पाझर

पाझर

संगीता एक साधारण कुटुंबातील मुलगी, तिच्यासह चार भावंड असल्याने हौस, मौज तिला माहितच नव्हती. बी.ए. पर्यंत कसंबसं शिक्षण झालं होतं. कोणीतरी सूचवलं आणि तीच लग्न शेखर नवरेशी भटा ब्राह्मणांसमोर झालं, नवरा मुलगा सरकारी नोकरीत कामाला हे ऐकूनच ती खूश होती. तसा दिसायला तो खूप smart नसला तरी बरा होता. मुख्य म्हणजे त्यांना माहिती मिळाली त्या नुसार निर्व्यसनी होता. पेन्शन मिळणारी नोकरी होती अजून जास्त अपेक्षा करण्यात अर्थच नव्हता कारण तिलाही नोकरी नव्हती की लग्न थाटात करून द्यायला वडिलांकडे पैसेही नव्हते.

कॉलेजला असतांना तिने संसाराची किती स्वप्न रंगवली होती. टुमदार घर असावं, फोर व्हिलर नाही पण मोटर बाईक असावी. तो हौशी असावा पण स्वप्नातला राज कुमार स्वप्नातच राहिला. गरीबाने अवास्तव स्वप्न पाहूच नये हे तिला त्या वयात कळलंच नाही. तिचा होणारा नवरा शेखर एका सरकारी कंपनीत कुशल कारागीर होता. पण कायम स्वरूपी नोकरी होती. पालघरला वडिलोपार्जित घर होते. तिच्या साठी हीच बाब जमेची होती. तिच्या वडिलांनी यासाठी हे स्थळ नक्की केलं. लग्नानंतर नव दांपत्य फिरायला जातात पण असे उगाचच पैसे खर्च करण्याचा शेखरचा स्वभाव नव्हता, त्याने तिची समजूत घातली जर राजा राणीचा संसार मांडायचा असेल तर. काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागतील. हिंडा फिरायला खूप वर्षे आहेत पण आत्ताच ते शक्य नाही. ती समजुतदार होती, तिने काहीच तक्रार केली नाही.

वर्ष झालं तरी शेखरचा मुंबईत घराचा शोध सुरु होता. कुठे जागा लांब होती तर कुठे किंमत अवाक्या बाहेर होती. शेवटी एकदाची जागा मिळाली, स्टेशन पासून दूरच होती पण काही पर्याय नव्हता. बिल्डिंग रस्त्याच्या जवळ होती आणि ब्लॉक पहिल्या माळ्यावर होता. ब्लॉक कसला अवघ्या दोन खोल्या आणि टॉयलेट, बाथरूम पण त्यालाही अडीच लाख मोजले होते. मित्रांकडून त्याने ऐकले होते, लग्नात आलेली मंडळी जेवून मंडपातून बाहेर पडली की सारे विसरून जातात.ज्याला स्वतःचे भविष्य घडवायचे असेल त्यांनी उथळ वागून पैसे खर्च करू नये. शेखरने योग्य निर्णय घेतला आणि हा दोन खोल्यांचा ब्लॉक विकत घेतला. अण्णांनी थोडी मदत केली, थोडे कर्ज घेतले ज्याचे हप्ते पगारातून जात होते. काटकसरीत राजा राणीचा संसार सुरू झाला. मौज मजा करता येत नव्हती पण मुंबईत स्वतःच घर झालं हे ही कमी नव्हतं.





त्यांच्या संसारात पाहुणा येणार असल्याची चाहूल तिला लागली. तिला मळमळ सुरू झाली तेव्हा त्या दोघांशीवाय कुणीही नव्हते आणि काय करावे ते त्याला सूचेना. कसंबसं लिंबू सरबत करून त्याने तिला दिले. जेव्हा ती थोडी सावरली तेव्हा ती त्याच्या धांदरटपणाला हसली, त्याला कळेना आत्ता हिला उलटी होत होती आणि आता उगाच का हसत आहे? वेड बीड लागलं की काय? त्याने तिच्याकडे थोड रागानेच पाहिले तस ती हसत म्हणाली. “अहो, रागवायला काय झाल तुम्हाला? एक तर चूक करता आणि माझ्यावरच कसे रागावता!” त्याला कळेना चूकले काय? त्याने बनवलेले सरबत घेतले तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आले. बनवलेल्या लिंबू सरबतात साखरेचा पत्ताच नव्हता. “सॉरी संगीता, साखर टाकायची राहून गेली.” ती त्याला पुन्हा हसली, “अहो मिस्टर, तुम्ही बाबा होणार आहात. काय गिफ्ट देणार आहात मला? ” अस ती म्हणाली मात्र, त्याने तिला उचलून घेतलं आणि वेड्यासारखा नाचला. जणू हर्षवायू झाला असावा. “अहो,अस काय करता मला चक्कर येईल की.” तेव्हा कुठे त्याने तिला अलगद खाली ठेवले.ती रागावली, “काय म्हणावं तुमच्या धांदरटपणाला? अगदीच खुळ्याचा बाजार.”

तिच्या गरोदरपणात आईला बोलावण्याच त्यांनी मनी ठरवलं. कधी रविवार येतो आणि ही बातमी आईला सांगतो असे त्याला झाले. रविवारी तो घरी गेला आणि ती गोड बातमी आईला सांगितली तेव्हा तिलाही आपण आजी होणार याचा कोण आनंद झाला! तिने सुनेचं बाळंतपण आपल्या घरी करू अस आग्रहाने सांगितले. तशीही सुनेच्या माहेरची सांपत्तिक स्थिती यथातथाच होती आणि या घरानेही गेल्या पंचवीस वर्षात बाळंतपण पाहिले नव्हते.

प्रवासाची दगदग नको म्हणूनच त्यांनी संगीताला सोबत आणले नव्हते. सुरवातीचे तीन महिने जास्त रिस्क असते तेव्हा प्रवास टाळा अस डॉक्टर बाईंचं म्हणणं होतं. जेवण खाण उरकून तो निघाला. जाताना आई वडिलांच्या पाया पडला, “नाना, तुम्ही दोन चार दिवस माझ्याकडे राहायला चला, तेवढाच संगीताचा वेळ बरा जाईल आणि तुमची हवा पालट होईल.” नाना हसले, “आता हवा पालट करून काय करणार? शिवाय माझ्यामुळे सुनेची धावपळ नको, माझं वेळेत जेवण खाण उरकण तुझी आई करते, दुसरं कुणाला जमायचं नाही.”





ते ऐकून त्या हसल्या, “पाहिलस ना शेखर, तुझ्या नानांनी, बायको नाही, हक्काची कामवाली आणून ठेवली आहे. त्यांची खात्री आहे त्यांचं हे वेळेचं नाटक कुणीही पूर्ण करू शकणार नाही. म्हणून ते गेल्या अठ्ठावीस वर्षात चार दिवस कोणाकडे कधी पाहुणे म्हणून गेले नाही, का हो खर सांगते ना मी? निदान कबूल तरी करा.” नाना हसले, “अग किती कौतुक करून घेशील स्वतःच, तू नव्हतीस तेव्हा ही मी जेवत होतो बरं. स्वयंपाक उत्तम येतो मला, तुला खात्री करायची असली तर तूच जा सुनेकडे, चार आठ दिवस राहून हवा पालट करून ये.” शेखर हसला, “अण्णा,खरंच नेऊ मी आईला, संगीताला किती आनंद होईलआईला पाहून.”

अण्णा त्याच्याकडे पाहून म्हणाले, “शहाणाच आहेस, असं अचानक उठून आई येईल का? पुन्हा आलास की जा घेऊन आणि हो वेळेत निघ नाहीतर गाडी स्टेशनवर आणि तू रस्त्यात. सुनबाई एकटी आहे घरी.” तो आईकडे पहात हसला, “पाहिलेस आई, ना अण्णा कुठे जाणार ना तुला जाऊ देणार, मी निघतो. बरं, पुढच्या वेळेस मात्र नक्की हा, तू आलीस तर तिलाही थोडा आराम मिळेल.”

त्या हसल्या, लग्न झालं की विचार कसे सहज बदलतात. मुलाला बायकोच्या तब्येतीची जास्त काळजी वाटते. तिला आराम मिळावा म्हणून मी त्याच्या खोलीवर यावं अस वाटते आहे. अशी आईची काळजी कधी केली नाहीस रे सोन्या, अस त्यांच्या मनी आलं, पण त्या बोलल्या नाहीत. त्याला आवडते म्हणून वांगे, शेवग्याच्या शेंगा, बटाटे याची भाजी त्यांनी डब्यात घालून दिली. तो निरोप घेऊन निघाला. “अण्णा येतो मी, काळजी घ्या.” तो दूर जाईपर्यंत आई हात हलवून निरोप घेत होती.





