आडनावे आणि गमती जमती

आडनावे आणि गमती जमती

मी नववी किंवा दहावी इयत्तेत असताना आम्हाला पु.लं.च्या बटाट्याची चाळ या पुस्तकातील एक परिच्छेद, ‘भ्रमंती’ या नावाने होता. हा भाग अनेकांच्या वाचनात आला असावा . आमच्या मराठी विषय शिकवणाऱ्या काळे मॅडम हा धडा शिकवतांना थोड्या थोड्या वेळाने माझ्याकडे पाहत. त्यांनी माझ्याकडे पाहिले की इतर मुले माझ्याकडे पाहत जणू भ्रमंती मधले कोचरेकर मीच की काय. त्यात त्रिलोकेकर,

चितळे मास्तर यांच्या मधले संवाद इतके प्रभावी होते की हास्याचे फवारे वर्गभर पसरत. तो धडा शिकवून झाल्यावर लहर येईल तेव्हा बाई वर्गाचे वाचन घेत आणि लबाड मुले जाणिवपूर्वक “भ्रमंती” वाचनासाठी निवडत. वाचन करणारा त्यातील तपशील वाचताना मुद्दाम थांबून माझ्याकडे पाही आणि बाई रागावल्या की पूढे वाचे. पू.लं.नी आपल्या लेखनातून सामान्य माणसाच्या वर्तनाचे असे काही पुल बांधले की या पुलावरून वाचकांनी पू.लं.ना डोक्यावर घेतले.

कोकणातील माणसाच्या बोलण्यातील लकबी त्यांनी अचूक हेरल्या आणी बरव्या, चिंत्या अशी टोपणनावे रूढ केली. मी वसई कॉलेजला गेलो तिथे रमेश कुबल नावाचे प्राध्यापक होते. तरुण वयात त्यांनी प्रायोगिक रंगमंच गाजवला होता.पु.लं.यांचा पाठ वाचता वाचता त्यांना अचानक पुलंचे भ्रमंती आठवले आणि त्यांनी पुन्हा त्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या आणि मला वर्गात काही दिवस बसणे कठीण केले. मित्र काही संदर्भ नसताना पूल भ्रमंती मधील “रस्सा पिऊन रस्ता तृप्त झाला”  किंवा “त्रिलोकेकर यांनी वही काढून निघण्याची वेळ नोंदवली.” अशी काहीही टिप्पणी करून मुले हसत असत, मी ही मनावर न घेता त्यांना दाद देत असे. म्हणतात ना “मरता क्या नही करता?” तुम्ही विरोध केला तर तुम्हाला जाणीव पूर्वक टार्गेट करणार त्या पेक्षा दुर्लक्षित करण एकदम योग्य. शैक्षणिक प्रवास सुरु असताना जे शिक्षक मला मिळाले त्या प्रत्येक शिक्षकांनी तेव्हा कोचरेकर नावचं बारसं केलं, कोणी कोचरे म्हणून, तर कोणी कोचर असे तर काही महाभागांनी कचराकर  अस सुधारित आडनाव मला दिले. येन केन प्रकाराने मी किंवा माझे आडनाव पूल कृपेने चर्चेत आले हेच खरे. कालांतराने चंदा कोचर प्रकरण उजेडात आल अन्यथा मी ही या चंदा कोचर कुटुंबातीलच असावा असा गैरसमज नक्कीच झाला असता.

या आडनावाची खरच गम्मत असते डुकरे हे आडनाव कोकणात आहे. कोणी तरी म्हणाले की ह्या डुकरेंच खर नाव सामंत पण एकदा त्यांच्या कुटुंबातील कोणी पूर्वज डुकराच्या शिकारीला गेला, बंदुकीच्या गोळीने डुक्कर जखमी झाला पण मेला नाही, डुकराने ह्या अर्धवट शिकऱ्याची पाठ घेतली,जवळ झाड मिळाले म्हणून बचावला तोवर डुकराने आपल्या शिंगाने त्याला जखमी केले म्हणून त्यांचे नाव डुकरे पडले.

कोकणात बऱ्याचदा त्याच्या मूळ आडनावाचा उल्लेख न करता गावाच्या नावावरून आडनाव घेतले जाते. आमचे मूळचे आडनाव प्रभू परंतु कोचरे हे आमच्या पूर्वजांचे मूळ स्थान असल्याने प्रभू ऐवजी कोचरेकर आडनाव रूढ झाले. तरीही माझ्या चुलत्यानी त्यांचे आडनाव प्रभू कोचरेकर केले. त्यामुळे माझ्या सख्ख्या चुलत्यांची आडनावे वेगवेगळी लावली गेली. एका चुलत्यांचे प्रभू, दुसऱ्यांचे प्रभुकोचरेकर तर तिसऱ्यांचे कोचरेकर. कधी कधी कोचरेकर आडनावावरून गैरसमज व्हायचा. एकदा असाच एका सभेला गेलो असता,एक गृहस्थ येऊन भेटले. ते म्हणाले आम्ही आचरेकर,तुम्ही कोचरेकर म्हणजे आमचे पाहुणेच की, मी हो हो म्हणालो,उगाच नकार देऊन आपलेपणा का घालवा? नंतर समजले ते त्यांच्या नात्यातील कोणी स्थळ असल्यास सुचवणार होते. त्या नंतर मी माझी ओळख, कोचरेकर, कुडाळदेशकर गौड ब्राह्मण अशी करून देऊ लागलो, न जाणो कुणी स्थळ घेऊन तयार असावे!

गावाच्या नावा वरून आडनाव लावलेले असले की आपुलकी दाखवायला बरे. एकदा गंमत झाली माझ्या कामानिम्मित मी भायखळा येथील पालिका कार्यालयात गेलो होतो. तिथे मी पाहिले की एका केबीनवर वराडकर नाव होते. ते वैद्यकीय अधिकारी होते, मी ते पाहिले आणि तेथील क्लार्कला म्हणालो “तुमचे साहेब माझे गाववाले आहेत, मी भेटू का?” त्यांनी त्या साहेबांना भेटून माझा निरोप सांगितला. मी त्यांना भेटायला गेलो नमस्कार,चमत्कार झाला. मी माझे काम त्यांना सांगितले आणि म्हणालो “मी वराड गावचा आहे.” ते हसले आणि म्हणाले, “माझे नाव वराडकर आहे पण मी फक्त गावाचे नाव ऐकले आहे. आमचे पूर्वज वराडला राहात असावे. तुम्ही ओळख सांगितली आता तुमचे काम मी करतो पण मी अद्यापि गाव पाहिले नाही.” माझे काम झाले पण फजितीही झाली.

या पेक्षा गंमतीदार प्रसंग माझ्या मुलाच्या जन्मवेळी झाला, गाडगीळ नावाच्या डॉक्टरांनी माझ्या पत्नीला तिचे नाव विचारले तिला या पूर्वी या आडनावा मुळे अनेकांनी तुम्ही आमचे गाववालेचअसे सांगितल्याने, ब्राह्मण असल्याचे कळण्यासाठी प्रभू कोचरेकर असे आडनाव तिने सांगितले.त्यामुळे मुलाच्या जन्म नोंदीत  नावा सोबत प्रभुकोचरेकर आडनाव लागले,तर मोठ्या मुलीचे आडनाव कोचरेकर लागले. दोन्ही मुले एकाच शाळेत शिकत होती. मुख्याध्यापकांनी मला बोलावून या आडनावातील गोंधळाविषयी विचारले. मी जे त्यांना सांगितले ते ऐकून त्यांना हसू आवरेना. आपण ब्राह्मण आहोत हे कळवण्याचा कोण हा अट्टाहास? शेवटी महत प्रयासाने मला आडनाव बदलून मिळाले.पूल नी आमचे  काही कर्तृत्व नसतांना त्रिखंडात आडनाव जगजाहीर केले.

मध्यंतरी “कोचर” नाव प्रसिध्दीस आले आणि माझे आडनाव पूर्ण न पाहता चंदा कोचर तुमच्या कोण? असेही मला दोन महाभागानी विचारले. अर्थात या आडनावाचा धसकाच वाटू लागला. माझे सहकारी मित्र, हे कॅथलिक आहेत त्यांचे नाव “Frutydo”,हे नाव कसे उच्चारावे इतके नक्कीच कठीण नाही मात्र या मित्राला कोणी फ्रूटाडो, कोणी फ्रुट्यांन्टो, कोणी फ्रुत्याडो असे वाटेल त्या नावाने हाक मारत.त्याने अनेक वेळ त्याचे नाव कसे उच्चारले जाते ते सांगितले तथापि कोणीही त्याचे आडनाव योग्य उच्चारत नव्हते शेवटी त्याने कोणालाही दुरुस्त करायच्या भानगडीत पडायचे नाही ठरवून टाकले.

