चाळशी नंतर स्त्री बायको उरत नाही
तिच्या रक्तात भिनत जाते तीची आई
ती होते मुलांची हक्काची प्रेमळ दाई
या दाईविना मुलांना पर्यायच उरत नाही |

मुलांना कसं समजवावं फक्त तिलाच जमतं
तीच नीट जाणते तिच्या पिल्लांना काय सलतं
त्यांच आतल्या आत झुरणं तिलाच कळतं
त्यांना कुणी बोललं तरी तीच रक्त जळतं |

आता ती असते कर्तव्य दक्ष चौकस गृहिणी
मुलांच्या भविष्याची चिंता रोज तिच्या मनी
प्रसंगी दरडावून किंवा हळुवार सांगते हक्काने
आणि दुसऱ्या जवळ सांगते माझी मुलंच गुणी  |

त्यांच्या जगण्यात ती स्वतःला विसरून जाते
त्यांच न्यून त्यांच्या व्यथा स्वत:च्याच माथी घेते
ती जागृत राहून त्यांच्या स्वप्नांना आकार देते
त्यांच्याकडून इप्सित साध्य करत पार नेते  |

मुले मोठी झाली की पहिली चिंता तिला लागते
कधी कधी मग ती मुले नसतांना स्वतःशी बोलते
स्वतःच्या विवंचना त्या निर्गुणाला एकांती सांगते
मुलांचे सुखी संसार मनी आठवत झोपेतच हसते |

आई होते आजी, आता त्यांच्या बाळांची दाई
ती थकली, तिला हवी विश्रांती कुणी म्हणत नाही
मुलाचं बाळ, दुडदुड धावताना पाहून ती चिंब न्हाई
आता जणू ती साऱ्या कुटुंबाची प्रेमळ माई |

आई या शब्दांचे मोल ज्याना सुखात कळत नाही
त्यांनी मनी चिंतन करावे, करू नये शब्दाची झिलई
कुटुंबाची जबाबदारी संकटात पेलते ती असते आई
संबंधांचा प्रेमळ, कोमल दुवा जपते ती तुमची आई |

मित्र हो, आई शब्दाला उपमा अलंकार मजजवळ नाही
आई ईश्वराचे रूप की प्रेमाची उबदार रजई मज कळत नाही
आई माझा प्राण, आई हृदयीचा राम, जिवा आराम
आई संजीवन नाम, चैतन्याचे भान, आई अंतिम धाम |

Tags:

7 Comments

Comments are closed.