मुली आणि महिला यांच्यावरील अन्याय कमी व्हावेत म्हणून शाळा,आस्थापने,वस्त्या येथे तेथील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून  महिला कल्याण समिती गठीत कराव्यात असा आदेश न्यायालया मार्फत शासनाला झाला आणि शासनाला जाग आली. अपोलो मिलच्या आवारात झालेला अत्याचार , दिल्लीत बस मध्ये झालेला अत्याचार, बंगलोर येथे आय.टी,इंजिनिअर महिलेवर झालेला अत्याचार आणि हे कमी कि काय म्हणून मुलींच्या वसतिगृहात झालेला अत्याचार अशा अनेक बातम्या वर्तमान पत्रात आणि न्यूज च्यानलवर येवू लागल्या.महिला किती असुरक्षित ! शासनाची भूमिका काय? महिलांच्या सुरक्षितेविषयी शासन किती असंवेदनशील आहे,महिलांच्या सुरक्षितेविषयी महिला राजकारण्यांची भूमिका काय असावी? ह्या बाबतही च्यानलवर उहापोह झाला.आता समाज जागृती  झाल्याने अत्याचार थांबतील अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. खरे तर समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पहिल्यापासूनच संकुचित होता. द्रोपादीची भर सभेत विटंबना होत असतांना आणि सभागृहात धृतराष्ट्रा पासून अनेक राजे असतांना,ज्याच्या नावातच धर्म आहे असा युधिष्टिर असतांना तिचा छळ थांबला नाही, मग त्या पांडवांच्या पुरुषार्थाला अर्थ तो काय? भर दरबारात सर्व समक्ष,अगदी पाच बलशाली पती समोर असतांना द्रोपदी स्वतःची विटंबना वाचवू शकली नाही तिथे एकट्या दुकट्या प्रवास करणाऱ्या महिले विषयी बोलायलाच नको. सरकार कायदे करत आणि त्याची अंमलबजावणी करण्याच काम शासन यंत्रणा करते परंतु या यंत्रणेतील एका दुवा जरी कच्घा राहिला तरी संपूर्ण यंत्रणाच कुचकामी ठरते. उल्हासनगरच रिंकू पाटील प्रकरण लोक विसरले असतीलही memories are short live अस म्हणतात पण के.ईएम. हॉस्पिटल मध्ये जुन्या नर्सचा एकही दिवस अरुणा शानभाग ची आठवण काढल्याशिवाय जात नाही.स्त्रियांवर होणारे अत्याचार घराबाहेरच होतात अस समजण्याच कारण नाही. आणि हे अत्याचार केवळ पुरुष वर्गाकडून होतात असही समजण्याच काही कारण नाही. जेव्हा कुटुंबातील व्यक्तीच तीच शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण करत असेल तेव्हा तीन ते सांगायचं तरी कोणाला ! कस ! खरच महिला कोणत्या बाबतीत स्वावलंबी झाल्या ? कामावर जाण्याच स्वातंत्र्य हे कुटुंबाच्या गरजेतून किती आणि तिच्या स्वेच्छेने किती ? स्वतः कमावती झाल्याने तिला आर्थिक स्वातंत्र्य कदाचित मिळाल असेलही पण  नोकरी करूनही संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी तिच्यावर ढकलून मोकळ्या होणाऱ्या पुरुषी अहंकारातून तिची सुटका कोण  करणार?
महिला शिक्षण घेवून सक्षम झाल्या का ? स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली का?  येणाऱ्या प्रसंगाला धाडसान तोंड देण्याच धाडस त्यांच्यात आल का? घरातून लहानपणी तू  मुलगी आहेस, मुलीच्या जातीला हे शोभत नाही अस सतत ऐकल्यानी  तिची घडण आणि मानसिक बैठक तशीच झाल्याने कोणत्याही अन्याया विरुद्धती ती  बंड करून उठत नाही.चार दोन महिलाच प्रातिनिधिक स्वरुपात खऱ्या दृष्टिन समाजासमोर महिलांचे प्रश्न मांडत असतात किंवा त्यांचा मुखवटा म्हणून वावरत असतात.माधुरी दिक्षित व्हायला बहुसंख्य महिलांना आवडते पण किती महिला मृणाल गोरे,उल्का महाजन,मेधा पाटकर,विद्याताई चव्हाण,नीलम गोऱ्हे होणे पसंत करतात ?  किती महिलांना डॉ.राणीताई बंग,डॉ.कोल्हे,डॉ.मंदाताई आमटे यांची भावनिक  पातळी  गाठता येते किंवा सिंधुताई सकपाळ यांच्यासारख समाजसाठी झोकून देता येत ! ज्या महिला आज विविध पक्षाच प्रतिनिधित्व करतात त्यांचा निवडणूक अर्ज भरायला पतीदेव लव्या जम्यासह आलेले असतात,आयत्या वेळी ती  जागा महिला आरक्षणात गेली म्हणुनच त्यांच्या पतिदेवांच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणाची री ओढायची ठरवलेली असते. कायद्यांनी ३० टक्के आरक्षण  मिळूनही कितीतरी महिला आरक्षित जागांवर महिला उमेदवारही मिळत नाही ह्या गोष्टीचा फायदा प्रस्थापित राजकरणी घेतात.मग महिला स्वयंसिद्ध कधी होणार? केवळ स्वतःच्या मनासारखे पेहराव केल्यानी,इंग्रजाळलेली भाषा वापरल्याने,किंवा महिला क्लब मध्ये सदस्य झाल्यानी सक्षम झाल्याची बतावणी करता येईल? सुरक्षित वातावरणात वाढल्यान,किंवा भरपुर फी भरून  कुणाच्या क्लासच किंवा कुणा बाबाच्या योग प्रशिक्षण शिबिरात दाखल होऊन महिला सक्षम होईल? अहिल्याबाई होळकर,राणी लक्ष्मीबाई,चांदबीबी यांनी कोणाच्या शिबिरात प्रशिक्षण घेतलं?
महिला दिन येतो आणि महिलांना अधिक दीन करून जातो.मुलींना लहान वयातच मुलांसारखी समान वागणूक मिळाली,त्यांनाही मैदानी खेळ खेळण्याची मुभा लहान वयात मिळाली तर त्यांच्यातही लिडरशिप,बेडरपणा,आणि निर्णय क्षमता निर्माण होईल.चार सहा दिवसांपूर्वी लोकसभेच कामकाज दाखवतांना श्रीमती जया बच्चन ज्या पोटतिडकीन महिलांच्या बाबतीत लोकसभेत आवाज उठवत होत्या ते पाहून खरच बर वाटल.लोकसभेला नजमा हेपतुल्ला नंतर बऱ्याच काळान अध्यक्ष पद पुन्हा श्रीमती महाजन यांच्याकडे आल आहे त्यांच्या माध्यमातून स्त्रियांनी आपले प्रलंबित प्रश्न धसास लावले पाहिजेत.उद्योग,व्यवसाय,शेती पत्रकारिता,समाजसेवा,क्रीडा क्षेत्र अशी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या महिलांना हिरकणी सन्मानांन गौरवल जात हि चांगली बाब असली तरीही केवळ एव्ह्द्यावर समाधान न  मानता श्रीणती मीरा बोरवणकर,श्रीमती रश्मी करंदीकर यांच्या सारख क्षेत्र निवडून संरक्षणाच्या बाबतीत आघाडी घेतली पाहिजे.कोणिही याव आणि टिकली मारून जाव एव्हढ्या सहजपणे स्त्रीची अब्रू भर रस्त्यात,एव्हढंच काय तर घरात शिरून लुटली जाते यावर परिणाम कारक उपाय म्हणजे स्त्री शक्तींनी संघटीत होवून स्वतःच संरक्षण स्वतःच करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.भर रस्त्यात, रहदारी असतांना कोणी मोटर सायकल स्वार   येतो आणि महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून घेवून जातो हे थांबवणे तिच्याच हाती आहे.रस्त्यातील सावधानता तिला शिकली पाहिजे.पोलीस आणि सरकार तुमच संरक्षण करायला पुरेसे समर्थ नाहीत हि बाब लपून राहिलेली नाही.महिलानो स्वयं सिद्ध  व्हा ,कराटे, तायक्वांडो, जुडो या सारखे एखादे प्रशिक्षण जरूर घ्या,लहान वयातच आपल्या कन्येला सायकल,स्कूटर या सारखे वाहन आवर्जून शिकवा.तिला मैदानी खेळासाठी उद्युक्त करा, तर ती  भविष्यात आव्हानांचा सामना करू शकेल.
तिला किती रुपयांचे ड्रेस देता,किती रुपयांचे घड्याळ किंवा मोबाईल देता या पेक्षा तिला स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण द्या तिला स्वतःच संरक्षण करण्यासाठी सबळ करा.अंगावरचे  सुंदर कपडे,हातातला किमती मोबाईल तीच रक्षण करू शकणार नाहीत किंबहुना ह्याच गोष्ठी तिच्यासाठी अडचण निर्माण करतील पण तिला स्वतःचा बचाव करण्याची कला  आणि तिच्यातील समय सूचकता तीच आणि तिच्या मालमत्तेच रक्षण करण्यास उपयोगी पडेल. झाशीच्या राणीच उदाहरण तुमच्या समोर आहेच पण तेरा वर्षांची मलाला युसुफझाई दहशतवाद्यांशी लढा देवून स्वतःच शिक्षण सुरू ठेवते,  ते हि पाकिस्तान सारख्या सदा सर्वकाळ दहशत असणाऱ्या देशात,  ह्या घटनेतून बोध घ्या.रेल्वे गाडीतून गुंड महिलेला फेकून देतो.कुणी पागल प्रेमवीर  महिलेवर “तेजाब’ फेकतो कोणी धावत्या गाडीत किंवा बसमध्ये बलात्कार करतो हे कुठवर सहन करणार ? हा जुलूम तुम्ही का म्हणून सहन करणार ? न्यायालयात त्याला खरच शिक्षा होणार का ?  कि कुणी वकील आपल्या पोटाची भूक भागवायला नोटांची पुडकी घेवून त्याचा बचाव करणार व ते तुम्ही डबडबलेल्या डोळ्यांनी पहाणार आणि अश्रुपातही मनातच करणार.आता हि घुसमट थांबलीच पाहिजे तुम्हीच तुमचा न्याय केला पाहिजे,ऊठा ,अन्यायाविरुद्ध पेटा,हाती काकण  सामर्थ्याची भरा ,कुंकू शक्तीच लावा,आणि मनात समय सुचाकतेचा मळवट भरा.स्त्री स्वयं सिद्ध आहे हे जगाला दाखवून द्या,नव वर्षाची घ्या प्रतिज्ञा ,मी अबला  राहणार नाही, संरक्षण कराव म्हणून कुणापुढे विनंतीही करणार नाही.माझ्यातल्या अंबिकेचा,रणचंडिकेचा शोध मला लागला आहे. होय मी स्वयं सिद्ध आहे .

Tags: