आकाशात ढगांची दाटी झाली की कुठे तरी दूर वर मोराचा मॅओऽऽ मॅओऽऽ टाहो ऐकू येतो, चित्रवाक पक्षीही “झोती व्हावती, झोती व्हावती” म्हणत आपली चोच वर करून वरूण राजाला साकडं घालतो, आणि कडाड ऽऽकाडऽ, ढाण ढूण असा गर्जत, बिजलीचे नृत्य करत तो झडीसह बरसू लागतो. हा असा पाऊस पडू लागला की आम्ही अर्ध्या कपड्यांवर या वर्षधारा अंगावर घेण्यासाठी अंगणात उगाचच उड्या मारत बसायचो आणि या जल धारा चांगल्या थोर होईपर्यंत यथेच्छ हुंदडायचो. आमच्या शेजारच्या दोन चार घरातील सर्व समवयस्क मुले आळी पाळीने सर्वांच्याच अंगणात नाचत असू. तेव्हा  कोणत्याही घरातून  सोन्या, बाबल्या, राजा घरात चल. भिजलास तर सर्दी होइल, पडसे होईल, ताप येईल” असं म्हणत नसे. या पहिल्या पावसाच्या धारा अंगावर घ्यायच्याच नाहीत तर मग काय करायचं? वरूण राजाचं स्वागत करायला सर्व सिध्द असतांनाच भित्री भागूबाई बनून घरात बसणं कोणाला आवडलं असतं? 

पावसाळा येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची जंगी तयारी सुरू होत असे. घरातील एका खोलीत, पुढील चार-सहा महिन्यांसाठी लाकूडफाटा, लाकडांच्या ढलपा, शेणी, गोवऱ्या व्यवस्थेने भरून ठेवण्यासाठी आम्ही मुले घरी मदत करत असू. लाकडांच्या माचावर भेतीव लाकडे, तोडीची लाकडे यांचे थर योग्य प्रकारे लावले म्हणजे कुठे पोकळी न राहता संपूर्ण माच लाकडांनी गच्च भरून जाई.या माचावर मग गोण भरून नारळाची किशी ठेवली म्हणजे आगोठीचे काम सुरू होई.

घराच्या सभोवती लाकडी बेलक्या पुरून चार, सहा मांडव घातले जात, या मांडवाच्या खाली, दोडकी, शिराळी, काकडी, पडवळ, कारली यांची अळी केली की त्या अळ्यामध्ये निगुतीने साठवलेले बियाणे लावले जात असे. अळ्याकरता दोन ते तीन फुट व्यासाची मातीची वर्तुळाकृती भरणी केली जाई. या मातीवर गुरांच्या पायाखालचा गोवर आणि थोडा गवताचा थर दिला की अळे तयार होत असे हीच आपल्या अंकुरणा-या बीजाची गादी. वेल वर जाण्यासाठी अळ्यात जागोजागी काठ्या पुरून त्या मांडवाच्या वरच्या अंगास केळीच्या सोप्याने बांधल्या की मांडवाचे अर्धे काम उरके. मांडवावर झाडांची शिरडे टाकून मांडव सजवला जाई.

मोकळ्या जागेत भेंडीसाठी दोनतीन सर आणि गोडे अळू लावण्यासाठी काढले जात. याचे बियाणे घरीच राखून ठेवलेले असे क्वचितच शेजारी शिल्लक असल्यास मिळे. रोहिणी नक्षत्रापूर्वी हे सर्व काम उरकले जाई.मृगाचा पहिला पाऊस पडला की तापलेल्या मातीतून वाफ बाहेर पडे.सगळीकडे मातीचा सुगंध दरवळे. अळ्यांमध्ये लपून बसलेले बियाणे हा पहिला पाऊस अंगाखांद्यावर घेत हरखून जाई आणि पुढील चार दिवसांतच बी चे आवरण दूर सारत दोन इटुकली धिटूकली पाने, अंकुर मान बाहेर काढत. सृष्टीचे सौदंर्य पाहून हरखून जात आणि दिसा माजी मांडवाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत. आमची आई हळूवार हातांनी त्यांच्या नाजूक वेलींना आधार देण्याचं काम दिवसातून दोन दोन वेळा करीत असे कारण उनाड वारा आणि जलधारा त्याला पुन्हा पुन्हा खाली ढकलून देण्याचे दुष्कत्य करत असत.

