आज कार्तिकी एकादशी आहे. विठ्ठलाच्या भक्तांची मांदियाळी या कार्तिकी एकादशीला पंढपूरात जमली आहे. गेले अठरा महिने करोनाचे दाट संकट होते त्यामुळे पंढरपूरात विठ्ठल एकांतात होता. त्यानेही सोशल डिस्टन्सींग पाळले होते. या विठूरायाच्या भेटीसाठी त्याचे भक्त उतावीळ झाले होते. आपण दोन दिवस घरातच राहिलो तर कसे तरी होते आणि हा विठ्या अठ्ठावीस युगे एकाच जागी उभा आहे आणि गेले अठरा महिने फक्त राऊळांच्या गराड्यात. त्यामुळे तो ही या विजनवासाला कंटाळलाच होता. भक्तांची अवस्था तर ‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’, अशी झाली होती. पण हे विठूचे भक्त खरच संमजस. त्यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली आहे. त्यांना भगवंताची अडचण कळली असावी म्हणूनच त्यांनी मायबाप सरकारला साकडे घातले पण उतावीळपणा केला नाही. मोर्चे काढले नाहीत, आंदोलन केले नाही की जेलभरो आयोजित केलं नाही. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.’ म्हणणारा सावतामाळी याचा आदर्श जपत त्यांनी आपल्या कामातच आपल्या शेतात, आपल्या दुकानात, व्यवसायात विठ्ठल पाहिला.

‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीवे भावे’ हा अभंग ते जगले आणि जागले. त्यांना माहिती आहे, अठ्ठावीस युगं तो विटेवर न कंटाळता उभा आहे. दोन वर्षे त्याच्या भेटीस नाही गेलो तर काय मोठा फरक पडणार. ज्यांना जिथे विठ्ठल पहायचा आहे ते त्याला पहात आले आहेत. डॉक्टर तात्याराव लहानेना आपल्या आईतच अवघ्या छत्तीसाव्या वर्षी विठ्ठल दिसला. त्या माऊलीने स्वतः मुलासाठी आपली किडनी दिली आणि डॉक्टर लहान्यांनी लहानच राहू नये म्हणून मोठ केलं. अर्थात आईपेक्षा ते मोठे होण शक्य नव्हतच म्हणूनच किडनी दान केल्यावर जेव्हा ती माऊली शुध्दीवर आली तेव्हा म्हणाली, “माझा तात्या कुठे आहे ? कसा आहे? मला त्याला पाहू दे, शरीरावर शंभर टाके असतांना आपल्या पिल्लाची काळजी माऊलीच करू जाणे. आईच त्यांची विठाई झाली. मग किडनी रूपातून विठ्ठल तात्याराव लहान्यांच्या शरीरात प्रवेश करता झाला. पहाता पहाता तात्याराव लहाने इतरांचे विठ्ठल झाले. या लहान्यांनी लाखो लोकांना त्यांची दृष्टी दिली आणि त्यांना विठ्ठलमय केलं.

करोना काळात हा विठ्ठल शेकडो हजारो डॉक्टर मंडळींच्या देहात शिरला आणि त्यांनी लाखो जिवांना जीवदान दिले. ह्या विठ्ठलाला पंढरीतच थांब, असं राऊळ, पंडे, बडवे म्हणू शकले नाही. तो अंतर्धान पावला. बाहेर पडला आणि सिस्टर बनून, नर्स बनून मदतीला धावला. तो कधी अँबुलन्स ड्रायव्हर बनला, कधी वॉर्डबॉय, तर कधी पोलीस. त्याने कोणाच्या रुपात यावे याला कुठे मर्यादा आहे?

‘तुळसी हार गळा कटी पितांबर, आवडे निरंतर रूप तुझे.’ असा हा निर्गुण निराकार आणि तरीही भक्तांसाठी पंढरपूरात जन्म घेतलेला सगुणाचा पुतळा. म्हणून नरहरी सोनाराला तो पिंडीरूपी शिवात आढळला. सावता माळ्याला त्याच्या कांदा मुळा भाजीत आढळला. जनाबाईला जात्यावर दळण्यासाठी तोच मदत करायला आला. मंगळवेढ्याच्या कान्होपात्राला त्याचाच ध्यास लागला होता. हरपले देहभान अशी कान्होपात्राची अवस्था झाली होती. वैष्णवांचा धर्म सेवाभाव आहे म्हणूनच पंढरीच्या वारीत डॉक्टर आणि सिस्टर सेवेकरी म्हणून जातात. अडल्या नडल्यासाठी तेच विठ्ठल होतात.

आपला विठ्ठल कशात पहावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न, कुठे पहावा? हा ही त्यांचाच प्रश्न, ‘विठ्ठलाला पाहू गेलो विठ्ठल होऊनि राहिलो.’ अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे मग विठ्ठल शोधण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. खरं तर तो होऊ नये. शेवटी हा श्रद्धेचा प्रश्न, या देहाचे त्या देही म्हणजे अद्वेत.

माझ्या पन्नास साठ वर्षांच्या आयुष्यात मी अनेकदा माणसातल्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे, अनेकदा. वानगी दाखल एक दोन उदाहरणे सांगतो,एकदा मी रातांबे पाडतांना झाडावरुन पडलो. अगदी उभा तळव्यावर, दोन्ही पायांना जबरदस्त मार लागला, त्याही स्थितीत मी कसाबसा घरी आलो. मी डोंगरात असल्याने माझा आवाज घरापर्यंत पोहोचण शक्य नव्हतं. कोणी मदतीस येण्याची शक्यता नव्हती, तिथ पडून राहिलो तर थोडया वेळात हलणे अशक्य होणार हे कळत होतं. घरी पोचलो आणि एका तासातच दोन्ही पाय तळव्यासह सुजले उभे रहाणे अशक्य झाले.तळवे एवढे दुखू लागले की कळा सहन होईनात.

घरी डॉक्टर येणे शक्य नव्हते. काठीवर भार ठेवत कसाबसा रिक्षाने दवाखाना गाठला त्यांनी तपासले आणि म्हणाले फ्रक्चर नसावे मुका मार लागला आहे, मी दोन इंजेक्शन देतो, एक दिवसाने सुज उतरेल. गरम पाण्याने शेक द्या. पण दोन दिवस शेक देऊन, आयोडेक्स लावून सुज उतरेना.
चौथ्या दिवशी दुसरे डॉक्टर. आर्थोपिडीक सर्जन गाठायचं ठरलं. त्याच दिवशी तुकाराम आला. त्याचा रंग सावळा म्हणताच यायचा नाही. पक्का काळा, गंमतीने तो म्हणतो, “माझ्या रंगासारो पक्को रंग गावाचो नाय, काय व्हया ता करा रंग गेलो तं पैसे परत.”, त्यांनी माझ्या पडण्याची, काय झालं? कसं? कधी झालं? चौकशी केली. माझ्या मामीजवळ गरम पाणी मागितलं. त्यात पाय बुडवून बसायला सांगितले, थोड्या वेळाने आयोडेक्सने मालीश केल आणि मला म्हणाला, “वाईच डोळे मिटून घे, थोडी कळ येईत सहन कर.” आणि दोन्ही हातांनी पायाची बोटे ताणली. मी जिवाच्या आकांताने ओरडलो. कळ डोक्यात गेली. तो शांतपणे चहा घेऊन निघून गेला. संध्याकाळी पायाची सुज उतरली. मी उठून उभा राहिलो. तो माझ्या विठ्याचा तुकाराम होता. माझ्या विठ्यानेच त्याला माझी हाक ऐकून पाठवले. आपण विश्वास ठेवा अगर नका ठेवू. नामात ताकद आहे. फक्त मनापासून पांडुरंग, पांडुरंग म्हणून पहा आणि आत्मिक सुखाचा आनंद होतो की नाही ते पहा. तर माझा तरी या माणसातल्या पांडुरंगावर गाढ विश्वास आहे. माझ्या हाकेला तो तेव्हा धावला आणि मला बरे करून गेला.

