जीवन म्हणजे नसे तमाशा वृथा कुणाला रिझविण्याचा
नसे विदुषकी चाळा उगा कुणाला हसविण्याचा

स्वतः फुलावे, अन् फुलवावे अमृत कुंभ तुम्ही व्हावे
शब्द फुलांच्या होऊनी माळा गीत त्यांचे तुम्ही खुलवावे

हलकी,सुगंधी झुळूक होऊनी सुमन बटांशी तुम्ही खेळावे
फुल पाखरू बनुनी बागडत, रम्य छटांनी रंगून घ्यावे

होऊनी शिरवी सर थेंबांची गाल गुलाबी भिजऊनी द्यावे
मोगरीचा गंध बनुनी मनास अलगद धुंद करावे

करुनी आरसा स्वच्छ मनाचा भूतकाळातील रूप पहावे
पुन्हा एकदा सान बनुनी आई संगे रंगुनी जावे

किंवा थोडे तारुण्य घेऊनी कर्णाचे ते तेज स्मरावे
मैत्री खातर झोकुनी देऊनी आव्हानांना पुन्हा भिडावे

संकटांचा बाऊ न करता संसारात तद्रुप व्हावे
मेळ रखूनी सुख दुःखाचा अंतरी थोडे स्थिर बनावे

वेध घेऊनी भविष्याचा संयमाने चालत राहावे
कृतार्थ जीवन जगण्यासाठी मदतीसाठी धाऊनी जावे

येता संधी प्रकाश वाटूनी तम हटविण्या समयी व्हावे
जगणे असे जागता जगावे की जीवनाचे सार्थक व्हावे.

Tags:

2 Comments

Comments are closed.