पवन

पवन

शाळेतून येता येता त्याचे रस्त्यावर द्वाड मुलाशी भांडण झाले, त्याचे कारणही तसेच होते, त्या मुलाने काही कारण नसताना त्याला टपली मारली. हा अन्याय निमूट सहन करणे त्याला शक्य नव्हते. त्याने कारण विचारले तर आधी शाब्दिक, मग झोंबाझोंबी, लाथा बुक्यांनी आणि नंतर कपडे फाटण्यापंर्यत त्यांची जुंपली. तो काही त्या मुलाच्या वाटेला गेला नव्हता पण एकदा भिडल्यावर थांबणे शक्य नव्हते. शेवटी अंगातला शर्ट फाटला आणि त्याच्या नाकपुड्या फुलल्या, तो त्याच्या पोटावर बसला दोन्ही हातांनी त्याचे कान गच्च धरून त्याने पिसटून काढले, दोन तीन ठोसे लगावले आणि विजयी स्वरात तो उठला “जय हनुमान.”

तो घरी पोचण्या आधी त्यांच्या जबरदस्त मारामारीची बातमी पोचली. बाकी काही न विचारता बापाने छडीने अंग शेकून काढले. शर्ट फाटला, त्याची शिक्षा भोगावी लागणार याचा त्याला अंदाज होता पण एवढी जबर शिक्षा होईल याची त्याला कल्पना नव्हती. दोन तीन वेळा त्याने बाला सांगायचा प्रयत्न केला पण बा ऐकायच्या मनस्तीतीत नव्हता. दोन तीन वेळा आईने त्याला आपल्या मिठीत घेतले पण त्याची शिक्षा तिला भोगावी लागली.

दोन तीन छड्या तिच्या हातावर बसल्या. तरीही तिने त्याला तसेच धरून ठेवले. छोटी बहिण शांती मोठ्याने रडत म्हणाली, “बाबा नका न मारु, दादा मरेल की अशानं” त्याने तिच्याकडे रागाने पाहिले. त्या डोळ्याची दहशतच अशी होती की ती दूर उभी राहून रडत बसली पण बापाला दया नाही आली. बापाचा राग शांत होण्याचे चिन्ह दिसेना म्हणून त्याने लांब उडी मारत पळ काढला, कधीही न परतण्यासाठी. वय अवघे चौदा वर्षे, कुठे जायचे? कसे जायचे? काहीच तर माहीत नव्हते, पण घरी परतायचे नव्हते एवढे नक्की. अंगतल्या शर्टाच्या चिंध्या झालेल्या, काठीने इतका मार पडला होता की शरीर ठणकत होतं पण त्या दुःखापेक्षा आपल्याला काही न विचारताच झालेली माराहाण, शिक्षा, हा अपमान होता. त्याचेच दुःख अधिक होते. आपण पळाल्यावर आई काय करेल? धाकटी शांती आठवण काढून रडेल का? असं त्याच्या मनात आलं पण आता मनाशी ठरलं होतं.

नारायणगावच्या बाहेर तो एकदाच आत्याच्या लग्नाला सासवडला गेला होता आणि आता कोणाकडे जायचं हे माहिती नसताना तो गाव सोडून बाहेर पडला होता. रडून नाक शेंबडाने भरलं होतं. घश्याला कोरड पडली होती. सरळ वाटेन न जाता कोणी परिचिताने पाहू नये म्हणून आड वळणाने तो चालत राहिला. तास दोनतास तो चालतच होता. कुठे जायचं काहीच तर माहिती नव्हते, डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. अंदाजे पाच सहा मैल चालल्यावर त्याच्या पोटऱ्या भरून आल्या. पाठीमागून ट्रक येत असल्याचा आवाज आला तस तो रस्त्यावर आला. हात दाखवून थांबण्यासाठी इशारा करत राहिला. एक दोन ट्रक तसेच निघून गेले. आता तो घरापासून आणि गावापासून बराच दूर होता. अर्ध्या तासाने एक टेम्पो आला. त्याने हात दाखवताच थांबला. “काका मला पुण्यात सोडता का? लय उपकार होतील.” ड्रायव्हरला दया आली, “बस हित. कुठून आलायसा?” “नारायणगाव.” पवन उत्तरला. “एकलाच कायला चालला? तुझी माय, बा कोण हाय की नाय?” “जी मला कोण बी नाय, माय, बा कवाच मेल.” तो धडधडीत खोट बोलला. “आता पुण्यात कायला जातो पोरा? तथ हरवशील गा.” “न्ह्याय हरवणार जी, ऱ्हाईन कुठबी भीक मांगीन.” टेम्पोवाला, निवांत झाला, त्याची खात्री पटली पोरगं आय बापा विनाच हाय. जास्त विचारून गळ्यात बांधून घ्याचं काय काम बी न्हाय. थोड्या वेळाने पोरगं निवांत झोपलं.

स्वारगेट आलं तसं त्यानं त्याला हलवून जाग केलं, “ये पोऱ्या उतरतोयस न्हवं, हे पुन आलं बग, सावकाश उतर, जाय हो,काय पैस बियस हायत का तुझ्याकडे?” त्याचं अंग रसरशीत तापलं होतं, पण त्या ड्रायव्हरचा इलाज नव्हता. “न्ह्याय जी, तुमाला द्याया काय बी न्हाय.” “बरं बरं, हे पाच रुपये घे, एखांदा कप चा पी.” “नको जी, हिथवर सोडलं लय उपकार झाले.” “आरं! घे म्हणतो ना, मोठ्या मानसाचं ऐकाव लेका, धर.” त्याने ते पाच रूपयाच नाणं निमूट घेतलं. तो उतरला वाट फुटेल तिकडे चालत राहिला. उंचच उंच इमारती, खुप मोठे आणी स्वच्छ रस्ते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांचा रांगा. मधून मधून हॉटेलातून येणारा तळणाचा वास. भूक उफाळून आली पण काही उपयोग नव्हता. तो झगमगाट पाहून भांबावून गेला. अचानक त्याला अनेक एसट्या एका मोठ्या इमारतीत शिरतानां दिसल्या, त्याने नाव वाचलं, शिवाजीनगर बस आगार.

तो शिवाजीनगर बस स्टँडकडे आला, त्याला त्याचे कपडे पाहून दोन तीन जणांनी हटकले. “ये पोऱ्या, कुठं निघालास? तुझी कापडं कोणी फाडली, आरा रा रा, काय दशा झालीया!” काय करावे सुचत नव्हते, शेवटी मुतारीत जाऊन त्याने शर्ट फेकून दिला. आता तो अगदी उघडा झाला. अंगावर शाळेची पँट तेवढी होती. त्याने तिथल्या कँटीनवर जाऊन हात पसरला,”शेट भूक लागल्याय द्या की हो काही खायला.” एकच वाक्य त्याने आगतीक होऊन दोन तीन वेळा म्हंटलं. आतल्या माणसान, एक समोसा पाव कागदात गुंडाळून दिला आणि त्याच्यावर खेकसला,”ले और जल्दी भाग वरना पुलीस को बुला लुंगा.” त्याने तो समोसा पाव घेता घेता त्याचे आभार मानले, शेट लय उपकार झाले. त्याने दूर एका बाजूला बसून समोसा पाव खाल्ला. आगरातून एसट्या सारख्या ये जा करत होत्या. तो टक लावून पहात होता. पूणे-नगर, पूणे-कोल्हापूर, पूणे-नाशिक, पूणे-ठाणे अशा कितीतरी पाट्या त्याने वाचल्या. तो एका कोपऱ्यात बसला असतांना एक पोलीस काका तिकडे येऊन गेले, त्याच्या नशिबाने त्यांच लक्ष त्याच्याकडे नाही गेल.

