एक वडापाव-कटिंगवर शब्दाखातर रोजच शाखेत राबत होतो
भाईंचे काम, कसले श्रम? कसला घाम? रात्ररात्र बॅनर लावत होतो

स्पर्धा, मेळावे, रोगनिदान, रक्तदान शिबिर, गल्लीबोळात भरवत होतो
शाखाप्रमुख सांगतील तसं, त्यांचा वडीलकीचा मान म्हणून करत होतो

कधी मोर्चा, कधी आंदोलन, कधी ठिय्या, आदेश मिळताच निघत होतो
मागून धनुष्य तर पुढे ढाण्या वाघ अभिमानाने जर्सीवर वागवत होतो

त्यांचा आदेश म्हणून दरवर्षी, गणपती, दहीहंडी चौकात झोकात होते
एरियात चंदा गोळा करताना, सामनेवाले भिडले तर डोकेही फुटत होते

सांडले रक्त तरी तमा नव्हती, गर्वाने वाघाचे छावे स्वतःला समजत होतो
ना रात्र पहिली ना पाऊस, एक एक मतासाठी चार चार मजले चढत होतो

निवडणूक दिवशी बूथ टाकून भर उन्हात, आळीपाळीने तापत होतो
दादा, भाऊ, ताई,आक्का, धनुष्यबाण चिन्ह, मारा शिक्का सांगत होतो

कशाचीच तमा नव्हती, शाळा न कॉलेज, दिवस शाखेतच सरत होते
ओझरती भेट, पाठीवर हात, कौतुकाचे शब्द, स्वप्नात भाई दिसत होते

त्यांच्या शब्दाखातर अंगावर केसेस, आजही जेलमध्ये कुणी सडत होते
हाण म्हणताच अविचाराने हातात काठी, कुणाचे डोके उगा फुटत होते

वाटले मनी, पालटेल नशीब, आज सोसली झळ तर उद्या होऊ वाघ
आजही शाखेत कट्टर सैनिक न भविष्य कळले न कधी आली जाग

कुठे सुरत? कुठे गुवाहाटी? झेपावले विमान, जाहीर केले त्यांनी बंड
शाखा ओस, बॅनर खाली, संभ्रम सारा, चिडीचूप आम्ही, अगदी थंड

सर्वच पक्षात दगाबाजी, फुटीर नेते, कार्यकर्ते मात्र प्रामाणिक निष्ठावंत
कोणत्याच नेत्याचा नसे भरोसा, बंड करून प्रतिष्ठा, आमचे हाल नसे अंत

त्यांनी बंडाच निशाण उभारलं आणि आमच्या झाली जीवनाची फरफट
कालपर्यंत एकदिलाने कार्यक्रम केला, दोस्ती गेली श्रमही सारेच फुकट

Tags:

1 Comment

Comments are closed.