सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मुंबईला निघून गेला, त्याने धीर दिल्याने ती सार काही विसरून गेली. तो पून्हा आला तेव्हा त्याने तिच्यासाठी आणलेला नाईट गाऊन तिला घालायला लावला. तिला ते कसेतरी वाटत होते. तिने दोन तिन वेळा नकार दिला पण त्याच्या आग्रहापूढे तिला नमत घ्यावं लागलं. तिने रविंद्रला खोलीबाहेर घालवले. गाऊन घालून ती आरशासमोर उभी राहून स्वतः ला पहातच राहिली.तिच तिलाच हसू आलं,”हा झगा घालून, अगदी मोकळ,मोकळ वाटतं, मला तर बाई लाज वाटते.शहरात एकवेळ घालतही असतील पण या खेडेगावात!आईंनी पाहिलं तर काय म्हणतील?” रवींद्रही तिच्या त्या रूपाकडे पाहून गोंधळला, त्याने गाऊनची लेस कशी बांधतात ते दाखवलं. आपल्या हाताने त्यांनी तिच्या केसात गजरा घातला. आजच तिच रूप काही वेगळच होत, रवींद्र तिला बाहूपाशात घेत म्हणाला, “प्रभे, छान दिसतेस हो तू, फोटोतल्या अप्सरे सारखी सुंदर! ओठांना लिपस्टिक लावली आणि डोळ्यात काजळ घातलस की झालं. पुढल्या वेळेस मी लिपस्टिक घेऊन येईन हो,स्वतःलाच तू ओळखणार नाहीस.”

ती लाजली, “तुमचं आपलं काहीतरीच. मला हो कशाला लिपस्टिक. मी काही चित्रपटातली हिरोईन नव्हे, मला अप्सरा म्हणू नका हा. मला नाही त्या आवडत, त्या म्हणे देवांशी चाळे करायच्या.” तो हसला त्याने तिला जवळ ओढली, तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले, तिने डोळे मिटून घेतले, ती निशब्द झाली. आता बोलत होती दोन हृदय, तो कानात कुजबुजला “प्रभे, आज तू भलतीच सुंदर दिसतेस.” रात्र चढत होती निशीगंधाचा दरवळ त्यांच्या खोलीला धुंद करून टाकत होता, ती आज खुलली होती. काचेच्या झरोक्यातून आकाशातील चांदण्या चमकत होत्या आणि ती त्या मधुर धुंदीत त्याच्या कुशीत गाढ झोपली होती. सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने तिला जाग आली.

तिचा आग्रह म्हणून रवींद्र तिच्यासाठी मुद्दाम सुट्टी घेऊन राहिला. असं पहिल्यांदा, बऱ्याच वर्षांनी घडलं होतं. ती खूप खुश होती. या आनंदात ती मुबंईला जाण्याचा विषय विसरून गेली. रवींद्र दोन दिवसांनी नेहमीप्रमाणे मुंबईला निघून गेला. पुढचे चार दिवस कसे निघून गेले कळालच नाही. शनिवार उजाडला, ती खूप आनंदात होती. बुट्याबुट्यांची साडी आणि मोरपंखी ब्लाऊज यात ती सुंदर दिसत होती. तिला आनंदी पाहून पार्वती काकू गालातच हसल्या, “हू आज रवींद्र यायचा आहे, मी विसरूनच गेले.”

या वेळेसही रवीद्रने एक मोठा बॉक्स आणला होता. म्हादूने तो सावकाश दिवाणखान्यात ठेवला. रवींद्र घरात आला, हात पाय धुवून बैठकीच्या खोलीत आरामखुर्चीत बसला तस ती चहा घेऊन आली. त्या खोक्याकडे पहात म्हणाली, “अहो! या खोक्यात काय आहे? काय आणलय?”
तो हसला,”तुमच्या आवडीच आहे,पण आता नाही हा पहायचं, पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे तेव्हा हे गिफ्ट तुला देणार.” “पण त्यात काय आहे ते तरी सांगाल की नाही?” “ती गंमत आहे, ते सांगितले तर मग गुपित काय राहिले, बरं जेवण तयार आहे ना, मला भूक लागली आहे.”
जेवण उरकून ते झोपायला गेले, गंमत म्हणजे, आज तिने स्वतः तो गाऊन घातला होता. खूप आनंदी दिसत होती. तो तिच्याकडे पाहून अर्थपूर्ण हसला, “एकंदरीत बाईसाहेबांना गाऊन आवडला म्हणायचा!” ती हसली. त्याने तिला जवळ घेतली तशी लाजून म्हणाली, “अहो, त्या खिडकीतून चंद्र पाहतोय पहा,मला लाज वाटतेय.” त्याने तिला पून्हा जवळ ओढत म्हटलं, “पाहू दे त्याला,माझी चांदणी किती सुंदर दिसते ती.” खिडकीतून झुळकीसरशी निशीगंधाचा गंध खोलीत शिरला आणि मन सुगंधित करून गेला.

