जगण्याचे राहून गेले ही खंत उरी कशाला?
मी घातली,गवसणी होती, त्या उंच आभाळाला
आव्हान दिले होते, त्या अथांग सागराला
मी नजरेत टिपले होते, अंतरिक्षात नव नक्षत्राला
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

न पाहिले जन्मदाते मी, वंचीत होतो मातृसुखाला
बालपण हरवले होते, न दोष दिला कधी नशिबाला
कधीच कळले नाही, मजवर कोणी अन्याय केला?
मी अनाथ तरीही नव्हतो, बाप मानले त्या ईश्वराला
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

बालपणी मैत्रेय जमले, त्या काळानेच मजला जपले
देऊनी भान जगण्याचे, दुःखात त्यानेच अश्रू पुसले
छत आभाळ स्वतःच झाले, दिशांचे घर मज दिधले
मी एकाकी कधीच नव्हतो, दुःख होते मज सोबतीला
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

अनुभवाची शिकलो शाळा, मित्र तेथेच झाले गोळा
समृद्ध मजला केले, रोज जगण्याचा नवाच सोहळा
कधी झुंज अस्तित्वाची, ना उपहास कुणाचा केला
मी इमानी स्वतःशी होतो, सुखास्तव घोटला न गळा
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

षड्रिपु माझ्यातही होते, परी न दुखावले कुणाला
ज्यांनी सोबत मज केली, त्यांना कधी दगा न केला
मी भणंग होतो तरीही, मज दावा कधीच न जमला
मी श्रीमंत बनलो मनाने, हाच आधार मज जगण्याला
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

कुडीत जोवरी श्वास मी लढेन, गाईन मातृभूमीचे गुणगान
नका लपेटू देह माझा, तिरंग्याचा करू नका अपमान
माझे अभिवादन, ज्यांनी दिला या भूमीत मजला जन्म
या जगण्याचा अभिमान, माझा सलाम जन्मभुमीला
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

छातीचा करूनी कोट, मी उभा इथे भू रक्षणाला
रक्तात न्हाऊन गेलो, परी सीमेवरूनी सोडले न शत्रूला
कसा निरोप घेऊ तुमचा, इथे शत्रू लचके तोडण्यास टपला
कळवा प्रेयसीला माझ्या, तुझा वीर तुजसाठी थांबलेला
अन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Tags:

10 Comments

  1. छान रचना सर, कविता थोडी छोटी असेल तर आणखी मजा आली असती.

  2. Spot on with this write-up, I honestly feel this website needs a great deal more attention. I’ll probably
    be returning to read more, thanks for the information!

Comments are closed.