एक दिवस रेडिओ वरती सकाळी भावगीत लागलं होतं,

अरे मन मोहना रे, मोहनाsss
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही

ती भावगीतातील आर्त तान ऐकली आणि मन पस्तीस वर्षे मागचा विचार करू लागलं, या आठवणींच्या कप्प्यात नक्की काय दडलेले असेल आणि ते कधी आणि कोणत्या प्रसंगाने वर उफाळून येईल काही सांगता यायचं नाही. ऐक्यांशी ब्याएंशीचा काळ असावा. तेव्हा मी अवघा वीस वर्षांचा होतो, पण गरज म्हणून एका घरगूती क्लासमध्ये शिकवायला जात होतो. रोज संध्याकाळी सहा ते नऊ असे तीन तास शिकवले की दरमहा दिडशे रूपये मिळत. माझ्यासाठी ते अतिशय गरजेचे होते. या क्लासमध्ये मी गणित आणि विज्ञान आठवी ते दहावीच्या वर्गाला शिकवत होतो. क्लासमध्ये प्रत्येक इयत्तेस वीस पंचवीस मुले होती. दहा बाय बाराच्या खोलीत मुल दाटीवाटीने बसत. हे सर्व विद्यार्थी, गरीब किंवा मध्यम परीस्थिती असणाऱ्या घरातील होती.

पाचवी ते सातवीच्या वर्गांना वीस रूपये आणि आठवी ते दहावी वर्गांना तीस रूपये ट्युशन फी होती. क्लासचालक एका गिरणीत कारकून होते. शिकवण्याची आवड जोपासता चार पैसे अर्थार्जन हा त्यांचा उद्देश होता. या क्लासला माझ्या सारखाच एक तरूण मुलगा जो किर्ती कॉलेजमध्ये एसवाय ला शिकत होता तो काही विषय शिकवत असे. गंम्मत म्हणजे आमचे विद्यार्थी आणि आम्ही यांच्यात फार तर चार सहा वर्षाचे अंतर असेलत्यामुळे खरं तर एक वेगळा बंध किंवा स्नेह आमच्या विद्यार्थ्यांत आणि आमच्यात निर्माण झाला होता.

क्लास मध्ये नुसतं शिक्षण नव्हतं, कधी तरी स्पर्धा होत,तर कधी पिकनिक, हळदी कुंकू आणि वार्षिक स्नेहमीलन सुद्धा.आम्ही वज्रेश्वरी येथे दोन बसेस करून पिकनिक नेली होती तर एकदा एलीफंटाला मुलं घेऊन गेलो होतो, अंदाजे दीडशे विदयार्थी त्या क्लासमध्ये होते.

जेव्हा अशी पिकनिक जाते तेव्हा मूल निवांत असतात,त्यांना हुंदडायला मिळत. मुख्य म्हणजे शिक्षकांनी इथे उगाचच नको त्या शिस्तीचा बडगा उगारु नये असं मुलांना वाटत आणि ते स्वाभाविक असतं. एरव्ही ही मुलं आमच्या बरोबर अवघी एक ते दीड तास असत पण अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटी वेळी मुलं जास्त वेळ आमच्या सोबत असतं त्यामुळे त्यांना समजून घेण्याची ती एक संधी असे. अर्थात उलट पक्षी मुलं ही याच वेळी शिक्षकाची पारख करत. मूल घरापासून दूर असल्याने मोकळी असत, थोडा व्रात्यपणा चाले, गाणी ,मस्करी, गंमती जमती सगळच चाले. मोठी मुलं आणि मुली ही संधी साधून मैत्री करत. कधी कधी त्यांची ही मैत्री मग पिकनिक संपली तरी अखंड चाले. एकमेकांना गृहपाठ देतांना त्यातून चिठ्ठी चपाटी दिली, घेतली जाई. मी ग्रामीण भागातून तिथे आल्याने याची माहिती असली तरी हे किती खोल रुजलं असावं याची माहिती असण्याच कारण नव्हतं. मुख्य म्हणजे माझ्यासाठी हा क्लास हे अर्थार्जनाचं एक साधन होत. अर्थात या वयात प्रेमाची भावना मलाही असाविच फक्त तोवर ती उफाळून आली न्हवती इतकेच.

त्या वर्षी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात एका मुलीने “अरे मन मोहना रे मोहनाsss साधी भोळी मीरा तुला कळली नाही हे गाण नृत्य आविष्कार करत सादर केलं होतं, त्याला क्लासच्या आलेल्या पालकांनी Once More दिला होता त्यामुळे ते गाणं माझ्या चांगलं लक्षात राहीलं होतं. पण वार्षिक स्नेहमीलन संपलं आणि क्लासची प्रिलीम किंवा सराव परीक्षा सुरू झाली आणि माझ्या कामाच्या धांदलीत मी ते स्नेहसंमेलन विसरून देखील गेलो. एक दिवस मला आमच्या क्लासच्या मालकांनी निरोप पाठवला. “सर तुमचा क्लास सुटला की मला येऊन भेटा.” मी ज्या मुलाने निरोप पाठवला त्याला होकार कळवला आणि क्लास सुटल्यावर त्यांना भेटायला गेलो. त्यांनी एक वही माझ्या समोर धरली आणि म्हणाले, “सर ही वही उघडून पहा.” मी उत्सुकता म्हणून वही उघडून पहिली. त्यात इक चिठ्ठी होती.”चिठ्ठी ! ” मी प्रतिक्रिया दिली. “हो,सर ती वाचा.” मी चिठ्ठी वाचली, “प्रिय निला, मला तुला भेटावेसे वाटते, सारखी तुझी आठवण येते, स्वप्नातही तूच दिसतेस, मी तुझ्या शिवाय राहू शकणार नाही. मी तुला आवडतो ना? लवकरच माझं ग्रँज्युएशन पूर्ण होईल,मला नोकरी लागेल मग आपण लग्न करु, पण तो पर्यंत मला विसरणार तर नाहीस ना? वगेरे, मी ती चिठ्ठी वाचून त्या सरांच्या हातात दिली.”सर! ही निला कोण? आणि हा ‘तुझाच विकास’ कोण?” माझा प्रश्न, मी वर्गात कधीतरीच हजेरी घेत असे, विज्ञान आणि गणित या विषयांना असाच एक तास पुरत नसे, त्यामुळे वेळ वाया जाणार नाही असं नियोजन मी करत असे.

हा निर्णय मी माझ्या पुरता पाळत होतो. “अहो, सर ही निला म्हणजे आमच्या शेजारच्या नाडकर्णिंची कन्या.अगदी काल परवा पर्यंत स्कर्टवर दारात फिरत होती, आणि हे आपले पारकर सर. तुमच्या सारखंच शिक्षण सुरू आहे, त्याला थोडी पैशांची मदत होईल म्हणून मी ठेवल. असं वागेल असं कधी वाटल नव्हते.”, क्लास चालक म्हणाले. त्या चिठ्ठीतल अक्षर मात्र खरोखरच सुंदर होत. “बंर मग!” मी त्या पारकर बद्दल आश्चर्य व्यक्त केले. एक दोन वेळा निलाच्या वडीलांना तो तिच्याशी बोलतांना दिसला. त्यामुळे त्यांनी तिच बाहेर फिरण बंद केल तर त्या दोघांनी एकमेकांना चिठ्ठी लिहिणं सुरू केलं. नाडकर्णीनी स्वतः तीच्या शाळेची बॅग पहिली तेव्हा ही चिठ्ठी सापडली, नाडकर्णी म्हणाले, “सर मुलं क्लासला काय करतात जरा लक्ष द्या. नाहीतर तिचा क्लास बंद करावा लागेल.” “म्हणून मी तुमचा सल्ला घेण्यासाठी बोलावलं.”, आमच्या क्लासचे मालक म्हणाले. मी काय त्यांना सल्ला देणार? नशीब मी कोणाच्या प्रेमात पडलो नव्हतो नाहीतर बिचारे मालक, कोणाला विचारणार होते?

मीच त्यांना उलट प्रश्न विचारला,”सर,मग आता तुम्ही काय करणार? ते गंभीर चेहरा करत म्हणाले,”शाळेचे शेवटचे तीन महिने अतिशय महत्वाचे आहेत आता पारकर सरांना काढून टाकणं जमणार नाही. तेव्हा, तुम्ही त्यांना समज द्या, त्यांना सांगा हे अस क्लासच्या मुलीवरच प्रेम करणं बरोबर नाही, शिवाय त्यांचही शिक्षण आजून सुरूच आहे, एवढं सांगाल ना?” “सर मी सांगू ! माझ ऐकतील ना ते?”
“हो हो, नक्की ऐकतील,तुमच्या विषयी त्यांना आदर आहे.” मी, “ठीक, करतो प्रयत्न”, म्हणत मी तात्पुरती सुटका करून घेतली.

चार पाच दिवसांनी मला संधी मिळाली, त्या दिवशी पारकर सर उशीरा आले, मुलांनी गडबड करू नये म्हणून मी त्यांच्या वर्गावर इंग्रजी ग्रामर शिकवत होतो. त्यांना पाहताच मी वर्गाबाहेर येऊ लागलो तर ते म्हणाले सर, तुम्ही Tense घेताय ना, करा पूर्ण, अर्ध तुम्ही आणि अर्ध मी शिकवलं तर मुलं confuse होतील. मी तुमचा पीरड घेईन. मी तेव्हाच त्यांना म्हणालो, “सर, आज क्लास सुटला की थोड थांबा, तुम्हाला मला भेटायच आहे.” त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी खुणेनेच नंतर बोलू सांगून संवाद संपवला.

क्लास सुटल्यावर त्यांची भेट घेतली,”पारकर सर, तुमचं कॉलेज काय म्हणतंय?” पारकर हसले, “तुम्ही मला अहो जाहो का करता? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. कॉलेज ठीक आहे, तीन वाजेपर्यंत लेक्चर संपतात, घरी पोचेपर्यंत पाच वाजतात, कधीतरी उशीर होतो.पण सर तुम्ही काही तरी सांगणार होतात!” “पारकर, मी काय काय म्हणतो जेव्हा आपण क्लासमधे शिक्षक म्हणून काम करतो, आपली जबाबदारी वाढते, मुलांचे पालक आपल्याकडे वेगळ्या नजरेने, आदराने पाहतात,बरोबर ना?” “सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण हे तुम्ही मला का सांगताय?” “पारकर चाललाय तो प्रकार योग्य नाही.” मी प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणालो. त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं, “कसला प्रकार? मी नाही समजलो.”
“सर! प्लीज पेडगावला जाण्याचे नाटक थांबवा, तुमचं आणि निला नाडकर्णीच जे काही चाललयं ते तिच्या वडिलांना समजलय, त्यांनी मोठ्या सरांकडे तक्रार केली आणि सांगितलय, हे तात्काळ थांबलं नाही तर ते मुलीचा वर्ग बंद करतील. सर शेवटी आपल्या क्लासची बदनामी होतेय, कळतय ना तुम्हाला? , पालक आपली मुले ,मुली पाठवण बंद करतील.”

