त्याने फार मोठ्या विश्वासाने बाबूला झुंजीत उतरवायचे ठरवले होते. जर बाबू जिंकला तर त्याला एकहाती अडिच लाख रोख बक्षीस मिळणार होते. शिवाय यूट्यूबवर ही झुंज अपलोड केल्यास त्याला समाज माध्यमातून फायदा होणार होता. या बाबत तो ऐकून होता. गेले तिन महिने व्हिकी आपल्या बैलाची,बाबूची तयारी करून घेत होता. त्याला चांगला खुराक सूरू होताच त्याच बरोबर त्याची शिंगे तासून आखीव रेखीव बनवली होती. या झुंजीची बातमी Whatsapp वरून सर्वांना कळली होती. प्रतिस्पर्धी अर्जुन तगडा असला तरी बाबूने यापूर्वी अशा अनेक झुंजी जिंकल्या होत्या. म्हणूनच व्हिकीला बाबू विषयी खात्री होती. आदल्याच रात्री तो बाबूसह तळगावात आपल्या पाहूण्यांकडे मुक्कामाला हजर झाला. सकाळी लवकर उठून तो गोठ्यात गेला आणि बाबूला त्याने साद घातली. त्याच्या जवळ जाऊन त्याने त्याला थोपटले, गळाभेट घ्यावी तशी गळ्यात हात गुंफन तो बाबूला म्हणाला, “बाब्या, ही झुंज जीकाक व्हयी, तुझ्या मालकाचो प्रश्न हां. जीतलस तर लाल मण्यांची माळ आणि बेळगावचे घुंगरू गळ्यात बांधीन. कळला ना, ही झुंज जीकाकच व्हयी.” बाबूने त्याचा हात चाटला. त्याचा गाल चाटण्यासाठी मान वर केली तस तो दूर होत म्हणाला, “लेका मी न्हालय, तूका व मी न्हाऊक घातलय, मालीश केलय. माझो बाबू चमकाक व्हयो. ही पेंड ठेवली हा ती निवांत खा, आता निघाया, लय उशीर. करून फायदो न्हय.”

तो मैदानात पोचला तस लोकांनी त्याच्या बाबू च जंगी स्वागत केल. धवल रंगाचा बाबू दिसायला देखणा होता तर अर्जुन काबरा रंगाचा होता. अर्जुनच्या पाठीवर उंच कोळ शोभून दिसत होतं. दळवी साहेबांनी दोन्ही बैल मालकांची भेट घेतली, त्यांच्या सोबत पेडणेकर आणि इतर कार्यकर्ते होते. दळवी साहेबांनी झुंज सुरू करण्यासाठी झेंडा दाखवून खुण केली. दोन्ही बैल एकमेकांना मारक्या नजरेन पाहू लागले. पायांच्या खुरांनी माती उडवू लागले. प्रेक्षकांची मैदान माणसांना फुलून गेलं ,दोन्ही बैल एकमेकांना टकरू लागले. कधी बाबू अर्जुनला रैटत होता तर कधी अर्जुन.
माणस आरडाओरडा करून प्रोत्साहन देऊ लागली आणि बैल जोश येऊन लढू लागले. क्षणाक्षणाला दोन्ही बैल एकमेकांना आव्हान देत होते. बाबू लंने अर्जुनाला दोन तीन वेळेस चांगलीच टक्कर दिली. दोन्ही बैल तसे जोडीस जोड होते. कोणीही हार मानत नव्हतं. दुसऱ्या मल्लांची किंवा व्यक्तींची झुंज पाहणं मनोरंजक वाटत पण स्वतःवर ती पाळी आली की त्यातील आव्हान लक्षात येत. कधी कधी जीवाशी गाठ असते तरी त्यातील चुरस सहजा संपत नाही. आव्हान-प्रतिआव्हान असल्याशिवाय कुस्तीत मजा कसली? पण जेव्हा आपण प्राण्यांवर झुंज लादतो तेव्हा मात्र आपण या गोष्टींचा विचार करत नाही.

खेळ हा माणसाच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीस पोषक आहे, म्हणूनच खेळाला जीवनात अत्यंत महत्व आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा मोठा देश असुनही एशियन किंवा ऑलिम्पिक खेळात मिळणाऱ्या एकूण बक्षिसांची बाबतीत जपान सारख्या छोट्या देशाच्या मानाने पिछाडीवर आहे.आजही ठराविक खेळाला समाजात प्रतिष्ठा आहे मात्र कितीतरी जागतीक पटलावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. पुर्वांचल मधून भालाफेक खेळाडू नावारूपाला येत आहेत. तर पंजाबमध्ये हॉकी प्रसिद्ध आहे, हरियाणा कुस्तीपटू मैदान गाजवत आहेत. जागतिक दर्जाच्या सुविधा खेळाडूंना मिळाव्यात या साठी केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू सक्रिय आहेत.

महाराष्ट्र राज्यात कबड्डी लोकप्रिय आहे. मल्लखांब या खेळातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. धावण्याच्या शर्यतीत कामगीरी केलेली कवीता राऊत, रायगडची ललीता बाबर. कोल्हापूरच्या आणि सातारच्या मातीत कुस्तीचे आखाडे होते. राजश्री शाहू महाराज पेहलवानांना राजश्रय देत. कोल्हापुरात माणसांच्या लाल मातीतील कुस्त्या पाहण्यासाठी लोक दूर दूरून येत. मातीला पाठ टेकली की जेता, पराभूत प्रतिस्पर्ध्याला अभय देई. हार मान्य केली की जेता शारीरिक इजा करत नसे.या कुस्त्या खिलाडू वृत्तीने घेत. खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सुवर्णपदक जिंकले होते .

जशा माणसांच्या स्पर्धा भरवल्या जातात तशा प्राण्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात. यात मेंढ्यांची टक्कर, बैलांच्या पळण्याच्या स्पर्धा, उंट सांडणीस्वारांची स्पर्धा, घोडेस्वारी आणि अडथळा शर्यत किंवा बैल आणि पेहलवान यांची झुंज इत्यादी. बैलगाडा शर्यत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात प्रसिद्ध आहे. अर्थात त्या लोक या स्पर्धेत आपल्या बैलगाडीला पळवतात. या बैलगाडीसाठी वापरले जाणाऱ्या बैलांची जोपासना खूप निगुतीने केली जाई. मल्लांना जसा खुराक दिला जातो तसा बैलांना दिला जातो. त्यांना शेतातील कामापासून दूर ठेवले जाई. अर्थात हा शौक गरीबाला परवडणारा नक्कीच नाही. आमदार आणि खासदार बैलांच्या झुंजीचे, बैलांच्या पळण्याच्या शर्यतीचे समर्थन करतात. त्यासाठी कोर्टानेच २०१४ साली केलेल्या कायद्याच्या विरोधात कोर्टात जातात आणि बंदीवर स्टे आणतात. मनेका गांधी मंत्री असताना पशूंच्या स्पर्धा भरवण्यावर त्यांनी कायदा बनवून बंधने आणली होती. स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांचा गैरवापर होऊ नये ही तळमळ त्या मागे होती. अर्थात त्या त्या राज्यात विविध प्राण्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात हे सत्य नाकारता येत नाही.

सातारा, सोलापूर भागात मेंढ्यांची लढत लावली जाते तर काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावली जाते. कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार किंवा सट्टा खेळला जातो. या झुंजीत कोंबड्यांच्या पायाला ब्लेड बांधली जातात परिणामी दोन्ही कोंबडे रक्तबंबाळ होतात. मात्र एका कोंबड्याने माघार घेईपर्यंत ही स्पर्धा किंवा झुंज चालते.

प्राण्यांचे खेळ लावतांना आणि पाहतांना माणूस हिंस्त्र पशू बनतो. मोठ मोठ्याने ओरडून प्रोत्साहन देतो. बिचारे प्राणी खर तर माणसाची ही चिथावणीखोर भाषा त्याला अजिबात कळत नाही पण त्याचा मानसिक गोंधळ उडतो आणि त्यामुळे तो जास्त आक्रमक जास्त हिंसक बनतो. सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापरावर बंदी असल्याने सर्कशीत जान उरला नाही अस सर्कस चाहते म्हणतात. मेरा नाम जोकर या राजकपूरच्या पिक्चरमुळे तेव्हा सर्कस मालकांचं बरच नुकसान झालं अस म्हटलं जातं. प्राण्यांच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर महत्त्वाचे ठरतात.सर्कशीत वाघ, सिंह किंवा हत्ती या जंगली प्राण्यांकडून विविध कसरती कार्यक्रम करून घेण्यात ट्रेनर माहिर असतात. एकाच वेळेस आठ-दहा वाघ किंवा सिंह यांच्याकडून कसरत करणाऱ्या ट्रेनरच काळीजही सिंहाच असावं लागत. सर्व सामान्यतः सर्कस आवडत नाही अशी व्यक्ती विरळा पण या प्राण्यांजवळून कसरत करून घेतांना ट्रेनरना दिव्यातून जावं लागतं. साहजीकच प्राणी या ट्रेनरना सहज सहकार्य करत नाहीत. या प्राण्यांना ट्रेनर जवळून कधी प्रेमळ वागणूक मिळते तर एखाद्या आडदांड प्राण्याला काबूत आणण्यासाठी कधी विजेचा शॉक खावा लागतो. प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर आजही पोलीस खात्यात होतो. बॉम्ब स्फोट प्रकरणात एका प्रशिक्षित कुत्रीने शोध कामात मोलाची कामगिरी बजावली होती. आजही चोरीचे गुन्हे शोध घेतांना प्रशिक्षित कुत्रे मोलाची भूमिका बजावत आहेत. अर्थात आता हे काळा आड झाले आहे. निदान कायदा प्राण्यांच्या खेळाला मान्यता देत नाही. म्हणूनच सर्कशीत प्राण्यांच्या वापरावर बंदी आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी रशियन सर्कस प्रसिद्ध होत्या. ट्रापीझ वरील चित्तथरारक कसरती हा आकर्षण बिंदू होता. कायद्याने या सर्कसवर बंदी आली आणि सर्कस इतिहासजमा झाली.

कायद्याने सगळेच होत नाही,”काय द्या नी करा.” अस चतुर सरकारी सेवक म्हणतात. काय घ्या पण नक्की करा असे म्हणणारे नागरिक आहेतच म्हणून काय द्या नी करा म्हणणारे सरकारी बाबू हिंमत करतात. असो तर मूळ मुद्दा आजही प्राण्यांचा वापर सरकारी कायदे धाब्यावर बसवून होतोच. जसे जंगली भागात हत्तीचा वापर लाकडी ओंडके वाहून नेण्यासाठी केला जातो. तर वाळवंटात उंट अधिकृतपणे सैन्यात वापरले जातात. सैन्यात द्रास सारख्या भागात खेचर पर्वताच्या उंच ठिकाणी माल वाहतुकीसाठी वापरतात. जेव्हा या प्राण्यांचा वापर विशिष्ट उद्देशाने होतो तेव्हा त्यांच्याशी कसे वर्तन केले जाते ते कुणीही शपथेवर सांगू शकणार नाही. बैल चालला नाही की त्याची शेपूट पिरगळणे किंवा त्याला पराणी टोचणे हे वर्षानुवर्षे चालत आले आहे. कधी कधी बैलाला या पराणी टोचण्यामूळे इजा होते पण काम करून घेण्याच्या नादात याकडे कोणी गंभीरतेने पहात नाही ही शोकांतिका आहे. बैल पोळ्याच्या दिवशी त्याला सजवायचे, त्याची मिरवणूक काढायची आणि इतर वेळेस त्याच्याकडून काम करून घ्यायचे त्यासाठी पाठीवर पराणी खुपसायची किंवा रट्टे हाणायचे, अशी अमानुष वागणूक देण्यात काय मोठेपणा मिळतो तेच कळत नाही.

बैलांच्या शर्यतीवर, किंवा जलकट्टू या शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली तेव्हा प्राणिमित्रांनी त्याचे स्वागत केले. परंतु ग्रामीण भागात वर्षानुवर्षे बैलांची शर्यत भरवली जाते आजही अनेक भागात सरकारी कायदे खिशात घालून तेथील मूठभर नागरिकांना खुश करण्यासाठी या स्पर्धा होतात. पुणे मावळमध्ये जाधव कुटुंबीयांकडे साडे सोळा लाख रुपये किमतीचा मॅगी नावाचा बैल शर्यतीसाठी आणला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात बैलगाडा शर्यत फार महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. लांब निमुळती आणि टोकदार शींगे, उंच वाशींड आणि मध्यम लांबीचा आकर्षक बैल नजरेत भरतो. काळा काबरा,तांबूस किंवा सर्वांग सफेद बैल लोक आवडीने बाळगतात. लोक या शर्यतीत वर्षभर देखभाल केलेले आखीव रेखीव देहयष्टी असलेले बैल वापरतात. येथील सर्वसामान्य शेतकरी हा बैलगाडा शर्यतीचा दिवाणा असतो. एकदातरी आपण ही शर्यत जिंकावी अशी त्याची मनोकामना असते. बैलगाडा हाकणारा तरबेज असावा लागतो. चौखूर उधळणा-या बैलांना काबूत ठेवण्यासाठी त्याला कसरत करावी लागते. या शर्यतीत बरेच वेळा अपघात होतात कधी गाडीवानाला तर कधी बैलाला प्राण गमवावा लागतो.असे काहीही घडत असले तरी लोकांची आवड कमी होत नाही.
स्वतःची काही मिनिटे करमणूक व्हावी या साठी किंवा स्वतःचा
मान मरातब वाढवण्यासाठी अशा स्पर्धांच आयोजन केल जात.

कोकणात, सिंधुदुर्गात, कोकण किंग या नावाने बैलांची झुंज अनेक वर्षे सुरू आहे. कायदा खिशात घालून फिरणारी आणि पोलीस ठाण्याला मॅनेज करणारी नेते मंडळी या स्पर्धांचे आयोजन करतात. सरकारमध्ये हे नेते सहभागी असल्याने आणि या नेत्यांना दुखावून कोकणात राजकारण करता येणार नाही याची जाण असल्याने या नेत्यांना कोणी दुखावत नाही. ते करतील ती पूर्व दिशा. राणेंना सतत अंगावर घेणारा नेताही या स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होता म्हणूनच या बाबतीत राणे पुत्र काही बोलतील. राजकीय डावपेच लढवतील असे वाटले होते मात्र सर्वच पक्षातील नेते या स्पर्धा आयोजनात सहभागी असावे.
जर तुम्ही या मुक्या प्राण्यांवर प्रेम कराल तर जरी सिंहा सारखा प्राणी उपाशी असला तरी उपकार कर्त्याला विसरत नाही. आणि इथं जो आपल्या शेतीची नांगरट करतो आणि पोषण करतो त्या प्राण्याला जाणीवपूर्वक झुंजीत उतरवून त्याने समोरच्या बैलाला मारावे म्हणून त्याला उत्तेजक पेय देऊन किंवा हार्मोन्स देऊन हिंसक बनवले जाते. किंवा त्याच्या पार्श्वभागात काटेरी वस्तू ठेवल्याने तो वेदनेने हिंसक बनतो. कुठे आहे मूक प्राण्यांवर प्रेम? कुठे आहे भूत दया?

सिंधुदुर्गात, तळगाव या आडगावात मातब्बर नेत्यांनी कोकण किंग या नावाने बैलांची झुंज ठरवली होती. गंमतीचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जेथे आहे तेथून हे तळगाव हाकेच्या अंतरावर असूनही या येथे २८ मार्च २०२२ रोजी सकाळी झुंज असल्याची बातमी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचली पण पोलीस कार्यालयाला पोचली नाही अस म्हणणं नक्कीच हास्यास्पद ठरेल. याचाच अर्थ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस कार्यालयाला माहिती असूनही त्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. ही झुंज आयोजित करण्यात माजी मुंबई महापौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा वाटा होता. अक्षरशः हजारोंच्या संख्येने बघे उपस्थित होते. व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिले तर किमान पाच पन्नास माणसे या दोन्ही बैलांना मोठ्या आवाजात चिथावणी देत होते, त्यांच्या मागे काठ्या घेऊन फिरत होते. या झुंजीची मजा सर्व बघ्यांनी घेतली पण यामुळे एक निष्पाप मुक प्राण्याचा हकनाक बळी गेला. ही झुंज ज्या दोन बैलांमध्ये झाली त्यातील बाबू हा वेंगुर्ले येथील तर दुसरा अर्जुन हा बैल कुडाळ नेरूरपार येथील होता. या बैलांची झुंज. पाहण्यासाठी खेड्यापाड्यातील अनेक हौशी जमा झाले होते. झुंजीचा शेवट ह्दयद्रावक झाला. वेंगुर्ले येथील बाबू बैलाचा अंत झाला. कायद्याने ही स्पर्धा भरवणारे आणि प्रेक्षक यांना कदाचित शिक्षा होईलही पण उमद्या बाबू बैल परत येणार नाही. बाबूची ती झुंज अखेरची ठरली. रणांगणावर विरांनी देह ठेवावा तसा बाबूने निकराची झुंज देत त्यानी देह ठेवला. पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन आयोकांवर योग्य कारवाई करेल की हे प्रकरण विस्मरणात जाईल तो एक तो रामेश्वर जाणे.

Tags:

1 Comment

Comments are closed.