“सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे” असं आपण अनेकदा ऐकलं असेल, किंवा “जगी सर्व सुखी असा कोण आहे.” समर्थांच वचन ऐकलं असेल. तुमच्या मते कोण सुखी आहे? मुकेश अंबानी! अमिताभ बच्चन! बिल गेटस! आपले फडणवीस, शिंदे की ठाकरे? मित्रानो सुख हे मानण्यावर आहे.

महाली मऊ बिछाने,कंदील शामदाने
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या

बालकवींची कविता आठवा. आज गरीब पैसे नसल्याने सुखी नसेल पण श्रीमंतही सुखी नाही, कोणीच सुखी नाही आणि समाधानी तर नाहीच नाही. प्रत्येक टप्प्यावर वाटतं, शिक्षण चांगल्या गुणवत्तेत पूर्ण झालं की चांगलं होईल, मग वाटतं चांगली नोकरी मिळू दे आयुष्याचं सोनं होईल, ते पूर्ण होत नाही तर वाटत कुणीतरी सोबतीला हवं, एकट्याचं आयुष्य काय कामाचं? हे मागणं काही संपत नाही. सुखाच्या शोधाचा प्रवास संपत नाही. प्रत्येकाचं तेच आहे म्हणा, स्वतःला समजवण्याची गरज असते पण आम्ही मात्र दुसऱ्याच सुख पाहून दुःखी होतो. हे तुमचं, माझं, सर्वांचं आहे बर का. झालं असं की प्रवासात अनेक मित्र मंडळी भेटतात त्यातील काही विस्मरणात जातात काही मात्र मनाच्या कोपऱ्यात घट्ट रुतून बसतात. तो चार चौघांसारखा, तरीही वेगळा, शरीर प्रकृती शिडशिडीत, निमगोरा आणि सरळ साधा, कसलाही भपका नाही की काही नाही पण त्याचे डोळे बोलके होते. काहीतरी सांगायला आतुर असा. त्याची माझी भेट माझ्या नेहमीच्या लोकल मध्येच झाली. सुरवातीला तो कोणाशी बोलत नव्हता, कळपात चुकून आलेली बकरी जशी बवरलेली असते तसा तो, कदाचित अवलोकन करत असावा. चार पाच दिवसात त्यांनी माणस ओळखली असावीत मग सहवासाने तो मोकळा झाला.

बोरिवली भगवती हॉस्पिटलमध्ये तो फार्मासिस्ट होता, बीफार्म फ्रेशर होता, म्हणून त्यांनी तेथील मेडिकल स्टोरमध्ये नोकरी स्वीकारली होती. खर्डीवरून प्रवास करायचा. त्याच्या ग्रुपमध्ये त्याच्या वयाची मुलं होती. कोणी एमएसइबी,कोणी बीएमसी, कोणी बँकेत. ती मुलंही तशी हुल्लडबाजी करणारी नव्हती. परिस्थिती माणसाला शिकवते, सरळ करते. एक दिवस त्यांनी मला उठून जागा दिली,” म्हणाला, बसा, बसून बसून कंटाळा आलाय.”
तो उभा राहून माझ्याशी बोलू लागला.” अंकल तुम्ही कुठे जॉब करता?” मी माझ्या जॉब बद्दल सांगितले. मला निमशासकीय नोकरी आहे ऐकून तो म्हणाला, “बर आहे तुमचं, हक्काच्या रजा घेऊ शकता. पगार ही चांगला असेल, त्याने स्वतःच मत व्यक्त केलं. माझं बघा, बीफार्म होऊनही मला काही फायदा झाला नाही. वडिलांची इच्छा म्हणून आरकेटीतुन बीफार्म झालो पण चांगला जॉब नाही, ऍडमिशन घेण्यापूर्वी कॉलेज सांगत होतं, आमचा Recruitment cell आहे म्हणून, पण नंतर कित्येक वेळा भेटून काहीच उपयोग झाला नाही. प्रोफेसरना जाऊन भेटलो तर म्हणाले तुमचा मोबाईल नंबर देऊन ठेवा कंपनी आली की तुम्हाला कळवू सगळी चालू बाजी. ” एका दमात तो सांगत होता.

पहिल्या भेटीत म्हणणं चुकीचं ठरेल पण त्याला त्याच मन हलकं करायचं असावं म्हणून म्हणा त्यांनी संधी मिळताच मनातील गोष्ट सांगून टाकली.एकंदरीत नाराज होता,माणसं पाहून व्यक्त होत होता. मी त्याची नाराजी समजू शकत होतो. बरेचदा पालक त्यांनी कोणी तरी सांगीतलेल किंवा त्यांच्या माहितीतील व्यक्ती ज्या क्षेत्रात चांगल करिअर करत असेल तेच क्षेत्र आपल्या मुलासाठी निवडतात आणि मुलाला त्या क्षेत्राचा आग्रह करतात. त्यांची इच्छा असते की आपला मुलगाही लवकर स्थिरस्थावर व्हावा. अर्थात त्या क्षेत्रात मुलाला लवकर जॉब मिळाला नाही तर दोष पालकांकडे जातो. मी यापूर्वी अनुभव घेतला असल्याने त्याच म्हणण ऐकून घेतलं.

त्याला भगवतीतील हंगामी फार्मासिस्ट म्हणून एकवीस हजार पगार होता. त्याच्या जोडीची कमी शिकलेली मुलं तीसचाळीस हजार पगार घेत होती, त्यामुळे तो नाराज होता. तो म्हणाला,”बीफार्म ला वडिलांचे पाचसहा लाख खर्च करून काही हाती लागलं नाही म्हणून वाईट वाटतं. वडिलांची अपेक्षा असेलच ना, की बाबा इतका खर्च केलाय तर आता मला मदत करेल.” त्यांनी आपला फोन दाखवला, “हा चायना मेड आहे, गरज म्हणून घेतलाय तीन हजारचा.” थोडक्यात तुटपुंज्या पगारामुळे काय भोगावे लागते ते मला समजवण्याचा प्रयत्न होता. त्याला कुठे ठाऊक होते, आजही छोट्या उद्योगात आठ दहा तास काम करून कारागिरांना दहा बारा हजारही मिळत नाहीत.प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटत त्यातील ती प्रकार होता. पण मला त्यांनी अंकल म्हटल्यावर मला सहानुभूती दाखवणं ओघन आलच. म्हणून मी म्हटलं,” अरे परिस्थिती काही तशीच रहात नाही, तुही चांगली नोकरी लागली की आयफोन घेशील.” तो हसला, “काय अंकल चेष्टा करता गरिबाची. आय फोनकाय गंमत आहे का?” मी म्हटलं, “अशक्य अस काही नाहीच या दुनियेत, श्रद्धा आणि सबुरी
प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळी नक्की होते.” तो कसनुस हसत म्हणाला, “किती महिने अर्ज करतोय ,एकही कंपनीने अजून कॉल पाठवला नाही. येतात ते कॉल फक्त फार्मसीकडून.

हॉस्पिटल अन मेडिकल सोडली तर या क्षेत्रात जॉब नाहीत की काय? अस त्याला वाटत होतं. तो म्हणाला “अंकल, माझे बाबा म्हणत होते, “हाच अभ्यासक्रम करून माझ्या मित्राची मुलं सेटल झाली. तुझ्या बाबतीत असं का घडाव? तू नीट प्रयत्न करत नाहीस.” “मी पेपरमध्ये येणाऱ्या प्रत्येक जाहिराती नंतर सिव्ही पाठवतो. Online अर्ज करतो पण नाही कॉल येत, काय करू?”.बाबा सांगतात वीस पंचवीस वर्षपूर्वी एलबीएस रस्त्याच्या दुतर्फा हेक्स फार्मा,जॉनसन अँड जॉनस, सिबा गायगी, मे एंड बेकर, बरोज वेलकम, मेरींड अशा भरपूर कंपन्या होत्या. त्यांच्या त्या चकाचक इमारती. या रस्त्याने जायचा योग आला तर त्यांची भव्य दिव्य गेट आढळून यायची. समोर मोठाले लॉन, मोठे मोठे दिवे आणि पार्किंगमध्ये टोयोटा सारख्या गाड्या, गेटवर स्टार्च केलेल्या गणवेशात सिक्युरिटी. शिफ्ट सुटतांना टाय लावलेली पोर, माझ्या बाबाला वाटायचं की बीफार्म झालो का पोरगं तिथेच लागेल. बाबा म्हणतात काय थाट असायचा तरुण पोरांचा? सुव्यवस्थीत कपड्यातील कर्मचारी बाहेर पडले की त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान पाहत राहावं अस वाटायचं. कंपनीत नाश्ता, दूध, अंडी, लंच भारी असायचा, आठवड्यात तीन दिवस नॉनव्हेज, मजा होती लेकांची. पण आमचं नशीब गांडू एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवून दोन वर्षे झाली तरी एकाही कंपनीचा कॉल आलेला नाही.” त्याने आपली मळमळ व्यक्त केली.

मी त्याच्या पाठीवर हात फिरवत धीर दिला,”येईल रे संधी, धीर सोडू नको, कधी कधी देव परीक्षा घेतो.” मलाही आठवलं मला एकदा मुलुंडच्या मेरींड कंपनीत जायचा योग आला होता. प्रशस्त आवार एका ठिकाणाहून दुसरीकडे सामान नेणाऱ्या फोर्क लिफ्ट, त्यांचे ते निळे गणवेश. पॉश कॅन्टीन आणि काचेच्या स्वच्छ केबिन.काय साहेबांचा थाट. तेव्हा मलाही वाटायचं आपलं डेस्टिनेशन हेच आहे, पण तकदिर कुठे नेईल नाही सांगता येत.

रोज खर्डी ते बोरीवली करून माझा हा लहान मित्र कंटाळला होता. त्याचे काही मित्र ठाणे तर काही घाटकोपरला उतरायचे मग हा थोडा मोकळेपणाने बोलायचा. तो वडिलांना पंधरा हजार रुपये खर्चाला देतो, पण त्याचे मित्र खुप पगार असूनही कसे आठ दहा हजार देऊन मोकळे होतात ते सांगायचा. तर वडिलांवर पूर्ण फॅमिलीची जबाबदारी असल्याने त्यांचे कसे हाल झाले त्याचे किस्से सांगायचा. त्याच बोलणं एखाद्या जबाबदारीने झुकलेल्या संसारी गृहस्था प्रमाणे असायचं. इकडतीकडची चर्चा सुरू असतांना तो मूळ ट्रॅकवर यायचा. कधी कधी म्हणायचा, “मी MBA करणार होतो पण त्याची फी खूप असते,आधीच वडील नाराज आहेत, हिंमत होत नाही सांगायची.” मी म्हणायचो अरे Online course कर त्याची फी कमी असते. इंस्टॉलमेंट मध्ये दे, ते करतात ऍडजस्ट. तो म्हणायचा, “MBA केल्यावर तरी मिळेल ना चांगला जॉब, नाहीतर पैसे आणि वेळ फुकट जायचा. झेडपी मध्ये जिल्हा रुग्णालयात जॉब आला होता पण रिमोट प्लेस, जायला मन नाही करत. एकदा तिथे जॉब घेतला की आपला मुंबईशी काँटॅक्ट तुटतो.”

मी त्याला म्हटलं, अरे मुंबईत थोडी का रुग्णालय आहेत, आणि टीआयएफआर टाटा सायन्सेस, बीएआरसी, हाफकीन अशा खूप संस्था आहेत, तुझं थोडच वय गेलंय मिळून जाईल जॉब.” थोडं हळू आणि गंभीर होत तो म्हणाला, “त्याच काय आहे, एवढ्या मोठ्या संस्थेत आपली डाळ शिजणारा नाही, माझं इंग्रजी इतकं चांगलं नाही. आम्ही तीन भाऊ आहोत, वडिलांनी झेडपी च्या शाळेत घातलं होत, गावाकडे इंग्रजी भाषा सुद्धा मराठीत शिकवतात. त्यामुळे कॉन्फिडन्स आलाच नाही.आता लहान भाऊ इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे. मोठा भाऊ अजून जॉबलेस आहे.वडिलांची तीन वर्षे राहिलेत,सगळे पैसे आमच्या शिक्षणावर खर्च केले तर…”

त्याला बरीच जाण होती. एक काळ असा होता, मुलांची शिक्षण आणि मुलीच लग्न करता करता बाप निवृत्त व्हायचा, त्यांनी घेतलेलं कर्ज मुलाला फेडावे लागे, आता परिस्थिती खूप चांगली आहे, निदान वडील आपल्याला झेपेल अशाच रीतीने मुलांना शिकवतात त्यांनी चांगलच भोगलं आहे, तेच भोग मुलाच्या वाट्याला नको.

रोहन थोडा वेगळा यासाठी होता की त्याला परिस्थितीच भान होत. आपल्या वडिलांवर आपल्या शिक्षणावर वडिलांनी खर्च केला होता तर आता त्यांना समाधान देणं त्याच कर्तव्य आहे याची त्याला जाणीव होती. आता डब्यात तो कम्फर्टेबल झाला होता. खर्डी ते कल्याण बसून आल्यावर तो कुणी न मागता जागा द्यायचा, त्याच पाहून त्याच्या ग्रुपमधील इतरही जागा द्यायला लागले. हा नक्कीच सकारात्मक बदल होता.

कधीकधी तो आपल्या कामावरील अनुभव सांगायचा, एखादा कस्टमर प्रिस्क्रिप्शन दाखवून औषधे काढायला लावायचा आणि बिलाचे पैसे ऐकून गांगरून जायचा, मग त्याला किती पैसे कस्टमरकडे आहेत त्या हिशोबाने औषधे द्यावी लागतात. तर काही कस्टमर शिल्लक एक दोन रूपयांसाठी वाट न पाहता निघून जात. एखादे कस्टमर कोणतेही प्रिस्क्रिप्शन न आणता औषध मागत आणि ते दिले नाही की अव्दातव्दा बोलतं, ‘तुमच्या मेडिकलला काय सोन लागलय का? अशी छप्पन मेडिकल एरियात आहेत.’ कधी कधी एखाद्या कस्टमरकडे दोन पाच रूपये कमी असले तरी ते आम्ही मायनस करून औषधे देतो.
कस्टमर सोडायच नाही अस आमच्या मालकांच मत आहे.”

त्याला खूप काही सांगायच असत, कधी घरातील परिस्थितीबद्दल तर कधी मोठ्या भावाचे घरी बसून रहाण्याबद्दल. बाबा त्याच्या मोठ्या भावाला खूप रागावतात, म्हणतात, “नुसतं बसून राहण्यापेक्षा रेल्वे स्टेशनवर हमाली कर चार पैसे मिळतील.” ते ऐकलं की वाईट वाटतं, भाऊ आर्ट ग्रॅज्युएट आहे, पोलीस भरतीला उभा होता पण थोडक्यात रिजेक्ट झाला. एका ऑफिसमध्ये लागला होता पण कॉम्प्युटरवर काम जमेना म्हणून नोकरी दिली सोडून ,तग धरून राहिला असता तर जमलं असत पण पेशन्स नाही ना? आता दोन वर्षे घरी बसून आहे. थोडक्यात घरची परिस्थिती सुधरावी यासाठी धडपडत होता पण चांगला जॉब नाही म्हणून धास्तावला होता.

कधीतरी तो गुपचूप बसून रहायचा, फारस कोणाशी बोलायचा नाही मग समजून जायच की काल साहेब कुठेतरी मुलाखत देऊन आले पण सिलेक्ट नाही झाले. तो नियमित कोणता ना कोणता online course
करत असतो,म्हणतो,”सर, डोक रिकामं राहील की नको ते नेगेटिव्ह विचार येतात म्हणून कोणता ना कोणता कोर्स करत रहातो, परीक्षा ऑनलाइन असते, फायदा होतो.”

एक दिवस मी गाडीत चढलो, नेहमीच्या कंपार्टमेंटमध्ये गर्दी दिसत होती, कुठे जावं या विचारत असतांना, रोहनने हाक मारली, “अंकल इकडे या, इकडे, त्यानी उभ राहून हात दाखवला.” मी त्याच्या जवळ जात म्हणालो, “काय रे गेले पंधरा दिवस कुठे होतास? हल्ली गाडी मिळत नाही का?”
तो माझ्याकडे पाहून छान हसला, अरे वा! खुश दिसतोय बेटा.” अंकल मी पहिली नोकरी सोडली, येण्याजाण्याचा खूप त्रास होत होता, थोडं लेट झालं तरी मालक बोलत होता, अगोदरची गाडी पकड म्हणून सांगत होता. मालक जॉब सोडू देत नव्हता. माझं डिग्री सर्टिफिकेट त्याच्याकडे होत ना. माझ्या बाबानी दम दिला तेव्हा कुठ तयार झाला.”