संडासच्या बाहेर हात धुवायचा नळ होता तिथे जाऊन तो पाणी पिऊन आला. दिवस बुडला सगळीकडे लख्ख उजेड फेकणारे पिवळे दिवे पेटले. भगभगीत दिसत होतं. पोटात भुकेन खड्डा पडला होता. स्टँड बाहेर एक फळ विक्रेता बसला होता, त्याच्याकडे सफरचंद, डाळींब, पेरू, चिकू केळी, मोसंबी खुप फळं होती. तो त्याच्या दुकानाजवळ जाऊन उभा राहीला, त्याने पाहिलं तो हिंदीत बोलत होता. तो तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणाला ” बहूत भूक लगा है काय तरी खाने को दो ना.” तो विक्रेता अंगावर खेकसला, “भाग यहा से, शरम नही आती भिक मांग रहे हो. भागो वरना पुलीस का डंडा पडेगा.” “अंकल,भूक लागल्याय हो, कुच भी दे दो मै बाहिर जाता हू.” त्याने डावा हात पोटावरून फिरवला. विक्रेत्यांनी पाहिलं, खरच पोराच्या पोटात काही नसावं, त्यानी पिकून गेलेली दोन तीन केळी त्याच्या हातावर ठेवता ठेवता विचारलं, “ये छोकरा, घर से भाग के आये हो क्या?” त्यांनी मान डोलवली. त्या विक्रेत्याच्या डोक्यात काय आल कोणास ठाऊक त्यांनी त्याला जवळ बोलावलं, “कहा से भागे हो?” मुलाला कळेना, सांगावं की सांगू नये.

“अरे गुंगे हो क्या,जवाब दो कहा से भागे हो?” “नारायण गाव से. पिताजी ने बहूत मारा, इसलीये भागा, अंकल मेरी चूकी नही थी, स्कुल के लडकेने झगडा करके मेरा शरट फाड दी, पिताजीने बिना पुछे मुझेच मारा, इसलीये भागा.”
“क्या नाम है?” तो पून्हा घाबरला, सांगाव की सांगू नये, सांगितले आणि त्याने पोलीसांच्या ताब्यात दिल की पून्हा घरी सोडतील आणि बाबा पून्हा मारतील. तो जायला निघाला तसं त्या विक्रेत्यांनी त्याचा हात गच्च धरला. “रूक भाग मत मै तुम्हे मदत करूंगा अगर सच बताओगे तो. बोलो नाम क्या है तुम्हारा? “पवन! , पवन मारूती चव्हाण. नारायणगाव मे रहता हू.” “बापू ने मारा इसलीये भाग रहे हो, माँ का सोचा है? वो बेचारी क्या करेगी? बेचारी रो रो के मर जायेगी.” “अंकल मुझे अब घर नही जाना है,मेरी पिठ बघो, बिना पुछे जानवर समझके मुझे मारा है अब किसी भी हालात पे मै घर नही जाऊंगा.” “बेटे, बापूने घुस्से मे आकर तुम्हे मारा होगा,इसका मतलब ये तो नही की वो तुम्हे नही चाहते, जावो बेटा घर जावो, बाहर दर दर ठोकरे खानी पडेगी, भुके मरोगे. देखो मै तुम्हे कमीज देता हू, टिकट का पैसा देता हू तुम अपने घर जावो.” “अंकल, मै ने ठान ली है अब मै घर नहीच जाऊंगा, जब तक मै कुच न बनू मै मुह नही दिखाऊंगा.” हिंदी पिक्चर स्टाईल डायलॉग तो बोलला. त्या विक्रेत्याकडे गिराईक आले तसे त्यांच बोलण थांबलं, पवन एका बाजूला शांत उभा होता. तो विक्रेता फळ कशी विकतो निरीक्षण करत होता. थोड्या वेळाने तो मोकळा झाला, देखो पवन तुम बहूत जीद कर रहे हो, मगर यहा रहना कठीन है,रहो गे कहा? यहा गुंडागर्दी करने वाले बडे बच्चे तुम्हे जीने नही देंगे, तुम्हारा जीना हराम कर देंगे. घर चले जावो, तुम्हारी माँ रोती होगी, तुम्हारी बहन याद करती होगी. बापू तुम्हे धुंडते होगे. जावो बेटा घर चले जावो.”

“अंकल, मै किसी भी हालात पे घर नही जाऊंगा,प्लीज आज की रात्र मुझे यहा रहने दो,कल सुबह होते ही मै चला जाऊंगा.” त्या विक्रेत्याला सुचेना ह्याचे करावे काय? घरी न्यावे तर त्याची तीन मुलं होतीच शिवाय बायको काय म्हणेल? तो ही प्रश्न होताच, बराच विचार केल्यावर शेवटी तो म्हणाला. “देखो बेटा मै तुम्हे घर तो नही ले जा सकता, यदी चाहो तो आज का दिन तुम दुकान मे एक रात रह सकते हो. कल तुम्हे तय करके घर जाना है, अगर पुलीस न पकड लिया तो दंडे पडेंगे, कितने दिन उनसे छूप सकोगे, अगर उन्होने पकड लिया तो घर से भागने के कारण दंड देना पडेगा या फिर सुधारगृह मे रख लेंगे.” त्या रात्री त्याने दुकानात आश्रय घेतला, सगळं अंग ठणकत होतं,कधी झोप लागली कळल देखील नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता दुकानदाराने दुकान उघडलं,पवन दुकानाबाहेर आला, “नमस्ते अंकल आपने मुझे सहारा दिया, मुझपे भरोसा किया ये मै कभी नही भुलूंगा.” दुकानदार त्याच्याकडे पहात म्हणाला, “अरे बेटा अकेले कहा जाओगे?” “मालूम नही, जहा तकदीर ले जायेगी.” “रूको बेटा, तुम्हारे लिये ये शर्ट लाया है, इसे पहन लो,मुह धोके आवो, मै तुम्हे चाय पिलाता हू.”

त्याने आणलेला शर्ट घातला, छोडा ढगळ होत होता, पण पूर्ण उघडे असण्यापेक्षा नक्कीच बरा होता. तो तोंड धुवून आला. झोप झाल्याने आता तो ताजातवाना दिसत होता. दुकानदाराने त्याला चहा आणि बिस्किट मागवले होते. बिस्किटचा संपूर्ण पुडा त्याने संपवला. तो दुकानदाराच्या पाया पडला, त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले, अंकल आपने मुझपे जो एहसान किया है, मै आपको कभी नही भुलूंगा.” दुकानदारही भावूक झाला, “देखो बेटा, मेरी मानो, जिद छोडो,घर वापस जावो, चाहो तो मै तुम्हे छोडने आता हू. मै तुम्हारे पिताजी को समझा दुंगा, वे तुम्हे नही मारेंगे.” पवन मुसमुसत म्हणाला,”नही अब मै वापस घर नहीच जाऊंगा, मुझे जाने दो.”

दुकानदाराने पन्नास रुपयांच्या दोन नोटा काढल्या आणि म्हणाला, “ये रख लो बेटा तुम्हारे काम आयेंगे,खुद का खयाल रखना, और एक बात चोरी गुंडागर्दी मत करना. जीने का कुच अच्छा तरीका ढूंढ लो, हमारे हनुमानजी तुम्हारी रक्षा करेंगे.” पवन त्या दुकानदाराच्या पाया पडला. तो निघता निघता दुकानदाराने एक पिशवीतून त्याला दोन तीन मोसंबी दिली, “ले बेटा, भुख लगी तो खा लेना.”

तो शिवाजीनगर स्टेशनच्या दिशेने चालू लागला,दोन तीन वेळा त्यांनी पाठी वळून पाहिले. दुकानदार त्याच्या दिशेने पहात होता, खुप दूर पोचताच त्यांनी हात हलवला. त्या फळ विक्रेत्याच्या रूपात त्याला विठ्ठल भेटला होता, त्याला आठवलं त्याची माय सांगायची. ईश्र्वर भेटायचा आसल तं कनच्याबी रूपात भेटतय, पर ओळख पटाय पायजे.” त्याने स्वतःशीच मान डोलवली जणू आईच त्याच्या कानात बोलत होती.

आपल नशीब शोधायला पवन निघाला होता, तो शिवाजीनगर स्टेशनवर आला, इथे तिथे पहात तो स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवर आला. प्लॅटफॉर्म पूर्ण खाली होता. त्याने एक लाल कपड्यातील माणसाला त्याची भाषा बोलतांना ऐकले होते, त्याच्याकडे जात त्यांनी मुंबई जाणाऱ्या गाडीची चौकशी केली. “मामा मुंबईला कनची गाडी जाती?” त्या मुलाकडे पाहताच त्या हमालाला संशय आला,” ए पोरा घरातून पळून चाललास वय, लेका ममयचं काय बी खरं नाय तू गुमान घरला जा. बा रागावर आला आनि दोन दणक घातले तरी तुझ्या आयुक्शाच वाटोळ होऊ नये असच त्याला बी वाटतं. तू गुमान न्हाय गेला तं पोलीसाला सांगीन.”

पवनच्या लक्षात आलं, तो जर तिथेच थांबला तर नक्की ते काका त्याला पोलीसांच्या ताब्यात दिल्या शिवाय राहिले नसते, तो तिथून सटकला. पावणे चार वाजता कोयना एक्सप्रेस येणार असल्याचे त्याला कळाले. त्याने एका मोठ्या पार्सल मागे आसरा घेतला. गाडी आली तसं तो स्लीपरच्या डब्यात चढला. वरच्या सिटवर मुटकुळे करुन पडून राहिला. टीसी किंवा पोलीस आले तर काही खैर नाही अस स्वतःला बजावत राहिला. त्याच्या नशीबाने कोणी आले नाही. तेथेच त्याला पाण्याची अर्धी बाटली आणि अर्धवट खाउन टाकलेला उपमा मिळाला.भुकेला आसरा म्हणून त्याने उपमा खाऊन टाकला. तीन साडेतीन तासाने ठाणे आले. तो घाबरतच ठाणे स्टेशनवर ऊतरला.गर्दीत मिसळून गेला.

पोटासाठी, चहाच्या टपरीवर पाचशे रूपये आणि दोन टाईम जेवण झोपायला फुटपाथ अस करत जगला, आईची, धाकट्या शांतीची खुप आठवण यायची. काठी घेतलेला बाप आठवायचा, कधीतरी झोपेतून दचकून उठायचा पण घरी जाऊन भेट घ्यावी, आयला आणि बहिणीला भेटून यावं अस वाटूनही तो टाळत राहिला. नोकरी बदलत राहिला. शिक्षण आठवी इयत्तेत थांबल होतच आणि जगण्याच्या शर्यतीत आता शिकणं शक्य नव्हतं पण व्यवहारी गणित त्याला कळलं. त्यांच्या चहा टपरीजवळ एक चप्पल दुरूस्ती करण्याचं दुकान होतं, काम नसेल तेव्हा तो तिथे थांबून निरीक्षण करायचा. मालकाकडे थोडे पैसे जमवले होते त्याची मदत घेऊन त्यानी आरी, टोचा, अस सामान विकत घेतलं. मोठ्या रस्त्यावर मोकळ्या जागी गोण पसरून दुरूस्तीच दुकान मांडलं. पहिल्या दिवशी वीस रूपये मिळाले. हळूहळू बस्तान बसलं. एरीयातला भाई दर महिन्याच्या दहा तारखेला पाचशे रूपये घेऊन जायचा पण त्याला इलाज नव्हता. चहाच्या टपरीवर हप्ता वसूल करायला भाई लोक यायचे, त्याला ठाऊक होतं. धंदा वाढला तसं तो घरी पैसे पाठवू लागला. बघता बघता, तो एका चप्पल दुरूस्ती स्टॉलचा मालक झाला, तो अधून मधून घरी पैसे पाठवत असे, पण त्याने आपला थांग पत्ता कधीही लागू दिला नाही. दरम्यान त्याच्या बहिणीच लग्न झालं. ती परक्या घरी निघून गेली. पहाता पहाता, दहा पंधरा वर्षे निघून गेली, आता तो एका फुट वेअर दुकानाचा चा मालक होता. अशाच एका मुलीशी त्याचं बघता बघता जुळलं, ती बारावी शिकली होती. एक पोरगं पण झालं त्याचं नाव त्यानं स्टॅन्डवरच्या अंकलची आठवण म्हणून हनुमान ठेवलं, त्यांनीच तर सांगीतलं होत हनुमानजी तुम्हारी रक्षा करेंगे.

त्याला शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड वरचा अंकल वारंवार आठवू लागला. घर आणि बहीण आठवू लागली. मनाचा हिय्या करून त्यांनी भेटून यायचं ठरवलं. अन एक दिवशी सकाळच्या डेक्कन ने त्यांनी शिवाजीनगर गाठलं. थोडा भारीतला जोड आणि काही भेटवस्तू अंकलसाठी घेतल्या होत्या. त्याने स्टँड गाठलं. दुकानात नजर टाकली तर तिथे एक तरुण मुलगा होता. त्याने धीर करून विचारलं,”यहा एक अंकल थे वे कहा है? अब नही आते क्या?”
त्या मुलांनी दुकानात लावलेल्या फोटोकडे हात दाखवत सांगितलं “पिताजी दो साल पहिले चल बसे,अब ये स्टॉल मै देखता हू, मगर आप कौन है? “पवन ने त्या फोटोला नमस्कार केला, “मै उनका चाहिता हू, पवन जाधव बारा पंधरा साल पहले उन्होने मेरी मदत की थी. त्याने बॅग उघडून शर्ट बाहेर काढत त्याला दाखवला, “ये उनकी अमानत है आपके पिताजीने मुझे दिया था. उनका बहुत एहसान है मुझपर.” तो काहीसं आठवत म्हणाला, पापा अक्सर आपको याद करते थे, कहते थे, न जाने बेचारा कहा चला गया, अच्छा और इमानदार था.” मुझे याद है, पापा मेरे मम्मीसे जुना शर्ट मांगके लेकर गये थे, वे कह रहे थे कोई गरीब बच्चेको शर्ट देना था.” “वो मै ही हू, बारा पंधरा साल हुये उन्होने मेरी मदद की थी. इसी दुकान के अंदर उन्होने मुझे पनाह दि थी, मै उनके लिये कुच लाया था.” त्यांनी चप्पल आणि भेट वस्तू त्याच्या समोर काढून ठेवली. आप खोलके देखोगे तो मुझे खुशी होगी.”

त्यांनी बॉक्स उघडून पाहिला. वडिलांच्या मापाच्या आकर्षक चपला पाहून तो गोंधळाला. पवन त्याला हात जोडत म्हणाला, भैया यदी आप यह पहनोगे तो मुझे खुशी होगी.” भैयाच्या मुलानी चप्पल पायात घातल्या, त्याच्या पायात त्या फिट बसल्या. पवन ची पत्नी आणि मुलगी ते पाहून आणि ऐकून गोंधळली. पवन म्हणाला, “मुंबई मे मेरा खुद का जुतोंका का दुकान है, ये जुते मैने उनके लिये खास बनवाये है. ओ पहनते तो मुझे बहूत खुशी होती. आप उनके लडके है तो आपका हक बनता है. आपका नाम क्या है?” “मै हनुमान यादव उनका बडा बेटा, उनको हनुमानजी से बडा लगाव था इस लीये उन्होने मेरा नाम हनुमान रखा है.” “कैसी अजब लिला है, मैने भी मेरे लडके का नाम हनुमान रखा है. अंकल मुझे बोले थे हनुमानजी तुम्हारी रक्षा करेंगे, उनके याद मे, मैने बेटेका नाम हनुमान रखा,बेटा,अंखल को नमस्ते करो.” पवन म्हणाला.

त्यानी पवन, आणि त्याच्या पत्नी व मुलाला ज्यूस दिला. “पवनजी आप हमारे घर आईये मेरी माँ को अच्छा लगेगा. दोपहर मे स्टॉल हम बंद रखते है. हम घर होके आयेंगे.” पवन त्याला म्हणाला मेरी एक शर्त है अगर अंकल का यह फोटो आप मुझे दोगे तो जरूर आऊगां.” पवन त्याच्या पत्नी आणि मुलासह त्यांच्या घरी गेला. त्यांच्या घरी भेटवस्तु नेल्या त्याच्या आईच्या पाया पडला. त्या कुटुंबाने पवनचे आदरतिथ्य केले. त्यांची भेट घेऊन जाताना त्याच्या मुलाने घरी असलेला त्या भैयाचा, अंकलचा तसाच फोटो त्याला दिला.

पवन नारायणगावला घरी पोचला तेव्हा त्याचा बाबा एका बाजेवर बसून बिडी पित होता. त्यांना पाहून तो उठला आणि पत्नीला म्हणाला,”अग लक्ष्मी कोण पावणी आल्यात बग की, नंदरला नीट न्ह्याय दिसत.” ती घरातून बाहेर आली तसा तो तिच्याकडे पहातच राहिला, ती अगदी कृश झाली होती. त्यांनी तिच्याकडे पहात “आये” अशी हाक मारतच तो तिच्या पायावर पडला. बाहेरून बाप कापऱ्या आवाजात विचारत होता, “कोण हाय? माझा ल्योक पवन की काय? पवन, लेका इतकं बापावर रागावलास होय. नशीब माझं,आमचे डोळे मिटायच्या आत यायाची बुद्धी तुला खंडोबान दिली.”

आई म्हणाली, “तू निघून गेला आणि तुझा बा सा महिने हातरुणात होता, कायम तुझी आठवण काढून रडायचा, भिताडावर हात आपटून म्हणायचा याच हातानी पोटच्या पोराला मारलय. त्याच्या मनाला लय लागल. कुठ कुठ सोद घेतला पर काय बी उपेग न्हाई झाला. तवापासून त्याची जगण्यावरची आशाच गेली. अगदी पार थकला, तुझी भैण शांती लगीन कराय तयार होय ना, म्हणली भावड्या आल्याशिवाय लगीन न्हाय करणार. कशी बशी तयार झाली. लग्नात तुझी आठवण काढून रडत होती. शांती तिच्या घरला गेली नी तुझा बा पार भेलकाडला, कसा बसा त्याला जगीवला. अन एक तू हायेस आई बाप जीते हायेत का मेले बघाय बी न्हाय आलास.” तीने डोळ्याला पदर लावला.

त्याने आईचे हात हाती घेऊन स्वतः च्या गालावर दोन तीन चापट्या मारून घेतल्या, “चुकलो म्हणतो ना,पण बा ने मारल्यावर माझा संताप झाला होता. आता आलोय ना! उद्या शांतीच्या घरी भेटून येतो तिची समजूत घालून घरी घेऊन येतो. तिचा राग निवळला, आईने सुनेला शेजारी बसवून घेतले. नातवाचे कौतुक केले.

हे सगळं ऐकून त्याचा राग पार निवळला त्याला बापाची दया आली, मनोमन त्याने बापाला माफ केलं. त्यांनीच ओटीवर पलंगावर बसलेल्या बापाला मिठी मारली. आणि काय घडतं कळायच्या आत बाप त्याच्या मिठीतुन कोसळला तो कायमचाच. जणू त्याच्या भेटीसाठी जीव लावून बसला होता. शांती आली.दोघा बहीण भावाची भेट झाली. बहीण रागाने बोलली “असा भाऊ असतंया होय, बारा बारा वर्ष आपल्या भणीची खुशाली न्हाय की आयची दाद फिर्याद नाय इतकं बी रागावू नये. आलास तो बा जाताना.” तो काही बोलला नाही. दोघ एकमेकांच्या कुशीत शिरून मनसोक्त रडली. त्यानी बापाच क्रीयाकर्म केलं.आता मोठा प्रश्न होता, आईला इकड एकटी ठेऊन कस जायचं? तो म्हणाला, “आई तू मुंबईला चल, इथ एकटी राहू नको, नातवा बरोबर तुझा वेळ बरा जाईल. सुनेन आग्रह धरला, “आई तुम्ही मुंबयला चला मी तुमची शांती ताई सारखी सेवा करेन. तिथ देवाच मंदिर आहे, कंटाळा आला तर भजन ऐकायला जा.” ती म्हणाली, “सुनबाई तू बिनघोर जा, या घराची मला सवय झालीया, यानला सोडून आज पतूर एकली माहेरलाबी कंदी न्हाय गेली अन आता त्यांच्या शिवाय, या घरात त्यांची कुड माझ्या सोबतीला हाय, त्यानला एकट टाकून मी ममयला नाय यायची तू जा.”

पवन ने आईला खुप समजावले पण व्यर्थ वडीलांचे क्रिया कर्म उरकून तो जायला निघाला तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. वडीलांची भेट झाली ती अशी, ना ते काही सांगू शकले ना तो मनाची खंत त्यांच्या समोर व्यक्त करू शकला. गेले पंधरा दिवस दुकान नोकरांवर सोपवून तो आला होता. शेजारी जाऊन त्यांनी आईच्या सोबतीला जाण्याची तिची विचारपूस करण्याची चुलत्याला विनंती केली. त्याने रान चुलत्याच्या स्वाधीन केल आणि म्हणाला, “अण्णा आमच वावर तुमच्या ताब्यात देतो,काय निघेल त्यातन खर्च जाता आईला जमेल तो वाटा द्या.” त्याने त्यांच्या हातावर पाचशेच्या चार नोटा ठेवल्या तसे अण्णा मिशीत हसले.

“पवन्या तू आयची काय बी काळजी करू नको, आमी काय तिला वाऱ्यावर सोडणार हाईत का? आमची बी ती कोणीतरी लागतीच की, जा लेका पर घरदार इसरू नग. आपली काळी कोण इसरत वय, तुझ्या पोराला कळाय नग आपल घर दार हाये, वावर हाये.” होय अण्णा, महीन्या दोन महीन्यान खेप टाकीन मी, पण तुमी आईची तेवढी काळजी घ्या, तिला एकटी ठेवताना जीव तुटतोय म्हणून सांगतो.” “पोरा, ते माझ्याकडं लागलं की आता, तू बिनघोर जा.”

आईची योग्य तजवीज लावून तो मुंबईत परतला तेव्हा दुकानात त्यांनी बापाच्या तसबीरी शेजारी भय्या अंकलची तसबीर लावली, हार घातला. बापाने शिस्तीसाठी बदडले होते तर दुसऱ्याने मायेचा ओलावा दाखवत आसरा दिला होता. नियतीचा न्याय अजब होता. वडीलकीच्या नात्याने बोलणारे, समजूत घालणारे आज कोणीही नव्हते.आज पुन्हा एकदा तो एकाकी झाला पोरका झाला.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “पवन

  1. अब्दुल रहीम हुदेवाले
    अब्दुल रहीम हुदेवाले says:

    “पवन” खूपच सुंदर लेख. सर, एवढं चांगल लेखन ,जे वाचायला खूपच सुंदर अनुभव आला. 👌👌👌

Comments are closed.