मकर संक्रांत संपली तरी आभाळ ढगाळ. सकाळचे साडेसात वाजले तरी सूर्याचं दर्शन नाही, हे अस मळभ आच्छादित असलेलं वातावरण असलं की माझं डोकं ठणकायला लागतं. अंग मोडून येतं. आम्ही,म्हणजे मी आणि मिस्टर इथे आलो त्याला दोन महिने झाले. या दोन महीन्यात न चूकता रात्री आठ साडे आठला अजिंक्यचा फोन येतो. तो ह्यांच्या तब्येतीची विचारपूस करतो जर अनधा मोकळी असली तर माझ्याशी बोलते देखील. कधीतरी ऐश्वर्या आमची नात High Paa, High Mu करते. ते सर्वस्वी तिच्या मुडवर असते. ह्यांची तब्येत अलीकडे जास्तच कुरकूर करते. सकाळी आठ वाजेपर्यंत अंथरुणावर पडलेले असतात, दोन वर्षांपूर्वी मणक्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांना अपंग बनवून गेलं.

हा माणूस वयाची ऐंशी गाठेपर्यंत सकाळी शिवाजी पार्कला दहा प्रदिक्षणा घालत होता हे सांगून कुणाला खर वाटेल?आमचं घर जुन्या इमारतीत चौथ्या माळ्यावर, किमान दोन तीन वेळा यांच्या खाली वर फेऱ्या व्हायच्या. तरीही कधी “थकलो” अस म्हणाले नाही. गेल्या वर्षी तापाच निमित्त झाल आणि जणू त्यांच्या अंगातील शक्ती कुणी काढूनच घेतली. ठाण्याच्या ग्यामन इंडिया कंपनीतून साठाव्या वर्षी  निवृत्त झाले तरी पंधरा वर्षे consultant म्हणून काम केलं. खूप मानसन्मान कमावला. अनेक Fly over Bridge structure चे आराखडे तयार केले.

हे सकाळी नऊ वाजता घरून निघाले की संध्याकाळी सात शिवाय परतत नव्हते म्हणून मी ही स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी निवृत्त झाल्यावर  शाळेत समन्वयक, मार्गदर्शक म्हणून काम केलं. माझ्या अनुभवाचा मोठ्या संस्थांना फायदा झाला मला पैसे मिळाले. नवीन लोकांशी ओळखी झाल्या. नाती निर्माण झाली. किती  मोठ्या मोठ्या माणसांशी मी जोडली गेले ते मी आठवते तेव्हा मला माझाच अभिमान वाटतो. अर्थात ही माझ्या वडिलांची पूण्याई. आमचे वडील समाज सेवेशी जोडले गेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्य सेनानी आमच्या घरी येवून गेले होते. अगदी पूज्य गुरुजींना पहाण्याचा योग मला मिळाला, तेव्हा वयाने लहान असल्याने बोलण्याचा धीर झाला नाही. माझ्या आईने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जेवू खाऊ घातलं होतं. भाई मोहाडीकर मला बहिणीवर माया करावी तशी माया करत. म्हणूनच मी शिक्षण क्षेत्र आणि समाजसेवा याच्याशी पूर्व पुण्याईने जोडली गेले.

माझ्या निवृत्तीनंतर घरी आम्ही दोघेच होतो. पण निवृत्तीनंतरही दोघेही कामात व्यस्त असल्याने फारसा एकटेपणा जाणवला नाही. या काळात मोठा मुलगा अजित सिंगापूर तर धाकटा पुण्यात कामानिमित्त स्थिरस्थावर झाले. अजिंक्य कधी तरी दादरला यायचा. कधी मुलं सोबत यायची पण बऱ्याचदा आम्हीच पुण्यास जायचो. त्याची वकिली, रोज ऑफिस , क्लायंट, कोर्ट अटेंड करावं लागतं म्हणून आधी दोन तीन महिन्यांनी फेरी व्हायची हळू हळू त्यातला कालावधी वाढला.

मुलांनी आम्हला भेटायला  यावं असा आग्रह आम्ही कधी धरला नाही आणि त्यांनी आमची गरज कधी लक्षात घेतली नाही. अजितचं अजून वेगळं. तो सिंगापूर येथे मोठ्या हुद्द्यावर, त्याच चार चार वर्षे इथे येणं नाही. दर शनिवारी फोन असायचा. कधी तरी बँकेत यांच्या नावावर डॉलर जमा व्हायचे. अर्थात मला पेन्शन असल्याने आणि यांचे शेअर्स, dividends, व्याज असे स्त्रोत असल्याने  पैसे वापरण्याचा प्रसंग आमच्यावर कधी आला नाही.

आई-बापाला पैसे दिले, एक फोन केला की आपली जबाबदारी संपली असे यांना वाटते की काय ते त्या नियंत्याला माहीत. पण मी किंवा यांनी कधी तक्रार केली नाही की आग्रह धरला नाही. मुलांनी त्याचा सोयीने अर्थ घेतला. मुलांचं स्वातंत्र्य आम्ही कायम जपलं त्यांच्या निर्णयात त्यांच्या संसारात ढवळा ढवळ केली नाही. त्यांनी विचारल्याशिवाय कधी मार्गदर्शन केलं नाही, मत प्रदर्शित केलं नाही.

आमच्या ह्यांचा आग्रह होता मुलांना समज आली की त्यांच्या मागे लागू नये जीवन त्यांच आहे ते त्यांनी घडवावे, आपण त्यांनी विचारले तर मार्गदर्शकाच्या भूमीकेत रहावं. प्रत्येक व्यक्तीला त्याच बरं वाईट कळतं, जीवन ही प्रयोगशाळा नसली तरी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम माणसाला अनुभवाने शहाणे करतो. दोन्ही मुलांनी अभ्यासाबाबत आम्हाला त्रास दिला नाही, त्यांच्या पाठी लागावं लागलं नाही. खेळ खेळले, एकांकिकेत भाग घेतला  बक्षिसे मिळवली. त्यांचे मार्ग त्यांनी निवडले,यशस्वी झाले. आम्ही शिक्षणासाठी पैसै खर्च केले. मात्र त्यांना सतत सल्ला दिला नाही, टोचणी लावली नाही, लावावी लागलीच नाही त्या दृष्टीने आम्ही नशीबवान.

आज आम्ही पेण येथे कदाचित कायमचे राहायला आलो त्याला दोन महिने लोटले, अजिंक्यने  पूण्याला Ola गाडी करून दिली आणि मला म्हणाला,  “आई मला कोर्ट आहे तू जाशील ना!” खरं तर त्याला मी खडसावले पाहिजे होते. ऐशी वर्षांचा आजारी बाप आणि अठ्याहत्तर वर्षाच्या आईला घरी सोडून यायला त्याला वेळ नव्हता. मी दुसऱ्या पालकांना त्यांनी मुलांवर कसे संस्कार करावे त्याचे मार्गदर्शन करत राहिले. इथे माझ्या मुलांचे काय चुकते ते सांगण्यात कमी पडले. दोन्ही मुले हुशार होती, गुणी होती, त्यांचा मार्ग त्यांनी निवडला यशस्वी झाले पण व्यवहारी दुनियेत जगताना भावना विसरले की काय तेच कळेना! आमच्या ह्यांची अशी तऱ्हा तर ह्यांचे साडू एकदम वेगळे एकदम कडक शिस्तीचे मुंबईला न्यायाधीश होते. अलिबाग येथे ऐसपैस बंगला बांधला. प्रत्येक सण बंगल्यावर साजरा होणार. दोन्ही मुलांनी आणि मुलींनी सुध्दा सह परिवार इथेच यायचं हा दंडक, त्यांच्या मुलांनी तो पळाला. मी त्याची साक्षीदार, आम्हाला सुध्दा कधी कधी निमंत्रण असायचं. ते भरलं गोकुळ पाहून त्यांच्या बद्दल आदर वाटायचा, यांना अस काही नाही जमलं, असतो एकेकाचा स्वभाव दुसर काय!

आई,बापाला  पैसे दिले की संपले असे गृहीतक आमच्या मुलांनी मांडले आणि स्वतःच्या वर्तुळात फिरत राहिले त्या वर्तुळाला  केंद्र आहे त्याच्याशी काही नातं आहे हेच विसरून गेले. आज हे सर्व आठवते याच कारण तसेच आहे.येथे राहायला आलो कारण दादरला इमारतीचे चार मजले चढून जाणं यांना शक्य नाही. माझ्या गुडघ्यांचे दुखणे कधीही डोके बाहेर काढते, शिवाय करोनाचे सावट मुंबई आणि पुणे शहरात अधिक. आमच्या सारख्या वयस्कर व्यक्तींना त्याचा धोका अधिक त्या पेक्षा येथे शुद्ध हवा. घर एक बाजूला असल्याने कोणाचा संसर्ग होण्याची भीती नाही,पण हे घर आमच्या प्रमाणे म्हातारं झालं त्यालाही दुरुस्तीची गरज आहे,कधी लाद्यांच्या खालून विंचू निघतो तर कधी कानेटी bathroom मध्ये अचानक निघते. नजर कमी झाल्याने जास्त जागरूक राहावं लागतं.

या घराची  दुरुस्ती करून घ्यायची तर माणस पाहणं आल पण तेवढे त्राण नाही.मुलाला येथे येऊन एवढ दुरूस्तीच काम करून घे म्हणाव तर त्याला वेळ नाही. हे म्हणाले तो माझ्या सारखा नोकर थोडाच आहे? व्यवसाय असणाऱ्या व्यक्तीला जागृत राहावं लागतं. ह्यांनीच त्याची बाजू घेतल्याने मी सांगण्याचा प्रश्न संपला. कस करु आमच्या संसाराच सिंहावलोकन? खरं तर कुणाला दोष देण्यात अर्थच नाही, मीच संस्कार करण्यात कमी पडले अस नाईलाजाने म्हणावे लागेल.

माझ्या शिक्षकी पेशात मी यशस्वी होते,एका प्रथितयश शाळेची मुख्याध्यापिका म्हणून मी नावलौकीक मिळवला होता. माझ्या मुलांचे यश मी माझ्या सहकारी वर्गाशी,नातेवाईक यांच्याकडे शेअर करायचे तेव्हा किती अभिमान वाटायचा, वाटायचे मुलांनी आमचे पांग फेडलं. बस आता काही नको,दोन्ही मुलांना तोला मोलाची स्थळ मिळाली, वरमाई म्हणून मिरवण्याचं भाग्य मिळाले.तेव्हा वाटायचे  सुख सुख अजून वेगळ काय असत? पण पाखरं पंख फुटताच उडून गेली, पिंजरा रिकामाच राहिला.

मी अजितने आग्रह केला म्हणून पहिल्यांदा सुनेच्या बाळांतपणाला आणि नंतर सुनेच फॅमिली प्लॅंनिंग ऑपरेशन झालं म्हणून एकटीच सिंगापूरला गेले होते ह्यांची गैरसोय करून. बिचारे काही म्हणाले नाहीत. तीन तीन महिने मी राहिले. हे ऑफिस वरून येऊन खिचडी करून भागवायचे तर कधी हॉटेलमध्ये जेवून यायचे पण कधी साधी नाराजी व्यक्त केली नाही आणि आजही करत नाहीत.

तेव्हा अजिंक्य होस्टेलवर रहात होता. थोडे दिवस घरी येऊन रहायला हरकत नव्हती पण त्याची गैरसोय नको म्हणून हे काही बोलले नाही आणि त्याचा बाप घरी एकटाच आहे हे लक्षातही आल नाही. हे म्हणतात आपण पालक म्हणून आपल कर्तव्य केलं. एवढा निसंग, अलिप्त आणि तरीही प्रेमळ माणूस माझा जन्माचा जोडीदार आहे याच आजही मला समाधान आहे.

मी भुतकाळात वावरते तेव्हा मी पहाते माझी गोजरी मुले या घराच्या आवारा भोवती आजुबाजूच्या मुलांना जमवून मस्त क्रिकेट तर कधी विटी दांडी खेळत आहेत, कधी बॅटिंग वरून तर कधी अजून वेगळ्या कारणे दंगा करत आहेत. मी त्या सर्व मुलांसाठी कधी कांदे पोहे तर कधी कांदा भजी तर कधी चमचमीत भेळ करून अंगणात बसवून खाऊ घालत आहे आणि आमचे हे आराम खुर्चीत बसून डुलत डुलत पेपर वाचत बसले आहेत. या फ्रेम बाहेर पडू नये असं वाटतं, इतक्यात बाबू पाटीलाची हाक येते . “आजी दूध घेता ना दूध,आजोबा आज बाहेर नाही आले.” मी कसं नुसं हसते, “आज आजोबांची तब्येत जरा नरम आहे,डोळा लागलाय त्यांचा.”तो निघता निघता म्हणतो आजी काय मदत लागली तर मोबाइल करा मला, मी येईन.” आजही इथे माणूसपण जिवंत आहे.

आम्ही पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी वडखळ येथे दहा गूंठे जागा विकत घेतली तेव्हा विकेंड साठी सोय एवढच नजरेसमोर होतं. दादरच्या भरगच्च गर्दीतून बाहेर पडून मोकळा श्वास घेता यावा, झालच तर निसर्गात पुन्हा एकदा हरवून जाण्यासाठी आणि झाडं लावायची हौस भागवता यावी या उद्देशाने इथे प्लाँट खरेदी केला.

शहरात वाढलेली मुले येथे कायम रहायला येणे शक्यच नव्हते त्यामुळे अवघे चारशे साडेचारशे स्वेअर   फुटांच घर बांधल. इथे पावसाळ्यात धो धो पाऊस पडत असल्याने काँक्रीट स्लॅब घातला नाही. तेव्हा स्लॅब च्या घरा बाबत  प्रवाद होता आणि आर्थिक नियोजनही नव्हते. म्हणून चार दिवस येवून आराम करता येईल आणि मुलांना मोकळ्या वातावरणात हुंदडता येईल, निसर्गाशी नात जोडता येईल इतकाच उद्देश होता. घराभोवती झाड लावली. फुलझाडांची मला प्रचंड आवड. चाफा, तगर, जास्वंद अशी झाड कुंपणाला तर मोगरा,जाई,चमेली,शेवंती अशी अंगणात. परसदारी, अगदी चिकू,आंबा याची कलम दापोली वरून आणून लावली.आम्ही आठ,पंधरा दिवसाने येणार म्हणून पाणी घालायला आणि देखभाल करायला माणूस देखील ठेवला. हे वैभव आजही आहे,फक्त नाही ती मुला-नातवंडाची सोबत.

ही जागा घेऊन घर बांधले आणि ही झाडे या वेली, हा पसारा मांडला तेव्हा दोन्ही मुलं शिकत होती. अजित इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला होता आणि धाकटा अजिंक्य बारावी आर्ट शिकत होता. इतर पालकांप्रमाणे मुलांजवळून त्यांनी काय शिकाव या बाबत आम्ही दोघांनी कोणताच आग्रह धरला नाही कारण आम्ही व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होतो.

मुलांना आम्ही त्यांची आवड जोपासू दिली. अजिंक्यला Distinction असूनही मी Science चा आग्रह धरला नाही. त्याला क्रिकेटची आवड असल्याने त्याने आर्ट घेतले तरी हे काही म्हणाले नाहीत, उलट माझी समजूत काढत म्हणाले, “कशात करिअर करावं ते त्याच त्याला ठरवू दे,आपण कोण आहोत त्याने काय कराव ते ठरवणारे?” इतका मोकळा ढोकळा माणूस मुलांना बाप म्हणून मिळाला पण मुलांना ते कळलच नाही. नेहमी आम्हाला गृहीत धरूनच मुले वागली तरीही आमच्या यांना वाटतं, मुलांना अनेक अडचणी आहेत,त्यांनी त्यांचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य घेतल तर चुकलं कुठे?”

चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी इथे वर्दळ नव्हती,अगदी मोजकी घर होती. दर  महिन्याला किमान  एक तरी फेरी न चुकता होत होती. मी शिक्षिका असल्याने रविवारला जोडून रजा असली की परेल डेपोतून आम्ही मिळेल त्या कोकणातील एस.टी.ने निघत असू. कधी हे सोबत असत कधी नंतर त्यांना जमेल तसे येत.

निघतांना जरुरी पुरते सामान घेतले की दोन तीन दिवस निवांत घालवता येत. मिस्टर सिव्हिल इंजिनिअर होते आणि मी शिक्षिका त्यामुळे घरातील वातावरण अभ्यासाचे असले तरी मुलांवर अभ्यासाचे दडपण नव्हते. अजित, सरदार पटेल इन्स्टिट्यूट मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग करत होता आणि त्याने इतक्या वर्षात पहिल्यांदा आमच्या सोबत यायला नकार दिला.