रस्त्याला लागताच त्याच मन संगीताचा विचार करू लागल, घरी ती एकटीच होती. या काळात, अचानक मळमळणे, उलटी होणे, चक्कर येणे, असं काहीही होत हे त्याने ऐकले होते. परिस्तिथीमुळे फोन घेणं जमलं नव्हतं पण लवकरच काही तरी अँडजस्टमेन्ट करून फोन घ्यावा लागेल तर तिची खुशाली कळेल अस त्याच्या मनी आलं. तो वसईला घरी पोचला तेव्हा सात वाजून गेले होते. फ्रेश होत त्यांने आईने दिलेला भाजीचा डबा काढून ठेवला आणि तिला चहा टाकायला सांगून तो दिवाबत्ती करायला गेला. संगीता,आई काय म्हणाल्या? नाना काय म्हणाले ऐकायला उत्सुक होती.
दिवाबत्ती उरकताच तिने त्याला चहा दिला आणि तो काय म्हणतो, ते ऐकायला ती त्याच्या बाजूस बसली. “अहो आता चहाच प्याल की आई अण्णा काय म्हणाले ते सांगाल!” तो हसला, तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, “आई म्हणते सुनेचं बाळंतपण इथेच करू, काय म्हणतेस तुला चालेल ना?” “आणि अण्णा! ते काय म्हणाले?” तिने निरागसपणे विचारले. तो हसला “अण्णाना मी म्हणालो, चार दिवस हवा पालट करायला चला, तर म्हणतात कसे, “मला नाही जमणार,उगाच सुनेला त्रास नको, माझं वेळेवर जेवण खाण तिला नाही जमणार.” , आमच्या अण्णांना स्वतः शिवाय काही दिसत नाही. ना आपण कुठे जाणार ना आईला जाऊ देणार.” “अहो मग आईंना आणायचं होत की चार दिवस,तेवढीच मला सोबत झाली असती, गप्पाटप्पा मारल्या असत्या,तुम्ही येईपर्यंत वेळ कसा घालवू, अस मोठं पोट घेऊन बाहेर फिरायला जायला लाज वाटते.” “अगं, डॉक्टर मॅडम म्हणाल्याच आहेत रोज दोन तीन किलोमीटर फिरून या म्हणून, पोट मोठं दिसत तर गाऊन घाल,साडी नेसू नको.”

ती हसली,अहो अगदीच हे कसे तुम्ही,साडी असो नाहीतर गाऊन पोट लपेल का?” त्याने बाहेर कुणी नाही ना याची खात्री करून तिच्या पोटावरुन हळूच हात फिरवला,ती लाजली, “अहो काय दिवस रात्र आहे की नाही आणि हो आता सारे उद्योग बंद, कळतंय ना?” त्याने तिला जवळ ओढली तस ती त्याला लोटत हसली. “हेच ते, बाबा होणार आहात, बाळ हसेल हो तुम्हाला, जरा शांत बसा.” तो हसला.

दिवस अगदी फुल पाखरा सारखे जात होते. पोटाचा घेर वाढत होता आणि मुलगा की मुलगी या वरून रोज वाद झडत होते. संगीताची आई दर आठवड्यात येऊन जात होती. येतांना मुलींसाठी काहींना काही आणत होती. कधी कधी तिला स्वयंपाक करण्याचा कंटाळा येई कधी फोडणीचा वास नको वाटे, मग तो डाळ आणि तांदूळ याची खिचडी लावून खिचडीवर वर तूप आणि चवीला लोणचं अस तिला देत होता. एवढं करताना त्याचा गोंधळ उडत होता.कधी मिठच नाही तर कधी जास्त अस असूनही ती विना तक्रार खात होती. डॉक्टर मॅडमनी तिला फळ खा असा सल्लाही दिला होता. तो जमेल ती फळ आणून खाऊ घालत होता. त्याच्या परिस्थितीच्या मनाने तो खूप काही करत होता.





संगीता दर महिन्यात लेडी Gynac Doctor जवळ शेखर सह जाऊन तपासून येत होती. बाळाची वाढ योग्य होत होती. दोघे खुशीत होती. तीन महीने झाले की डॉक्टर सोनोग्राफी करणार होते. दोघही बाळ “तो” आहे की “ती” जाणून घ्यायला ऊत्सुक होती.

