चिपीचे विमानतळ आणि कोकण विकास

चिपीचे विमानतळ आणि कोकण विकास

अर्जुन बळवंत वालावलकर या रत्नागिरी जिल्ह्यातील वालवल येथील सुपूत्राने कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. ते ब्रिटिश काळात रेल्वेच्या सेवेत होते. संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे विस्तारत होते तरी कोकणात रेल्वे येत नव्हती, त्याचा विचारही होत नव्हता म्हणून ते पाठपुरावा करत होते. त्यांनी वर्तमानपत्र अनेक लेख लिहिले आणि बॅरिस्टर नाथ पै यांनी त्यांचे म्हणणे मनावर घेतले. दिल्लीत नाथ पै हे इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी या योजनेचा पाठपुरावा करूनही यश येत नव्हते. त्यामुळे बॅरिस्टर नाथ पै यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यास इंदिरा गांधी यांनी अनुमती दर्शवली पण आणीबाणी लागली आणि सर्वच दिशाहीन झाले. नाथ पै यांच्या नंतर मधू दंडवते यांनी सतत पाठपुरावा केला त्यांना जॉर्ज फर्नांडिस यांनी साथ दिली आणि टप्प्याटप्प्याने कोकण रेल्वे धावू लागली. कोकणच्या सह्याद्री रांगात रेल्वे कशी धावणार ह्याचे उत्तर ई श्रीधरन यांनी दिले. त्यांच्या अथक मेहनतीने आणि भुमीपुत्रांच्या योगदानाने एक स्वप्न साकार झाले.

त्यानंतर कोकणाला वेध लागले ते विमानसेवेचे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकास होण्यासाठी जलद सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. विस्तीर्ण किनारपट्टी, अथांग सागर, रम्य समुद्र किनारे आणि पर्वत राजी, नारळी पोफळीच्या बागा, आणि अतथ्यशिल माणसे असे सर्व फेवरेबल घटक असूनही कोकणात पर्यटन विकास होत नाही याचे कारण परदेशी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विमान सेवेसारखा जलद पर्याय नाही. कोकणातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या गेल्या दहा पंधरा वर्षाच्या प्रयत्नांना यश येऊन आज कोकणात विमानसेवा सुरू होत आहे याबद्दल आनंदच आहे पण त्याचे श्रेय प्रथम भुमीपुत्रांचे आहे ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने शासनास परत केल्या.तेव्हा श्रेय घेण्यासाठी वादविवाद न झाले तरच कोकणी माणूस संमंजस आहे अस जग म्हणेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात, येणार येणार येणार म्हणता म्हणता चिपीत विमान उतरलं, उद्घाटनाची तयारी पंधरा दिवस अगोदर सुरू होती. या पहिल्या वहिल्या विमानात अर्थात तुम्ही आणि आम्ही नसणार हे जगजाहीर होतं. त्या विमानात होते हाय प्रोफाइल लोक. राजकीय पूढारी, पत्रकार, उद्योजक होते की नाही ते कळायला मार्ग नाही. पण काही मंत्र्यांनी आणि वजनदार नेत्यांनी या चिपीच्या आजूबाजूच्या जमिनी विकत घेऊन उद्योग सुरू केलाच होता पण या त्यांच्या उद्योगांनी सामान्य माणसाला फायदा झाला की तो नागवला गेला ते कोणी उघड करणार नाही. तशी दहशत या ठिकाणी आहे.

या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला अर्धा डझन मंत्री आणि त्यांचे सचिव हजर होते. त्यातील मोजक्या नेत्यांना भाषणाची संधी मिळाली. बरं या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यास हजर असणाऱ्या नेत्यांनी काय बोलाव त्याला आचारसंहिता नव्हती परिणाम प्रत्येक जण आपल्या वकूबा प्रमाणे बोलला. अनेक वाहिन्यांवर त्याच थेट प्रक्षेपण झालं. थिएटर बंद, नाट्यगृह बंद म्हणून करमणूक करण्याची जबाबदारी काही विदूषक मंडळींनी उचलली हे बरं झालं.नाहीतर या सोहळ्यात रंग भरले नसते. उद्घाटनप्रसंगी दशावतारी करायला हरकत नव्हती पण नालिंग, वरदम, वालावलकर, बाबी हे रात्र झाल्याशिवाय तोंडाला रंग फासत नाही.





या नेते मंडळींनी दिवसा उजेडी तोंडाला रंग न फासता दशावतार केला हे काय कमी का? मुख्य म्हणजे आमच्या बाबीला रीतसर सुपारी द्यावी लागली असती. हे मात्ताबर राजकीय अभिनेते हाय कमांडची सुपारी घेऊनच आले होते, आम्हाला वेगळी सुपारी द्यावी लागली नाही.गणपती नमन वगैरे करायला वेळ नव्हता, तसेही गणपती बिचारे ह्यांची तोंड पाहायला लागू नये म्हणून आधीच गेले होते. तेव्हा ह्या मंडळींनी किती अवतार दाखवले आणि कोणती कथा लावली ते जाहीर कळलं आणि चिपी न जाता आमची करमणूक झाली हे खरं. तसही चिपीत म्हणजे विमानतळावर आम्हाला घेणार कोण?तेथे हौशा गौशाना स्थान नव्हते. तिथे जमलेली मंडळी ही लय भारी प्रकारातील होती. तसेही कदमांचा रामदास आताशा ताटकळतोय तर आमचं काय!

आताशा मला प्रश्न पडतो कोकण तरी आमचं आहे का? राहील का? या कोकणाचं प्रशासन सांभाळायला कोकण पट्ट्यातील एकही लायक व्यक्ती शासनाच्या पदरी नाही हे तसही आमच दुर्दैव. दक्षिणात्य मंजूश्री मॅडम यांना येथील लोकांची मानसिकता आणि प्रश्न कसे कळणार? पण वर्षानुवर्षे असेच घडत आले. येथील शाळेवर शिक्षक कोल्हापूर, सांगली, सातारा ते पार जळगाव येथील, येथे एम.एस.ई.बी इंजीनियर घाटावरचा, येथे कृषि अधिकारी देशावरचा, येथील जिल्हा रुग्णालयात, न्यायालयात, पाटबंधारे विभागात आणि पीडब्लूडी येथे कर्मचारी सांगली, कराड कडले, आणि रस्त्यावर माती टाकायला कोकणी तरुण.

असे का घडले? असे का घडते? का आम्हाला वाटत नाही की आम्ही येथील सरकारी पदांवर अधिकारी व्हावं? का आम्हाला वाटत नाही की येथील शाळेत निर्माण होणाऱ्या विविध पदांवर आपण असावं? याच कारण आमच्या नेत्यांनी गुलामगिरीच बाळकडू आम्हाला पाजल आहे.
त्यांची तळी उचलून धरणारी, त्यांच्या पाठी फिरणारी आणि त्यांचा जयजयकार करणारी टाळकी त्यांना हवी आहेत. प्रसंगी त्यांच्यावर होणारा हल्ला स्वतःवर झेलणारे स्वामिनिष्ठ गुलाम त्यांना पदरी हवे आहेत. त्या बदल्यात मुंबईत एखादे झोपडे आणि दोन वेळच्या आन्नाची सोय करायला ते तयार आहेत. तुम्हाला सुशिक्षित करणं तुम्हाला तुमच्या हक्काची जाणीव करुन देण त्यांना परवडणारे नाही. तुम्हाला शिक्षीत करून जागे करणं आणि असणाऱ्या विविध संधीच जाणीव करून देण त्यांना परवडणार नाही. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला ते मूर्ख नाहीत तर पूर्ण व्यवहारी आहेत. हे असं असूनही तरूण चांगली नोकरी काही कामधंदा करण्या एवजी टपोरीगीरी करण्यात धन्यता मानतात हे भिषण सत्य आहे. या नेत्यांच्या हुजरेगिरी करून पोट जाळण्यापेक्षा स्वाभिमानाने आणि कष्टाने शेती केली तरी स्वतःची कमाई असेल.

