गुड्डी

गुड्डी

रिझल्ट  लागला कि प्रवेशासाठी गर्दी होते .कोणी ओळख असल्याची सलगी दाखवत प्रवेशासाठी कुणा शेजाऱ्याला घेवून येते. ती तशीच आत आली. माझ्याकडे पाहत म्हणाली “सर,बसुना ?” माझ्या उत्तराची वाट न पाहताच ती खुर्चीत विसावली. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताच म्हणाली “सर मी गुड्डीची आई , आपण ओळखल नाहीत मला ! माझ्या मुलीनी चार वर्षापूर्वी ग्यादरिंगला मला जावूद्याना घरी आता वाजलेकी बारा लावणीवर डान्स केला  होता. ” बाईनी मला आठवण  दिली . दरवर्षी ग्यादरिंगला मुल -मुली जी नृत्य सादर करतात ती लक्षात न ठेवणच योग्य असते.त्यांची कला म्हणुन कौतुक करण्यासाठी आम्हीही टाळ्या वाजवतो नाही अस म्हणण खोटारडेपणा ठरेल . तरीही या मुलानी निवडलेल्या गाण्याशी शिक्षक वर्ग सहमत असतोच अस नाही. त्यामुळे  गाण्याचा संदर्भ देवुन ती आपल्या मुलीची ओळख सांगत होती ते अप्रस्तुत  होते. उद्या एखादी महिला पालक असेही म्हणेल “सर माझ्या मुलीने चोली के  पिछे क्या है डान्स केला होता आठवतो ना ! “खर तर मला हि गुड्डी अजिबात आठवत नव्हती पण त्या बाईंनी पुढची हकीकत सांगू नये म्हणुन मीच आवरत घेत विचारल. ” बर काय काम होत ?” “सर, आपली गुड्डी इथून गेली आणि ग्राजुयेट  झाली.  एल. आय.सी. मध्ये नोकरी करते ह्या पोरीला पण इकडे प्रवेश द्या म्हणजे बर होईल  तिच्या धैर्याच मला कौतुक  वाटल, चार वर्षापूर्वी शिकून  गेलेल्या मुलीलाच आधाराची काठी  बनवत ती प्रवेशाचा मार्ग उघडत होती. मला तिच्या बरोबर वेळ वाया;घालवण परवडणार नव्हत. मी माझ्या सहकाऱ्याला तिच्या प्रवेशाबाबत पाहायला सांगितले तसे घाई घाईत ती म्हणाली “सरांकडे मी गेले  पण!” , त्या पण ने मी सावध झालो गुड्डीची आई सावरून बसत म्हणाली “तिला थोडे कमी गुण आहेत ,पण ती मेकअप करेंल,सर ती फारच छान डान्स करते . गेल्या सार्वजनिक  गणपतीला तिने चिकनी चमेली डान्स इतका फार्मात केला लोकांनी तिला चार हजार रुपये बक्षीस दिल” अरे! अरे रे वा,फारच छान कि ,पण मग  तिला डान्स अकादमी मध्ये घाला. तिच्या कलेला वाव मिळेल.

“सर,प्लिज आपणच पहाना जाधव सरांनी आपल्याकडे पाठवलंय . ” मी त्या मुलीची मार्कलिस्ट पाहायला मागितली सर्व विषयात काठावर पास होती.मी त्या बाईंकडे पाहत पाहत म्हणालो “अहो आपण म्हणता आहात पण हिला हा अभ्यास जमणार नाही. सर्व विषय इंग्रजीत आहेत आणि थोडस गणितही आहे ,त्या पेक्षा तिला आर्ट घेवू दे म्हणजे कॉलेजही होईल आणि तिची कलाही तिला जोपासता येईल. ” माझ्या सांगण्याने तिच समाधान झाल नाही. “सर काय डोनेशन असेल तर सांगा मी भरते पण नाही म्हणू नका. आर्टला घ्यायचं असत तर इथ कशाला आले  असते ? ” तिच  बोलण रोख ठोक होत. मी पुन्हा तिची समजुत काढली “हे पहा प्रश्न डोनेशनचा नाही. आम्ही डोनेशन घेतही नाही. प्रश्न तिच्या आकलन क्षमतेचा आहे ,तिची वर्ष वाया जायला जायला नको ,तीच वयही मोठ वाटत म्हणुन म्हणतो. ” ती माझ्याकडे पाहत हसून म्हणाली साहेब ती नापास होणार नाही ह्याची हमी मी देते मग तर झाल. “अगदी फुल कॉन्फिडन्स मध्ये बाई बोलत होत्या मलाच आश्चर्य वाटल,कशाच्या आधारावर त्या मला सांगतात हे कळावं म्हणुन मी विचारल “बाई अहो कॉलेजचा अभ्यासक्रम इतका सोप्पा नाही ,मुख्य म्हणजे सगळे विषय इंग्रजीतून आहेत म्हणुन म्हणतो. ” बाई हसल्या “सर त्या —–शाळेने नववी इयतेत दोनदा नापास म्हणुन तिच नाव काढून घ्यायला सांगितलं होत. त्यांच्या नाकावर टिच्चून सतरा नंबर भरून बाहेरून बसवली. पोरगी काठावर का होईना पास झाली. शाळेत आत्ता पेढे देवुन आले सर—-. तिला मी बाहेरून बसवून बारावी करायला लावलं असत  पणकॉलेज लाईफ तिने जगायचंच नाही का?”

तिचं विधान ऎइकुन मला झटकाच बसला आणि तिच खरही होत आम्ही नववीमध्ये नापास ठरवलेली मुले सतरा नंबर भरून पास होतात हे समजण थोड आम्हालाही अवघडच आहे. आमच्या मुख्याध्यापकांच्या  सभेतही याच विषयावर चर्चा झाली होती,  नववी पास न होणारी मुल शाळेतुन दाखला घेवून  सतरा नंबर अर्ज भरून परीक्षेला बसत होती आणि पासही होत होती. “सर, मग देतायना प्रवेश? काय डोनेशन असेल तर सांगा मी द्यायला  तयार आहे. ” त्या  माउलीला काय सांगाव ह्या अडचणीत मी होतो.  तिने मात्र प्रवेश घेतल्या शिवाय जायचं नाही असा निर्धार केला होता. मी त्या माउलीला समजावलं ” हे पहा मी तुमच्या मुलीची मुलाखत घेईन जर योग्य उत्तर दिली तर प्रवेश देईन.” तिची आशा पल्लवित झाली. ” चालेल  सर काहीही विचारा, संधी द्या, पोरगी नक्की उत्तर देईल .” तिने बाहेर बाहेर उभ्या असलेल्या मुलीला हाक मारली. ” प्रिती  इकडे
ये . ” प्रिती आत आली. हाय हिलचे स्यांडल , स्लीवलेस ड्रेस आणि पाठी मोकळे सोडलेले केस अशा अवतारात ती समोर उभी राहिली.   “सर ही  माझी  पुतणी प्रिती  ,प्रिती  सरांच्या पाया पड.”  ती मुलगी  माझ्या दिशेन सरकली तस तिला हातानी खुणावत मी म्हणालो ”  तुला कथा कादंबरी वाचायला आवडते  का ?” ती हसली.” सर मला परफोर्म करायला आवडते . कधी तरी मी न्युज पेपर वाचते . चित्रपट, त्यावरचे कॉमेंट मला वाचयला आवडतात. ” अरे  वा ! तू चित्रपटाची फारच शौकीन आहेस. चांगली गोष्ट आहे. दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जातो ?” ती कोरड्या चेहऱ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली. हे संदर्भ तिला नवे होते. तिची चूक नव्हती . मीच तिला अनाव्शक प्रश्न विचारून वेळ वाया घालवत होतो. तिची काकी मात्र अतिउत्साही होती . “सर,तिला  फाळके कसे आठवणार,मी लहान असतानाच फाळके वारले अस माझी आई सांगायची. ” मी कपळावर हात मारून घेण्याच्या बेतात होतो इतक्यात एक  मुलगी थेट माझ्या समोर आली. “सर कसे आहात आहात तुम्ही ? ” माझ्या समोर असलेली मुलगी अगदी आताच कॅट वाक करून ऱ्याम्प वरून

आल्यासारखी सजुन आली होती. तिने माझ्याकडे पाहुन आपली ओळख सांगण्या पूर्वीच माझ्या समोरच्या बाई उद्गारल्या “सर, नाही ओळखलत ना ! आपली गुड्डी ” त्या बाईना काय बोलाव हेच क्षणभर मला सुचत नव्हत,क्षणभर थांबुन मी म्हणालो “अच्छा ही  तुमची गुड्डी होय,बरीच सुधारणा झाली कि, मला तर वाटल कोणी सेलिब्रेटिच माझ्याकडे आल्याय ” बाईना माझ उपरोधिक बोलण कळल नसाव किंवा त्यांनी न समजल्याचा आव आणला असावा पण त्या नाजूक स्वरात पुन्हा म्हणाल्या “सर, मग देताय ना प्रवेश ? “मी गुड्डीला आणि तिच्या आईला मनोमन हात जोडले. 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar