सुबोध घरी शांतपणे बसला होता पण त्याच्या मनात मात्र वादळ घोघावत होते. चार दिवसांपूर्वी सारिका तडकाफडकी घर सोडून गेली. तस काही फार मोठं कारण नव्हतं. सारिकला भावाच्या लग्नाला जायचे होते, लग्न आठ दिवसांनी होते म्हणून सुबोधची आई तिला समजूत घालत म्हणाली, “सारिका एवढ्या अगोदर लग्नाला गेलंच पाहिजे का? चार दिवस अगोदर गेलीस तरी चालेल. तुझी आता सवय झाली आहे घराला आणि आठ दिवस तू नसलीस तर चुकल्या चुकल्या सारख होईल गं.” झालं, सारीकाला आला राग. ती म्हणाली, “आई, या पूर्वी तुम्ही चौघच होता,मी येऊन फक्त एक वर्षच झाल ना, मी नसले तरी तुमच्या मदतीला शीतल ताई आहेतच की,आठ दिवसांनी फार मोठा काय फरक पडणार, तसेही धुणे भांड्याला बाई आहेतच की.” 

तिचं तिरकं बोलण त्यांना लागल, “सारिका अग काय बोलतेस तु, मी तुला काय सांगते आणि तू कसा विचार करतेस?  अग कधीतरी तुला मुद्दाम कोणतं  काम सांगितले का? कामवाल्या बाई नाही आल्या तरी आम्ही दोघी शक्य ते सर्व काम उरकतो आणि तरी तू असा चूकीचा अर्थ घेतलास? मी कधीही तुला सून समजले नाही तर माझी मुलगीच मानल आणि तू —-”  त्यांच्या बोलण्यात सारीकाने रागवावं अस काहीच नव्हतं तरी सारीका काही उत्तर न देता तिच्या बेडरूममध्ये निघून गेली.

सुबोधच्या वडिलांनी हे सार ऐकल पण ते कुणालाही काही बोलले नाहीत. संध्याकाळी सुबोध घरी आला  त्याचे चहा पाणी झाले. घरात सर्वच शांत शांत पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो हॉलमध्ये आला तरी अण्णा पेपर वाचत होते. नेहमी प्रमाणे ना त्यांनी काही चौकशी केली की त्याच्याशी हसले. “अण्णा, घरात काही घडलं का? कुणाला बरं नाही का? आज घर अगदी शांत शांत का आहे? ”  ते हसले, “का रे ? काहीच तर झालेल नाही, तु थकून आलास म्हणून तुला तस वाटत असावं. तु फ्रेश हो चहा घे मग आपण बोलू.” त्याला कळेना नक्की अण्णा कोणाबद्दल आणि काय सांगणार आहेत. तो स्वतःच्या बेडरूममध्ये गेला तर सारीका  गुपचूप बसली होती.  त्याने मुद्दाम खाकरून तिच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण तिने दुर्लक्ष केलं तेव्हा त्याची खात्री पटली घरात महाभारत घडले असावे. तो तिच्या शेजारी जाऊन बसला.

 “सारीका, घरात काही झालय का? काही तरी अघटित घडल्या सारखे शांत का?” तिने तरीही उत्तर दिले नाही.त्याने पुन्हा तिला विचारले “सारीका, तुला कोणी काही बोलल का?” तरी तिने उत्तर दिले नाही जणू तो भिंतीबरोबर बोलत होता. त्याच्या समजूतदार पणाचा अंत झाला तस तो ओरडून म्हणाला “सारीका! काय झाले ते सांगणार आहेस की जाऊ इथून ? बस एकटीच खुरडत.”  ही मात्रा लागू पडली. तिने बेडरूमच दार लावून घेतलं आणि जोरात रडायला सुरवात केली, “थोडही स्वातंत्र्य नाही इथे,मी काय समजत होते आईंना आणि काय निघाल्या?”

“आई! काय म्हणाली? कशावरून तुमच वाजलं?” सुबोधने विचारले. “काही नाही, मी भावाच्या लग्नासाठी जाणार होते तर म्हणाल्या,एवढ्या लवकर कशाला जातेस, जा चार दिवसांनी, तूच सांग एकच भाऊ, त्याचं लग्न काही पून्हा पून्हा होणारी गोष्ट नाही ना? गेले आठवडाभर तर काय अडतय त्यांच? पण नाही, म्हणाल्या तुझी आम्हाला सवय झाली आहे. हे कसल वागणं. समजा आपण वेगळेच राहीलो असतो तर?” तिचं बोलण  ऐकून सुबोध रागावला,”काय चूकल ग आईच? एक आठवडा जाऊन काय करणार तिथे? जा चार दिवस अगोदर. लग्नानंतरही तूला पूजेसाठी किंवा पाच परतावण होई पर्यंत थांबावच लागेल ना?” 