पहिले चार सहा दिवस त्या वेलींच्या वाढीकडे आमचे बारीक लक्ष असे. त्याला फुटणा-या प्रत्येक नवीन पानांची बातमी आम्ही आईला पोचवत असू. त्या कोवळ्या नाजूक पानांना खाण्यासाठी गोगलगाय, अळ्या पुढे सरसावत पण आई किंवा बाबा त्यांच्या शरीरावर रखा मारुन किड आणि अळीचा हल्ला परताऊन लावी. पोटच्या मुलांची काळजी जसे घेतील तितक्याच निगूतीने त्या नवीन वेलींना सांभाळत.

पहिला पाऊस पडला की बाजारात शेवरे विकायला येई यांचा आकार गारूड्याच्या पुंगी सारखा असतो. ही वनस्पती दगडधोंड्यातच उगवते, शक्यतो सपाट जागी दिसत नाही. पाच किंवा सहा नग एका जुडीत असतात. आजही डोंबिवलीच्या बाजारात हे शेवरे किंवा शेवळे पावसाच्या पहिल्या आठवड्यात विकायला येते. त्याला अळवाप्रमाणे थोडी खाज असते म्हणून त्यात चिंचेऐवजी ‘काकडे’ या आवळ्या सारख्या फळांचा रस शिजवताना टाकतात. अळूप्रमाणेच याची पातळ भाजी करता येते. हे शेवळे  पाऊस पडला की फक्त दोन तीन आठवडेच तग धरते. याची गरम मसाल्याच्या वाटपासह केलेली पातळ भाजी मटणास मागे टाकील इतकी चवदार असते. याच वेळी बांबूचे कोंब ही बाजारात विकायला येतात. या कोवळ्या बांबूच्या कोंबांच्या एक ते दोन मिलिमीटर जाडीच्या चकत्या काढून मिठाच्या पाण्यात साठवून ठेवतात याची वालाचे बिरडे घातलेली भाजीही चविष्ट लागते. याच महिन्यात आपट्याच्या पानासारखी पाने असणारा कोरळही बाजारात येतो. याची भाजी सुंदरच लागते. पावसाने बस्तान बसवले की बाजारातून ह्या भाज्या गायब होतात.

पावसाला सुरुवात होण्या अगोदरच कुदळीने खणून घराच्या वाटेवर लाल, भगवा पांढरा तेरडा लावला जाई. तिथेच कृष्णतुळस पाणी पिऊन जोरात वाढे. घराभोवती अगदी  गच्च हिरवे गार होई. संपूर्ण कुंपणावर तोंडलीची वेल शोभून दिसे. जणू हिरवा ताटवा त्या कुंपणावर बहरे. या वेलीवर नाजूक अतिशय पातळ पांढरी फुले येत आणि त्या मागे कवळे तोंडले आकार घेई. कुंपणाला असणारी कपाशीची झाडे ही गर्द हिरवी होत, याची कवळी बोंडे सोलून आम्ही त्यातील कवळा गर खात असू.

पाहता पाहता सर्व भाज्यांचे वेल धीट होऊन संपूर्ण मांडव व्यापून टाकी. भेंडी, गवार यांची रोपेही चांगली दिड दोन फुट वर येत. हळदीची लुसलुशीत रोपे कंदातून वर येत. हे पान हातावर कुस्करले की छान सुगंध येत असे. या सर्व वेलींना आणि इतर झाडांना गाईचं शेण आणि राख दर चार, सहा दिवसांनी टाकावी लागे. राख मारली की झाडावर असणारी अळी मरून जाते असा आईचा अनुभव होता.

