कोणा एखाद्या अधिकारी व्यक्तीला आपण चारित्र्यवान म्हणतो
पैशाने, शिक्षणाने, संस्काराने, कशाने तो नक्की चारित्र्यवान ठरतो?

अंगभर कपडे, स्वच्छ पोशाख, पादत्राणे याने का चारित्र्य घडते?
गरीब बिचारा! कोठून आणेल पैसा अडका, मग त्याचे चारित्र्य अडते

गावगुंड, वर्दीधारी, अन भ्रष्ट नेता काढती उगाच दुसऱ्या विरुद्ध रान
प्रामाणिक शब्द यांचा अखंड शत्रू हे फक्त सत्ता अन पैश्याचे गुलाम

गांधीजींनी केवळ पंचा नेसून साम्राज्यवादी इंग्लड हलवलं
दिंडी, सत्याग्रह आणि असहकार शस्त्राने परिवर्तन घडवलं

शाळेतल्या साध्या पोशाखातील गुरुजीला तेव्हा गावात मान
ते म्हणती फटक्यांची शिक्षा कशासाठी? जर शब्दांचा होतो बाण

गुरूजींच्या साध्या, स्वच्छ, सफेद कपड्यात होता देशाचा प्राण
मुलांवर संस्कार घडवणारे गुरूजी हाच होता गावाचा अभिमान

गुरुजींची बदली होणार अस कळताच सगळं गाव जमत होतं
“नका जाऊ गुरुजी” म्हणत मुलांच्या डोळ्यातच तळ साठत होतं

तेव्हा गावचा कुलकर्णी भला, सदाचारी, गावाचं पहात होता हित
त्यांना होता वडिलाकीचा मान त्यांच्या डोळ्यालाच गाव होतं भित

आज सारच बदललंय एका दाखल्यासाठी मारव्या लागती दहा खेटा
खासदार,आमदार, तलाठी, ग्रामसेवक म्हणती “कायद्या” न पीए ला भेटा

गंमतच आहे,भ्रष्टाचार करतात त्यांच्याकडे मागतो चारित्र्याचा दाखला
सुटाबुटातील लाचखोर अधिकारी, दलाल यांनी सारा देशच विकला

चारित्र्यहीन माणसूच फडकवतो राष्ट्रध्वज, करतो तिरंग्याला सलाम
आम्ही खरच षंढ, या स्वतंत्र भारत देशात, अजूनही व्यवस्थेचे गुलाम

Tags: