टपटप पावसाची सर अखंडीत अन धरा थंड गार झाली
तुझ्यासवे दुलईत मी परी हळव्या मृदा गंधाने जाग मला आली

गात्रे सारी रोमांचित तव स्पर्शासाठी कधीची आतुरलेली
मिटले नेत्र अनोख्या सुखाने सख्या तू अशी काय जादू केली?

उघड्या गवाक्षी डोकावली वीज आश्चर्याने पाहून तुला गेली
शृंगाराची लय सावरत कौलावरी धावत पहिली सर आत आली

गंध दरवळ मातीचा येता धुंदीत सख्या तुझी मिठी घट्ट झाली
पहाट सरली, वर्दळ सुरु, गवाक्ष उघडे अन लाज मला आली

पहा सख्या मज हासे ती विज, म्हणे नको निजू आता महाली
फुटे तांबडे क्षितिजावर, प्राजक्ताचा सडा अंगणी वाट चांदण्यात न्हाली

जाई, जुईचा दरवळ खुणावे, बहरला मांडव या इथे, मखमली वेली
बोलते तिजसवे मी मनीची वार्ता, कळे मज निःशब्द तिची गुढ बोली

बेडकांचे संगीत, न कळे, कोणता राग आळवती, पुन्हा पुन्हा त्या ओळी
करती स्वागत, वरूणाचे की वनश्रीचे, डबक्यात बिछायत गार मखमली

सुखद गारवा, हळवी शिरशीर, टपटपती धारा, पुर्वेला चाहूल आली
भिजल्या पंखे, झेपावती पाखरे, पिल्ले निवांत घरट्यात थांबलेली

सखा तृप्त अजुनी धुंदीत दुलईखाली बाहूत मज ग्लानी आली
आठवण होता मिलनाची, मधुर क्षणाची, उमटे नाजूक खळी गाली

Tags:

1 Comment

Comments are closed.