गेल्या पंधरा वीस दिवसात सगळंच काही बदललं होतं. वेळ यावी लागते हेच खरं असावं. एक दिवस सकाळी बराच उशीर झाला तरी प्रभा उठली नव्हती म्हणुन पार्वती काकू तिच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी हाक मारली,”प्रभे अग उठायच नाही का? बघ पुर्वेला सुर्य डोकावू लागलाय”
“आई, माझं डोक थोड जड झालयं, कसं तरी होतय.”
त्यांनी कपळावर हात लावून पाहिला,”प्रभे शरीर तर गार लागतय, रात्री झोप नाही लागली का?” इतक्यात तिला उलटी झाल्या सारखी वाटली म्हणून ती बाथरूममध्ये गेली,”आई रात्रीपासून मळमळतयं,उलटी होत नाही पण, डोकं जड झालयं”

पार्वती काकू हसल्या, “मी आले हो, तो पर्यंत तोंड धुवून घे. उठून फिरू नकोस, आराम कर.” त्यांनी लिंबाचे सरबत आणि आल्याचा तुकडा आणला, “हूss, हे सरबत पी आणि आले तोंडात ठेव म्हणजे बरे वाटेल. थोड्या वेळांनी त्यांनी सविताला बोलावून घेतलं, “सवे,जरा प्रभाकडे थांबतेस का? मी घरातल आवरते, रात्री पासून तिला थोड बर नाही.”
“काकू,वहिनींना काय झाल?ताप येतोय का?” “तूच जाऊन पहा, मला मेलीला काय कळतंय.” सविता प्रभाच्या खोलीत गेली आणि थोड्याच वेळात ओरडत बाहेर आली,”काकू, वहिनींना कोरड्या उलट्या होतायत, गोड बातमी आहे.
आधी देवाला आणि वास्तूपुरूषाला दिवा लावा,साखर ठेवा.”

पार्वती काकू हसल्या, “सवे, मला मगाशीच कळालं होत हो, पण म्हटलं तू जाऊन खात्री करावी, छान आता त्याला येऊ दे,बघ किती आनंद होईल तो.” दुपारी डॉक्टर तपासून गेले,त्यांनी दुजोरा दिला.सगळा बंगलाच प्रभेची काळजी घेऊ लागला, पार्वती काकूंना इतका आनंद झाला होता की सारख्या प्रभाच्या पाठी पाठी राहू लागल्या. “अहो आई, मला काही झालेलं नाही. तुम्ही उगाच काळजी करू नका.” पण तिच कोणी ऐकत नव्हत, पार्वती काकू घरात बाळंतणीचे साजूक तुपातले पदार्थ बनवू लागल्या. तिच्या मदतीला, सवीता, शर्मीला, मोहिनी, वैदेही त्यांची काम उरकून दुपारी येऊ लागल्या. ती स्वयंपाक खोलीत आली की तिला त्या वासाने कसनुस होई मग दोघी म्हणतं, वहिनी थोडे दिवस अस होणारच, स्वयंपाक घरात येऊ नका,वहिनी कचरा काढू, वहिनी टेबलवर चढू नका, जीना चढू नका.” तिला या नका, नका चा कंटाळा आला होता.रवींद्र कधी येतो आणि त्याला मी कधी सांगते अस तिला झालं होतं.