म्हणून तरुण मित्रानो सावध व्हा. चिपीत विमान आलं तर त्यात तुम्ही बसून आल्याचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी झटा. राऊत साहेब जिंदाबाद, राणे साहेब जिंदाबाद, जठार जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद या घोषणा देऊन किंवा रॅली काढून पोट भरणार नाही. सावध व्हा, आपल्या मित्रांना सावध करा. चांगले शिक्षण,चांगले संस्कार, चांगले विचार आणि चांगला आचार तुमच्या प्रगतीच द्वार उघडू शकतो.
गावगुंड बनू नका, तर ध्येयवादी विद्यार्थी बना.चांगले नागरिक बना. स्वतः छोटा का होईना व्यवसाय करा, प्रामाणिकपणे मेहनत केलीत तर नक्की यश मिळेल. चुकूनही कोणाच्या पदरी आश्रीत म्हणून जगू नका आणि हुजरेगिरी करू नका. स्वाभिमानाने जगा आणि दुसऱ्या व्यक्तीला समजून घ्या.





आमच्या नेतृत्वाला लाज वाटायला पाहिजे आम्ही येथील तरूण रक्ताला येथील भुमीपुत्रांना स्थानिक स्वराज्य संस्थेत उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या संधी दाखवू शकलो नाही. त्यांची मानसिकता बदलू शकलो नाही. या येथे उपलब्ध असणाऱ्या सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही. येथे कार्यरत असणारे शासनाचे अनेक विभाग त्यातील संधी, त्यासाठी करायची तयारी,घ्यायची मेहनत या बाबत योग्य माहिती कधी पुरवली नाही. या उलट येथील सरकारी पदांची आणि शाळेतील रिक्त होणाऱ्या जागा आम्ही पैशाच्या हव्यासापोटी लिलावाने विकल्या.

आम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे गुलाम म्हणून नांदण्यात, हुजरेगिरी करण्यात जन्म घालवला आणि पुढील पिढीलाही तेच शिक्षण दिले. आता या चिपी विमानतळावर तरी कोकणी रक्ताला न्याय द्या. नाहीतर सांगण्यासाठी विमानतळ आमचं, उतरतील पर प्रांतीय किंवा विदेशी आणि आम्ही त्यांचे रामा गडी म्हणून राबत बसू.

तेव्हा चिपीच्या या दशावतारीत कोण कोणावर भारी पडलं त्याच मोजमाप मेडिया करेल पण तुम्ही सोंग नाचवण बंद करा. येथील तरुण मुलांना वडा पाव आणि बीअरची बाटली याच आमिष देण थांबवा आणि त्याला समज द्या. शिक्षणासाठी प्रेरित करा. शिक्षणासाठी सवलत मिळवून द्या, खिशात हात नाही घातला तरी चालेल त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून द्या आणि नंतरच स्वतःची पाठ थोपटून घ्या. नाहीतर विमानतळ उभा राहिला आहेच पण उद्या येथे उद्योग आले तरी त्या उद्योगास लागणारे मनुष्यबळ बाहेरूनच आले तर येथील तरूणांना तेलही गेले आणि तुपही गेले हाती आले धुपाटणे अशी स्थिती होईल.

धृतराष्ट्र आंधळा नव्हता आणि संजय आगीत, सॉरी युद्धात तेल ओतण्याचे काम इमाने की विमाने इतबारे करत होता. खर तर त्यांनी ही आग धुमसत ठेवीन अशी शपथ घेतली आहे. आघाडी टीको वा न टीको, “हम चुल्हा जलाते रखेंगे” असा वादा त्यांनी मॅडम समोर केला आहे. असो तर कोकणी माणसाला दशावतार म्हटलं की कोण आनंद! बाबी नसला म्हणून काय झाले? इतर कोकणी कधी कधी तोंड रंगवू शकतात हे अवघीयांना ठावे. तर असा हा दशावतार की दहीकाला संपन्न झाला.कोकणातील तमाम नेते हजर राहिले. बोलण्याची संधी मात्र मोजक्या नेत्यांना मिळाली. विमान वाहतूक उड्डाण मंत्री सिंदीया यांनी दिल्लीतून उद्घाटन झाल्याच जाहीर केलं. कलेक्टर मॅडम ते म्हसकर कुटुंब या साऱ्यांनी निश्वास सोडला. एकंदरीत वस्त्रहरण न होता, कापडं न फेडता हा कार्यक्रम “यशस्वी पार पाडला” या बद्दल अवजड आणि अवघड मंत्री, त्रिकोणी मंडळाचे अध्यक्ष आणि तमाम सदस्य यांचे कोकण आभारी आहे.

साहेब म्हणाले म्हणून आम्ही मुंबई मधून वडा पाव गाड्या चिपीच्या विमानतळाबाहेर लावल्या होत्या. वाटलं होतं भूमिपुत्रांना साहेब न्याय देतील. उद्घाटनास आलेले आमचेच नगरसेवक, आमदार, मंडळाचे अध्यक्ष, आमदार, मंत्री आमचा वडा पाव विकत घेऊन खातील. कुठले काय! त्यांनी कोणा गुप्ता नावाच्या माणसास पाठवून आम्ही गाड्या लावल्या म्हणून हप्ता वसूल केला. ताकीद देत म्हणाला, “गाड्या लावायच्या असतील तर आधी साहेबांना किंवा त्यांचे सेक्रेटरी राऊत साहेब यांना भेटा.” तेवढ्यावर थांबला नाही, म्हणाला, “भाषण देऊन साहेबांना भूक लागली आहे, दोन, दोन वडा पावचे पार्सल पोच करा सिक्युरिटीकडे.” हाय रे कर्मा ! ,हा कसला धंदा, यांनी आम्हाला चांगलं धंद्याला लावाल.

एवढे भोग भोगूनही, आम्ही दुखलं म्हणायचे नाही आणि फुकट वडा पाव न्हेला अशी बोंब मारायची नाही म्हणजे जुलूम नव्हे तर काय? अहा रे रयतेचे राज्य! एक तर मोठी स्वप्न दाखवत आमच्या जमिनी विमानतळ होणार म्हणत चिंचोक्याच्या दरात खरेदी केल्या. थोडया सुटल्या होत्या त्या, “रे येड्या या कातळावर काय उगवतला, आता विकलस तर चार पैसे गावतीत, नंतर कुत्रोव मुतूचो नाय.” म्हणत त्या ही त्यांनी पदरात पाडून घेतल्या, आम्ही गांडू त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला, दादा खोट कस बोलतील अस म्हणत येतील त्या पैश्यात सडा विकला.



affiliate link

दरम्यानच्या काळात विमानतळाच काम मागेच राहिले, अनेक मुहूर्त आले आणि गेले, वाटू लागल चिपीचं विमानतळ हे गरीबांच्या जमिनी विकत घेण्यासाठी रचलेल सोंग होत. आमच्या कोकणात शिमग्याला सोंग काढतात. पण एकदाचा मुहूर्त मिळाला. जी नेतेमंडळी आज कार्यक्रमाला हजर आहेत त्यातील काही नेत्यांनी येथील जमीन फुका पासरी घेऊन ठेवली आहे. कधीतरी या जागेला सोन्याचा भाव येणार आणि मग ही मंडळी याच जमिनी विकणार हे उघड सत्य. आम्हाला वेळोवेळी आश्वासन देण्याच काम मात्र यांनी इमाने इतबारे केलं हे खरं.