स्वप्नरंजनात दिवस भराभर जात होते, कामावरून घरी कधी येतो असे त्याला होत असे. आणि एक दिवस तो कामावरून येत असता त्याला चक्कर आली. कधी नव्हे तो, रिक्षा करून कसा बसा घरी आला. तिला काही न सांगता तो चहा घेऊन आणि दिवाबत्ती करून पलंगावर पडून राहिला. त्याला गप्प गप्प पाहून ती घाबरली, “अहो! पडून का राहिलाय, तुम्हाला काही होतंय का? असे गप्प,गप्प का? बरं वाटत नाही का तुम्हाला? डॉक्टरकडे जायचे का?”
ती घाबरू नये म्हणून तो आवाज स्थिर ठेवत म्हणाला, “काही नाही ग,तू कशाला काळजी करते? काही विशेष नाही, जरा चक्कर आल्या सारखी वाटते, कदाचित ऍसिडिटी झाली असेल? थोडी झोप घेतली की बर वाटेल.” जेवण उरकलं तस तो नेहमीपेक्षा लवकर झोपायला गेला. संगीताने त्याच्या डोक्यावर तेल चोळून दिले. रात्री पुन्हा त्याला चक्कर आली. तो घाबरला, “संगीता मला कसं तरी होतंय, सगळं गर गर फिरतंय, मला पाणी दे.”

तिने लिंबू सरबत करून ते त्याला प्यायला लावले. त्याच्या अंगाला घाम फुटला होता. तिने तो पुसून दिला. “अहो शेजारच्या काकूंना बोलावू का?” तो थोड्या वेळाने सावरला, “संगीता, अग, एवढ्या रात्री कुणाला त्रास द्यायचा म्हणजे. तू झोप. उद्या मी आपल्या फॅमिली डॉक्टर देशपांडे यांची अँपॉइंटमेंट घेतो..”

दुसऱ्या दिवशी तो देशपांडे डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी, काय होतंय? कधीपासून अस व्हायला लागलं? झोप नीट होते का? तुमचं काम उन्हात किंवा आगीकडे असते का? या पूर्वी असं व्हायचे का? असे नाना प्रश्न विचारले. हात पाहिले, जीभ पाहिली, नाडी पाहिली, रक्तदाब मोजला. त्यांना कसला संशय आला त्यांनाच ठाऊक पण, त्यांनी विचारलं, “या पूर्वी कधी तुम्हाला चक्कर आली किंवा काही औषधे घेतली होती का, नीट आठवा ?” त्यांनी पुन्हा विचारले. एका पेपरवर त्यांनी काही लिहिले आणि Mehata Dignostic centre मधून टेस्ट करायला सांगितल्या तेव्हाच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्यांनी काही औषधे लिहून दिली, “ह्या गोळ्या घ्या, तुमची चक्कर थांबेल आणि संध्याकाळी तुमच्या मिसेसला आणू नका कोणी दुसरे परिचयाचे असेल त्यांना आणा उगाच फार वेळ त्यांना बसून रहायला नको.” जेव्हा ते असं म्हणाले, तेव्हा त्याचे गांभीर्य त्याच्या लक्षात आले. घरी जाता जाता त्यांनी बाहेरच्या बुथवरून मित्राला फोन केला. संध्याकाळी वेळ काढून येण्याची विनंती केली.





संध्याकाळी त्यांनी मेडिकल रिपोर्ट घेतले आणि तो वसंत म्हात्रे सोबत डॉक्टरकडे गेला. तो आल्याचे पाहून त्यांनी रिपोर्ट मागवून घेतले. रिपोर्टवर नजर फिरवताच, डॉक्टरनी शेखरच्या मित्राला बोलवून घेतलं, रिपोर्ट मित्राला दाखवत ते म्हणाले, अस रेअर घडतं, पण यांच्या बाबतीत हे घडलं , अस पहा की तुमच्या मित्राला आतड्याचा कॅन्सर झाला असण्याची दाट शक्यता आहे, अर्थात मला तस वाटतंय.” त्यांचं बोलण ऐकून मित्र हादरला, शेखरला हे सांगण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. “डॉक्टर मी हे मित्राला कस सांगू? तो कोलमडून पडेल.”

डॉक्टर म्हणाले, त्यांना खर काय ते सांगावच लागेल. त्यांच्या मनाची तयारी करावी लागेल. त्या शिवाय उपचार कसे करणार? मी एक निष्णात डॉक्टरची appointment घेऊन देतो, ते म्हणतील त्या प्रमाणे करा.” म्हात्रेसमोर त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याशिवाय अन्य उपाय नव्हता. डॉक्टरनी त्यांना त्यांच्या परिचयाच्या गोखले डॉक्टरांची चिट्ठी दिली, त्यांना फोन करून त्यांचा संशय व्यक्त केला. डॉक्टर म्हणाले, “हे पहा तुम्ही त्यांना आजाराविषयी सांगतांना थोडी काळजी घ्या. नक्की काय झालं आहे ते या डॉक्टरनी तपासलं की सांगता येईल. घाबरण्या सारखं काही नाही थोडी काळजी घेतली पाहिजे. बहुदा यांना उशिराने लक्षात आलं असा माझा समज आहे, या तुम्ही. तुमचा मित्र बरा झाला की मला फी द्या. या तुम्ही.”

तो केबीन बाहेर पडला, शेखर त्याची वाट पहात होता. त्याने नजरेनेच त्याला विचारले, वसंतने हातानेच बाहेर निघण्याची खुण केली. जसे ते बाहेर पडले शेखरने वाटेतच मित्राचा हात धरुन त्याला थांबवले. “वसंता आधी मला सांग डॉक्टर काय म्हणाले? माझ्या विषयी काहीही असेल तरी ऐकायची माझी तयारी आहे,प्लीज.” वसंताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, “शेखर तस घाबरण्या सारख काही नाही, आपण अर्धा कप चहा घेऊ तिथच मी तुला सांगतो.” ते हॉटेलमध्ये पोचले, वसंताने एक स्पेशल चहाची ऑर्डर दिली. स्वतः पाणी प्यायले आणि शेखरच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “आधी हा चहा घे,थोडा फ्रेश हो, डॉक्टरांनी काही टेस्ट गोखले डॉक्टर यांच्याकडे करायला सांगितल्या आहेत,त्यांना बहुदा संशय आहे,” वसंताचे बोलणे पूर्ण होण्या आत शेखरने चहाचा कप खाली ठेवला, “वसंता, मला कॅन्सर तर झाला नाही ना? डॉक्टर माझ्याशी स्पष्ट बोलत नाही त्या मुळे मला संशय येतोय, खर सांग मित्रा.”





शेखरने त्याचा हात घट्ट धरला,”हो मित्रा तुझा तर्क खरा आहे. डॉक्टरांना तसा संशय आहे. गोखले पुन्हा एकदा खात्री करतील आणि Treatment , Medicine ठरवतील. डॉक्टर म्हणाले घाबरण्याचे कारण नाही Treatment वेळीच घेतली तर तू पूर्ण बरा होशील.
आपण उद्या डॉक्टर गोखले यांच्याकडे जाऊ.” “वसंता,तू आज माझ्या बरोबर आलास, उद्या पुन्हा तुला रजा घ्यायला नको, मी माझ्या भावाला बोलावतो, तो ही बरोबर असलेला चांगला नाही तर म्हणेल एवढं गंभीर असूनही आम्हाला का सांगितलं नाही. तू आज आलास तेच फार झाले. मित्रा please कोणाला काही सांगू नको हां.” “म्हणजे, तू वहिनींना हे सांगणार नाहीस की काय? ” वसंताने विचारले.
“अरे, तिला हे कळलं तर ती बिचारी साफ कोलमडून पडेल, तिच्या पोटात माझं बाळ आहे. नको नको, सध्या तरी तिला सांगण योग्य नव्हे.” शेखर वसंताकडे केविलवाणा पहात म्हणाला.

त्यांचं बोलण वेटर ऐकत असावा अस वाटल्याने वसंता तिथून उठला त्याने शेखरचा हात धरला आणि तो पैसे देऊन वाटेला लागला. वसंताने शेखरला घरी आणून सोडले, संगीता त्याला शपथ घालून म्हणाली, “भावोजी,आधी मला सांगा, ह्यांना काय झाले आहे? डॉक्टरनी तुम्हाला का बोलवून घेतलं? असा कोणता आजार आहे की ते मला सांगू शकत नव्हते!” “वहिनी,अद्यप डॉक्टरांची खात्री झालेली नाही, उद्या डॉक्टर गोखले यांनी तपासले की काय ते कळेल तेव्हा अर्धवट माहितीवर मी तुम्हाला काय सांगू.”
ती शेखरकडे पहात म्हणाली,”तुम्हाला बाळाची शपथ आहे मला नाही का सांगणार!” तो तिचा हात घट्ट धरत म्हणाला, “संगीता, डॉक्टर म्हणतात मला कॅन्सर झाला आहे.मी बरा होईन ना की—–” तिने त्याला जवळ घेतले,”अहो पुरुषा सारखे पुरुष असून रडता, तुम्हाला काही होणार नाही. माझी अंबा माझ्याशी अस वागणार नाही.” तिने उसन अवसान आणून नवऱ्याला धीर दिला.

