त्या फुलांना नव्हता सुगंध, परी आजही ती स्मृतीत माझ्या
मजवरी पाकळ्या त्या फुलांच्या, नित्य निरंतर बरसात होत्या

त्या वृक्षास सिंचले ना कुणी, तरी खुळा तो बहरत होता
दिनभर ताप सोसून, थकून सायंकाळी पुन्हा तो हसत होता

पांथस्तावर छाया धरुनी, चवऱ्या ढाळत रिझवत होता
थकल्या जीवाला येण्यासाठी, मान उंचावून खुणावत होता

ऊन, वारा, पाऊस धैर्याने सोसत, पर्णांनी तो गातच होता
मज मनाला उभारी देण्या, उंच आकाशी जाताच होता

त्यागून नित्य जुनेरी वस्त्रे, नवलाईसह सजतही होता
शिकवण बदलाची, त्यागाची, जगण्यातून देत होता

ना कधी हीन, ना दैन्य,ना दीन, ताठ कणा राखत होता
पशू पक्षांना हवा आसरा, म्हणून फळांना प्रसवत होता

दंभ ना मुळी ,त्याग मानून, कार्य स्वतःचे करीत होता
पाहून कुढतांना दुखितांना, मनातुनी खंतावत होता

स्वतः जगून, कृतीतून तो त्यागाची महती पटवत होता
असा तो सेवाव्रती वृक्ष, संकेताने कुणा घडवत होता

मोहरून सावरलो त्या क्षणाला झटकून टाकले दैन्य मनीचे
आठवून त्या व्रतस्थ वृक्षा मळभ झटकले कितिक युगांचे

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

4 Comments

  1. वाह वाह. खूपच सुंदर रचना. निःस्वार्थ भावना ही सर्वोत्तम भावना आहे सर.👌👌

  2. धन्यवाद अब्दुल ,आपण कवितेचे चाहते आहात वाचून आनंद वाटला. आपला उत्स्फूर्त प्रतिसाद हिच लिखाणाची प्रेरणा.

  3. फारच छान….!वृक्षाचे अचूक निरीक्षण आणि समर्पक शब्दांत मांडणी.फारच छान.

  4. नमस्कार, अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद.

Comments are closed.