सुबोधने आईची बाजू घेतली त्याचा तिला जास्तच राग आला, “मी समजत होते तुम्ही माझी बाजू घ्याल,पण बायको कोण तुमची? आई रक्ताची ना, तिचीच बाजू तुम्ही घेणार. पण मी जाणारच आईच्या मदतीला, मला गेलच पाहिजे. मी उद्या जाणारच आहे.” सुबोधला तिच्या या बोलण्याचा राग आला. तो तिला म्हणाला, “ठिक तु जाणार आहेस ना,मग जा की, माझ्या परवानगीची किंवा घरातल्या मोठ्या माणसांच्या होकार किंवा नकाराशी तुला काही कर्तव्य नाही तर तू जाऊ शकतेस. आम्ही काही तुला अडवणार नाही.” तो तिला फारसं न समजावता बेडरूम बाहेर निघून गेला. ती रात्रीचे जेवण करायला आली नाही. सुबोधची बहीण शीतल तिला बोलवायला गेली, “वहिनी आम्ही तुझ्यासाठी जेवायचे थांंबलो आहोत जेवायला चल.” तीने काहीच उत्तर दिल नाही.

थोड्या वेळाने सुबोधची आई  तीला बोलवायला गेली,”सारीका, अग काय हा वेडेपणा, या घरची सुन ना तू? जर तूच जेवायला आली नाहीस तर अण्णातरी जेवतील का?”  “आई मी कुणाला जेवू नका म्हणाले नाही, अण्णांनी माझ्यासाठी थांबायची गरज नाही. मला जेवायचं नाही.” त्यांचा नाईलाज झाला. त्या परतून जाणार तर पाठी अण्णाच उभे होते, त्यांना पाहताच सारीका चटकन उभी राहिली. अण्णा, तिच्याकडे पहात म्हणाले, “सुनबाई आम्ही तुला गुणी मुलगी समजत होतो, असला वेडेपणा तुला शोभत नाही, जा तू माहेरी, हवे तेवढे दिवस रहा पण भरल्या घरी उपाशी राहू नको आणि घराला कमीपणा आणू नको.” तिची प्रतिक्रिया न पाहता ते निघून गेले.

एवढे झाल्यावर कुणीही शहाण झाल असत पण तिला शहाणपण आल नाही. त्या दिवशी रात्री कुणीही जेवलं नाही. सकाळी ती तयारी करून निघून गेली. सुबोधने तिला समजावायचा प्रयत्न केला पण त्याच्या शब्दाला न जुमानता ती निघून गेली. घडला प्रकार खूप संतापदायक होता तरीही अण्णा सुबोधला काही म्हणाले नाही.सारीकाच्या भावाच, संजयच लग्न चार दिवसांवर आले तसे अण्णा सुबोधला म्हणाले, “सुबोध, तू आणि शीतल लग्नाला जा. सारीका कशीही वागली तरी आमचे व्याही आपटे लाख माणूस आहेत. त्यांनी स्वतः येऊन निमंत्रण दिलय तेव्हा आपल्या घराला कमीपणा येईल असं वागून चालणार नाही आणि हो चांगला भरगच्च आहेर घेऊन जा.” सुबोधला आश्र्चर्य वाटले. सुनेने एवढा अपमान करूनही अण्णा समजुतीने बोलत होते, “अण्णा, सारीकाने एवढा तमाशा केला तरीही मी जावं अस खरच तुम्हाला वाटतं. तिने माझा अपमान केला तर समजू शकतो पण आईचा आणि तुमचा अपमान केला तरी———” अण्णा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, “एकाने गाय मारली तर मी वासरू मारू का? हे आपल्याला शोभेल का? मग तिच्या बालीशपणात आणि आपल्यात फरक काय?, जा आपण  मोठेपणा दाखवत क्षमा केली तर आज नाही उद्या तिला उपरती होईलच.”