श्रावण आला की सणांची रेलचेल सुरू होत असे आणि याच वेळेस परसातील भाजी तयार होई. कधी पडवळ, कधी शिराळ, तोंडली तर कधी गीलकी अशी भाजी किमान दोन महिने घरात असे, आई, आपण कष्टाची ताजी भाजी कशी खातो आणि आरोग्याला मोसमातील भाजी कशी उत्तम ते  इतक्या वेळा सांगे की हे भाजी पुराण आमचं पाठ झालं होत. याच काळात टाकळा,  कुर्डू, शतावरी, फोडशी अशी निव्वळ जंगलात किंवा ओढ्याच्या काठी उगवणारी भाजीही कोणी तरी आणून देई. एखाद्या मातीच्या ढिगावर किंवा निवडुंगाच्या कुंपणाकडे अळंबी रूजून येत. ती जमीनीतून बाहेर आल्यानंतर फार तर चार पाच तासच रहात नंतर मलूल होऊन जमीनदोस्त होत. ही अळंबी कुठे रूजून येतात ते जाणकारांनाच माहीत असे.आमच्या घरापाठी जानकी, आमची कामवाली राही. अळंबी आली की ती आईला निरोप देत असे. गंमतीचा भाग असा की ही अळंबी जमीनीतून काढतांना बोलू नये अन्यथा ती अद्रुष्य होतात असा समज होता. या अळंबीचे मटण मसाला घालून पातळ कालवण केले तर टोपही पुसून खाल.

आपण जे बटन मशरूम विकत आणतो त्याच्या आणि नैसर्गिक अळंबी ह्यात जमीन अस्मानाचा फरक. मात्र अळंबी ओळखता आली नाही तर मृत्यूशी गाठ. ती मिठाच्या पाण्यात टाकल्यावर त्याला लालसर हिरवा रंग आला तर ती विषारी समजावी.

पावसात अळूच फतफत, अळूच्या पानांच्या गाठींची भाजी, अळूवड्या हे खाता आले नाही तरच नवल. अळूच्या गाठी करण्यासाठी अळूचे पान थोडे नरम व्हावे यासाठी ते पलंगाखाली चार तास ठेवावे लागे, म्हणजे त्याच्या गाठी चांगल्या होतात. या गाठीत आवडीप्रमाणे चणे, वाटाणे घातले की भाजी झकास लागते.

आमच्या घरा मागे काळे अळू, तेरे, सफेद अळू भरपूर उगवे. श्रावणात मांसाहार बंद असल्याने हे अळूचे, लसूण फोडणीचे फतफते घरात शिजले की त्या लसूण फोडणीच्या वासाने वेडं व्ह्यायची वेळ येई. डीश भर अळू हादाडल्याशिवाय तिथून बाहेर पडावं वाटत नसे. 

श्रावणातल्या ऊन पाऊस खेळा सोबत वेली वरची शिराळी, पडवळ, काकडी यांची फुले बहरून येत. दरम्यान मांडव बहरून त्यावर लांब लचक पडवळ शिराळी धरू लागत. काकडीच्या वेलावर लुसलुशीत कवळ्या काकड्या साद घालत. आम्ही मुले घरच्यांची नजर चुकवून ह्या कवळ्या काकड्या पसार करीत असू. घरातल्या छपरावर लाल भोपळ्याचा वेल कौलाच्या आधाराने वर वर चढे . त्यावरती भोपळ्याची कर्ण्याच्या आकाराची पिवळी फुले लगडत, त्यातील मध खाण्यासाठी भुंगे टपून बसत. ह्या फुलांचे भाजून, आले, मिरची  आणि दही घालून सुंदर रायते आई बनवी. ते चपातीबरोबर छान लागे, पण भातासह खाल्ले तरी मजाच वाटे. तुम्ही कधी हे भोपळ्याच्या फुलांचे रायते खाल्ले आहे का? पहाच एकदा खाऊन. श्रावणात आदिवासी कंटुर्ली विकायला आणत ही मोठ्या बोरा एवढी काटेरी फळे खुपचं पोष्टीक समजली जातात. आता ती भाजी बाजारात दिसतात पण रानात स्वत: उगवणा-या कंटुर्लीची चवच काही न्यारी. शेवटी नैसर्गिक ते नैसर्गिक.