चार दिवस सरता सरत नव्हते. शनिवार उजाडला तसं ती उत्साहाने सगळं करू लागली.अजूनही स्वयंपाक खोलीत गेल की वासान मळमळ सुरू होतीच पण सासूबाईना किती त्रास देणार म्हणून ती सवय करत होती. संध्याकाळी सर्व आवरून तीने सवीताला सोबत घेतलं, देवघरात आणि वास्तू पुरूषाला स्वतः दिवा लावून आली. सकाळीच तिने तारीकडून जुईच्या कळ्या काढून घेऊन गजरा करून ठेवला होता. तो गजरा माळून ती त्याची वाट पहात बसली.लंबकाच्या घड्याळात आठचे ठोके पडले तशी ती अस्वस्थ झाली, “इतक्यात ते यायला हवे होते,आजही गाडी लेट झाली की काय?” ती स्वतः शीच बोलली, इतक्यात घोड्यांच्या टापाचा आवाज आला. म्हादू नेहमी प्रमाणे पिशव्या घेऊन आला. आजही एक रंगीत आवरण असलेला मोठा खोका होता.त्याच्या मागोमाग रवींद्र आला.त्याला पाहून ती गोड हसली. रवींद्रने तिच्याकडे पाहिले, आज ती थोडी वेगळीच दिसत होती, थोडी थकल्या थकल्या सारखी. हातपाय धुवून तो आला तेव्हा तिने पाणी आणि चहा दिला.
पार्वती काकूही बैठकीच्या खोलीत येऊन त्याची विचारपूस केली.

“रवी,आलास, बरं झालं बाबा, आज एक माणूस सकाळपासून चातकासारखी तुझी वाट पहात बसलयं, जा आधी हातपाय धुवून घे,तुला चहा ठेवते.” खर तर त्याला प्रभा अशी आजारी असल्यासारखी का दिसते? बरं
नव्हतं का? विचारायच होतं, पण त्याने स्वतःला आवरलं अन तो बाथरूममध्ये गेला. आईने दिलेला गरमागरम चहा घेताना त्याच लक्ष तिच्यावर गेल,”प्रभा आज आईने चहा आणून दिला, तू बरी आहेस ना?”

ती हसली,”हो तर, एकदम ठणठणीत,तुम्हाला मी आजारी असल्या सारखी दिसते का? आई म्हणाल्या मी देते चहा. मी म्हटल ठिक.” रवींद्र संशयाने तिच्याकडे पहात म्हणाला, “मग मला तू थोडी वेगळी कशी दिसतेस, थकल्या सारखी”
“चला तुमच आपलं काहितरीच,उलट आज मी एकदम ताजीतवानी आहे. हो की नाही हो आई?” “हो रे हो!आज ती एकदम खुश आहे,आनंदी आहे,बघ. तू येणार म्हणून तिने जाईचा गजरा सुध्दा माळला आहे.बर त्या दिवशी तो खोका आणून ठेवलास आज हा दुसरा खोका, आणलस तरी काय ऐवढं. आणि आईला दाखवायच नाही की काय? म्हणजे नसेल दाखवायच तर तुझी इच्छा हो,मला आपल वाटलं म्हणून बोलले.”

त्याने तो बॉक्स हळुवार उघडला,त्यातून मोठी सुरई सारखी फुलदाणी काढली, दुसऱ्या पिशवीतून आणलेले गुलाब त्यात ठेवले. ” आई पाहिलस, ही फुलदाणी माझ्या एका मित्राने इटली मधून आणली.यात रोज ताजी फुलं ठेवायची.” प्रभा,ती फुलदाणी पहातच राहिली, “अय्या कित्ती छान आहे नाही, हिच्यावर बेलबुट्टी कोरल्याय ती किती नाजुक आहे. खूप छान,पण ही ठेवायची कुठे?”
“कुठे म्हणजे काय? इथेच, ते टेबल आहे ना, त्याच्यावर. तारीला सांगून ठेव हा, खूप नाजूक आहे ती, घाईघाईने आवरायला जाईल आणि फोडून टाकेल.”

