मी नेहमीच तिच्याकडे भाजी घेत असे. वसईची, गावातील, गावठी भाजी म्हणून मला त्या भाजीचं आकर्षण होतं. टिळक ब्रीजच्या पूढील मनपा मंडईतील असणाऱ्या विक्रेत्यांकडील मेथी, पालक, लाल माठ, अळू आणि तिच्याकडे असणारी हिच भाजी यात खुप फरक होता. तिच्याकडची मेथी नाजूक पानांची, पालकही पातळ पानांचा आणि पोपटी झाक असलेला मुळांसह असायचा, कांद्याची पात तर इवल्याशा कांद्याची असायची त्यात राकट 

रांगडेपणा नसायचा. कोथंबीरी छोट्या पानांची आणि वेगळाच सुगंध सांगून जायची. एखाद पान चूरगळलं तरी नाकात सुगंध दरवळत रहायचा अशी ही नाजूक वर्णाची भाजी. जास्त छेडछाड केली तर मलूल होणारी भाजी हेच त्या भाजीच्या आकर्षणाच कारण.सगळीच भाजी आपले गावठीपण जपणारी, गौरवर्णी किशोरवयीन मुलीसारखी. भाजी सोबत कधी करवंदे,ताडगोळे तर कधी रताळी, कधी लाल पेरू तर कधी सफेद जांभ आणि अवीट गोडीचे चिकू ती आणायची. लांबट आकाराचे पोपटाच्या चोचीच्या रंगाचे पेरूही ती आणायाची.

त्या त्या ऋतूत असणारी भाजी, मग अळू, शेपू,आणि कंटवली तिच्याकडे हमखास मिळायची. दवण्या शेवग्याच्या शेंगा घ्याव्या तर तिच्याकडून, पावसात टाकळा असो की फ़ोडसीची भाजी, शेवळ असो की कुर्डुची भाजी, तीच भाजीची रेसिपी सांगायची. अशी खासी भाजी आणणारी ती ठसठसशीत कुंकू, हातात हिरव्या बांगड्या आणि नववारी यात शोभून दिसायची. मला काय हवं काय नको ते तिला कसं कळायच तिच जाणे परंतु तिच्याशी फारस न बोलता अगदी पाच दहा मिनिटात माझी खरेदी संपायची,”ताई घ्या पिशवी,अर्धा डझन चिकू टाकलेत पहा, साखरे सारखे गोड आहेत,साहेबाना आवडतील.” माझ्या नवऱ्याला या बाईंनी ते काळे आहेत की गोरे हे ही पाहिलं नाही तरीही ती आपलं मत ठाम व्यक्त करायची अशी ही माझी भाजीवाली.

तिच्या जवळची भाजी घेतल्याशिवाय माझे पाय ऑफिसच्या दिशेला  वळत नसत. ती ही जणू माझी वाट पहात थांबल्या सारखी  दिसायची. कधी कधी ऑफिस मधले चेष्टा करत, मॅडम तुम्ही ऑफिसला येता की भाजी खरेदीला,त्यांनी विचारणे आणि मी नुसते हसून दाद देणे अंगवळणी पडल होत.

माझं प्रमोशन झालं आणि माझी ब्रँच बदलली. दादर सोडून मला चर्चगेटला  जावं लागलं. माझी बदली झाल्याचं तिला मी सांगितलं तस तिने आवंढा गिळला. मी तिला विचारलं, “पार्वती काय झालं? माझी इथून बदली होणं स्वाभाविक आहे, माझ्या एवजी तुला वेगळ कुणी गिऱ्हाईक मिळेलच की!” ती स्वतःला आवरत म्हणाली,”नाही ताई मी तुमच्याकडे कधी गिऱ्हाईक म्हणून नाही पाहिलं, तुम्हींही माझ्याशी कधी भाव करत नाही बसला. खरं सांगते माझी मोठी बहीण रोज मला भेटायला येते असच मला वाटायचं म्हणून तुम्ही सकाळी नाही आला तर मी तुमच्यासाठी भाजी वेगळी काढून ठेवून वाट पहात बसायचे. माझी भाजी तर चार पूर्वीच संपायची,घरी लवकर गेलं तर नवरा माझ्या कमाईच्या पैश्यातून दारू पिणार आणि मला मारणार हे ठाऊक होतं म्हणून मी ——-“

तिला पुढे बोलता येईना. मी तिचा हात घट्ट पकडला. आज पर्यंत तिने कधीच आपली व्यथा सांगितली नव्हती केवळ उद्या पासून मी भेटणार नाही म्हणून तिच्या अंतःकरणात भळभळणारी जखम उघडी पडली. माझ्या पर्समधून पाचशे रुपयांची एक नोट काढून मी तिच्या हाती कोंबली, “पार्वती घे तुझ्या मुलांना खाऊसाठी माझ्याकडून भेट.”

तिने ती नोट पुन्हा माझ्या हातात दिली, “ताई नको, मला पैसे नकोत,मी गरीब असले तरी कुणाचे  फुकटचे पैसे घ्यायचे नाहीत हे माझ्या आईने मला लहानपणी शिकवलं. शक्य झालं तर एकच उपकार करा, माझी मुलं शिकत आहेत. दहावी बारावी झाली की कुठेतरी त्यांना नोकरीला चिकटवा.” तिच्या डोळ्यात माझा निरोप घेताना पाणी तारारल. मी तिची जड मनाने रजा घेतली.

दुसऱ्या दिवसा पासून मी चर्चगेट येथे ऑफिसमध्ये जाऊ लागले. मी तिला फार मिस करत होते. घरी सासूबाई पहिल्यासारखी भाजी का आणत नाहीस अशी विचारणा करीत, आमचे हे देखील अधून मधून दादरच्या भाजीची आठवण करीत पण फक्त भाजीसाठी मला दादरला उतरून पुन्हा चर्चगेट गाडी पकडणे शक्यच नव्हते. दरम्यानच्या काळात माझ्या दोन तीन वेळा वेग वेगळ्या ब्रँचमध्ये बदल्या झाल्या.बरीच वर्षे मागे पडली आणि मी पार्वती बाईंना पूर्ण विसरूनही गेले.

एक दिवस अचानक दादरला जाणं झालं. खरं एवढ्या वर्षानंतर तर तिची आठवण मनपटलावरून पुसून गेली होती पण कबुतर खान्यापाशी आले आणि अचानक तिची आठवण झाली. आता अडिच वाजले होते, तिची भेट व्हावी म्हणून मी झपझप पावले उचलत होते. मला पाहताच ती उठून उभी राहिली. तिच्या कपाळावर माझ लक्ष गेल.ठसठसशीत लाल कुंकवाच्या जागी काळ कुंकू पाहताच माझ्या मनात चर् झालं. “पार्वती हे कधी?” “ताई दोन वर्ष झाली, लिव्हरला सुज येऊन गेला, खुप पैसा खर्च केला पण नाही उपयोग झाला. ताई आज अचानक इकडे कशा?” तिने विषय बदलत माझी विचारपूस केली नवऱ्याच्या कटू आठवणी तिला नको वाटत असाव्या. तिला अचानक काही आठवलं तिने पेढ्याचा बॉक्स काढला आणि माझ्या समोर धरला, “घ्या ताई,पणशीकर यांच्या कडचे आहेत, मुलगा विमा कंपनीत ऑफीसर झाला.”

“अरे वा! मग आता तुला भाजी विकायला नको. मुलगा तुझी काळजी घेईल.” ती उसासे टाकत म्हणाली,”भाजी न विकून कसं चालेल ताई, मुलाचं लग्न झालं, सून नोकरी करते. ते बोरिवलीला राहतात. कामावर जायला घरी यायला बरं पडत त्यांना, आणि बिन शिकलेली अडाणी आई कोणाला पाहिजे? माझं हाय ते बरं हाय त्यांच्या पैश्यावर जगण्यापेक्षा–“

“पार्वती, अगं तो मुलगा आहे तुझा. तुला टाकून थोडाच देणार?” तसं ती वरमली, “तस तो म्हणतो, आई भाजी विकू नको मी तुला खर्चाला पैसे देईन. कोणी मला विचारलं आई कुठं आहे? काय करते? तर मी काय सांगणार? पण त्याला म्हटलं, आई भाजी विकते हे सांगायची लाज वाटत असेल तर बिन दिक्कत सांग आई वारली.” मी तीच सांत्वन करत म्हणाले, “मुलाला आईची कधी लाज वाटते का? तुझं आपलं काही तरीच, त्याला वाटत असावे आईने खूप कष्ट केले आता करू नये, निवांत जगावं नातवंडा बरोबर.” “ताई,तसा तो ये म्हणतो मला, पण ती दोघ जातील कामावर आणि मी घरी एकटी, बसून काय करू? यांची धुणी भांडी करण्यापेक्षा हात पाय हलतात तोवर आपलं हे काय वाईट? आपण उगाच कुणाला ओझं व्हायला नको.”

“अग, आता तरुण आहे पण पुढे वय वाढल्यावर  जाशीलच ना!,उद्या नातू झाला आणि त्यात गुंतून गेलीस तर सगळं विसरून जाशील.” ती खळाळून हसली,”काय गम्मत करता ताई,मी काय तरुण राहिली आहे आता! दोन वर्षे झाली साठ संपली त्याला. जो पर्यंत हात पाय हलतात तो पर्यंत धंदा टाकायचा नाही, अस मी ठरवलं आहे.”

मी तिचा निरोप घ्यावा म्हणून,पर्स उघडून पाचशेच्या दोन नोटा जबरदस्तीने तिच्या हाती कोंबल्या, पार्वती नाही म्हणू नको,तुझ्या मुलाच्या लग्नाचा आहेर समज.”तिच्या डोळ्यातून अश्रू ठिबकले. “ताई मला कशाला पैसे,आणि माझा मुलगा माझ्या सारखा स्वाभिमानी आहे. माझ्याकडून पैसे घेणार नाही. तोच मला महिन्यात कधी तरी भेटून पैसे देऊन जातो. म्हणतो तुला खर्चाला ठेव. पण आई माझ्या सोबत राहायला चल अस काही म्हणत नाही. मला  मेलीला किती लागत हो, मी ते पैसे तसेच शिल्लक ठेवते कधी तरी त्याला उपयोगी पडतील .”

“पार्वती, तु आता लवकरच आजी होशील आणि तुझा मुलगा तुला त्याच्या घरी घेऊन जाईल. तेव्हा नातवाला खेळणी घ्यायला हे पैसे ठेव. त्याला म्हणावं तुझ्या दुसऱ्या आजीने हे पैसे दिले आहेत.” पार्वती आजी होण्याच्या स्वप्नात नकळत रंगून गेली. मी निघाले, तसं तिने माझ्या पिशवीत बरीच भाजी भरली. ताई आता पुन्हा कधी भेट होईल की नाही सांगता येणार नाही,तेव्हा एवढी भाजी न्याच. नाही म्हणू नका,आणि हे चिकू साहेबांना द्या.” 

मी निशब्द, तिच्या प्रेमळ भावनेची आणि  भेटीची  किंमत करू शकत नव्हते. मी डबडबलेल्या डोळ्यांनी तिचा निरोप घेतला. मी दोन तीन वेळा पाठमोरे वळून पाहिले ती हात हलवून मला निरोप देत होती. त्या मायाळू सखीचा निरीप घेताना माझी मुळे मी स्वतःशी पारखून पहात होते.

Tags:

5 Comments

  1. छान….!या आणि अशा आठवणी मनात खास जागा करून जातात.
    अशीच माणसं माणूसकी जपणारी असतात.

Comments are closed.