प्रवास

प्रवास

ती माझी कोकणात जायची पाहिली वेळ होती. तेव्हा कोकण रेल्वे सुरू झाली नव्हती, आणि रात राणीने म्हणजे आताच्या लाल परीने जाणेही सोप्पे नव्हते, कारण एस टी रिझर्व्हेशन करण्यासाठी दोन दोन दिवस लाईन लावावी लागे. मला कसेबसे मागच्या सीटचे मालवण बसचे तिकीट मिळाले. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा होता. ठाणे बस स्थानकातून संध्याकाळी साडेचार वाजता निघाली. प्रत्येक प्रवाशाचे कोणी ना कोणी बस वर निरोप द्यायला आले होते. बस निघेपर्यंत, “नीट जा, पोचल्यावर पत्र पाठवा, बॅगवर लक्ष ठेवा, बस निघाली की आवळा सुपारी खा” अशा सूचना सुरू होत्या. बस निघाली आणि प्रत्येकानी निरोप घेतला.

माझ्या पुढच्या सीटवर एक जोडपे बसले होते. त्यांना पाच-सहा वर्षाचा मुलगा होता. बस निघाली, तिने कळव्याचा नाका ओलांडला नसावा इतक्यात त्या लहान मुलाला जोराने लघुशंका आली. ती बाई नवऱ्याला हलवुन म्हणाली “अहो बाबल्याक जोराची इलीहा, कंडाक्टराक दोन मिनीटा गाडी उभी करूंक सांगा.” तो धडपडत उठला आणि कंडक्टरकडे जाऊन म्हणाला, “भाऊनो वाईच गाडी थांबवा झिलाक जोराची लागलीहा”. कंडक्टर भडकला, गाडी आधीच लेट झाल्याय, अजुन उशिर करता का? बस स्टँडला लागली की घेवुन जा, जा जाग्यावर बसा”. तो येवुन बसणार तो पुन्हा बायको भडकली, “अहो,काय म्हणतत ते थांबवतत ना? झील गाडीत करीत मग बोलता नये, लहान हा तो, त्याका काय कळता?” बहुदा तीच वाक्य कंडक्टरने ऐकलं. त्याने थोडी मोकळी आणि निवांत जागा पाहून बस थांबवली, आणि ओरडून म्हणाला ज्याला मोकळं व्हायचं असेल त्यांनी जा गाडी दोन मिनिट थांबेल नंतर बस थांबणार नाही.” जवळ जवळ निम्मी गाडी खाली झाली. रस्त्यावर झुडपाच्या आडोशाने ज्याला मोकळं व्हायचं होते ते गेले बाकीचे पाय मोकळे करून आले.





कंडक्टरने जोरानी बेल वाजवली, ड्रायव्हरने इंजिन सुरू केले तसे सगळे पळत पळत गाडीत आले. माझ्या पुढच्या सीटवरचा प्रवासी आला नव्हता. कंडक्टर मोठ्याने ओरडला आपले शेजारी आले का पहा? बाई म्हणाल्या “ते यायचे आहेत”. कंडक्टर रागावत म्हणाला कुठे गेले? यायचं आहे की नाही त्यांना.एक दोन प्रवाशी बडबडले काय माणूस आहे आत्ता राहिला कुठे लोकांच्या वेळेची किंमत नाही,म्हणायचं काय? बाई बिचारी शांत राहिली.तिला बोलायला वाव नव्हता तिचा नवरा चुकला होता. तो घाईघाईने चढला तसा कंडक्टर त्याच्यावर संतापला, ” काय राव! घर आहे का तुमचं? कुठेही गाडी थांबवता, कितीही वेळ थांबता, होता कुठे?”

तो निमूट जागेवर जाऊन बसला. कंडक्टर त्याच्यावर ओरडत म्हणाला “पुन्हा कुठे थांबला तर गाडी तशीच घेवून जाईन. चल रे बाबा गाडी जाऊदे”. गाडी सुटली तस बायको भडकली, “काय अक्कल गहाण टाकलास काय? खय्य गेललास माती खाऊक? तुमच्यामुळे माका बोलणी खावची लागली.” त्यानी काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण गाडी गियर मध्ये होती. त्याने घेतलेल्या दारूचा वास येत होता.जशी त्याला दारू चढली तशी तो बडबड करू लागला. “एस टी काय कंडक्टरच्या बापाची आहे काय? आपण स्वत:च्या पैश्याची पिली, कोणी फुकट नाय दिली”. त्याची बडबड ऐकून कंडक्टर भडकला “आता आवाज बंद करतो की उतरवू गाडीतून? कटकट साली!!” त्याच्या बायकोने हात जोडले, “भाऊनो पाया पडतय, त्यांचं मनावर घेऊ नका”. तरीही त्याची बडबड चालू होती, कंडक्टरला अश्या प्रवाशांची सवय होती, त्यांनी सीटवर डोक टेकल. बस पनवेल स्टँडला बाहेर थांबली, कंडक्टर कंट्रोलर जवळ एन्ट्री करून आला. प्रवासी चुळबुळ करत होते पण काही न बोलता कंडक्टर जागेवर येऊन बसला. गाडी श्रीरामवाडी डेपोला थांबेल तेव्हा चहा पाणी करून घ्यायचं. त्याने तिकीट पंच करायला घेतली. “टपावर लगेज कोणाचं आहे, चिठ्ठी घेतल्याय का लगेजची?” पाचसहा जणांनी हात वर केले. त्यांनी लगेज तिकीट पंच केलं आणि तो डोकी मोजून सीटवर बसणार होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक नग कमी तसा तो ओरडून म्हणाला “खाली कोण उतरलं?” अचानक त्याचं लक्ष बाईच्या शेजारी गेलं. बाई आणि मूल मस्त झोपली होती आणि बाप्पाचा पत्ताच नव्हता.तो तिच्या सीटजवळ येऊन रागावत म्हणाला, “अहो बाई उठा, तुमचा नवरा कुठे आहे?” बाईने पाहिलं शेजारी नवरा नव्हता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली, ती तारस्वरात ओरडत म्हणाली, मगाशी होते कुठे कडमडले, आता काय करू? तिने जोराने रडायला सुरवात केली तस्सा मुलगाही रडू लागला. कंडक्टर बाईवर रागावला “स्वतःचा नवरा सांभाळता येत नाही. करता काय तुम्ही? उगाच बोंबलू नका.” ती बाई रडत म्हणाली “भाऊ गाडी पाठी घ्या ना, दया करा.” बसमधले प्रवाशी चिडले “बस पाठी घ्या काय? वेड लागलं काय तुला, नवऱ्याला सांभाळता येत नाही आणि दुनियेला ताप. राहुद्या त्याला, अश्या बेवड्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे.”

बस पुढे जात राहिली, बाई आणि मूल रडतच होते. मला दया आली मी कंडक्टर जवळ जाऊन चौकशी केली. “मास्तर, बाई रडत्याय हो, तिचा नवरा बेवडा यात तीची काय चूक! मागच्या डेपो मध्ये अनाउन्समेंट करता येईल का? म्हणजे तो दुसऱ्या बसने प्रवास करू शकेल”. तो माझ्याकडे बघत हसला, “ओ चाकरमानी जा शांत बसा तो बेवडा श्रीराम वाडी डेपोला येतो की नाही ते पहा! पंधरा वर्षाचा अनुभव आहे सर्विसचा.सगळे बेवडे फार हुशार, तुम्हालाच मूर्ख बनवतील”. मी त्याच बोलणं आणि त्याचा विश्वास पाहून गप्प झालो. जाग्यावर जाऊन बसलो. बाई अद्याप रडतच होती. मी माझ्या सिट जवळ गेलो तस ती म्हणाली , “भावा कंडक्टर काय म्हणतात? येतील ना ते?” मी निःश्वास सोडत म्हणालो “देव पाउदे आणि तुझ्या नव-याला येण्याची बुध्दी देउ दे, तो नाही आला तर तुला बस स्टाॅपवर उतरवुन देईन कुठे जाणार तू?” तसं ती म्हणाली कसालला, तीथून दुसरी एस.टी. आहे. उतरवुन द्याल ना, आमची ट्रंक आहे वरती”. मी होकार देऊन माझ्या सीटवर बसलो. त्या अद्भुत माणसांचा विचार करता करता डुलकी लागली.





गोंधळाने जाग आली,एस टी बाहेर फेरीवाले ओरडत होते.आवळा सुपारी घ्या, ए आवळा सुपारी,आलेपाक घ्या आलेपाक, कलिंगण, थंड, गारेगार कलिंऽऽगण, ए काकऽडी, वडाऽऽपाव सर्व फेरीवाले बेंबीच्या देठापासुन ओरडत गि-हाईक शोधत होते. कडंक्डरने शिटी फुंकत गाडी डेपोत लावली आणि मोठ्या आवाजात ओरडुन सांगितलं, “गाडी दहा मिनीटे थांबेल,दहा मिनीटात हजर व्हायचे.” उतरतांना तो बाईकडे नजर टाकुन गेला जणू तीच मोठी गुन्हेगार होती. मी एसटी खाली पाय मोकळे करायला उतरलो.एसटी कॅंटीनचा कटींग चहा मारून थोड्या वेळाने परतुनी आलो.

पाहतो तर काय पुढच्या सीटवर बाईचा नवरा बसला होता त्याच्या हातात वडा पावची पुडी, कलींगण असं बरंच काही होतं आणि तो बायकोची समजुत घालत होता. ती बिचारी हमसुन हमसुन रडत होती.मुलगा नक्की काय झालं या गोंधळात आळीपाळीने आईबापाकडे पहात होता. पूढच्या दहा मिनीटात एस टी.भरली कंडक्टरने येऊन घंटी जोराने बडवली आणि त्यांनी मागच्या सीटवर नजर टाकली. तो तरातरा पाठी आला त्यानी त्या माणसाचं बखोट धरून त्याला उठवलं आणि दोन कानाखाली ठेऊन दिल्या. बाई बिचारी पहात राहिली. “ओ भाऊ नोकरी घालवाल की माझी तुमच्या दारूपाई. त्या बायकोकडे पहा, बिचारी रडुन रडुन हैराण झाली. घरी जा न प्या की! नाय कोण म्हणते, पण लोकांना त्रास काय म्हणुन? आत्ता गाडीखाली उतरला तर तंगडच मोडुन ठेवीन”. तो प्यायलेला माणुस हात जोडुन माफी मागत होता.”साहेब, एकदाच चुकलो पूना नाय खरच अजीबात नाय, शपत्त घेतो,पाया पडतो”.

“नाटक बंद गुपचुप झोपायच. पून्हा आवाज आला तर तू हाय नी मी हाय” एवढं सांगून कंडक्टर निघून गेला. कंडक्टर जायला वळला तसे त्या बाईने कंडक्टरला हात जोडले. गाडी लंचसाठी इंदापुरला थांबली, खरंतर मला जेवायचं होत पण जो तमाशा काही तासापुर्वी घडला होता ते पाहुन माझी जेवण करायची इच्छाच गेली. व्यसनापाई माणुस इतका हिन बनू शकतो. अपमान सहन करु शकतो आणि आपल्यामुळे कुटुंबाला उध्वस्त करू शकतो हे पाहूनच मी हैराण झालो होतो. आता जर त्या माणसाने पून्हा एसटी खाली उतरायचा प्रयत्न केला तर मीच तुडवणार होतो एवढा राग मस्तकात गेला होता. पण ना तो माणुस उठला ना त्याच्या मुलाने भुकेने मागणी केली. कदाचित त्यांच्या घरी हे चित्र रोजचंच असावं.

मनात मात्र प्रश्र्नांची भूतं थैमान घालत होती,बाईने त्या कंडक्टरला हात का जोडले? एवढी दारू पचवुनही तो पून्हा पनेवल येथुन प्रवास करुन त्याच गाडीत कसा आला? त्याच नाट्य खरं की कडंक्टरचा संताप खरा? बाईचं नवरा म्हणुन प्रेम खर की लग्नबंधन म्हणुन जबाबदारीची जाणिव खरी? याचा विचार करतच मी झोपी गेलो. जेव्हा तो कसाल डेपोत उतरला तेव्हा टपावर चढून त्याने सामान काढलं गाडीतील दोन बॅग आणि एक बांधलेला बोजा घेउन निघाला. माझ्या मनात, त्यांचा संसार कसा असेल? बाई कसे सारे सहन करत असेल हाच विचार तो दिसेनासा होईपर्यंत तरळत होता. मी त्या बाईला हात जोडले, धन्य तो नवरा आणि धन्य तीची सोशिकता.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “प्रवास

  1. Archana Ashok kulkarni
    Archana Ashok kulkarni says:

    छान….!
    अनुभव, निरीक्षण,भाषा सर्वच …..!

Comments are closed.