हे माते तुझ्याच अज्ञान बालकांना एकदाच क्षमा कर
तू जननी तू जन्मदात्री चुकू तिथे जरूर शिक्षाच कर
वैफल्यग्रस्त तुझ्या बालकाला ममतेने हृदयासी धर
निरोगी, निरामय जीवनाचा मंत्र दे,दे माणुसकीचा वर

आम्ही हव्यासापोटी अहंकार, आकांक्षा यांचे बीज  पेरले
आम्हाला खोट्या समृध्दीची हाव म्हणून हृदयच पोखरले
बंदिस्त केले ओहोळ, बांधली धरणे, नद्यां आता अबोल
भविष्याच्या चिंतेने तुझे उर पोखरत गेलो खोलच खोल

शोध लावतांना तुझ्यावर आम्ही फक्त अन्यायच केला
तुझे पाणी, जमीन अन्  शाश्वत श्वासही गहाण टाकला
बीजच विषवृक्षाचं लावल्यावर काय अमृत उगवेल?
रासायनिक खतांचा प्रचंड मारा वृक्षांना कसं जगवेल?

माणुस प्राणी इतका स्वार्थी त्याची राक्षसात गणना
स्वत: सुखी व्हावं म्हणून तुझी सतत अवहेलना
तरीही तू सार सहन केलस तुझ्याच मुलांसाठी
हलाहल पचवून ही देत राहिलीस जगण्यासाठी

आणि आम्ही महामुर्ख तूला ओरबाडत राहिलो
तुझ्या स्तनातील दूध पितांना रक्तही शोषत गेलो
तू ना तक्रार केलीस ना नाकारत गेली हीच ती बोच
आम्ही खरच करंटे काहीच यातुन घेतला नाही बोध

तुझ्या सर्व शरीरभर आमच्या हीन कृत्याचा कलंक
आमच्याकडे विज्ञानाची भरारी मारीत गेलो डंख
तरीही सावरलो नाही म्हणूनच तू शिकवत राहिलीस
बाळांनो असं वागू नका कृतीतून तुझ्या दाखवत राहिलीस

स्वार्थापोटी मेंदूच पूरता गहाण विज्ञानाच्या दूकाना
तुझे दु:ख ,तुझे उसासे कळलेच नाही मला स्मशानात
याचा शेवट असेल भयानक, मूला थोडं सावध हो 
कान बहिरे असल्याप्रमाणे मी ऐकूनही सोडून दिलं

आणि मग उत्पाताची मालिका कधी मलेरीया,डेंग्यू
सार्स तर कधी चिकनगुनिया सारे तर आम्हीच पेरले
तुझे दु:ख न समजता गिनीपिग म्हणूनही तुलाच हेरले
अन् पहाता पहाता मानवाला अनेक व्याधींनी घेरले

आता त्याची विषारी फळे आमच्याच पिढीने पचवायची
महामारी करोना आणि यापूढील संकटे गुमान सोसायची
हे सारं मुलांना देऊन खरंच आम्ही मिळवलं तरी काय?
तु सार भरभरून देऊन त्या बदल्यात तूला दिलयच काय?

याची शिक्षा पूढील पिढीस नको म्हणून थोड सावध होऊ
जे नैसर्गीक नाही त्या सुखांचा सोस आतातरी  सोडून देऊ
प्रयत्न केला तर नक्कीच जमेल माणसातला हैवान मरेल
आणि पून्हा एकदा ही देवभूमी वनदेवीच्या हिरवाईने भरेल

पून्हा उगवेल एक पहाट आणि धरेला येईल नव्याने जाग
माणसातला सैतानही मरेल आणि समज येवून तुला आई म्हणेल
निसर्ग नव्याने नटेल,ओढे स्वच्छ पाणी अंगावर खेळवत गातील
लता वेली वृक्षांच्या आधाराने वाढतील,त्यावर पक्षी घरटी बांधतील

ओढे वाहातांना खळाळून हसतील, पक्षी त्यांना साथ देत मंजुळ गातील
हिवाळ्यात धुके डोंगर माथ्यावर उतरेल,वृक्षांना बिलगत गवतावर नाचेल
समुद्रपक्षी तळ्यात तर कधी खाडीत येतील चव बदल म्हणून मासे खातील
हे सौंदर्य डोळ्यात साठवत प्रणयी युगूल मत्स्यावतार घेत पाण्यात शिरतील

निळे आभाळ खाली उतरेल त्याचा चंद्र धरणीच्या प्रेमात पडेल
नदीचे पाणी त्याचा तळ दाखवेल सुर्य चंद्र त्या आरशात दिसेल
सहा ऋतू आपले रूप दाखवुन नव्याने नटतील आणि नाचतील
रस्ते आणि बागा हिरवाई लेवून बसतील रुसलेली बाळं पुन्हा हसतील

Tags:

4 Comments

Comments are closed.