वाघ आडनाव धारण करणारी माणसं भित्री असली तर काय म्हणाल? कोल्हे आडनावाची माणसे धुर्त असावी अस वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतू कोल्हे हवालदार एअरपोर्टवर ड्युटीवर असतानाच त्यांना चोराने हस्तचातुर्याने चितपट केलं तर तो बिचारा कोल्हे कोणाजवळ तक्रार करेल. कदम नावाच्या आडदांड माणसाचा आवाज अतिशय कोमल लागला तर कुणीतरी म्हणेलच ना “अहो कदम तुमच्या आवाजात अजिबात दम नाही.” उंचापुरा बलदंड माणूस योगायोगाने घोडे नावाचा असावा हे कसं वाटतं! आणि केवळ तो बलदंडच नव्हता तर त्याची पावले लांब लांब पडत त्यामुळे त्याच्या बरोबर चालताना आपण कासवे बनत असू आणि तो मात्र आडनावा प्रमाणे टापा, सॉरी, पावले टाकून निघून जात असेल तर!

शेक्सपिअर उगाचच म्हणून गेला “नावात काय आहे?” उंटवाले आडनावाच्या माणसाची मान बाहेर आलेली आढळली तर ते आडनाव त्याला सार्थ की नाही. गीते आडनाव ऐकल्यावर काय वाटत? पण यांचा आवाज ऐकल्यावर यांनी त्यांच्या “मधुर” आवाजात गाण न गायलं तरच बरं. नाव दांडेकर आहे म्हणून घराबाहेर पडताना, हाती काठी किंवा सोटा घेतलाच पाहिजे असच काही नाही आणि आडनाव अस्वले आहे म्हणून कोठेही कोट्या करून दाद मागण्यासाठी हात पूढे करत “द्या टाळी”अस म्हंटल पाहिजे अस ही नाही. चिखले आडनावाच्या माणसाचा पेहराव शुभ्र शर्ट आणि आकाशी रंगाची पॅन्ट पाहिली तर हे तर चिखलातल कमळ अस वाटल तर वावग काय? लुकतूके

आडनावाची व्यक्ती अगदीच किरकोळ असावी यात ही संकेत असावा. गोरे नावाची व्यक्ती रंगाने गडद सावळी असावी आणि काळे काकू जवळ आल्यावर भांड्यातून प्रकाश परावर्तित व्हावा एवढा गोरा रंग असावा. पंडित आडनावाची व्यक्ती अगदी सामान्य बुद्धीमत्ता असणारी असावी.पंडित आडनावाच्या कुटूंबात दुर्दैवाने कमी बुद्धीच्या मुलाने जन्म घ्यावा किंवा पंडित नावाच्या व्यक्तीने सगळीकडे आपले पांडित्य दाखविण्याचा हास्यास्पद प्रयत्न करावा याला तरी काय म्हणावे!

पुलंनी जेथे तेथे विसंगती टिपण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला आणि मराठी मनाला हसवण्याचे काम केले. फुगे आडनाव असणारी व्यक्ती रागाने सारखी फुगत असेल तर समजू शकतो मग ढगे यांनी काय करण साजेसं असेल.मेघे साहेबांनी ढगाकडे पहात “मेघा रे मेघा रे” म्हटलं आणि तितक्यात कोणी मेघा येऊन तिने बिजलीगत येऊन साहेबांचा समाचार घेतला तर मेघेंचा चेहरा पावसाळ्यातील मेघासारखा, नव्हे ढगासारखा काळा पडायचा.

आमच्या वरिष्ठ कार्यालयात डोके नावाचे वरिष्ठ लिपिक होते. एखाद्या सरकारी परिपत्रकातील मूद्याचा ते  विचित्र अर्थ काढायचे आणि तो नियम आहे असे म्हणत इतरांना त्या नियमात कसे बांधता येईल याचा कसून प्रयत्न करायचे.  शेवटी ज्यांना त्यांच्या अमंलबजावणी केल्याने त्रास होत असे ते त्यांची तक्रार वरिष्ठांना करत. वरिष्ठ मग गंमतीने म्हणत अहो त्या परिपत्रकात आहे त्याच अनुपालन करा तुमच डोक का म्हणून लावता? आमच्या कार्यालयात अशा अनेक वल्ली होत्या त्या आपले आडनाव सार्थ वाटावे असे वागण्याचा खटाटोप करत.

भोळे आडनाव असले तरी ही माणसं बरीच शहाणी असतात आणि समोरच्या माणसाला वाक्यागणिक चूका दाखवण्यात माहीर असतात आणि शहाणे आडनावाची माणसे शहण्यासारखी वागतीलच असं ही नाही जी गोष्ट जेव्हा चार चौघात बोलू नका अशी बायकोने केलेली सूचना ते सहजच विसरतात आणि मित्राला विचारतात, “तुमचा संजू पास झाल्याचे कळाले, अभिनंदन! पण आमची ही म्हणत होती की त्याला पास क्लास आहे, खरं का?” त्या माणसाला अभिनंदन केल्याबद्दल आभार मानावे की चार चौघात वाच्यता केल्याबद्दल खरपूस समाचार घ्यावा हेच कळत नाही.  खुस्पे आडनाव लावल म्हणून दुसऱ्या लोकांच्या चर्चेत, भांडणात नाक खुपसले पाहिजे असे नाही पण आडनाव सार्थ ठराव म्हणून असेल पण खुस्पे त्यांचा विषय नसला तरी बोलणारच मग कधी कधी तोंड घातल्या बद्दल  अपमान सहन करावा लागतो पण खुस्पे ते सहन करतात. काय करणार, “आदमी आदत से मजबूर जो है।” रास्ते, हस्ते, अशी कितीतरी नावे आपलं नाव आणि नावाची आब राखावी म्हणून रास्त ते बोलत असतात,दुसरा चूकू नये याची चिंता रास्त्यांना असते आणि ते आठवण करून सांगतात अगदी,खरं आणि रास्त तेच बोललो. समोरच्या माणसाला त्यांना विचारावे असे वाटते,”साहेब तुम्हाला कोणी झक मारायला सांगितली आमच्या भाषणात.”  पण तो नेमस्त असतो म्हणतो, “त्यांनी गाय मारली मी वासरू का मारू?”

खरे आणि खोटे यांचेही तेच. खरे एखादी कादंबरी,एखादे नाटक यांची समीक्षा करायची ठरवतात तेव्हा ते एवढे खरे बोलतात की लेखक किंवा निर्मात्याच्या  अंगावर आता कापडं  शिल्लक ठेवणार की नाही याची चिंता वाटू लागते आणि खोटे अगदी या उलट विजू खोटेना विचारून पहा कितीही ठरवले तरी आयत्या वेळेस जीभ घात करते आणि सत्य,खरे तेच बाहेर पडते. वतनदार माणसाकडे स्वतःच्या घर बांधण्या एवढी जागा नसावी आणि इनामदाराने त्याला कोणीतरी दिलेली इनाम मिळकत इमानदारीत फुंकून टाकलेलं असते, अशी कितीतरी आडनावे सांगता येतील ज्या नावांच्या व्यक्ती त्या नावाशी फारकत घेतल्या प्रमाणे वागतात.

देव आडनावाच्या माणसाचे वर्तन कसे असावे?  त्यांनी येता जाता दुसऱ्याच उपमर्द केला, त्यांना पिडा दिली तर त्या देवाकडे समाज कसे पाहिलं?  रावण आडनाव कसे वाटते, ह्या आडनावाच्या माणसांची देहयष्टी कशी असावी असे तात्काळ नजरे समोर येते? पण जर तो पाप्याचे पितर असल्या प्रमाणे अगदीच किरकोळ असेल तर कसे वाटेल? आडनाव रावण आहे म्हणून काळी चार पट्टी वापरून संभाषण केले तर समोरचा काय म्हणेल? कोणत्याही  पी.जे. वर गडगडाटी हास्य केले तर काय अवस्था असेल? तेव्हा नाव किंवा आडनाव असल्या प्रमाणे वागलच  पाहिजे असे नाही,आपण समाजात राहात असल्याने कोणी आपल्या वागण्याने, बोलण्याने दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल.

नागपूर, चंद्रपूर, गोंदिया येथे लोक शेवटी वार लावून आडनाव सांगतात. कन्नमवार,अन्नमवार, बोजेवार, नंदनवार,तलेवार ही खरे तर तेलगू नावे आहेत. ही सगळी तालेवार माणसे आहेत. पारशी मंडळींची आडनावे मोठी मजेशीर असतात. उनवाला,कांचवाला, बाटलीवाला, लोखंडवाला, नळवाला, दवावाला हे सगळं हार्डवेअर घेऊन ही मंडळी काय करत होती ईश्वर जाणे. एकाने तरी मिठाईवाला नाव घेतले असते तर काय बिघडणार होते. पण नाही, हे आडनाव घेणार पेनवाला. लेको एखादी खायची वस्तू विकायची की नाही, की तुमच्यात फक्त हार्डवेअरच खातात. साबूवाला नाव तस बर आहे पण सारखं सारखं काय धुणार शिवाय टाटाचा 501 होताच की. त्या मानान इराणी नाव वेगळ वाटतं. शाँ,गोदरेज,टाटा ही नाव वेगळी आणि ठसठसीत वाटतात. गुजराती आणि मारवाडी समाजात नावे जबरदस्त असतात. माझ्या गावात असणाऱ्या मित्रांची नावे खेलीलाल, घेरीलाल, मगनलाल, बाबूलाल, माझ्या बऱ्याच वेळा मनात आलं हे लाल पालुपद का ते विचारावं पण नाही विचारता आलं. 

सिंधी, सिंधची संस्कृती घेऊन इथे आले. त्यांच्या नावाशेवटी  आनी किंवा जा असे लावून आडनाव बनते. खरे तर हे आडनाव त्यांच्या कुटुंबात या पूर्वी यशोशिखरावर असणाऱ्या व्यक्तीची माहिती देते. तेच त्यांचं आडनाव बनते जसे. अडवानी, गिडवणी, तोलवानी, वासवानी ही नावे त्यांचे वास्तू पुरुष किंवा आजोबा यांच्या नावाला आनी लावून तयार झाली आहेत. जसे तोलाराम यांच्या नावावरून तोलवानी आडनाव पडले. काही आडनावे मात्र ज लावून तयार झाल्याचे दिसते. जसे आहुजा, रहेजा, हिंदुजा, जुनेजा वगैरे. यांची नावे मात्र लाल,लाल असतात आणि ह्या व्यक्ती वर्णाने टोमॅटो प्रमाणे लाले लाल असतात.

दक्षिणेकडे आडनाव असे काही नसते ते ज्या भागात राहतात त्या भागाचे, गावचे किंवा वाडीचे नाव लावतात. शक्य ते त्यांच्या नावात नाव आणि वडिलांचे नाव एव्हढाच उल्लेख असतो. उन्नीकृष्णन, रामकृष्णन, गोपालन, तर आंध्र भागात राव नाव प्रचलित आहे. आडनावाचा इतिहास अभ्यासणे फारच मनोरंजक होईल. प्रत्येक राज्य आणि प्रांत लक्षात घेता त्याला अंत नाही तूर्तास रजा घेतो. पुन्हा कधीतरी नावामागचा इतिहास  आणि गमती जमती.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

6 thoughts on “आडनावे आणि गमती जमती

  1. भोसले राजेंद्र
    भोसले राजेंद्र says:

    😁😂🤣chan sir….vinodi lekhan.

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  2. PRASHANT GIDH
    PRASHANT GIDH says:

    खूप खूप छान 😂😂😂

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  3. Kishor Dange
    Kishor Dange says:

    माझे आडनांव डांगे आहे, आमच्या कडे एखाद्याला खोकला आला की आमच्या घरून भाकरी घेऊन जायचे डांगे खोकला बरा होतो अशी (अंध) स्रध्दा.. गंमत म्हणजे मला खोकल्याच्या प्रचंड त्रासामुळे मुंबईतील नोकरी सोडावी लागली..

  4. Avinash Mandavkar
    Avinash Mandavkar says:

    खुप छान.

Comments are closed.