पार्वती काकू म्हणाल्या,”रवींद्र, तू आम्हाला गिफ्ट आणलस तर आम्ही पण तुला गिफ्ट देणार आहोत. हवयं ना?” “तुम्ही! गिफ्ट आणलय आणि मला, ते काय?” त्या खुर्चीतुन उठल्या आणि त्याचे दोन्ही हात हातात घेत म्हणाल्या, “रवी! तू बाप होणार आहेस आणि मी आज्जी.” ते ऐकताच त्याने प्रभाला उचलून घेतले, तो तिला फिरवणार होता, काकू ओरडल्या, अरे थांब, तिला उचलून फिरवू नको,तिची काही महिने काळजी घ्यायला पाहिजे.” त्याने बायकोला अलगद खाली ठेवले आणि आईला घेऊन फिरवू लागला. “आई, मी आज खूप आनंदात आहे. मी आल्यावर म्हणालो होतो ना, प्रभा आज वेगळी दिसते म्हणून.”
“अरे वेड्या, मला चक्कर येईल, आधी मला खाली सोड.”पार्वती काकू म्हणाल्या. त्याने आईला खाली ठेवले आणि तो बेडरूममध्ये जाऊन बॉक्स घेऊन आला, “प्रभे हे तुझं वाढदिवसाच, surprise गिफ्ट,उघडून पहा.” तिने बॉक्स ला बांधलेली पट्टी काढण्याचा प्रयत्न केला पण ती निघत नव्हती.त्यानी चाकूने चिकट पट्टी कापून काढली आणि बॉक्स मोकळा केला तसा प्रभाने आत मधून मोठी बाहुली काढली. ती पाहून ती आनंदून गेली,”आई पाहिलंत, किती मन कवडे आहेत ते अजिबात थांगपत्ता लागू दिला नाही, मला म्हणाले जादूची वस्तू आहे, योग्य वेळ येईल तेव्हा पाहू नाहीतर कोप होईल. “घर आनंदात बुडून गेलं.

रात्रीचे जेवण खाण उरकल्यावर ती दोघ झोपायला गेली.तो तिला म्हणाला,”तू खूप आतल्या गाठीची आहेस,गोड बातमी असूनही मला नाही सांगितलं ना?” ती हसून म्हणाली, “मी तुम्हाला एकट्याला रात्री सांगणार होते पण तुमच्या आईला धीर असेल तर ना?आनंदाने त्या उतावीळ झाल्या होत्या. कधी एकदा तुम्ही येताय आणि कधी त्या तुम्हाला सांगतायत अस त्यांना झालं होतं.” “अग आई आहे ना माझी, या घरात चाळीस वर्षांनी पाळणा हलणार हा आनंद छोटा का आहे? बर आता तू तुझी काळजी घ्यायची, उगाचच धावपळ करायची नाही,उंचावर चढायचं नाही,जीने चढायचे नाही.”

“अहो! ही गोड बातमी माझ्या आईला कळवायला हवी, असं करा पुढच्या वेळी आठ दिवसासाठी तिला घेऊनच या.किती महिन्यात तिची भेट नाही. ऐकताय ना?” “ठीक, सांगतो तुमच्या मातोश्रीना, त्या तयार झाल्या तर नक्की आणतो.मात्र सांगितलं ते नीट पाळायचं, उगाच धावपळ करायची नाही. काही हवं असेल तर सविता वहिनींना हाक मारायची. त्या नक्की येतील.”

“अहो! तुम्ही नवरा आहात की डॉक्टर, मी हे आधीच ऐकलंय. आता तुम्ही ही एक करायचं. आठ दिवस रजा घेऊन माझ्या सोबत थांबायचं. थांबणार ना ,मला एकटीला बसून कंटाळा येतो” “आठ दिवस? मग आपल्या ऑफिसला कुलूप मरावं लागेल? आणि तू एकटी कुठे आहेस, आता तुझ्या जोडीला बाळ आहे ते काय! त्याच्याशी
माराव्या गप्पा, सविता वहिनींना बोलवावं,झालच तर..”
“थोडक्यात काय, तुम्हाला थांबायला नाही जमणार असच ना?” “अग मी आठ दिवस आणि ते ही लगेचच जमणार नाही म्हणालो, आधी मी दोन दिवस ऑफिसमध्ये जाऊन येईन आणि मग आमच्या लाडक्या राणी सोबत थांबेन मग तर झालं.” “पण हे नक्की ना! ,पहा हा ,तुम्ही फसवलं तर आम्ही नाही बोलणार.” “Promise,आमच्या राणी सरकार आम्हाला बाळ देणार मग त्यांची काळजी आम्ही नाही घ्यायची तर कोणी घ्यायची. उद्या आपल्या बंगल्यात आपल्या शेजाऱ्यांना छोटी पार्टी देऊ, जल्लोष करू मग तर झालं!” “तुम्हाला खरंच काही कळत नाही, आत्ता पासून जगजाहीर कशाला करा, ही बाब खाजगी नाही का?”
“अग,या बंगल्यात चाळीस वर्षांनी काही चांगली घटना घडते आहे, तर कळूदे सगळ्यांना या बंगल्याला नवा वारस मिळत आहे.आणि ही गोष्ट लपून थोडीच राहणार,सवीता वहिनींनी एव्हाना सगळ्यांना सांगितली देखील असेल.”

