तीच घराची शोभा

तीच घराची शोभा

रस्त्याने चालतांना एकदा आम्ही बोर्ड वाचला मालक चालक संघटना
तेव्हा पासून मी मलाच विचारतो प्रश्न,आणि करतो मालकाचा बहाणा

चालक म्हणजे पत्नी तीच तर कुटुंबाची गाडी विनाअपघात चालवते
तिचं कोणी ऐकत नाही असं चुकून वाटलं, तर भांडी आदळून दाखवते

आपलं असतं मन अशांत, चिंता, भिती, भयग्रस्त तेव्हा तिच देते धीर
आपण मात्र नको तिथं संताप, उगाचच सगळ्यांना जाच, अन शब्द जणू खंजीर

तीच असते घरचा मॉनिटर, गृहमंत्री, अर्थमंत्री अन म्हटलं तर जेलर
तिला कोण रोखणार? ती बोलते, मांडते, करते, तिला असतो मुक्त वावर

तिच्या प्रेमाच्या छायेत त्याच रूक्ष जगणं कष्टमय जीवनातही सुखावत
रागावली तरी झोपताना त्याचे पाय चेपते तेव्हा मन तिच्याकडे झेपावतं

घरी अनोळखी, फुकटे मित्र, नातेवाईक आल्यास “मालक” नाहीत सांगते
पण तिच्या माहेरची मंडळी आल्यास त्यांच्या सोबत दिवसभर थांबते

तो मालक असल्याने दिवसभर राब राबून तिची भारी बडदास्त ठेवतो
रात्री चालक रागावली तर तो वळकटी टाकून निवांत एकटाच झोपतो

जन्मताच तिने आत्मसात केली आहे कोंड्याचा मांडा करण्याची कला
तो तिचा निस्सीम सेवक, तिच्या हा ला हा म्हणतो इतका साधा भोळा

घरातील तिचे स्थान अबाधित तो कप असला तरी ती त्याची बशी
तो तिला आनंदी ठेवतांना राबतो, ती त्याच्या शांत निद्रेसाठी मऊ उशी

घरातील बरेच निर्णय तीच घेते अन हे असं म्हणाले बिनदिक्कत म्हणते
आपल्या तालावर सगळं घर हलते हे पाहून सुखावून एकटीच हसते

त्याच्या नावाचं कुंकू ती लावते पण त्या कुंकवाची शिस्त मनात जपते
ज्या घरी संमजस मन मिळाऊ जोडपं असतं त्याच घराचे घरपण टिकते

घरात कितीही वैभव असले तरी देव्हारा अन गृहिणीशिवाय नाही शोभा
महिलेचा हात जिथे जिथे फिरतो, जिवंतपणा वास्तूत येतो तिथेच भगवंत राही उभा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “तीच घराची शोभा

  1. Bhosle R. B.
    Bhosle R. B. says:

    छान कविता..
    छान उपमा दिल्या…. कप – बसी…..

Comments are closed.