुदृढ प्रकृती द्यावी.” वाहिन्यांनी TRP वाढवण्यासाठी एखादी घटना वारंवार दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा डॉ. गुप्तांसारख्या निरपेक्ष बुद्धीने काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तीची मुलाखात प्रक्षेपित केल्यास नागरिक त्याचा फायदा घेऊ शकतील.

डॉक्टर राजेशकुमार गुप्ता नावाचा सहृदयी देवदूत गेले अनेक वर्षे कोकणच्या गरीब भूमिपुत्रांना रुग्णसेवा देत आहे. सावंतवाडी नगरपालिकेने त्यांच्या या सेवाभावी कार्याचा जरूर गौरव करावा. सावंतवाडी येथील जानकीबाईसाहेब रुग्णालयाला मिळालेलं एक अनमोल रत्न म्हणून कोकणची भूमी आपली सदैव ऋणी राहील.

Tags: