साहेब कुणी आरक्षण देता का?
जातीचे आरक्षण देऊन पावन करून घैता का?
शेतीत बा राबायचा, पण मला कष्ट जमत नाहीत
नांगर, टिकाव, फावड हातातही धरवत नाही
पाऊस, पिकांचं ताळतंत्र अजिबात समजत नाही
गुर-ढोर, शेण, गोवर, नाकाला वास साहवत नाही.
बायको, मुलांच्या चेहऱ्यावरची निराशा पाहवत नाही।।

साहेब कुणी आरक्षण देता का ?
गुणांची टक्केवारी नाही, पोरांना प्रवेश देता का ?
इंजिनिअरींग, मेडिकल, फार्मा, कुठेही चालेल
आमचा सिंहाचा छावा,आरक्षणात बोकड बनेल
एकदा संधी दिली तर बुलेट सारखा सुसाट धावेल
आमची जात इमानी, तुमाला मुख्यमंत्री पदी ठेवेल
तुमच्या आशिर्वादाने, दोन घास तरी सुखाचे जेवेल ।।

साहेब कुणी आरक्षण देता का ?
सरकारी नोकरीत आरक्षण देऊन पावन करून घेता का ?
लढाईची धामधूम राहिली नाही, कष्टाची सवय उरली नाही
लग्नाची सोय करता करता, शेती मालकीची उरली नाही
इलेक्शनची नशा कधीच सरली, घराची मालकी उरली नाही
सरपंच पद सांभाळताना, नात्याची समजच धरली नाही
भाऊ-बंद दूर गेले मदतीची आशाच आता ऊरली नाही.

साहेब कुणी आरक्षण देता का ?
वाहणाऱ्या इलेक्शनच्या गंगेत शुद्ध करून घेता का?
देशमुखी, पाटीलकी, फौजदारी गेली, प्रतिष्ठा सारीच सरली
किमान आमदारकी देऊन तुमच्या पायापाशी घेता का?
काय सांगाल ते करीन, पक्ष फोडण्यास ऊपयोगी पडीन
आदेश द्याल तर चार सहा जणांची डोकीही फोडीन
आता मदत कराल तर ऋण तुमचे याच जन्मी फेडीन

तुमच्या यशाचं गणित मला थोडं सांगाल का?
साहेब तुमच्या पक्षात दाखल करून घ्याल का?

Tags:

1 Comment

Comments are closed.