ते माझ्यावर रागावले, “मोठ्या सरांनी मला सांगण्यासाठी तुम्हाला नेमलय का? ते परस्पर नाही का सांगू शकत? आणि हा आमचा खाजगी प्रश्न आहे त्यात मोठ्या सरांनी दखल का द्यावी?” “सर, तुम्ही आणि निला क्लासच्या वेळी चिठ्ठ्या एकमेकांना देता म्हणून मोठे सर तुम्हाला म्हणालेत.” “ठीक आहे, मला काय करायच ते मी करीन.” म्हणत निघून गेले. त्यानंतर, एक दिवस पारकर आणि इयत्ता नववीमध्ये शिकणारी निला नाडकर्णी घरातून पळून गेली. ती दिसायला खरेच साधीच होती आणि हा प्रकार घडे पर्यंत भोळी नसली तरी सरळमार्गी दिसत होती. दोन दिवसांनी त्या दोघांचा शोध लागला. नाडकर्णींनी मुलाला चांगल बदडून काढलं. या प्रकाराने क्लासचं वातावरण ढवळून निघाले, मुलं हळू आवाजत या बाबत चर्चा करू लागली. या सर्व गोष्टींना विराम देण्यासाठी मोठ्या सरांनी पारकर सरांना तडकाफडकी काढून टाकले. या प्रकारा बद्दल आजूबाजूला बरीच चर्चा झाली. पालकही येऊन भेटून गेले. काही पालकांनी सरांना गोड धमकीच दिली,”आमच्या मुलीला क्लास ला पाठवावं की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल”, क्लासमध्ये नवीन मुलगी शिकवायला आली. आठ पंधरा दिवसात हळूहळू सगळ शांत झालं. क्लास सुरळीत सुरू झाला. या प्रकारानंतर मी मात्र जास्त सावध झालो. काही दिवस निला क्लासला यायची बंद झाली होती. सरांनी नाडकर्णिंची समजूत घातल्यावर ती येऊ लागली. इतर मुली तिच्या पासून दूर बसत,जणू तीने फार मोठा गुन्हा केला असावा. मात्र निलाने कोणाच्याही टिकेकडे लक्ष न देता अभ्यास केला. पूढील वर्षी निला फस्ट क्लास मिळवत एस. एस. सी. उत्तीर्ण झाली. तीने पेढेही वाटले.

माझ इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी एका कंपनीत कामाला लागलो. सरांचा आग्रह होता की मी वेळ एँडजेस्ट करून शिकवाव पण मला शक्य झालं नाही. कालांतराने मी ते शहर सोडून दुसरीकडे रहायला गेलो. क्लासमध्ये घडलेला प्रसंग आणि निलाला विसरून गेलो. चार पाच वर्षे कंपनीत काम केल्यानंतर नोकरीही बदलली आणि आवड म्हणून शिक्षकाची नोकरी स्विकारली. वाढत्या वयाबरोबर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मुख्याध्यापक झालो.

एक दिवस माझ्या कार्यालयाबाहेर एक व्यक्ती उभी होती. नवीन प्रवेश सुरू होते त्या संबधाने त्याला भेटायच असावं अस मला वाटलं. मी कामात व्यस्त नाही पाहून ती व्यक्ती कार्यालयातून माझ्या केबीनमध्ये आली आणि म्हणाली, “सर मला ओळखलत का?” मी आठवण्याचा बराच प्रयत्न केला पण प्रवेशासाठी अनेक व्यक्ती भेटून जातात त्यामुळे सगळ्यांना लक्षात ठेवण शक्य नसत. ते कोण हे मलख काही केल्या आठवेना म्हणून मी मानेनच नकार दिला.
“सॉरी पण मी आपल्याला नाही ओळखल?” “सर मी माळवदकर, भांडूपला तुम्ही क्लास मध्ये शिकवत होता तेव्हा तुमच्या क्लासला होतो निलाच्या वर्गात. तुम्हाला निला नाडकर्णी आठवतेय ना?” “कोण निला?” “अहो सर,तुमच्या क्लासमध्ये होती, वार्षिक स्नेहसंमेलनात तिने डान्स केला होता बघा, अरे मन मोहना —-‘ मला अचानक क्लिक झाल, “यू मीन निला नाडकर्णी जी पारकर सरांच्या प्रेमात पडली होती ती!” “सर अगदी बरोबर,तुम्हाला आठवल ना,तिच्या बँचमध्येच मी,सचीन गावड, आम्ही होतो.”
मी त्याला शेकहँड केलं. “तू माळवदे, म्हणजे किशोरच ना? बस चहा मागवतो ” “नको सर,,चहा नको.आजही आम्ही तुमच्या लक्षात आहोत,ऐकून बर वाटलं, मुलाच्या प्रवेशासाठी आलो होतो, केबीनवर तुमच नाव पाहिलं आणि राहवल नाही म्हणून म्हंटल तुमची भेट घ्यावी. सर तुम्हाला भेटून आणि ते ही पून्हा शिक्षक म्हणून भेटतांना बरं वाटल.”
मी त्याच्यासाठी चहा मागवला गप्पा मारल्या, तो महानगरपालिकेत कामाला होता आणि परेरला रहात होता. ऐकून आनंद झाला. एवढ्या वर्षांनी तो मला विसरला नव्हता याच अप्रूप होतच. मला पुन्हा एकदा निला नाडकर्णी ची आठवण झाली, “किशोर मग तुमच्या बँचची निला कुठे असते आणि तिने पारकर सरांशी लग्न केलं का?” बऱ्याचदा मुलं मोठी झाली की हे अस तारुण्यातील प्रेम विसरून जातात. प्रौढ झाली की पुन्हा नवीन मित्र नवीन पार्टनर शोधतात ही माझी माहिती होती म्हणूनचं मी किशोरला विचारलं. “सर निलाने पारकर सरांबरोबर लग्न केलं.ते मुंबई महानगर पालिकेत आहेत आणि निला टिचर आहे ठाण्याला. नुकतंच तिला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय.”त्याने माहिती पुरवली. “अरे वा! त्यांनी दोस्ती निभावली, त्यांचा वासू- सपना नाही झाला, ऐकून आनंद वाटला.” अस वास्तवात खूप कमी वेळा घडतं, माझी उत्सुकता चाळवली,”किशोर,ती तुझ्या संपर्कात आहे का रे?” मी विचारलं. “हो तर! सर आम्ही फक्त क्लास मेट नव्हतो तर एक शाळेत, एका वर्गात होतो,आम्ही पंधरा वीस जण आजही एक मेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत.” त्याचे शब्द ऐकून आनंद झालाच पण निलाशी बोलाव अस मनी वाटलं, तिने प्रेमाचा अर्थ नीट कळत नसतांनाही केलेलं प्रेम जपलं, निभावल ऐकून तिच्या विषयी आदर वाढला.किशोरने मला तिचा मोबाईल नंबर शेअर केला.
पुढील रविवारी मी निवांत वेळी फोन केला, “हॅलो ! कोण बोलतंय? ” पलीकडून आवाज आला, होय तोच थोडा कीण कीण आवाज. “मी बोलतोय”, मी नाव सांगितलं.तिची नावाने ओळख पटेना, मध्यंतरी तीस पस्तीस वर्षाचा कालावधी पाठी पडला होता. “निला मी साध्या भोळ्या मीरेचा शिक्षक बोलतोय, आठवतं ना?” “अय्या सर तुम्ही, मी खरंच नव्हतं ओळखलं, पण आता लक्षात आलं,स्वारी सर, माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? मी अचानक किशोर माळवदेशी झालेल्या भेटीबद्दल तिला सांगितलं आणि तीच अभिनंदन सुद्धा केल. कृष्णाच्या मीरेला तीच प्रेम वास्तवात मिळवता आलं नव्हतं पण कालियुगी मीरेन ते संकटावर मात करत मिळवलं होत.तीच करावं तेवढं कौतुक थोडंच होत.ती शिक्षीका तर झालीच होती पण विविध शैक्षणिक उपक्रमाबद्दल तिला ठाणे महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मी तिचं अभिनंदन केलं. मी पारकरची चौकशी केली, संडे असल्याने तो घरीच होता. मी त्याच अभिनंदन केले. त्यालाही आनंद झाला.ते दोघे प्रेमाच्या परीक्षेत यशस्वी ठरले हीच कौतुकाची गोष्ट होती. मीरेला तीचा कृष्ण मिळाला होता. जर माळवदकर माझ्याकडे आला नसता तर ही प्रणय कथा खरी झाल्याचं मला कळलं नसत पण काळाचा महिमा अगाध असतो हेच खरं.

Tags:

1 Comment

Comments are closed.