आता टुरिस्ट उतरले की तुमचा फायदाच फायदा, कोकम विका, शहाळी विका, काजू,फणस काय वाटेल ते विका. कोंबडी वडे विका, कोकम कढी विका असं म्हणत आमची मुंबईतील टपरी, पानपट्टी बंद करून ताब्यात घेतली. आम्ही साहेब म्हणतात म्हणून विश्वास ठेवून इथे आलो तर इथेही तेच. अजूनही केवळ मोठ्या साहेबांच्या शब्दखातर आम्ही शाखेत आहोत पण यांचे रंगच वेगळे आणि तरी म्हणतात, “कोकणातील जनतेला आम्ही सोडणार नाही.”

याचा नक्की काय अर्थ घ्यावा ते कळत नाही.आमच्या गिरण्या तुम्ही बंद पाडल्या, आमच्या चाळी तोडून टॉवर उभारून आम्हाला बेघर केलं. आता नक्की काय बाकी आहे तेव्हढे सांगा. केसाने गळा कापतात ऐकलं होतं पण तुम्ही बंधन मनगटात बांधून गळा कापाल अस नव्हतं वाटलं.

पश्चिम महाराष्ट्राशी मैत्री म्हणजे विश्वासघात करणाऱ्या नेत्यांशी मैत्री, यशवंतराव यांच्या शिष्याने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची कथा तशी फार जुनी नाही. समाजवादाच्या गप्पा मारत काही लोक पक्ष काढतात आणि विलीन करतात हा इतिहासही फार जुना नाही. ज्यांचं आयुष्य फक्त सत्ता भोगण्यात गेल ते तुमचा किंवा कोणत्याही मित्राचा हात कुठवर धरतील हे सांगणे तसे अवघड. “असंगाशी संग” याची प्रचिती भल्या भल्याना आली आहे, तुम्हीही एकदा अनुभव घ्या.

यापूर्वी युतीत होता,पंचवीस वर्षे एकत्र संसार करायचा म्हणजे काय चेष्टा आहे? अजीर्ण झालंच होतं, काही तरी कारण हव होत काडीमोड घ्यायला ,तुम्ही म्हणालात पहिली अडिच वर्षे द्या, फडणवीस यांना अर्ध द्यायच जीवावर आलं, म्हणाले, “जिंकूनही द्यायची गादी याला कुठे का आहे अर्थ? लागल्यास जास्त पदे घ्या पण माझी खुर्ची मागू नका.” बिनसल. राष्ट्रवादी बरोबर पाट लावायला गेले तो पाटही अचानक काकाने खेचला, काय म्हणाव दैवाला?. तरी म्हणाले मी येईन म्हणूनच जाणीवपूर्वक त्यांच नाव निमंत्रण पत्रीकेवर टाकलच नाही. न जाणो तिथ आले आणि करणी करून मंत्रीमंडळ ताब्यात घेतल तर काय करणार त्या पेक्षा चार हात दूर असलेले बरे.

आजचा दिवस चिपीवासी आणि कोकणाच्या चांगला लक्षात राहील. पहिले व्यावसायिक विमान कोकण,सिंधुदुर्ग येथे या दिवशी उतरल्याची नोंद इतिहास जपून ठेवेल यात वादच नाही परंतु याच दिवशी ठाकरे आणि राणे यांच्यातील शाब्दिक रस्सा उकळून अंगावर सांडला. याची नोंद कायमस्वरूपी राहील. चिपीच्या निमित्ताने का होईना मातोश्री सोडून ठाकरे बाहेर पडले हे काही कमी धारिष्ट्य नव्हे. येथे येतांना गडांचे नसले तरी जांभ्या दगडांचे फोटो त्यांनी काढले असावेत. आता हे फोटो दुर्बिणीतून पाहून साहेबांना एवढ्या दुरुन दिसलेले दृष्य यांचे प्रदर्शन भरेल आणि ते फोटो हजारो लाखो रुपयांना विकले जातील,अहा रे डोक्यालिटी ! ह्याला म्हणतात व्यवसाय. असो तर आजचा दिवस स्वर्ण अक्षरात लिहून ठेवला पाहिजे.



affiliate link

केंद्रातील सत्ता बहू काळ ज्याच्या ताब्यात होती त्यांनी या महाराष्ट्रात नवीन पायंडा पाडला आहे. खरे तर साहेबांच्या भाषेत काँग्रेस नंबर एकचा शत्रू पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने तुम्ही शत्रूला मिठी मारली, त्यांचा अनुभव तुम्हाला लवकर येईलच, मॅडम म्हणाल्या तर ते कधीही नांदेड किंवा विदर्भात निघून जातील. तेव्हा तुमचे विमान खाली उतरता यावे या साठी जागा शिल्लक ठेवा. आता किती काळ आकाशात भरारी मारता येतील याचा अंदाज घ्या. इंधन किती वेळ पुरेल? आयत्या वेळी इंधन टाकायला त्यांनी मनाई केली तर काय? हे लक्षात असू द्या.

चिपीत उतरून तासाभरात परत फिरलात त्या ऐवजी रस्त्यावरून प्रवास केला असतात तर रस्त्यावर प्रवास करताना शरीरातील हाड एकमेकांशी कश्या गप्पा मारतात ते ही कळालं असत. लोकांची वास्तपुस्त करता आली असती. निदान सागरी मार्ग त्याच तुम्ही कौतुक करता तो डोळ्याखाली घेतला असता तर बरं झालं असतं, उद्या विमानांची संख्या अचानक वाढली तर विमान रस्त्यावर लॅन्ड करायला बरं. ज्या कोकणी माणसाच्या भरवश्यावर तुम्ही मुंबई भोगली त्याचे हाल कळाले असते. कोकणी माणसाला आणि कोकणाला मी वाकून मुजरा करतो म्हणता आणि येथील जैतापूर विकासात खोडा घालता. आज कोकणात काही कुटुंबातील प्रायव्हेट कंपनी सोडल्या तर इथे उद्योग आहे कुठे? जर जैतापूर येथे रिफायनरी आली असती तर हजारो भुमीपुत्रांना प्रत्यक्ष नोकरी आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असता. स्थानिकांचे जीवनमान उंचावले असते. नवनवीन उद्योग सुरू झाले असते आणि राज्याला करही मिळाला असता. प्रदूषण नियंत्रीत करायची अट घालणे,प्रकल्प उभारताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक समिती नेमणे असे उपाय शक्य होते. आपण ही संधी गमावली.

आज हौस म्हणून कोकणी चिपीला उतरत आहे, याचा अर्थ त्याचे जीवनमान उंचावले आहे असा नाही तर किशात पसे असेपर्यंत तो राजा असतो, आमच्या दशावतारी नटाला विचारा, रात्री तो राजा असतो आणि सकाळी रंग पुसून तो डोक्यावर बोचक घेऊन घरी जातो. कौतुक म्हणून इथला कोकणी माणूस हा प्रवास ऐपत नसली तरी काही काळ करतीलच पण उद्या पर्यटकासाठी पुरेशा सुविधा नसल्या तर चिपीचे भविष्य काय? इथे लाईट गेली तर आठवडा आठवडा येत नाही. मे महिन्यात पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. ग्रॅज्युएट झाला तरी दहा हजाराच्या नोकरीला तरुण महाग मग विकास व्हायचा कसा? विस्तारा कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार झाला तर ठिक. नाहीतर विस्तार न करता कंपनी आपलं चंबू गबाळआवरून वाटेला लागेल.

रत्नागिरी विमानतळ कधीपासून बंद आहे. वास्तविक सिंधुदुर्गपेक्षा अधिक उद्योग रत्नागिरी येथे आहेत, अधिक पर्यटनस्थळे आहेत असे असूनही हे विमानतळ राज्याला सुरु ठेवता आलेले नाही याची नोंद घ्यावी.”नव्या नवरीचे नव दिवस” ही म्हण खोटी ठरवण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

येथे रोज फक्त एक विमान येणार म्हणजे फार तर चारशे पाचशे प्रवासी रोज उतरतील किंवा येथून जातील या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून त्यांच्या दिमतीला किमान पन्नास, शंभर लोक कार्यरत असणार, बर ह्या नोकरीत स्थानिक असेल तर ठिक अन्यथा या विमानतळावर होणारा खर्च जिल्ह्याच्या मुळावर येईल. ज्या काही सुधारणा करायच्या त्या या परिसरात होणार आणि उर्वरित सिंधुदुर्ग वंचित रहाणार, विकासातील ही असमानता फारच घातक म्हणजे आजारापेक्षा उपचार अधिक घातक. मग हा लढा आहे रे आणि नाही रे मधील झाला तर नवल वाटू नये.

चिपीत विमाने जरूर यावीत पण कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून येथे सर्व पर्यटन स्थळांची कामे व्हावी.ती कामे होताना स्थानिक शिकलेल्या मुलांना कामे देण्यात यावी तर ही मुले मुंबई, पुण्याकडे पळ काढणार नाही. येथे शाश्वत विश्वासाची काम व्हावी तरच तरूणांना भविष्य असेल.

चिपीचं विमातळ कार्यरत झालं ही आपल्या कोकणाच्या विकासासाठी आनंदाची बाब आहे. विमान आले आणि विमान गेले. विमानातून कोण कोण आले. हे पाहण्यात उमेदीची वर्षे खर्च करू नका तर चांगला अभ्यास करा ,उच्च शिक्षण घ्या, स्पर्धा परीक्षा द्या, मेहनत करा, यश मिळवा,उच्च पदावर जा आणि विमानाने चिपित उतरा. येथील तुमच्या भावंडांना, मित्रांना,गाववाल्यांना मार्गदर्शन करा. येथे उद्योग उभारा. येथील स्थानिक माणसाला रोजगार द्या. उच्च ध्येय ठेवा, उच्च स्थानी विराजमान होऊन चिपीत या. तुमच्या स्वागताला कोणी नाही आले तरी ही भुमी तुम्हाला सलाम करेल. तुम्हाला कुशीत घेईल. मला खात्री आहे ह्या चिपीवर एक दिवस तुमचे स्वतःचे विमान उतरेल,अर्थात त्या साठी नियोजनबद्ध मेहनत, मेहनत आणि फक्त मेहनत.

विमान जरूर आणा, पर्यटन जरूर वाढवा, पण पर्यटन विकास करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा आधी निर्माण करा. विमानतळ ते पर्यटन स्थळे याना जोडणारे पक्के जोड रस्ते, चोवीस तास वीज, मुबलक स्वच्छ पाणी, करमणूक साधने, इस्पितळे याची उभारणी केली तरच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. केवळ पर्यटन उद्योगावर विकास होणार नाही तर या विमानतळाचा वापर फळे,शेती उत्पादने, मासे, लाकडी वस्तू यांच्या वाहतुकी बरोबर, औषधी वनस्पती यांच्या वाहतुकीसाठी खुला केल्यास, कार्गो उभा राहील आणि इतर राज्यात कोकणी उत्पादने पाठवता येतील.

तेव्हा मायबाप सरकार आणि कोकणातील तमाम सर्वपक्षीय सामाजिक नेत्यांना विनंती,विमानसेवा सुरू झाली हे विकासासाठी पहिल वामनाचे पाऊल होते त्याचे नक्कीच स्वागत. पण जर धरण बांधून बारामाही पाण्याची व्यवस्था झाली, शेतात नगदी पिके उभी राहिली. माकड आणि अन्य वन्य प्राण्यांच्या स्वैर वर्तनावर बंदी आणली, जंगलातून इमारती लाकूड आणि उद्योगात उपयोगी पडतील अशा योग्य झाडांची लागवड केली गेली. त्या लाकडावर प्रक्रिया उद्योग उभा राहिला आणि येथील लोकांना रोजगार मिळाला तर येथील जीवनमान उंचावेल आणि चाकरमानी बनण्यासाठी लोक मुंबई, पूणे गाठणार नाही.

चिपीला विमान येवो, अथवा चिपीतुन विमान जावो कोकणात उद्योग सुरु झाल्याशिवाय सामान्य माणसाला प्रगतीचे द्वार खुले होणार नाही. त्याच्या खिशात पैसेच नसेल तर तो चिपीत जाऊन काय करेल? तेव्हा आधी उद्योगाला चालना द्या. चिपिच्या कातळावर आय टी पार्क आणा, मोटार उत्पादन सुरू करा, जड आणि अवजड प्रकल्प सुरू करा म्हणजे कोकणी माणसाच्या हाताला काम मिळेल आणि कोकण उत्कर्ष शक्य होईल. तेव्हा चिपीत विमान उतरवले,आम्ही करून दाखवले हा नारा देण्या एवजी कोकणातील भुमीपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी काही ठोस करा तर तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काही करता आहात यावर विश्वास बसेल.अन्यथा चिपीच्या उद्घाटनाने कोकणवासीयांचे पोट भरणार नाही तो आनंद सोहळा वांझोटा न ठरो हीच इच्छा.

                             समाप्त
Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

11 thoughts on “चिपीचे विमानतळ आणि कोकण विकास

  1. Bhosle R. B.

    Kokni Sarkari Adhikari aani netyanni vichar karayla lavnaara lekh.

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      धन्यवाद

  2. YESHWANTRAO TAHASHILDAR
    YESHWANTRAO TAHASHILDAR says:

    सर्व नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याजोगा लेख।

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      धन्यवाद मित्रा,तुमच्या अभिप्रायाने लिहिण्यास उत्तेजन मिळते.

  3. Neha tendolkar
    Neha tendolkar says:

    खूप छान लेख आहे. नेत्यांनी कोकणी माणसांचा विचार करावा, व कोकणी माणसांनी आपल्या कोकणचा, आपल्या माणसांचा विचार करणे गरजेचे आहे.

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      Thanks for compliment.

  4. Milind Chavan
    Milind Chavan says:

    कोकणी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख, आता तरी कोकणी माणूस जागा होईल, आपल्या जमिनी परप्रतियाना विकणार नाही, आणि नेत्यांच्या मागे फिरणार नाही तो दिन सुदिन ठरो.

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      धन्यवाद मिलिंद, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणाचा विकास झालेला नाही, अनेक नेत्यांनी फक्त स्वतःचा विकास केला. भोळी जनता तशीच राहीली ही खंत आहे. यावर गांभिर्याने विचार व्हावा म्हणून लिहिले आहे. आपल्या मित्रांना हा लेख पाठवा ही विनंती.

  5. सागर सिद्धू पाटील
    सागर सिद्धू पाटील says:

    नवं तरुणांना चांगला उपदेश दिला आहे तसेच राजकारणी मंडळींनी काय करावे . काय करू नये? याबद्दल चांगली शिकवण दिली आहे. सर खूप छान लेख आहे .आई कशी आपल्या पोरावर वात्सल्य रुपी प्रेम करते तशीच तुमची कोकण च्या भूमीवर प्रेम आहे हेच या लेखातून दिसून येते. वरील लेखातून नवं तरुणांनी काही बोध घेतल्यास कोकणचा विकास कोणीही रोखू शकणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेष असेल . मस्त सर.

  6. KESHAV SHIVRAM SAMANT
    KESHAV SHIVRAM SAMANT says:

    Very well placed the dsrk realities of Chipi.

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      Thanks for compliment.

Comments are closed.