त्यानंतर विठ्ठल नाना रूपाने अनेकदा माझ्या संकटात धावला, कधी माझी रेल्वे गाडी चुकू नये म्हणून त्याने मला आपल्या टू व्हीलरवर लिफ्ट दिली, तर कधी माझ्या दुःखाच्या प्रसंगी सहानुभूती.

अगदी काल परवाचाच प्रसंग. मी आणि माझी पत्नी टू व्हीलरने सफाळ्यावरून पालघरला गेलो होतो. अपेक्षित पेट्रोल गाडीत होते आणि परतताना अर्ध्या वाटेतच पेट्रोल संपल्याचा इंडिकेटर फ्लॅश झाला. अंधार पडला होता,आता काय करणार? सफाळा किती किलोमीटर आहे त्याचा फलक दिसेना. रस्त्यात पेट्रोल कोणाकडे कसे मागावे? तरी एका घरासमोर स्कुटर उभी केली. “भाऊ थोडी मदत कराल का? आम्ही पालघरवरून परतत होतो, पेट्रोल अचानक संपलं.”

त्यांनी त्यांच्या आईला हाक मारली, रिकामी बाटली मागितली आणि आपल्या गाडीतून कोणताही प्रश्न न विचारता बाटलीभर पेट्रोल काढून दिलं. मी पैसै घेण्याची विनंती केली, आमच्या वेळेला धावून आल्याबद्दल आभार मानले पण पैसे घ्यायला त्यांनी ठाम नकार दिला. म्हणाले, “मी पेट्रोलचे पैसे घेतले तर तुमची गरज भागवल्याचा मी फायदा घेतला याचे मलाच वाईट वाटेल. मला पैसै नकोच पण तुम्ही अंधार पडण्यापूर्वी नीट जा.” मी कुठे विठ्ठल पहायला गेलो? तो तर पदोपदी माझी सोबत करतो.

माझा एक नातेवाईक म्हणतो, एकदा विठ्ठल घेतला की वेगळ काही घ्यावच लागत नाही, या विठ्ठल नामाची नशाच वेगळी आहे. ही नशा चढली की मग शरीराला कशाची आसक्ती रहात नाही. सवयीने तो रक्तात आणि मनात भिनतो. मग मी, तू पण उरतच नाही. हा उच्च पदावर कार्यरत असणारा भक्त, दिंडीत पाई चालतो, कांदा भाकरी खातो आणि हरि हरि म्हणत कुठेही झोपतो. तो वारी करतो, ती विठ्ठलाची वास्तपुस्त करायला, त्याला सांगायला, मी तर तुझ्या कृपेने मजेतच आहे पण तुझ काय? तु पण मजेतच आहेस ना? याची खात्री करायला तो जातो. हा स्नेह त्याला वारी करायला प्रवृत्त करतो.

‘विश्वासाचे मुळ विश्वभंर’ तुम्ही कोणाच्या मदतीला तत्पर असाल तर तुमच्या मदतीलाही कोणीतरी धावून येईलच हा विश्वास तुम्हाला हवा. मी फारच क्वचित मंदिरात जातो, बरेच वेळा मंदिरात शिल्प म्हणून असणारी कलाकुसर पाहण्यात आनंद मिळतो तो मुर्ती पाहुन होत नाही कारण मुर्तीवर शेंदूर, अबीर, बुक्का थापून पंड्यांनी मुर्ती विद्रूप केलेली असते. पहायचे तर सावळे ते रूप गोजीरे मनोहर याच स्वरूपात त्याला पहायला मला नक्की आवडेल.