केवळ  अण्णांच्या शब्दाखातर तो आणि शीतल  लग्नासाठी सांगलीला गेले. तो एका हॉटेलवर राहिला. लग्नाचा मुहूर्त सकाळी ११.२०चा होता. त्यांनी हॉटेलवर नाश्ता उरकला आणि दहा वाजता तो आणि शीतल, पटवर्धन आर्किड हॉल वर पोचले. सनई चौघडा वाजत होता. हॉल चांगला सजवला होता. प्रवेशद्वारावर अत्तर शिंपडले जात होते. गुलाब फुलाने स्वागत केलं जात होतं.  संजय आपटे आणि सानिका गोडबोले यांची नावे फुलांनी सुशोभित केली होती. भगवे फेटे वराकडील मंडळींना वधू कडील मंडळी बांधत होती. सगळीकडे मंगलमय वातावरण होत.प्रवेश द्वारावर सुबोधचे चुलत साडू ऋषकेश गद्रे स्वागताला उभे होते. त्यांचं लक्ष सुबोध आणि शीतल कडे जाताच ते त्यांच्या दिशेने गेले. त्यांनी दोन्ही हात पसरून गळा भेट घेतली. “सुबोध कसे आहात? अहो साल्याच लग्न आणि आपण आज येता, हे काही बरे नाही.” त्यांनी वधू कडच्या मंडळींना बोलावून सुबोध नको नको म्हणत असता  फेटा बांधला. शीतलला सुद्धा फेटा बांधत होते,तिने नकार दिला.

त्यांना घेऊन ऋषिकेश पुढे गेला. पुढच्या कोचवर ते बसताच सारीकाचे वडील गजानन आपटे लगबगीने पुढे आले. त्यांनी जावयाला नमस्कार केला, दोन्ही हात स्वतः च्या हाती धरत म्हणाले, “सुबोध राव आमचं काही चुकले तर माफ करा. तुम्ही येता की नाही याची चुटपुट होती पण अण्णांना मी ओळखतो, त्यांच्या सारखा भला माणूस माझा व्याही आहे याचा मला गर्व आहे. आपण बसा, मी  शीतलला आपल्या रूममध्ये सोडून येतो.” शीतलला घेऊन  ते वर पक्षाच्या खोलीकडे गेले. सुबोध त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला. गजाननरावांनी जावई आणि त्यांच्या बहिणीचा लग्नात मान पान केला. सोन्याची चेन जावयाला घातली. सुबोधने मेहुण्याला सोन्याची अंगठी आणि सासूसासरे यांना आहेर केले.

लग्न सोहळा उरकला. कितीतरी वेळ फोटोसेशन सुरू होते, आपटेनी नवं दाम्पत्यासह मुलगी जावई आणि  स्वतःचे फोटो काढून घेतले. सुबोध तेव्हा सारीका शेजारी काहीच घडले नसावे असा उभा राहिला. फोटोग्राफर सांगतील तसे फोटो त्यांनी घेऊ दिले.पाहुणे राहूणे निघून गेले. मोजकी घरची मंडळी वरातीसाठी  मागे राहिली. सुबोधने जाणीव पूर्वक सारिकाशी बोलणे टाळले. संजय आणि सानिका यांची सजवलेली फोर्ड वाटेला लागली. तसे त्याने सासऱ्यांचा निरोप घेतला,” बाबा आम्ही निघतो आम्हाला सात वाजता लक्झरी आहे. उद्या ऑफिस आहे.”  “सुबोध राव,दोन दिवस आपण थांबला तर नाही का चालणार? सारीका ही तुमच्या सोबत येईल.” “बाबा,ऑफिस मधून रजा नाही मिळणार,तिला यायचे तेव्हा येऊ दे, आमची काही हरकत नाही. आम्हाला आज निघायला हवं.” 

सुबोध आणि शीतल जायला निघाले तस सारिका तिथे आली, “सुबोध, बाबा एवढं सांगतात तर रहा की दोन दिवस. ऑफिसमध्ये कळव दोन दिवस रजा हवी म्हणून. उद्या पाच परतावण न्यायचे तर घरातली माणसं हवी ना?”  “Sorry सारिका, मला थांबता येणार नाही. उद्या महत्त्वाची मिटींग आहे मला. आणि तसही तू आहेस की.” सारीका, शीतलकडे पहात म्हणाली “शीतल,सांग की तुझ्या दादाला, बाबा सांगतात तर त्यांचा आग्रह मोडून जाऊ नको, वाईट वाटेल त्यांना.” शीतल सुबोधकडे पहात म्हणाली,”वहिनी मी तुमच्या दोघांच्या  वादात पडणार नाही, दादा तुला request करत होता तू ऐकलं का  त्याच? त्याच जाऊदे, अण्णांच तरी? आणि आता तू त्यालाच सांगतेस बाबांचा आग्रह मोडू नको म्हणून.” त्यांच बोलण सूरू असताना सुबोधला फोन आला, “हॅलो, हॅलो, हा अण्णा हो पोचलो ना,अगदी मुहूर्तावर पोचलो,हो अण्णा, काय? दोन दिवस थांबू म्हणता? अहो मला मिटींग आहे, काय म्हणता ? Sick leave टाकू,अहो डेलिगेशन येणार आहे मी नसलो तर— . अहो अण्णा,रेप्युटेशन खराब होत, बरं ,बरं ,ठिक तुमच ऐकत नाही अस कस म्हणता,बरं ठिक. बर तर परवा येऊ आम्ही.”