कॉलेजमध्ये शनिवारी प्रोग्राम होता आणि तो त्यात सहभागी झाला होता,तो जाणार नाही हे ऐकून अजिंक्य म्हणाला, ” आई मी पण इथेच थांबेन म्हणतो, तिथे क्रिकेट खेळायला कुणीही नसतं, कॉलेजमध्ये आमची Cricket Match आहे  मला प्रॅक्टिस करायची आहे.”  त्यांचं म्हणणं ऐकून मी रागावले पण हे म्हणाले, ” वसू, राहू दे त्यांना इथे. हो आणी त्यांच्या जेवणाची सोय आनंदभुवन इथे करतो.”

मी म्हणाले “स्वतः हट्टाने राहात आहेत,आजच्या साठी मी पोळ्या आणि भाजी करून ठेवते, उद्या दोघे मिळून  खिचडी करतील खिचडी करण काही कठीण नाही.” अजित म्हणाला, “मला सबमिशन आहे नाहीतर मी केली असती खिचडी, त्या पेक्षा आम्ही ऑम्लेट पाव खाऊ, थोडे पैसे ठेवा म्हणजे झाले.” दिवस कापरा सारखे उडून गेले. तेव्हा अजितचे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे ठरत होते मिस्टरांनी त्याच्या शिक्षणासाठी खर्चाची तरतूद केली होती  परंतू कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झाले त्यात तो सिलेक्ट झाला आणि कंपनीने त्याला  सिंगापूरच्या ब्रँच मध्ये पाठवले, पाहता पाहता तो तिथेच सेटल झाला. किती वेडं असतं मन, विचारांच्या तंद्रीत किती वर्षे मागे जाऊन आले.

आता बाबू पाटील दूध घेऊन आला नसता तर अजून कुठे भटकत राहिले असते ईश्वर जाणे. मला ह्यांची हाक ऐकू आली,”अग जरा येतेस का?” मी उठले आणि घरात जायला वळणार तोच अंगणातील हापूस आंब्याचे कलम उन्मळून पडले, ना वारा ना पाऊस याला कोसळायला काय झाले? मी मनातच म्हणाले. गेले तीस चाळीस वर्षे ते आवारात उभे होते वर्षा आड फळे देत होते, मला तो अपशकून वाटला, पण मी जोराने मान झटकली. विज्ञानाच्या शिक्षिकेने असला विचार करावा याचे मलाच आश्चर्य वाटले. यांची पून्हा हाक ऐकू आली. मी आले आले म्हणत घरात शिरले तर हे माझ्यासाठी चहा करून मी येण्याची वाट पहात होते.मी आनंदाने ओरडले ” अहो, तुम्ही का चहा ठेवलात मला बोलवायच नाही का?” हे माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “वसू, मी अंगणात येऊनही गेलो. तु भुतकाळात रमली होतीस, तुला वर्तमानात आणाव,ते ही शुल्लक चहासाठी बरं वाटेना म्हणून मग ——” 

मी त्यांच्या खंबीर शब्दाने नादावले, माझ्या अंगणातील आंब्याचे कलम पडले असले तरी माझ्या भाग्याचा वटवृक्ष अजूनही खंबीरपणे वादळ वाऱ्यास टक्कर देत मला साथ करेल याची खात्री मला पटली. वाफाळता चहा घेता घेता मी डोळे मिटून त्या जग नियंत्याचे दर्शन यांच्या रुपात घेतले. गेले पंचावन्न वर्षे माझा सोबती सुख दुःखात वटवृक्षा प्रमाणे मला सोबत करत आहे.त्याच्यावर पक्षांनी घरटी केली, त्यांनी आधार दिला.पक्षांना वाटले तेव्हा पक्षी उडूनही गेले, वटवृक्ष मात्र शांत, धीरगंभीर आपल्या जागेवर निश्चल आहे.

इतर कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

10 Comments

  1. अशी अनेक जोडपी सभोवताली दिसतात. वास्तवदर्शी कथा.

  2. आपल्यापैकी कुणाची तरी कथा आहे असे वाटते.छान लिहिले आहे.

Comments are closed.