जेष्ठ सरता सरेना, सा-या जीवा लागे धाप
रस्ता तापूनिया लाल, दिसे दुरूनही निश्र्वास

कुणी चाले अनवाणी, पाय पेटती उन्हात
वृक्ष दूर दूर दिसे, त्याची सावली मनात

सुर्य मध्यांनीला आला, धरा सोसते ताप
मघा “ती” होती सोबतीस, आता लपली पायात

सारीकडे तगमग, प्राणी पक्षी चिडीचूप
धाप टाकती म्हातारे, जरी बसले निवांत

आले सत्वर अंधारून, जणू अमवासी रात्र
पोरे दंग खेळात, भिऊनी आली वेगे अंगणात

सुटे बेभान वारा, घुसळे पोफळी माडात
आले टपोरे थेंब, पोरे भिजती पावसात

त्या पहिल्या सरींनी, माती झाली सुगंधीत
एकमेका देती टाळी, माड धुंदीत गातात

चाले विजेचे तांडव, वारा करी वाताहत
वादळाने केली दैना, उडवूनी नेले छत

घेऊनिया दोन मुले, जागवली सारी रात
फांद्या घरावरी पडल्या कालच्या वादळात

चाले वरूणाचा जोर, चार दिस हा प्रपात
कसे सावरावे तीने, त्यांचे निष्ठूर आघात

सावरले कसेबसे, शिवले झावळ्यांचे छत
पोरे खेळायास गेली, भरलेल्या डबक्यात

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

4 Comments

  1. कडक उन, भरमसाठ पावसाचे (extreme) एकदम टोकाची अवस्था शब्दामध्ये योग्य बद्धl मध्ये व्यक्त केलीय. 🌺🌺

  2. उन पावसाचा खेळ व मेळ खुप छान मांडलात सरजी

Comments are closed.