शेखरने फोन करून भावाला तातडीने बोलवून घेतले आणि देशपांडे डॉक्टर यांचे पेपर्स त्याला दाखवले आणि गोखले यांचे हॉस्पिटल गाठले. त्याचे रिपोर्ट पाहून गोखलेंनी पुन्हा एकदा त्याला चक्कर आली तिथपासून संपूर्ण घटना ऐकली. “शेखर तुमच्या पोटात कुठं दुखतंय का? चक्कर येते तेव्हा नक्की काय होतं?” डॉक्टरांच्या प्रश्नामुळे त्याच्या लक्षात आले की त्याला चक्कर येते तेव्हा पोटातही ढवळून येते. डॉक्टर म्हणाले,आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल, त्या नंतरच निदान करता येईल अल्सरममुळे सुद्धा असं होऊ शकत. गोखलेचं हॉस्पिटल अद्यावत होतं. सोनोग्राफीचा रिपोर्ट संध्याकाळी मिळाला आणि त्यांचं अनुमान खरं झालं. महेंद्रने भावाला धीर दिला, डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो बाहेर पडला. सुदैवाने कंपनीच MediClaim असल्याने त्याचा उपचार टाटा हॉस्पिटलमध्ये सुरू झाला, घरावर दुःखाच सावट पडलं.

संगीताचे दिवस भरत होते आणि दुसरीकडे शेखरचा आजार बळावत होता. वर्षभर उपचार सुरू होते, आधी सहा महिने कंपनीने पूर्ण वेतन पाठवलं. त्या नंतर दर महिन्याला अर्धा पगार मिळू लागला. त्याची औषधे आणि घरखर्च भागवता तिची ओढाताण होत होती. यातच तिची डीलिव्हरी जवळ आली. घरी शक्य नव्हते म्हणून जवळच्या नर्सिंग होममध्ये तिचे बाळंपण उरकले. तिच्या माहेरून आर्थिक मदत होणे शक्य नव्हते. या बद्दल माहेरच्या माणसांच्या नावे सासूने बोटे मोडली. तिला कन्या झाली या बद्दल मात्र सासू काही बोलली नाही हेच तिच भाग्य. मुलगी गोरीपान होती, डोक्यावर भरगच्च केस होते. नाकी-डोळी छान होती. तरीही आजी स्वतःहून नातीला उचलून घ्यायला पहात नव्हती. शेखरची आई तिच्या मदतीला सहा महिन्यांपूर्वी येऊन राहिली होती, ती अधून मधून संगीताला टोमणे मारून हिच्याशी लग्न केलं आणि माझ्या मुलाचं वाटोळं झालं असं बोलू लागली. संगीता संयमाने उत्तर देणे टाळत होती. शेखर मुलीला पाहून हसत होता, उठून बसून मुलीला घ्यायला पहात होता ती लबाड अवघी महिन्याची असूनही त्याला हुंकार भरत होती. आवाजाच्या दिशेने नजर फिरवून पहात होती.





तिच्या जन्माला एक महिना होऊन गेला बारस लांबवण शक्य नव्हते म्हणून शेखर आजरी असूनही तिचं बारसं करून घ्यायचं ठरवलं. अण्णा, जाव आणि दिर बारश्याला आले. तिच्या माहेरची मंडळी आली आणि अगदी साधेपणाने घरीच तीच बारस केले. अण्णांनी तिचं नाव नम्रता अस ठेवलं. तिला कमरेची साखळी आणि पैंजण घातल्या. शेखर उठून बसला.तिला मांडीवर द्या म्हणून आग्रह करत होता. पण त्याचा आजार गंभीर असल्याने आईने नातीला दुरूनच त्याला दाखवले. त्याला खूप वाईट वाटले समोर मुलगी दिसत असूनही तो तिला जवळ घेऊ शकत नव्हता.संध्याकाळी त्याची विचारपूस करून सर्व जायला निघाले. अण्णांनी त्याचा हात हातात घेतला, “बाबा,लवकर बरा हो, तुला मी अस पाहू शकत नाही, एवढ्या तरूण वयात तुला हे अस का व्हाव? देव केवढा निष्ठुर आहे मी एवढा वयस्कर झालो तरी ठणठणीत आहे आणि तुलाच हे आजारपण का याव?” अण्णा रडू लागले ते पाहून त्याला हुंदका फुटला. संध्याकाळी घर पून्हा खाली झाल. आई तेवढी त्यांच्या सोबत थांबली.

त्याचा आजार बरा व्हावा म्हणून धुपारे झाले, अंगारे झाले. देवीला ओटी भरण झालं पण एक दिवस रात्री झोपेतच त्याचे प्राण गेले. शेखरच्या आईने नातीला दोष लावला. महेंद्र आईला रागावून म्हणाला तिचा काय दोष? तिला काही बोलू नको. कंपनी मधले मित्र आणि साहेब लोक भेटून गेले. तिला नोकरी देण्याचं आश्वासन मोठ्या साहेबांनी दिल. सासू तेरा दिवसाचे सोपस्कार उरकून निघून गेली.जाताना नात वाईट पायगुणाची, माझा मुलगा मारला असा ठपका ठेवून गेली. कंपनीतील साहेबांनी कामगारांना आवाहन केलं आणि लोकांनी वर्गणी काढून आर्थिक मदत केली. तिचे कंपनीतून मिळणारे क्लेम फॉर्म भरून घेतले. महेंद्रने वहिनीची पाठराखण करत तिला हक्काचे सर्व पैसे मिळवून दिले.

हा दिवस पहावा लागेल असे कधीच तिला वाटलं नव्हतं. तिच्या नवऱ्याला जाऊन पुरता महिनाही झाला नव्हता. पण आता हातावर हात बांधून गप्प राहणे शक्य नव्हते. तिच्या सोबत अवघ्या सात महिन्याच्या मुलीचे भविष्य अंधारमय झाले होते. सोपस्कार म्हणून तिला घरी घेऊन जायला सासू येऊन गेली पण नवरा वारल्यावर पदरी लहान मूल असूनही तिला सोबत करायला कोणी थांबले नव्हते नाही म्हणायला तिची आई आपल्या मुलीचे हाल पाहू शकत नव्हती म्हणून दर दोन दिवसांनी तिच्या मदतीला येत होती. सासू आपल्या मदतीला थांबली नाही याचा राग तिच्या मनात कायम होता. तिच्या नवऱ्याच्या उपचारासाठी दिराने पैसे खर्च केले होते याची जाणीव तिला होती पण आज तिला ती आणि तीच बाळ यांच्या भविष्याची चिंता होती.

तिच्या भावांनी तिला माहेरी येण्या विषयी विनंती केली पण त्यांची परिस्थिती तिला माहीत होती. ती तिचे दोन खोल्यांचे घर सोडून यायला तयार नव्हती. या ही परिस्थितीत दिराने तिला अनुकंपा म्हणून नोकरी मिळावी या साठी कंबर कसली आणि तिला नोकरी मिळण्याची अंधुक आशा निर्माण झाली.तिचा नवरा सरकारी कंपनीत कायमस्वरूपी कामगार असल्याने त्याचा Group Insurance होता त्यामुळे Death claim चा त्याचा अर्ज मार्गी लागला, मृत्यू नंतर काही निर्वाह निधी मिळाला असे पैसे तिच्या खाती जमा झाले. सासूचे म्हणणे मी त्याला वाढवला जसा तुझा त्याच्यावर हक्क आहे तसा आई म्हणून त्या पैशावर माझाही हक्क आहे. मात्र विमा कंपनी आणि तो काम करीत असलेली कंपनी यांनी तिला अवघी सहा महिन्याची लहान मुली आहे ही बाब लक्षात घेऊन आणि सासूला उत्पन्नाचे साधन असल्याने हिस्सा नाकारला. या गोष्टीने सासू रागावली. तिने सुनेशी नात संपवून टाकलं.

वास्तवता महेंद्रने आईची समजूत काढून असा आग्रह धरणे योग्य नाही असे बजावणे योग्य ठरले असते परंतु आईला दुखावले तर आई काय म्हणेल या भीतीपोटी त्याने आईला विरोध केला नाही आणि आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला सहानुभूतीने पाहिले नाही. ज्याच्या मागे कुणी नसतं त्याच्या पाठी देव असतो अस म्हणतात. एक दिवस कंपनी प्रतिनिधी घरी आला त्याने पत्र दिले. अनुकंपा म्हणून कंपनीने तिला सेवेत घ्यायचे ठरवले. मुलगी वर्षाची झाली की तिने जॉईन व्हावं अशी सुटही दिली होती .आता तिला खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती. अवघ्या सहा महिन्यांच्या मुलीला कोणाकडे ठेवणार हा मोठा प्रश्न होता.

तीच दुर्दैव पुन्हा आड आलं. तिचे सासरे, शेखरचे वडील अचानक अटॅक येऊन वारले. तिला निरोप मिळताच ती लहान मुलीसह घरी आली. त्या घरची मोठी सून असूनही आधी तिच्याकडे कोणी लक्ष दिलेच नाही पण ती जिद्दीने थांबली आणि जावे बरोबर, घरच्या कामात मदत करू लागली. दोन दिवस कामाशिवाय तिच्याशी कोणी फारसे बोलेना. एक दिवस ती सकाळी कपडे धूत होती आणि मुलगी घरात दुपट्ट्यावर लोळत होती, ती रांगत रांगत जिथे शेखरची आई बसली होती तिथे पोचली आणि तिने उचलून घ्यावं म्हणून रडू लागली, संगिताला तिच्या रडण्याचा आवाज येत होता पण तीने निर्धाराने नम्रताच्या रडण्याकडे दुर्लक्ष केले, आज ती सासूच्या मातृत्वाची परीक्षा घेणार होती. बराच वेळ रडल्यावर ती अचानक रडण्याची थांबली तरीही ती नम्रताला पहायला घरात गेली नाही.तिच कपडे धुण्याच काम संपल आणि ती घरात आली, आजी नातीला छातीवर धरून थोपटत होत्या आणि
माझी ती नमू गुणाची,बाहूली देईन मेणाची
बाहूलीला शीवू झबले,नमूचे रडू थांबूदे
नमूचा बाबा आकाशी,नमू माझ्या अंगाशी
नमूची आजी एकटी,राहील नमू सोबती
अस गाण गुणगुणत होत्या आणि त्यांच्या डोळ्याला धार लागली होती. संगीता घरात आली, पहाते तर नमू हुंकार भरून आजीच्या डबडबल्या डोळ्यावरून आपले इवलेसे हात फिरवत होती. ती सासूकडे पहात हात पूढे करत म्हणाली, “आई द्या तिला इकडे तुम्हाला सतावल ना गाढवीने, अगदी काही म्हणून करु देत नाही,अस्स अगदी रडत बसते.”

सासू तिला रागावली, “संगीता, तिला नाही हो गाढवी वगेरे म्हणायच माझी नात आहे ती, माझ्या मुलाची ठेव आहे ती. आज पासून ती इथेच राहाणार कुठ्ठे कुठ्ठे म्हणून जाणार नाही. हो ना बाळे, राहशील ना माझ्या सोबत,हो ना,बाळा आता तुझे आजोबा सुद्धा नाहीत हो माझ्या सोबतीला.” तो इवलासा जीव आजीच्या बोलण्याला हू ,हू करत साथ देत होता, आजीच्या ह्दयास नम्रताने पाझर फोडला होता. संगीता, आजीमध्ये झालेला बदल पहात होती आजीच्या मायेला वात्सल्याचा पान्हा फुटला होता. संगीता सासूच्या बाजूला बसून धाय मोकलून रडत होती. तो एवढासा जीव आई आणि आजी का रडतात म्हणून टकमका पहात होता.
सासूने सूनेला जवळ घेतले आणि मिठी मारत म्हणाल्या “तुझ दुःख मी समजून घेतल नाही म्हणून मला मेलीला शिक्षा झाली. संगीता मला माफ कर मी चूकले.” संगीता त्यांचे पाय धरत म्हणाली, “नाही हो आई,नाही, अस म्हणू नका, देवच माझी परीक्षा घेतो त्याला काय करु आधी हे गेले आणि आता अण्णाही.” दोघी अश्रूनी न्हाऊन निघाल्या. नम्रताला संगीताने जवळ घेतले आणि म्हणाली “नमे आजीला म्हणाव आम्ही कुठ्ठे कुठ्ठे जाणार नाही बरं”

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar