पाहिले तिला तिनसांजेला मनातून चढवला साज
ते देखणे रुप मी विसरू पाहतो परी आठवते ती रोज

केसात माळला मी तिच्या चंद्र पूर्ण पौर्णिमेचा
अन गजरा गुंफला तिच्यासाठी शत तारकांचा

अस्ताच्या सुर्याजवळून फुलवली ओठावरी लाली
कुंतलांच्या नाजूक काळ्या बटा शोभती भव्य भाली

कमळाचे अस्तर लावून शिवली तिजसाठी कंचूकी
प्राजक्ताच्या पोवळ्या रंगाचा नेसू झाकली पूर्ण कटी

लांब सडक नागीण वेणी नितंबावर, त्यात माळला चाफा
पाई घातले केतकीचे पैजण, बांधला तिजसाठी जुईचा झोका

बकुळीच्या करुन माळा, मनगटी भरली नाजूक काकणे
केळीच्या गाभ्यापरी दंडावरी सजली चमेलीचे रूप देखणे

गोबऱ्या गालावर छटा गुलाबी, पाहून तिज लाजे गुलाब
कोरीव भुवया, मिटती पापण्या, डोळ्यात सुरमा लाजवाब

भाळी कोरली चकोर इवली, हनुवरी शोभती तीन तीट
वक्षस्थळ आखीवरेखीव पदराआड जणू अमृताचे घट

आजानूबाहू, नाजूक बोटे, हातावरी सजली मोहक मेहंदी
चालीत ऐट, ती गजगामीनी, पदन्यास तिचा ही तर फक्त नांदी

वाट छेडतो हळूच वारा, त्या माऱ्याने मुडपते तिची जीवणी
चाले तेव्हा श्वास फुलतो, तिज पाहून कृतार्थ झालो जीवनी

इतर कविता वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Tags:

3 Comments

Comments are closed.