आवाहन सळसळत्या रक्ताच्या माझ्या तरुण मित्रांना

संपूर्ण भारतात करोनामुळे भितीचे वातावरण आहे, देशातील मोठ्या शहरात या रोगाचा उद्रेक झालेला दिसत आहे. एकुण करोना बाधितांपैकी अंदाजे तीस टक्के ते पन्नास टक्के महाराष्ट्रात आहेत आणि नागपूर, पूणे, मुंबई, नाशिक, ठाणे, औरंगाबाद या मोठ्या शहरात करोनामुळे हाहाकार माजला आहे. या सर्व गोष्टींला जबाबदार कोण? करोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण आता करोना संपला अशा अर्विभावात आम्ही जो कोणताही विधिनिषेध न पाळता मुक्त संचार केला, ना मास्क ना दोन हाताचे परस्परांतील अंतर, ना प्रवासादरम्यान काळजी यामुळे करोनाने डोके वर काढले.

आर्थिक व्यवहार ठप्प पडू नये म्हणून नोकरदार, अधिकारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिक यांना प्रवासाची जी संधी दिली होती तेव्हा देशाचे आणि राज्याचे आरोग्य खाते, उच्च पदस्थ आरोग्य अधिकारी, समाजसेवक आणि निवडक सेलिब्रिटी सतत माध्यमाद्वारे सांगत होते करोना विषाणू संपलेला नाही. योग्य काळजी घ्या, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका?. सण, समारंभ, लग्न इत्यादी कार्यक्रम करोना आंतरनियमन काळजी घेऊनच साजरे करा. पण लक्ष कोण देतं? तारूण्य आणि पैशांचा उन्माद यामुळे कोणीही नियम पाळण्याची तसदी घेतली नाही परिणामी करोना विषाणूने पून्हा डोके वर काढले. पहिल्या लाटेत सरासरी दहा हजार ते बारा हजार प्रती दिवस या वेगाने करोना पेशंट वाढत होते आजा हा वेग किमान पाच पट किंवा जास्तच आहे.

पहिल्या लाटेला थोपवण्यासाठी जी जंबोकोवीड हॉस्पिटल निर्माण केली होती ती पेशंटने ओसंडून वाहात आहेत. ग्रामीण भागात एका बेडवर दोन पेशंट झोपवले जात आहेत. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडीसिवर यांचा तुटवडा भासत आहे. अँटिजेंन चाचण्या करण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ कमी पडत आहे. अशी अभूतपूर्व संकट परिस्तिथी असतांना आजही नागरिक आपले वागणे सुधारत नाहीत. आजही कोणतेही खास आणि अत्यावश्यक कारण नसताना घरा बाहेर पडत आहेत. आजही लग्न अतिशय थाटामाटात होत आहेत. हळदी कार्यक्रम आयोजित करून अनावश्यक गर्दी होत आहे. यात चुकूनही एक व्यक्ती करोना बाधित किंवा संक्रमित असेल तर तो एकाच वेळेस अनेकांना संक्रमित करत आहे.

नम्र विनंती, माध्यमावर अनेकदा करोना विषयी घ्यायची काळजी व पाळायचे नियम हे सतत दाखवले जात असूनही अजूनही डोळे बंद असल्याचं नाटक आपण सुरूच ठेवणार असलो तरी डॉक्टरच काय पण ईश्वरही आपल्याला वाचवू शकणार नाही. आपण पाहिले आपल्या आप्तांपैकी अनेक जण भरल्या संसारातून निघून गेले. आपले मित्र किंवा मैत्रिणी अचानक आपला संसार अर्धवट टाकून निघून गेल्या. ज्याची चार दिवसापूर्वी भेट झाली होती तो निघून गेला आणि त्याच्या अंत्ययात्रेला आपण जाऊ शकलो नाही. तेव्हा झोपेचं सोंग सोडून द्या. अति आत्मविश्वास आणि फाजील धाडस बंद करा. आपल्याला स्वतःची काळजी नसेलही पण कुणालातरी तुमची गरज आहे, तुमच्या चुकीची शिक्षा तुमचे मित्र मैत्रिणी, तुमच्या घरातील जेष्ठ मंडळी यांना देण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही करोना नियमांचं काटेकोरपणे पालन करा. हात स्वछ धुवा सॅनिटाइज करा, बाहेरून आल्यावर शक्य तो कपडे बदला. बाहेरून आणलेल्या वस्तू सॅनिटाइज करा. करोनाची कोणतीही लक्षणे दिसत असल्यास तातडीने डॉक्टर गाठा. अँटिजेन, RTPCR टेस्ट करून घ्या, टेस्ट चे रिपोर्ट येत नाही तो पर्यंत स्वतःला विलगिकरणात ठेवा. टेस्ट पोसिटीव्ह आली तर डॉक्टरांच्या सल्याने योग्य औषधे घ्या, गरम पाण्याने गुळण्या करा. शिंकतांना, थुंकतांना काळजी घ्या, सर्दी किंवा थुंकी कुठे पसरणार नाही याची काळजी घ्या. योग्य वेळी तपासणी, योग्य औषधे, विलगिकरण आणि योग्य आहार वेळीच घेतला तर आजारावर मात करता येते बे लक्षात घ्या.

एखाद्या कुटुंबात, एखाद्या व्यक्तीस अशी लक्षणे दिसू लागली की उर्वरित कुटंब त्याच्याशी फटकून वागू लागते, कधी एकदा त्याला ऍडमिट करून मोकळे होतो अशी स्थिती कुटुंबाची असते. हे लक्षात घ्या की जोपर्यंत सौम्य लक्षणे असतात तो पर्यंत योग्य उपाय केल्यास ऍडमिट करण्याची गरज पडत नाही. तेव्हा करोना झालेल्या रोग्याला दुर्लक्षित करून एकाकी पाडू नका त्याचे मनोबल वाढवा त्याची काळजी घ्या. त्याला योग्य औषधे, योग्य आहार द्या. त्याचे मनोबल वाढेल असे प्रेमाने त्याच्याशी वागा. कोणत्याही नकारात्मक बातम्या त्याला सांगू नका. आपण त्याची घरीच उत्तम काळजी घेऊ शकता. हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट असल्याने तुमचा पेशंट लाडका नाही. हॉस्पिटलमध्ये मुळातच साधनांची कमी आहे. दाखल झालेले पेशंट आणि आरोग्य कर्मचारी वर्ग यांचे प्रमाण व्यस्त आहे परिणामी ते तुमच्या व्यक्तीकडे पर्सनली लक्ष देऊ शकणार नाहीत त्या मुळे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या निगराणीत त्याची काळजी घेणे उत्तम.

योग्य काळजी योग्य आहार, वेळीच औषधे,आणि मानसिक आधार ही चतुसूत्री नीट जोपासली तर एकही करोना रोगी दगावणार नाही. तुमची सकारात्मक ऊर्जा आणि विचार त्याला लवकर बरे करू शकतात कारण शारीरिक प्रतिकार शक्ती आणि मनाची ताकद कोणत्याही संकटावर मात करू शकते तेंव्हा आजाराचा विचार सोडा आणि खंबीरपणे करोनाशी लढा द्या.

बऱ्याच खेड्यात करोना विषयी अजूनही योग्य माहिती नाही. अँटिजेन चाचणी करून घ्यायला सामान्य माणूस धजावत नाही आणि आपला आजार लपवून ठेवतो परिणामी तो उर्वरित कुटुंबाला संसर्गित करतो. म्हणून तरुणांनी योग्य काळजी घेऊन या जनजागृती मोहिमेत स्वयंसेवक म्हणून पुढे आले पाहिजे.
लोकांच्या मनातील भीती कमी करणे, लोकांना अँटिजेन, हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास किंवा औषधे, इंजेक्शन मिळवून देण्यास मदत करणे, ब्लड प्लासमा मिळवून देण्यास मदत करणे. आजारी माणसाच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे, अशी कितीतरी छोटी छोटी परंतु महत्वपूर्ण कामे जर युवा पिढीने केली तर करोना निवारणास त्यांची मदतच होईल. तेव्हा युवा वर्गाला हीच संधी आहे समाजाची सेवा करून स्वतःची क्षमता आणि कार्यमग्नता तपासून पाहण्याची. चला तर सर्व कोवीड योध्यांच्या खांद्याला खांदा लावून सिद्ध होऊ आणि करोनाची संकट पळवून लावू.

हम होगे कामयाब एक दिन
हो हो मन मे है विश्वास पुरा है विश्वास
हम होगे कामयाब एक दिन।

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *