तव डोळ्याच्या तळ्यात प्रेमाचा महापूर येतो
त्या भावनांच्या लाटेत मी पून्हा पून्हा हरवतो

कधी संयमी शांत शीतल
संथ गतीचा मोहक निर्मळ
तुडुंब भरला तरीही सोज्वळ
निश्चल तरीही भेटीस व्याकुळ

कधी अशांत नागीण वळवळ
धुमसे क्रोधे करी खळबळ
करी तांडव दाखवी वडवानळ
करी व्यक्त अंतरीची तळमळ

कधी गोजिरा नयन मनोहर
जणू पवित्र गोमुख गंगाजळ
पाहता पडे मनाशी भुल
शांत जलातून दिसे स्वच्छ तळ

कधी उफाळून आणी भोवळ
किनारी दिसे किती दलदल
उग्र स्वभावे उडवी धांदल
क्षणात क्षोभ घडे अमंगळ

कधी सुखाचे दिसती ओघळ
कधी देई मोती निर्मळ
मुक शांत भाव सुंदर
कवेत घेई प्रियाची सळसळ

कधी भासे उथळ चंचल
उखडून टाकी नाते कोमल
परि भावबंध अश्रूंचे निर्मळ
धुवून टाके दुःखाचे काजळ

Tags:

4 Comments

Comments are closed.