उठ मित्रा सिध्द हो, घे सारे आकाश पंखाखाली
तोडून घे ती नक्षत्रे, अन बांध मानवतेच्या महाली
करून आव्हान सूर्यास, त्या तेजाने पेटव ज्ञानाची वात
पाडून टाक विषमतेच्या भिंती, जागव प्रेम जनमाणसात

उठ मित्रा सावध हो, तुला संपवायची आहे गुलामी
कोणी कोणाचा चाकर नाही, माणूस म्हणून हवी हमी
थांबव माणसांचे शोषण, टाक चिरडून जळवा विषारी
नकोच कोणास कोणती दुर्बुद्धी, नको व्यसनाच्या आहारी

उठ मित्रा बलवान हो, नकोच कोणावर अत्याचारी घाव
सुशिक्षित व्हाव्या भगिनी, कोणी राक्षस न घेवो त्यांचा ठाव
बनून दक्ष भूमिपुत्र तू , त्यांच्या मदतीस कृष्णापरी घे धाव
याश्चयावत दिवाकरो तू अजरामर, न मिटो कधी तुझे नाव

उठ मित्रा नको उशीर, आधी प्रयत्न, थोडे धाडस, मग पुर्ततेचा ध्यास
स्वतःला सिद्ध करताना झगडावं लागतं, हो एकलव्य नंतर व्यास
शोध तुझ्या वाटेतील काटे, संकटापेक्षा आपले प्रयत्न हवेच मोठे
थांबला तो संपला म्हणून कार्यरत रहा प्रवाह दूर करतो वाटेतील गोटे

उठ मित्रा तू हो दीपस्तंभ, सर्वांच्या जिव्हेवरी तुझे नाव,तू आरंभ
बुडत्याची नाव हो, भरकटल्याचा पंख, नवउन्मेषाचा प्रारंभ
शक्ती दे, तू युक्ती दे, भ्रमितांना भक्ती दे आपदामधून दे मुक्ती
तुझ्या यशाच्या पताका लाव त्रिभुवनी पसरो दिगंती तुझी किर्ती

Tags:

5 Comments

  1. छान..!शब्दचातुर्याने आजची परिस्थिती आणि अपेक्षित परीस्थिती.तरूणांकडून अपेक्षा समर्थपणे मांडले आहे.

  2. खूपच सुंदर कविता, लयबद्ध कविता अप्रतिम

    1. धन्यवाद कुलकर्णी मॅडम,धन्यवाद सागर पाटील सर.

Leave a Reply

Your email address will not be published.