तेव्हा, ‘विठ्ठल पहाया गेलो, विठ्ठल होऊन राहीलो.’ ही अवस्था, तद्रुपता ज्यांना जमली ते महान. आपल्या आजूबाजूला असे अनेक विठ्ठल असतील ज्यांची तुम्हाला ओळख झाली नसेल. विठ्ठल भेटीची ओढ समजू शकतो, पंढरीची वारी ही सामाजिक ऐक्याची वारी आहे. तिथ वय विसरून भक्त एकमेकांच्या पाया पडतात. माऊली माऊली असा एकमेकांचा उल्लेख करतात कारण या देहाचे त्या देही हा साक्षात्कार त्यांना झालेला असतो. सुटो भेदाभेद, तुटो अमंगळ अशी स्थिती तेथे निर्माण झाल्यावर आपपर भाव राहिलच कसा? विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे त्यांनी जरूर जावे पण प्रथम आपल्यामधील विठ्ठलाचे दर्शन घ्यावे.

काल माझ्यावर गुदरलेला प्रसंग मी माझ्या मित्राला सांगत होतो, तेव्हा तो मला म्हणाला, मलाही असे अनुभव आले. एकदा तो, बायको आणि दोन लहान मुले यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना भेटायला दूर गावी मोटरसायकलने गेला होता. येताना उशीर झाला. त्याचा लहान मुलगा अगदी छोटा होता. त्याला भूक लागली म्हणून आईने बाळाला दूध पाजव म्हणून थांबला. रस्त्यावरून येणारे थांबून काही मदत हवी का विचारू लागले. अर्थात ‘भाव तेथे देव’ तेव्हा भगवंत चराचरात आहे, तुम्ही त्याला साद घाला सकारात्मक उर्जा तुम्हाला जाणवेल. मदतीला कोणी नक्की उभे राहील.

आज कार्तिकी एकादशी आहे. खरं तर ही एकादशी या साठी महत्त्वाची कि, आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. या चार मासात विष्णू दिर्घ निद्रेच्या आधीन असतात. कार्तिक महिन्याच्या एकादशीला विष्णू झोपेतून जागे होतात, म्हणूनच कार्तिकी एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशीला आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच दर्शन घ्यावे म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. या अर्थाने ही मोक्षदायीनी एकादशी आहे. या दिवशी दान करून पूण्य पदरात पाडून घेतले जाते. याच अनुषंगाने आपणही या महिन्यात ग्रामीण भागात जाल तेव्हा ज्या सेवाभावी संस्था त्या भागात कार्यरत आहेत आणि गरीबांचे जीवन सुसह्य आणि सुकर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा संस्थाना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करा.

तुमच्यातील विठ्ठलाचे दर्शन या गरीब संस्थाना नक्कीच होईल. “सर्व कार्येशु सर्वदा.” या योजनेत लोकसत्ताच्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्थाचा परीचय होतो तेव्हा असे किती विठ्ठल समाजात आहेत ते कळते. आपल्याला विठ्ठल होता नाही आले तरी त्याच्या या सेवारूपी पालखीचे भोई व्हायला काहीच हरकत नाही. किती रूपये दिले ते महत्त्वाचे नाही, त्या योजनेत तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. किमान आपण कोणाच्या उपयोगी आलो ही भावनाच महत्वाची. तुम्हाला तिथेच विठ्ठलाचे दर्शन होईल. जेव्हा असा दिवस तुमच्या भाग्यात येईल तीच तुमच्यासाठी कार्तिकी. या वर्षी केंद्रसरकारने राज्यसरकारच्या मदतीने पंढरपूर सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय मार्गांशी जोडण्याचा मनोदय जाहीर केला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना खास पदमार्गीका तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. परंतु कार्तिकी वारी करायला प्रत्येकाने पंढरपूर ते आळंदी असाच प्रवास करायची गरज नाही. तर सेवाभावी योजनेत मदत केली तरी ठिक. म्हणूनच मी म्हणतो पहावा विठ्ठल प्रेमभावे.

Tags:

3 Comments

    1. देवाचिया द्वारी उभा क्षणभरी…
      तेणे मुक्ति चारी साधियेल्या..
      खरोखर यथार्थ विवेचन सर

  1. खूपच छान.कार्तिकी एकादशीला काकड आरती व हरीपाठा नंतर तुमचा लेख वाचला. सकाळ भक्तीरसपूर्ण झाली.

Comments are closed.