सारिका त्यांच्यामधले संभाषण ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले, “सुबोध ,Thank You,अण्णांचे उपकार मी विसरणार नाही. चला सर्व तुमची वाट बघत आहेत.” अण्णांनी सांगितले म्हणून नाईलाजाने त्याला शीतलसह थांबावे लागले. सुबोधने अंदाज केला नक्कीच आपटेंनी अण्णांना फोन केला असावा. लग्नघर असल्याने, पाच परतावण आणि सत्यनारायण यात दोन दिवस कापरासारखे उडून गेले. सुबोध घरी जायला निघाला त्या दिवशी आपटेंनी आपल्या पत्नीला आणि सारीकाला बैठकीच्या खोलीत बसवले आणि सांगीतले, “सारीकाची आई, तूम्ही  तिच्या संसारात ढवळा ढवळ केलेली मला चालणार नाही, अण्णासाहेब संमंजस म्हणूनच घराची अब्रु वाचली, यापूढे ऊठसूठ तिला बोलवू नका. तुझ्या मुलीला समज दे,लग्न झाल्यावर सासरे हे वडिलांच्या जागी आणि सासू आईच्या जागी असते. जर त्यांची मनं दुखावली तर त्या सारखे काहीच पाप नाही. सारीका तरीही गप्पच होती हे पाहून आपटे म्हणाले, “सारीका तू गप्प आहेस त्यामुळे तुझ्या मनात काय ते कळत नाही पण तू झाल्या प्रकारा बद्दल सूबोधची आत्ता  सर्वा समक्ष माफी मागावी आणि कटूता संपवावी हे बरे.”

संजय आणि सानिका अप्पांकडे पहात होते, बघ्याची भूमिका निभावण्या पलीकडे ते ते काही करू शकत नव्हते. सानिका तर या प्रसंगाने चांगलीच घाबरली. “आप्पा, सारीकाने माझी माफी मागावी असं मला वाटत नाही, पण आई आणि अण्णांना तिने दुखवू नये,आई आणि अण्णा दोघेही सारीकावर शीतलवर प्रेम करतात तेवढेच करतात. त्यांना दुखावुन सारीकाने परस्पर निघून यायला नको होत.” सुबोध सारीकाकडे पहात म्हणाला. सारीकाने सुबोधचे पाय धरले , “सुबोध मला माफ कर,अनावधानाने मी आई आणि अण्णांना दुखावले पून्हा हीच चुक होणार नाही.” 

शामलने पूढे होत सारीकाचे हात हाती घेतले. “वहिनी तू माझ्या आईला अद्यापही ओळखू शकली नाहीस. तीनेच मला तुझा रूसवा दूर करून घरी आणावे यासाठी दादा बरोबर पाठवले. त्या दिवशी रात्री तू रागावून जेवली नाहीस तर आई आणि अण्णा जेवले नाहीत, म्हणाले ती पोरगी ऊपाशी असताना आम्ही कसे जेवणार? आई अण्णा जेवले नाही म्हणून कुणीही जेवल नाही.  मुलीने लग्न झाल्यानंतर माहेर आणि सासर यातील सेतू प्रेमाने मजबूत करायचा असतो,तोडायचा नसतो अस आई म्हणते.”

“अगदी बरोबर म्हणालीस मुली. दुर्दैवाने ही गोष्ट सांगायला सारीकाची आई कमी पडली,पण अण्णासाहेब यांच मन मोठे म्हणून संसाराची गाडी घसरता घसरता वाचली. सारीका जी समज तुझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या शामलकडे आहे ती तुझ्याकडे असती तर आनंद वाटला असता,पून्हा बापाला कमीपणा येईल असे वागू नको. सुबोधराव जी चूक सारीकाने केली त्या बद्दल मी माफी मागतो माझ्या मुलीवरचा राग सोडा आणि सुखाने संसार करा” “नाना,आम्ही आईच्या संस्कारात वाढलो,रागाने मन दुभंगण्यापेक्षा प्रेमाने जग जिंकावे असे आई म्हणते. मी सारीकाला समजावण्याचा प्रयत्न केला,पण आमच्या कोणाच्याही सांगण्याचा परिणाम तिच्यावर झाला नाही,आई आणि अण्णा यांना तिने दुखावू नये एवढीच अपेक्षा. याउपर आमची काही तक्रार नाही.” सारीकाने सुबोधचे हात हाती धरत म्हटले,”सुबोध मी मी चूकले माफी मागीतली आता तरी  मला माफ कर, यापूढे आई ,अण्णा यांना वाईट वाटेल अस मी कधीही वागणार नाही,प्रॉमिस.” सुबोधने तीला सर्वा समक्ष अलिंगन दिले.

दोन कुटूंबातील कटूता कमी झाली खरी  पण सारीकाची आई सुगंधा या प्रसंगाने दुखावली,नवऱ्याने सर्वांसमोर आपली चूक दाखवून द्यावी याचा तिला राग आलाच,ती स्वयंपाक घरात निघून गेली तेव्हा ही गोष्ट सुबोधच्या लक्षात आली.  बायकांचा स्वभाव मुळातच लहरी त्यात त्यांच्यावर सर्वांसमोर आरोप म्हणजे गंभीर चूकच. त्यात शामलने आईचे उदाहरण दिल्याने तिचा नकळत पाणउतारा झाला. सुबोध स्वयंपाक घरात गेला आणि सारीकाची आईला घेऊन आला, “आई,आमच्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावला असाल तर माफ करा, केवळ शामल जवळून पुन्हा चूक घडू नये म्हणून स्पष्ट बोलावे लागले आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे पण आम्ही तुमची मुले आहोत तेव्हा आमच्या वरील राग सोडा.” आप्पा हसून म्हणाले, “सारीकाची आई. पहा जावई किती सुज्ञ आहेत. आधी छान शिरा करा आणि सगळ्यांच तोंड गोड करा, सारीका जा आईला मदत कर. सानिकाकडे पहात म्हणाले सुनबाई तू फक्कड कॉफी कर आमचे रुसलेले जावई हसले पाहिजेत.”

सुबोध संध्याकाळी सारीका आणि शीतल  सांगली ते पुणे लॅक्सरी बसने निघाले. लग्न झालेल नवीन जोडप त्यांना सोबत म्हणून बस स्टँडवर आले. संजयने सारीकाचा निरोप घेतला. बस निघाली तस सारीकाने सानीकाला हात हलवून बाय केले. शीतल जाणीवपूर्वक वेगळ्या सीटवर बसली जेणेकरून सुबोध आणि सारीका यांना प्रायव्हसी मिळू शकेल .वाटेत दोन वेळा फक्त स्नॅक्स आणि चहा साठी शामल त्यांच्यासह बसली. जेव्हा ते स्वारगेटला पोचले तेव्हा शीतल सुबोधला गमतीने म्हणाली, “दादा, आता उतरता, की पुन्हा सांगलीला जाणार दोघ.” ते ऐकून सारीका छान लाजली. घरी अण्णा त्यांची वाट पहात होते, त्यांना येतांना पाहून अण्णा पत्नीला म्हणाले, “लक्ष्मी, यांची दृष्ट काढ, पुन्हा कोणाची, अगदी आपलीही नजर नको लागायला.

“शीतलची आई ,पार्वती खरोखर मीठ मोहऱ्या घेऊन आली आणि तिने त्या ओवाळून दूर फेकल्या, सारीका घरात आली आणि पार्वतीच्या कुशीत शिरून मुसमुसुन रडत होती आणि त्या तिची समजूत काढत होत्या, अण्णा तृप्त मनाने सासू सुनेच्या त्या जोडीकडे पाहून गालात हसत होते, “शब्दवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.” अशीच ती मूक भावना होती. भांडं  तडा जाण्याऐवजी घट्ट सांधल गेलं होतं, संसार खट्टा मिठा नसेल तर मजा ती काय? , सुबोध गंमतीने म्हणाला,  “तुमचं भेटून पोट भरल असेल तर आमच्या पोटाची सोय करा आत्ता.” घर खळाळून हसल,जणू संसाराला नव्याने विरहाच्या संगीताची साथ मिळाली होती.

Tags:

3 Comments

  1. Khupch Chan….
    Mulinchya / mulanchya aaine
    mulanchya/mulinchya sansarat laksh ghatle nahi tar kititari janache ghatspot vachtil…… aaine aadhle prem n karta margdarshaka chya bhumiket rahave….

Comments are closed.