आठव आली मज बालपणीची
अन् सवांगड्यांची कितीक वर्षांनी

पाहता मैदान, चिंचेचे ते झाड
नजरेचा आड झाले दृश्य जागे

फांद्या फांद्यावरी लपले सवंगडी
राज्य माझ्यावरी धावपळ माझी

सुरपारंब्या खेळूनिया धाप
लागे गाढ झोप नाही घोर जीवा

हूतूतू खेळूनी मळती कपडे
घरी मार पडे क्षिती नसे त्याची

घालुनी लंगडी मोडती पाय
आनंदे उपाय अन्य काय बरे?

आवडे लगोरी चिंधीचाच चेंडू
खरेखोट्याचे राज्य आम्ही मांडू

विटी दांडू रस्त्यातला खेळ
फुटे कपाळ परी नाही खंड

पाडूनिया गद खेळलो गोटया
डावात बदल खेळू आट्या पाट्या

फळीची ती ब्याट वर्गणीची चेंडू
हरवता रानी डावा साठी भांडू

शोधाशोध भारी आणि बुडे दिस
उशीर घरास छडीचा प्रसाद

ओतता पाऊस स्तब्धता खेळास
नाव पाण्यामध्ये निघे दिमाखात

दिवाळी फटाके हातांची वाट
फुसके फटके जखम हातास

कधी मन धावे गार गार थंडीत
बोरीच्या झाडाखाली जमते रंगत

शेकोटीची मजा चोरीचा हुरडा
पडे गराडा, भोवती आगीच्या

मकर संक्रांत पतंग हातात
कटला पतंग जाई भरारत

असे जाता दिन येतसे परीक्षा
अभ्यासाची दिक्षा आम्हा ना रुचे

तरीही वाढलो खाउनी मार
प्रेमाचा व्यापार आई संगे

आता आम्ही बाप नियतीचा शाप
मुलांवर उगा होते तापाताप

Tags:

3 Comments

  1. छान.थेट साठ वर्षांपूर्वीच्या काळात नेलेत.भारी वाटलं.चेहर्यावरच्या रेषा भराभर बदलल्या.

    1. धन्यवाद,काही तरी हलक फुलक लिहण्याचा प्रयोग करून पहातो.तुम्हाला आवडला आनंद आहे.
      आडनावे आणि गमतीजमती लेख तुम्ही वाचला का?कळवा .

  2. सर कविता वाचून क्षणात बालपणाच्या भूतकाळात हरवून गेलो आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि आईच्या प्रेमळ भाषेत खालेला मार ाआईच्या ाआठवणीने मन तितकेच व्याकुळ झाले.
    सर एकदम झकास कविता वाचकांना बालपणात हरवून करणारी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *