आजचे कर्नाटक हे पुर्वी छोट्या छोट्या संस्थानात विभागलेले होते. यातील बेळगाव आणि धारवाड या दोन जिल्हावार आपण भाषिक तत्वावर दावा करत आहोत. आपल्याला उडप्यांची हॉटेल चांगलीच परिचित आहेत. कोलार येथील सोन्याच्या खाणी बद्दलही आपल्याला माहिती असेलच. बंगळुरू आयटी हब म्हणून परिचित आहेच, बिदर येथील साडीवरील चांदीचे नक्षीकामही आपण ऐकून असाल पण म्हैसूर आपल्या दिर्घ परिचयाचे झाले ते विद्यार्थी दशेतील ऐतिहासिक हैदर आणि टिपू सुलतान याच्या नावामुळे. कदाचीत कर्नाटक या भागावर वडियार राज घराणे गेले सहाशे वर्षे राज्य करत होते हे अनेकांना माहितही नसावे कारण आपले इतिहासाचे ज्ञान हे परीक्षेत पास होण्याइतपतच असते. माझा व्यक्तिगत अनुभव तरी असाच आहे.

उत्तरेकडील महाराणा प्रताप, राजा भारमल, राजा जयसिंग, मानसिंग, उदयसिंग, होळकर किंवा शिंदिया इत्यादी राजे महाराजे यांचा उल्लेख इतिहासात ज्या प्रकर्षाने येतो तसा उल्लेख दक्षिणेकडील राज घराण्यांचा येत नाही हे आपण शालेय जीवनात कोणता इतिहास शिकलो ते आठवण्याचा प्रयत्न केल्यास कळेल. याला अपवाद आताच्या आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथील निजामशाही, विजापूरची आदिलशाही, अर्थात औरंगजेब, शाईस्तेखान, नजीब अशा ठसठशीत नावांखेरीज या मोघली नावांचा इतिहास पुस्तकातच राहतो. टिपू सुलतान यांनी इंग्रज सत्तेशी लढा दिला म्हणून कदाचित त्याला इतिहासात स्थान मिळालं असावं. तर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला प्रादेशिक माहिती असते परंतू इतर राज्यांचा इतिहास फारसा परिचित नाही हेच खरे.

दक्षिणेत चोल राजाने तंजावर वसवलं असा उल्लेख आढळतो. या तंजावरवरती बराच काळ मराठ्यांनी राज्य केलं. दक्षिणेकडील राजांची मराठ्यांशी अनेक युध्द झाली. या राजांनी मराठ्या विरूद्ध लढण्यासाठी कधी इंग्रजांना तर कधी विजापूरच्या सुलतानाला आपल्या मदतीस बोलावल्याच इतिहास सांगतो. आजच्या तामिळनाडूचा इतिहास पहिले ते तिसरे शतक येथून सुरू होतो. हे राज्य चोल राजा आदित्य याने वसवले असा उल्लेख विश्वकोशात येतो. मात्र पांड्य, चेर आणि पल्लव या राज घराण्यांनी येथे राज्य केले. पल्लव हे कलेचे भोक्ते होते.affiliate link

कर्नाटकात वडियार या घराण्याने १३९९ ते १९५४ पर्यंत राज्य केले. याच भागावर वडियार यांच्या पुर्वी राष्ट्रकुट घराण्याचे राज्य होते. टिपू सुलतानाच्या अगोदर किमान ३००वर्षे ह्या भागावर वडियार यांचे राज्य होते. यदूराया वडियार हे या राज्याचे संस्थापक होते. राजांनी म्हैसूरला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली. येथील राजे संगीत आणि कलेचे भोक्ते होते. येथील दालनात त्या त्या काळातील कला व वैभवाचे दर्शन घडते. स्वातंत्र्य पुर्व काळात राजा चामराज यांच्या विधवा पत्नी केंपा नान्जमणी वाणी विलासा हिने १८९७ साली वेदावती नदीवर धरण बांधले होते असा उल्लेख आढळतो. वाणी विलासा हेच कर्नाटकातील सर्वात जुने पक्के धरण मानले जाते. देवांना चेहरा देऊन ओळख दिली ते राजा रविवर्मा याच वडियार कुटुंबातील. राजा रविवर्मा यांनी रेखाटन केलेली अनेक तैलचित्र जगमोहन पॅलेस येथे आहेत.

वडियार घराण्यातील राजांनी आपली राजधानी काही काळ श्रीरंगपट्टणम येथे हलवली होती त्यामुळेश्रीरंगपट्टणम या शहराचा विकास झाला. म्हैसूरचा राजवाडा हा प्रशस्त आणि नेत्रदिपक आहे. जुना राजवाडा लाकडी होता त्याला १६३८ साली आग लागून तो बेचिराख झाला, टिपू सुलतान यांनी १७९९ साली त्याची पुर्नबांधणी केली होती.

टिपू सुलतानाच्या मृत्यू नंतर हा राजवाडा कृष्णराजा वडियार तृतीय याच्या ताब्यात आला. त्याने हा राजवाडा हिंदू स्थापत्य कलेने १७९९ साली पुन्हा बांधला. १८९७ साली राजकन्या जयलक्ष्ममांनी हिच्या लग्न समारंभात त्याला आग लागली आणि तो भस्मसात झाला. ६०० वर्षांच्या काळात तो अनेक वेळा बांधण्यात आला. त्यानंतर आता अस्तित्वात असलेला राजवाडा हा राजा कृष्णराजा वडियार याची पत्नी महाराणी केंपानन्जामणी देवी यांनी इंग्रज स्थापत्य शास्त्रज्ञ हेन्री आर्यवीन याच्याकडून १९१२ साली बांधून घेतला. त्यात हिंदू, इस्लामिक, रजपूत, गोथीक शैलीचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. हा राजवाडा डोळ्याचे पारण फेडतो अस म्हटल तर वावगं ठरू नये.या राजवाड्यातील सभागृह व इतर दालने पाहिली की महाराणी केंपानन्जामणी यांना असलेली सौंदर्य दृष्टी लक्षात येते.

म्हैसूर येथे एकूण सात राजवाडे आहेत, अंबा, जगनमोहन, ललीथा, राजेंद्र विलास, चेलूवंबा, करंजी, जयलक्ष्मी यापैकी अंबा विलास किंवा म्हैसूर पँलेस हा सयाजी रोड स्थित आहे. याचीच बांधणी अनेकदा केल्याचे लक्षात येते.हा राजवाडा हा शहराच्या मध्यभागी असल्याने त्याचे चारही बाजूने दर्शन घडते.या राजवाड्याच्या उत्तर दिशेस भुवनेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे त्यास पाच मजली गोपुर आहे, देवादिकांच्या मूर्ती कोरल्या आहेत. या मंदिरावर नाजूक कलाकुसरीचे कोरीव काम आहे. चामुंडेश्वरी व वर्षास्वामी, कृष्णास्वामी ही काही तितकीच सुंदर मंदिरे राजवाड्यात आहेत. सर्व मंदिरात देवादिकांच्या मूर्ती चित्रित केल्या असून त्या कृष्णलीला दर्शवितात तिथे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दसऱ्याच्या दिवशी किंवा विजयादशमीला चामुडेश्र्वरी देवीची सोन्याच्या हौद्यातून हत्तीवरून मिरवणूक काढली जाते हा हौदा ७५० किलो वजनाचा शुध्द सोन्याचा आहे. कर्नाटक राज्याने नृत्य आणि संगीत याचा वारसा जपून ठेवला आहे. गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी, एम.एस.सुबलक्षमी, विष्णू दिगंबर पलूस्कर ही कर्नाटक शैलीतील गायकांची नावे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेले ११० वर्षे हा राजवाडा, हे वैभव जतन करण्याचं काम या राज्याने केलं आहे, ही कर्नाटक राज्यासाठी जमेची बाब आहे. हा राजवाडा गेल्या पाच पंचवीस वर्षातील असावा इतका तो निटनेटका ठेवण्यात आला आहे. या राज्याला आपल्या गत वैभवाचा आणि सांस्कृतिक वारशाचा रास्त अभिमान आहे असे तेथे काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आचरणातून दिसते. येथील दसरा उत्सव आणि त्याची मिरवणूक पाहण्यासाठी जगातून अनेक लोक येत असतात.

रोज संध्याकाळी ०७ ते ०८ या वेळात येथे राजवाड्याचा इतिहास सांगणारा दृक श्राव्य माध्यमातून Light Show आयोजित केला जातो. या माध्यमातून घराण्याचा सहाशे वर्षांचा इतिहास कथन केला जातो. राजवाडा निवेदन शैलीतून आपला इतिहास मांडतो. या राजवाड्या समोर गुलाबाची सुंदर बाग आहे. या बागेमुळे मुळच्याच देखण्या राजवाड्याला मोहक स्वरूप प्राप्त होतं. अतिशय प्रसन्न वाटत.

जगनमोहन राजवाडा, आर्ट गॅलरी ही वास्तू आणि त्यातील चित्र व पोट्रेट पाहण्यासारखी आहेत. राज घराण्यातील अनेक राजे, राजकन्या यांची पोट्रेट तसेच राजा रविवर्मा यांची पोट्रेट येथे आहेत. काही पोट्रेट ही आठ बाय सहा फुट आकाराची आहेत. येथे जुन्या वस्तूचे प्रदर्शन पहायला मिळते.

या राज्यातील नागरिकांना एकंदरीत स्वच्छतेचे महत्त्व नक्की समजले आहे हे पदोपदी जाणवते. स्वच्छतेची जाणीव असणारे पुरेसे कर्मचारी आपले काम नेकीने करत असल्याने शहर सुंदर राखले गेले आहे. येथे स्वछतागृहात पाच रुपये शुल्क आकारले जाते परंतु तेथील स्वच्छता आणि टापटीप पहिली की पैसे योग्य कारणासाठी खर्च केले जातात याच समाधान वाटतं. याच धर्तीवर आपल्या मोठ्या स्वच्छ स्वछतागृहे उभारून शहरात सेवा दिली गेली तर नागरिकांना सुविधा मिळेल. आज मुंबई शहरात असलेली, सुविधा नावाने चालवली जाणारी स्वच्छतागृह अतिशय गलिच्छ असतात.

कर्नाटक राज्यातील आवडलेली गोष्ट म्हणजे रस्ते, खेड्या पाड्यात कुठेही जा सर्व पक्के आणि उत्तम रस्ते आहेत. संपूर्ण भागात रस्त्यांचे उत्तम जाळे पसरले आहे अस म्हटल तरी वावग ठरू नये. येथे अडीच किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर रुंद एवढ्या पट्ट्यात चामराजेंद्रा प्राणी संग्रहालय पसरले आहे. या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट्या, सिंह, अस्वल, तरस, गवा, रानरेडा, डुक्कर, हरणे, चितळ, सांबर, मोर, गरुड, भारद्वाज, रान कोंबडी, शहामृग, हंस, माकड, अजगर, साप, असे अनेक भारतीय वंशाचे पशू, पक्षी, सरीसृप तसेच अनेक देशातील पक्षी, प्राणी जतन केले आहेत. त्यांना सुसह्य वाटावे असे नैसर्गिक वातावरण जपण्याचा व्यवस्थापनाने प्रयत्न केला आहे. काही भागात पाणी खेळवले आहे.

भारतीय प्राण्यापासून बेंगाँल टायगर, चिपांझी सारखे परदेशी पाहूणेही आहेत. मुख्य म्हणजे. स्वच्छतेबरोबर लहान मुल आणि स्तनदा यांच्यासाठी ठराविक अंतरावर सोय, तसेच स्वच्छतागृहे आणि पर्यटकांना खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी खानपान व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना या ठिकाणी प्लास्टिक बाँटल्स, खाद्यपदार्थ पाकिटे यांची तपासणी करूनच प्रवेश दिला जातो. या प्लास्टिक वस्तूवर बारकोड चिकटवून ठराविक डिपॉझिट घेतले जाते आणि प्राणी संग्रहालय सोडताना बारकोड स्कँन करून परत केले जाते त्यामुळे कोणीही कुठेही कोणतीही वस्तू फेकत नाही.

प्लास्टिक वस्तू प्रवासात न्यायची असल्यास त्यावर डिपॉझिट आकारून ते डिपॉझिट प्रवास संपवताना किंवा त्या दरम्यान राज्यात कुठेही परत देण्याची व्यवस्था राबवता आली, त्याकरता आँनलाईन बुकिंग प्रमाणे संगणक प्रणाली तयार करता आली तर प्लास्टिक वापर आणि त्याची विल्हेवाट यावर उत्तम नियोजन करता येईल.

करोना काळात या राज्याने अनेक नव्या गोष्टींचे तंत्र विकसीत केले. हाताचा स्पर्श होऊ नये म्हणून फुट कंट्रोल नळ किंवा सेन्सर असलेले नळ यांचा सार्वजनिक ठिकाणी वापर हे एक उदाहरण सांगता येईल. सांस्कृतिक वारसा जपता यावा त्याची योग्य देखभाल राखता यावी यासाठी सर्वच ठिकाणी योग्य ते शुल्क आकारत असल्याने हे वैभव पूढील कित्येक पिढ्यांना पाहता येईल याची खात्री वाटते. कुर्गला भारतातील स्काँटलंडयार्ड म्हटले जाते कारण येथील नैसर्गिक सौंदर्य, उंच पर्वत रांगातून वाहणारे झरे. सर्वदूर पसरलेले काँफीचे मळे आणि या मळ्यातच असणारे टुमदार बंगले यामुळे कुर्ग हे ठिकाण विदेशातील रहाणीमानाचा फिल देते.

कुर्ग येथे मडीकेरी हे उंचीवर वसलेले मध्यवर्ती शहरी ठिकाण आहे. येथे रहाण्यासाठी हाँटेल्स तसेच होम स्टे असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. येथे गढी वाटावी असा १७ व्या शतकातील छोटा किल्ला आहे याच्या प्रवेश व्दारावर दोन दगडी हत्ती आहेत या किल्ल्यास दगडी कोट आहे. येथे छोटे प्राचीन वस्तू संग्रहालय आहे मात्र या किल्ल्यावर फारसे पहाण्यासारखे काही नाही. मडीकेरी या शहराच्या आजूबाजूला ओंमकारेश्वर मंदिर, राजा सीट, मंडलपट्टी इत्यादी ठिकाणी जाणे सोयीचे होते.affiliate link

राजा गार्डन शहराच्या एका बाजूला असून येथून सुर्यास्त पहाता येतो. या बागेत विविध प्रकारचे गुलाब व फुलझाडे आहेत. संध्याकाळी सुर्यास्त पहाण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते.विशेष म्हणजे येथे ओरिजिनल चवीचे काँफीचे विविध प्रकार उपलब्ध असतात. डोस्याचे विविध प्रकारही म्हैसूर आणि कुर्ग येथे अनुभवता येतात. येथील सांबारची चव अनुभवल्या नंतर मुंबईत आपण सांबार म्हणून काय खातो ते कळेल. काँफी पासून बनवलेली डार्क चॉकलेट आणि विविध प्रकारचे मसाले यांचे कुर्ग हे माहेर आहे. त्यामुळे ज्यांना खरेदीचा अनुभव आहे त्यांनी येथील मसाले खरेदी तसेच चंदन आणि रक्तचंदन किंवा त्याच्या वस्तू यांची खरेदी करण्यास हरकत नाही.

कुर्ग या जिल्हातही मंडलपट्टी हा सुंदर ट्रेक आहे.विशेष म्हणजे हा ट्रेक जीप सारख्या वाहनाने आणि अतिशय खडतर अशा रस्त्यावरून पूर्ण करताना वाटणारा थरार जरूर अनुभववा असाच आहे. महेंद्राच्या थार जीपमधून उंच सखल निमुळत्या आणि नागमोडी रस्त्यावरून प्रवास करताना शरीरातील सर्व अवयव आणि हाडे एकमेकांशी गप्पा मारत असल्याचा अनुभव येथे घेता येतो.

मडीकेरी येथून हा ट्रेक वाहनाने एक तासाभरात पूर्ण केला की अर्धा किलोमीटर उंचीवर निरीक्षण टेकडी आहे, येथून खूप दूरवर पसरलेल्या पर्वत रांगा आणि खोल दरी दिसते. हा पूर्ण भाग धुक्याने आच्छादित असतो. वातावरण स्वच्छ असेल तर सूर्योदय व सुर्यास्त पाहायला मिळतो. या संपूर्ण वाटेवर दुतर्फा कॉफीचे मळे आहेत, चंदनाची आणि रक्तचंदनाची उंच वाढलेली झाडे आहेत. नारळी, पोफळीच्या बागा आणि त्याच्या आधाराने वाढलेल्या मिरीवेली आहेत. चहाची गवती पात वाटावी अशी दिसणारी वेलचीची रोपे, जायफळाची झाडे आहेत. हा भाग मसाला पिकांमुळे समृद्ध आहे.

याच वाटेवर कावेरी नदीच्या उगामातुन निर्माण झालेला अँबी धबधबा आहे. येथे पांडव येऊन गेल्याची आख्यायिका येथील बुजुर्ग सांगतात. म्हैसूर शहरापासून एक ते दिड तास वाहनाने गेल्यानंतर वृन्दावन गार्डन ला पोचता येते. वाटेत श्रीरंगपट्टणम लागते. येथील किल्ला राजा तिम्मणा नायक याने १४५४ साली बांधला. येथे लाल महाल आणि टिपूचा राजवाडा होता. ब्रिटीशांनी श्रीरंगपट्टणम काबीज केले तेव्हा येथील वाडे पाडले. वडियार यांनी आपली राजधानी काही काळ येथे नेल्याचा संदर्भ आहे. कावेरी नदीवर बांधलेल्या धरणाच्या पायथ्याशी असणारे वृन्दावन गार्डन अतिशय मनोहारी आहे. तेथील असंख्य कारंजी डोळ्यांचे पारणे फेडतात. पाण्याच्या मोठ्या कारंज्याचा संगीताच्या तालावरील आविष्कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. हा बगीच्या तीस ते चाळीस एकर परिसरात पसरला असून कारंज्याची रचना पायरी पध्दतीने केली असल्याने ही बाग कारंज्यासह सेल्फी घेण्याऱ्या कुटुंबासाठी नक्कीच उत्तम ठिकाण आहे.संध्याकाळी ६.३० नंतर दर अर्ध्या तासाच्या अंतराने येथे Water Fountain light Show होतो तो पाहण्यासाठी रिघ लागते. येथे असणाऱ्या तळ्यात बोटिंग करता येते. बच्चेकंपनीला वृंदावन बगीचा नक्की आवडेल. म्हैसूर येथून वृंदावन गार्डन येथे जाण्यासाठी वाहनास एक तास लागतो. वाटेवर टोल भरावा लागतो.affiliate link

दुबारे येथे हत्ती कँप आहे, हा कँप एका सुरक्षित बेटावर असल्याने येथे सामान्य नागरिक पायी जाऊ शकत नाही. येथे फाँरेस्ट खात्याने तीस पस्तीस हत्ती एकाच भूभागावर ठेवले आहेत. सकाळी १० वाजता तेथे पोचल्यास हत्ती पाण्यात कसे डुंबतात ते पाहता येत अर्थात तिकीट काढून. ११ ते ०४ या काळात हत्ती तेथेच असणाऱ्या जंगलात चरण्यासाठी त्यांना माहूत घेऊन जातो. येथे वीस किंवा जास्त टस्कर किंवा सुळे धारी हत्ती आहेत. हत्तीचे आयुष्य सरासरी ४५ वर्ष असते मात्र आफ्रिकन हत्ती सत्तर वर्ष जगतो. सुळे दोन मीटर पर्यंत असतात. येथील काही हत्तीचे सुळे तुटलेले होते. हत्ती मारामारी करतात तेव्हा त्यांचे सुळे तुटतात अशी माहिती येथे मिळाली. हत्तींची मारामारी होऊन सुळा तुटला तरी तो त्या सुळ्याने त्याला किंवा इतर हत्तींना इजा होऊ नये म्हणून अर्धवट तुटलेला किंवा वाकडी वाढ झालेला सुळा हत्तीला भूल देऊन कापून टाकला जातो.

म्हैसूर येथे ओरिजिनल सिल्कच्या साड्या, शाल आणि कुर्ते वाजवी भावात मिळतात, येथे कावेरी या ब्रॅण्ड नावाने सिल्क उत्पादने विकली जातात. तसेच चंदनाच्या हॅन्डमेड कलाकुसर केलेल्या वस्तू मिळतात. यात पेन स्टॅन्ड, प्राणी, लहान मुलांची खेळणी, हस्तिदंती वस्तू उपलब्ध असतात. अर्थात ह्या वस्तू महाग असतात. पण मुंबई, पुणे च्या तुलनेत येथील सिल्क साडी किंवा वस्तू स्वस्त मिळतात. मला तरी म्हैसूर आणि कुर्ग च्या प्रवासात मजा आली मात्र येथे हॉटेलमध्ये साऊथ इंडियन डिशेस जितक्या उत्तम मिळतात तितके रुचकर इतर डिशेस नाहीत. डोसा- सांबर आणि सोबत खोबऱ्याची चटणी मात्र लाजबाब.

वेगळ्या राज्यातील संस्कृती आणि तेथील सांस्कृतिक वारसा पहावा या उद्देशाने आमची ट्रिप यशस्वी झाली यात वाद नाही. तेव्हा म्हैसूर येथील राजवाडा, कावेरी नदिवरील धरणाच्या पायथ्याशी असणारे सुंदर नव्हे तर मनमोहक वृदांवन गार्डन आणि प्राणिसंग्रहालय, कुर्ग येथील कॉफीचे मळे आणि मंडलपट्टीला स्टंट वाटावा असा ट्रेक करायला जाताय ना? येथे ओरिजिनल चवीचे मसाल्याचे पदार्थ खरेदी करू शकाल आणि विविध चवीचे डोसे ट्राय करू शकाल. हा मोसम या ट्रिपसाठी उत्तम आहे. चला तर बॅग भरा.

Tags:

3 Comments

Comments are closed.