दुसऱ्या दिवशी दुपारी सगळ्या शेजाऱ्यांना आणि काही निवडक मंडळींना चहा पाणी कार्यक्रमासाठी निमंत्रण गेलं. जोशी डॉक्टर,भंडारे सर, पाटील काका, पुरुषोत्तम वाघ, कोणकर वकील अशी निवडक मंडळी आली. रवींद्रने चहाला बोलवल्याच कारण सांगितले. ती बातमी ऐकून प्रत्येकाने त्याच अभिनंदन केलं. पाटील काकाच म्हणाले, “रवींद्र या चहा पाण्यावर नाही हो जमणार, आत्ता ठिक आहे पण बारशाला आम्हाला पार्टी पाहिजे हो, ती ही ओली.”

“हो तर देईन की, तुम्ही घेणार असाल तर खास मागवून घेतो. आमच्या देवेंद्रलाही सोबत होईल.” रवींद्रच्या वाक्यावर हसत हसत पार्वती काकू म्हणाल्या तसली पार्टी करणार असाल तर शेतावरच्या घरी बरं, म्हादू तुमची सगळी व्यवस्था करेल.हास्याचा कल्लोळ झाला.

पंधरा दिवसांनी प्रभेचे आई-बाबा गिरगाव येथून मुलीला पाहायला आले. येतांना मुलीला आणि जावयाला खूप काही घेऊन आले. पार्वती काकूंच्या मदतीला प्रभेची आई रमाताई महिनाभर राहिल्या. तिचे वडील चार दिवसांनी जावयाबरोबर मुबंईला निघून गेले. प्रभेच्या आईने लेकीच्या आवडीचे अनेक पदार्थ करून घातले. दर शनिवारी पार्वती काकूंना विचारून जावयाच्या आवडीचा पदार्थ बनू लागला. घरात उत्साहाचे वातावरण आले.एक दिवस गमतीने रवींद्र सासूला म्हणाला देखील, “आई, यांना सांग, जावई गरोदर नाही, त्यांची मुलगी आहे, तिला काय आवडतं ते घाला.” रमाताईंना त्याचा राग आला,त्या म्हणाल्या तुम्ही गरोदर असता तर बर झालं असतं,माझ्या लेकीचा त्रास तरी वाचला असता. “या विनोदावर प्रभा पोटभर हसली.

पाहिले बाळंतपण म्हणून देसाई तिला माहेरी नेणार होते पण प्रभा घर सोडून जायला तयार नव्हती. दिसामासाने प्रभा फुलत होती, स्वतः वास्तूपुरूषाला दिवा लावून येत होती. तिच्या मनातील भिती कमी झाली होती.आता तारीला सोबत घेऊन ती बागेत फिरत होती. वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ करून फुलदाणी सजवत होती तर कधी शेजारच्या बिऱ्हाडात सांगून गुलाब मागवून घेत होती.तिची कांती उजळली होती आणि चाल मंदावली होती.गंम्मत म्हणजे ती स्वतः चिंचेच्या झाडाखाली जाऊन चिंचा आणून खात होती.

सातव्या महिन्यात ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला तिची आई इतर मुलीसह आली. गावातील काही महिलांना निमंत्रण होत.झोपाळा सजवून त्यावर तिला बसवलं.तिच्या हातात, बहिणींनी तिला सजवले होते. स्वतः आणलेली पैठणी नेसवली, कमरेला मोगऱ्याच्या माळा बांधल्या होत्या तर डोक्यावर सुंदर मुकुट, जुई चे बाजूबंध अशी सात सौभाग्यवतीनी ओटी भरली. रवींद्र हा सोहळा पाहून खूप आनंदी झाला.पार्वती काकूंना दिवस कसा जातो तेच कळेना.

दर पंधरा दिवसांनी डॉक्टर घरी येऊन तपासून जात होते. बाळाची वाढ योग्य असल्याचा निर्वाळा देत होते. रवींद्र अधून मधून तिच्यासाठी घरी थांबत होता. प्रभा खूप आनंदात होती.

नववा महिना लागला तशी प्रभेची अवस्था फार बिकट झाली, थोडं चाललं तरी थकवा येऊ लागला.पार्वती काकूंना भीती वाटू लागली. त्या रविंदरला म्हणाल्या, “या गावात हॉस्पिटलची सोय नाही,तू आपलं तिला मुंबईला ने उगाच तिची हेळसांड नको.” रवींद्रने डॉक्टर जोशींना विचारलं तर ते म्हणाले, “बेटा आता तिचे दिवस भरत आलेत, तिची तब्येतही चांगली आहे, काळजी करण्या सारखं काही नाही. वाटेत डिलिव्हरी झाली तर गडबड होईल त्या पेक्षा,एखादी नर्स तिच्या दिमतीला ठेव. ती सहज सुटका करेल. माझ्या परिचयाच्या बाई आहेत मी त्यांना सांगतो.”

दोन दिवसांनी, चाळीसपंचेचाळीस वयाच्या काळे नावाच्या बाई आल्या, त्या तालुक्याला,सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या.त्यांनी प्रभाला तपासलं ,त्या पार्वती काकूंना म्हणाल्या, काकू भिण्या सारख काही नाही.ताईंची तब्येत एकदम छान आहे.डॉक्टर तुम्हाला म्हणाले नाही पण मला त्यांनी सांगितलं आहे ताईना जुळ आहे. म्हणून त्याची हालचाल मंदावली आहे.” ते ऐकून पार्वती काकू घाबरल्या, “माझ्या प्रभेला तर काही धोका नाही ना? तिची सुखरूप सुटका झाली म्हणजे झाले. “त्यांनी एका फटोकडे हात जोडत नमस्कार केला आणि म्हणाल्या, “नाना तुमच्या सुनेला आशीर्वाद द्या तिची सुखरूप सुटका करा.” “काकू, तुम्ही निर्धास्त व्हा. मी आहे ना, या पेक्षा अवघड बाळंतपण केली आहेत. बहूदा उद्या दुपार पर्यंत यांची नक्की सुटका होईल. मी उद्या सकाळी येते. राईचे तेल, स्वच्छ कपडे, एक मोठा टब तयार ठेवा. माझ्या मदतीला एखादी चलाख बाई द्या म्हणजे झाले. बाकी सगळे मी आणते.” काळे बाई निघून गेल्या. पार्वती काकू सवीताला घेऊन वास्तूपुरूषाच्या झाडाकडे गेल्या. त्यांनी दिवा लावून गाऱ्हाणे घातले, “हे वास्तूपुरूषा माझ्या सुनेची सुखरूप सुटका कर, मी तुझी समाधी बांधीन.”

दुसऱ्या दिवशी दहाच्या दरम्यान काळे बाई आल्या. त्यांनी तिच्या खोलीतील अडगळ तारीच्या मदतीने काढून टाकली. खोली स्वच्छ पुसून घेतली. प्रभेला त्यांनी एनिमा दिला आणि दुपारी तीन साडेतीन वाजता तिच्या रडण्याचा जोरदार आवाज ऐकून पार्वती काकू घाबरून गेल्या.त्यांनी देवाकडे निरांजन पेटवून साकड घातलं. त्या तिच्या खोलीबाहेर येऱ्याझाऱ्या घालत होत्या. तोंडाने नारायण नारायण पुटपुटत होत्या. साडेतीनच्या दरम्यान तीच कण्हन कमी झालं, सविता काळेबाईंच्या मदतीला होती, सारखी आत बाहेर करत होती. प्रभेची सुटका झाली, काळे बाई खोली बाहेर येत पार्वती काकूंना म्हणाल्या दोन बाळ होते म्हणून तिला त्रास झाला.दोन्ही बाळ आणि तुमची सून सुखरूप आहेत. मुलगे दोघेही गुटगुटीत होते म्हणूनच प्रभाला त्रास होत होता. तासाभरात काळे बाईंनी पार्वती काकूंना बोलावून मुल दाखवली. त्या म्हणाल्या, “लब्बाड आईच्या चेहऱ्यावर गेलेत. बघा कसे मुठी आवळून रडतात. प्रभे माझ्या डोळ्याचं पारणं फेडलस हो,आज मी खूप खुश आहे.”

थोड्या वेळाने शर्मीला त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. पार्वती काकूना म्हणाली, “काकू,मी ताईंसाठी खिर केली आहे. तुम्ही काही करू नका.” पार्वती काकूंना हायसे वाटले. पार्वती काकूंनी तिच्याकडे आदराने पाहिलं. काळे बाईंनी सविताला, बाळाला कसे बांधायचे, दूध पिताना कसे ठेवायचे ते समजावून सांगितले.

पूढचा महिनाभर प्रभेला आणि दोन्ही बाळांना आंघोळ घालण्यासाठी त्या बाई पाठवते म्हणाल्या.ते ऐकून पार्वती काकू म्हणाल्या, “बाई तुमचे उपकार मानावे तेवढे थोडे.” काळे बाई हसल्या. “अहो उपकार कसले, एकमेकांना मदत नको का करायला? जोशी डॉक्टर तुमच्या मुलाचे मित्र, मग मला थोड अधीकच लक्ष द्यावं लागणार. असो मी सांगते त्या प्रमाणे त्यांना काही दिवस हलका आहार द्या.” , त्या सूचना देऊन निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी पार्वती काकूंनी किरण ठाकूर यांच्याकडे रवींद्रसाठी प्रभेची सुटका झाली असून दोन्ही बाळ सुखरूप आहेत. लगेचच निघ आणि येतांना प्रभेच्या आईला घेऊन ये असा निरोप पाठवला.

किरण ठाकूरला अचानक आलेला पाहून तो समजून गेला. त्याने उत्सुकतेने त्याला विचारले. दोन मुलगे झालेले ऐकून तो आनंदी झाला. त्यांनी किरणसाठी चहा मागवला. ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांसाठी पेढे मागवले. आज त्याच्या आनंदाला उधाण आले होते. किरणला हॉटेलमध्ये जेवण देऊन तो ऑफिसमध्ये आला. गिरगाव येथे सासूला फोन करून त्यानी बातमी सांगितली आणि संध्याकाळी त्यांना न्यायला येत असल्याचे कळवले. मुलीला दहा वर्षांनी मुलं झाली हा आनंद खूप मोठा होता. संध्याकाळी रवींद्रला आणण्यासाठी म्हादू गेला. रवींद्र सोबत प्रभाचे आई वडील आले होते. त्यांनी हातपाय धुतले. कधी एकदा बाळाला पहातो असे रवींद्रला झाले होते. तो हातपाय धुवून प्रभेच्या खोलीत गेला, खोलीत धुपाचा वास भरून राहिला होता. तो गंध चांगला वाटतही होता पण त्यानी बाळाला त्रास होईल असेही त्याला वाटत होते. ती वाट पहातच होती. दोन्ही मुल एकाच लाकडी पाळण्यात दुपट्यात बांधून ठेवली होती.त्यानी बाळाला उचलून घेतलं,तस प्रभा त्याच्याकडे पहात म्हणाली “अहो ! ह्या दुपट्यासह घ्या,कधीही सू करतो आणि मानेखाली नीट हात धरा. पहा लब्बाड कसा टक लावून पाहतोय.”

एवढ्यात दुसऱ्या बाळाने रडायला सुरवात केली,प्रभेने त्याला उचलून घेतलं, “अल्लेले,तुला पण बाबा उचलून घेनाल, लडायच नाही. शहाणा तू, ललल तर बाबा घेनाल नाही. बाबांच्या अंगावल सू नाही कलायची हं” रवींद्रने पहिल्या बाळाला ठेवलं आणि दुसऱ्या बाळाला तिच्या हातून घेतलं. एवढ्यात प्रभेचे आई बाबा,दारातून डोकावले तस,प्रभा म्हणाली, “या बाबा, आत या, बघा तुमचे नातू वाट बघत आहेत.” प्रभाची आई आतमध्ये आली,तिने अलगद बाळाला उचलून घेतले, दुसऱ्या बाळाकडे पहात ती म्हणाली, राम-लक्ष्मणाची जोडी आहे. रवींद्र हसला. पार्वती काकूंनी त्यांच्यासाठी चहा आणला. चहा घेता घेता
त्यांच्या गप्पा रंगल्या. पार्वती काकूंनी सवीताच्या मदतीने ते येण्याआधी जेवण उरकले होते. त्या रवींद्रला म्हणाल्या, “तुझे जोशी डॉक्टर आणि काळे बाई यांचे आभार मानावे तेवढे थोडे, डॉक्टरांना जुळे आहे हे माहित असूनही आपण घाबरून जाऊ नये म्हणून त्यांनी फक्त काळे बाई यांनाच जुळे असल्याचे सांगितले. काळेबाईंनी स्वतः येऊन तयारी केली आणि बाळंतपण सुखरूप केले, आंघोळ घालायला बाईही पाठवली. माझी अशी इच्छा आहे की त्यांची ओटी तर भरावीच पण त्यांना चांगले बक्षीस द्यावे.” “अलबत, द्यायलाच हवे, शहरातील डॉक्टर जुळे होणार असेल तर प्रचंड नाटकं करतात, पैसे तर घेतातच पण पालकांना घाबरवून टाकतात. तुम्ही बक्षीस दिले तरी मी वेगळे देईन. तो त्यांचा हक्क आहे.” देसाई म्हणाले.

रात्री जेवण उरकल्यावर,बारशाचा विषय निघाला, पार्वती काकू म्हणाल्या, “आमच्या गुरूजींना विचारून दिवस ठरवला पाहिजे. रविवार मिळाला तर फारच उत्तम,पूढील शनिवारी बारा दिवस पूर्ण होतील. रमाताई तुम्ही काय म्हणता?” “गुरूबळ आहे की नाही पहायला सांगा. बाकी तुमचे गुरुजी ठरवतील ते आम्हाला मान्य. रविवार असेल तर हिच्या बहिणी, यांची भाचे कंपनी अशी आमची आठ दहा माणस येतील. का हो मी म्हणते ते बरोबर आहे ना?” प्रभेची आई म्हणाली. गुरूजींनी रविवारी दुपारी तीन नंतर चांगला मुहूर्त असल्याचे पंचांग पाहून सांगितले. बंगल्यात तयारीची धामधूम सुरू झाली. पताका लागल्या. गावातील प्रतिष्ठित मंडळींना आणि बंगल्यातील रहिवाशांना जेवणाचे निमंत्रण गेले. काकूंनी वास्तू पुरूषाला नवस केल्याप्रमाणे चौथरा बांधून घेतला. देसाई गिरगावातून आचारी घेऊन आले.दुपारी जिलेबीच जेवण झालं. साडेतीनच्या मुहूर्तावर बारस झालं. पाळणा हलला.मुलांना वास्तूपुरूषाच्या चौथऱ्यावर ठेऊन आशीर्वाद घेतले. स्पिकरवर अंगाईगीतं वाजली. वैभव आणि विशाल अशी नाव ठेवली संध्याकाळी वेफर, लाडू आणि पेढा अशी डीश झाली. लोक मुलांना आशीर्वाद आणि गिफ्ट देऊन आनंदात घरी गेले. रवीद्रने प्रत्येकाला भेटवस्तु दिली. पाहुणे मंडळी दोन दिवस राहिली. बंगल्या पाठी बाग फिरताना कोणी तरी त्या चौथऱ्याविषयी विचारले. रात्री जेवण उरकल्यावर कोणीतरी पुन्हा चौथऱ्याविषयी विषय काढला तस रवीद्रने त्यांना वास्तूपुरुष आणि त्याची कथा ऐकवली,आणि या गोष्टीवर आपला विश्वास नसल्याचेही सांगितले पण संपूर्ण रात्र पाहुणे झोपू शकले नाहीत. खरं तर त्यांना काही अनुभव आला नव्हता पण अशा हॉन्टेड घरात रवींद्र आणि प्रभा हिमतीने राहतो या बद्दल सर्वांनी कौतुक केले.

त्या नंतर ती मुले शिक्षणासाठी मुबंईत निघून गेली.व्यवसाय वाढल्याने रविंद्रचे त्या बंगल्यात येणे जाणे कमी कमी होत गेले. बंगला चांगला असे पर्यंत आणि पार्वती काकू असेपर्यंत भाडेकरू राहिले. नंतर एवढ्या मोठ्या बंगल्याची डागडुजी करणे अवघड झाले आणि तो दुर्लक्षित झाला. पाऊस पाण्यात तो हळूहळू पडून गेला. खरे खोटे ईश्वर जाणे पण आजही साठ वर्षानंतर भग्न अवस्थेत तो चौथरा तिथेच आहे. लोक असं म्हणतात आजही वास्तू पुरुष दर अमवास्येला फिरत असतो. त्याच जागेवर दुसऱ्या मालकाने मोठा बांगला बांधला पण ते ही फार काळ तिथे राहू शकले नाही. आजही जुने जाणते लोक त्याला “भूत बंगलाच” म्हणतात.

6 Comments

 1. Hello! I could have sworn I’ve been to this site before
  but after reading through some of the post I realized it’s
  new to me. Anyhow, I’m definitely delighted I found it and I’ll be bookmarking and checking back often!

 2. Hello superb blog! Does running a blog like this
  require a large amount of work? I have no understanding of computer programming but I was hoping to start my
  own blog in the near future. Anyways, if you have any recommendations or tips for new blog owners please share.
  I understand this is off subject but I simply needed to ask.
  Thank you!

Comments are closed.