मी त्याच्याकडे काळजीने पाहिले, “अरे दुसरा जॉब मिळण्याआधीच सोडला नाहीस ना?” तो माझ्याकडे पाहून हसला, छे, छे अस कस करेन मी? मला घाटकोपरला जॉब मिळाला तीस हजार देतो म्हणाला, उद्या जॉईन करणार.” मी अभिनंदन केले. “चला जवळ तर आलास, प्रवासाचा त्रास वाचेल.” तो हसला,”अंकल कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये यापेक्षा जास्त देत नाहीत. I am expecting something good, in company or Govt. Office.”
मी त्याला म्हणालो,”अरे! लागेल चांगला जॉब, बेकार तर नाहीस.” “अंकल, दोन वर्षे झाली ग्रॅज्युएट होऊन, मेडिकल स्टोअरमध्ये काही चॅलेंज नाही. काहीतरी वेगळं करायला मिळालं तर मजा येईल.” तो अस्वस्थ होता, कारण त्याचा मुक्काम त्याला मिळाला नव्हता, पी हळद आणि हो गोरी असा प्रकार घडणार नव्हता. कितीतरी अस्वस्थ, नाराज मुलांना आयटी क्षेत्रातील मुलांचे पगार दिसत असतात, किंवा सरकारी नोकरीतील स्थिरता दिसत असते.ते खरं ही आहे, रिसेशन पिरड सोडता गेले वीस वर्ष आयटी क्षेत्रात मुलांना चांगला स्कोप आणि ग्रोथ आहे हे नक्की. आपले ध्येय साध्य होईपर्यंत वाटचाल करायलाच हवी यात शंकाच नाही, पण सतत त्या विषयी नकारात्मक बोलत राहिल्यास आणि त्याचा दोष अन्य कोणावर देत राहून तुमचे प्रश्न थोडेच सुटणार? मुख्य म्हणजे सगळ्याच मुलांना सरकारी, मोठ्या किंवा एनएमसी कंपनीतच जॉब हवा असा अट्टाहास किती योग्य?

उद्या एखाद्या मोठ्या कंपनीत तुम्ही एकाच प्रकारचे काम करत राहिलात तरी तोच तो पणा येणारच, समाधान हे मानण्यावर आहे. जॉब तुमच्या क्षेत्राशी मिळता जुळता असेल तर पगार कमी आणि पगार भरपुर असेल तर जॉब मनाजोगात असेलच असे नाही. अपूर्णतेत सुख आहे फक्त ते तुम्हाला कळलं तर मजा आहे.

रोहन सारखे खूप लोक असतात.त्यांना कशानेच समाधान मिळत नाही. सदा त्रासलेले. नेहमी नाराजी गोंजारत राहायचं की आहे त्यात समाधान मानून पुढे जायचं हे तुमच्याच हाती आहे. सुख म्हणजे काही चणे शेंगदाणे नव्हे की तुम्ही खरेदी केले किंवा पालकांनी तुम्हाला आणून दिले. आता करिअरच्या वाटा तुमच्या तुम्ही शोधताय त्यामुळे त्याची जबाबदारी आणि त्याच यश तुमचंच आहे.कोणताही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रात करिअर करतांना संधी मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा पण स्वतः नाराज आणि नाखूष राहून घरातील आणि तुमच्या संपर्कात असणाऱ्या मित्र परिवाराचे वातावरण बिघडू देऊ नका. सुखाची गुरुकिल्ली अजून कित्येकांना मिळालेली नाही,पण ज्यांना ती मिळाली त्यांना ती समाधान देऊन गेली असेलच असेही नाही.काहीतरी अपूर्ण ठेवण्यात देवाचा संकेत असावा.आम्हालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पदरी निराशा आली पण सतत रडगाणे गाऊन फायदा नव्हता. अर्थात
बरेच नकार पचवून सिझन झालो होतो म्हणूनच भरभरून सुख मिळाल तरी कसतरीच वाटायचं.उन-पाऊस , सुख-दुःख ही असणारच, स्थितप्रज्ञ असणं शक्य नाही पण त्यातून जेवढे सावरता येईल तेवढ सावरावं. जेवढ आवरता येईल तेवढ आवरावं आणि कमीत कमी चार चौघात सांगावं.

Tags:

3 Comments

Comments are closed.