पावसाचे चार महिने म्हणजे निसर्गाचा आनंद सोहळा. किती पालेभाज्या, किती फळ भाज्या आणि सोबतीला काकड्या, टरबूज यांची मेजवानी.आमच्या कौलांवर तोंडली, भोपळा यांचे वेल पसरत आणि गणपती सरता सरता भोपळे धरत, दुरून, अगदी रत्यावरून हे भोपळे नजरेस पडत. या भोपळ्याचे वडे छान लागतात. माठाची भाजी आणि मिक्स धान्याची भाकरी आई श्रावणातील रविवारी करत असे. या रविवारी बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात व हा भाकरी भाजीचा नैवेद्य देवाला दाखवतात. 

असा हा वर्षा ऋतु आणि त्याची हिरवाई मनाला प्रसन्न तर करतेच पण हा ऋतु गरिबाच्या पोटाची सोयही करतो. ज्यांच बालपण खेड्यात गेलं आहे त्यांना विचारा, या वर्षा ऋतूची चाहूल लागली की निसर्गा पासून ते प्राण्या पर्यंत आणि शेतकरी,कष्टकरी यांना किती आनंद होतो. आम्ही शहरात राहायला आल्या पासून या सुखाला मुकलो.

श्रावण आला की माझ्या लहापणापासून अनुभवले ते सारे डोळ्यासमोर येते आणि मी सकाळी गाडी पकडून सफाळे गाठतो, घरी जाऊन परसदारी फिरतो पण आत्ता तेव्हा धरत तशा वेली फुलत नाहीत, तसा बहर परसदारी दिसत नाही.नाही म्हणायला अळू, तोंडली मी घेऊन येतो. पण ते जुने दिवस आठवले की मन खंतावून जातं. का ते हिरवेपण टिकवता आले नाही? का तो जोश आताच्या तरुणाईत नाही? ही टोचणी संपतच नाही. पण याचे बोल मी कुणाला लावत नाही. 

“कालाय तस्मै नमः” पण आजही वाटते हे नव्याने पुन्हा करावे अन् श्रावणाने फुलून यावे. शेवटी तीच धरती तोच मी अन् तोच श्रावण.

मी सफाळाल्या गेलो किंवा मालवणला गेलो तरी अंगावरून कपडे काढले की नजर वळते ती परसातील झाडापेडांवर. कारण निसर्ग आणि त्याची संपदा हीच माझी पहिली आवड. निसर्गाची निर्मीती आणि त्यांचे रहस्य हाच माझ्यासाठी कौतुकाचा विषय. मलाही या

हिरवाईने वेड लावल आहे, हे मी नाकारू शकत नाही.

नव निर्मितीचे डोहाळे लागले धरेला
रोजची स्वप्न पडते तो आला वसुंधरेला
होई शिडकावा प्रेमाचा, नवं चैतन्याचा
तिज वसा दिला प्रभूने उदरी फुलविण्याचा 

Tags:

4 Comments

  1. जो अनुभव, गेले चाळीस वर्ष घेतला तो सर्व मित्रांना वाटून पुन्हा त्याची आठवण जागवणे आणि गत काळ जगणे ही माझी गरज आहे.असे करत असताना मित्रांना आनंद देऊ शकलो तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.आपण वेळोवेळी प्रोत्साहित करता.धन्यवाद.

Comments are closed.