morning-walk

मॉर्निंग वॉक

काही वर्षांपूर्वी फक्त उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटूंबातील लोक  morning walk, Gym या साठी नियमित जात असत. मग शिवाजी पार्क मैदान म्हणा, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी येथे सकाळी फेर फटका मारला तर बरेच लोक सकाळी जॉगिंग करताना दिसत, पण आता हा morning walk छोट्या शहरा पासून ते ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे. याचे कारण कदाचित दूरदर्शन किंवा अन्य द्रुकमाध्यमे असतील. काही असो, मॉर्निंग वॉक हा आता अपरिचित राहिला नाही. किमान स्वतःच्या आरोग्य विषयी जागरूक नागरिकांसाठी तो परवलीचा शब्द बनला आहे .

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. आजही कनिष्ठ वर्गातील नागरिक सकाळी उठल्या पासून विविध गोष्टीसाठी धावपळ करत असतात, त्यामुळे  ह्या मॉर्निंग वॉक साठी वेळ तर हवा ना. सकाळी दूध घेऊन या, कचरा कुंडीत कचरा टाकून या, नळाला पाणी आलं की पाहून या, जमलं तर कोणाच्या बंगल्या बाहेर डोकावणारी फुले काढून या, अश्या अनेक ऍक्टिव्हिटी सकाळी उरकतांना या मॉर्निंग वॉक साठी वेळ तर हवा. त्यामुळे मॉर्निंग वॉकची अनुभूती घ्यायला त्यांच्यापाशी वेळ नसतो. तरीही  गेल्या पंधरा वीस वर्षा पासून ह्या मॉर्निंग वॉकची मजा अनेक घेत आहेत. आरोग्य उत्तम राहावं म्हणून असो की निर्माण झालेली क्रेझ म्हणून असो. मी गेले पंधरा वीस वर्षे याचा आनंद आणि मजा  घेऊ लागलो आणि जी मजा मला आली आणि करमणूक झाली ती तुमच्याशी शेअर करावी असे वाटले म्हणून हा लिखाण प्रपंच.

तर भल्या सकाळी म्हणजे पाच सव्वापाचला तुम्ही जेथे कोठे रहात असाल तेथून  बाहेर रस्त्यावर या आणि जरा उघड्या डोळ्याने पहा, काय मज्जा येते ती. ऋतू कोणताही असो. जर तुमचे मन सकारात्मक असेल तर तुम्हाला ग्रीष्म असतांनाही अगदी सकाळी सकाळी उगवतीला सूर्य आगमनाचा सोहळा अनुभवता येईलच. रक्तिमासारखा तो लाले लाल गोळा आपली प्रभा फाकत डोंगरा आडून किंवा क्षितिजा पासून सहस्त्र किरणांची प्रभावळ टाकत तुमच्या समोर उभा ठाकतो तेव्हा कृष्णाने अर्जुनाला दाखवलेले स्वतःचे विराट रूप ते हेच याची खात्री पटते.

पावसाचा आनंद घेण्यासाठी निःशब्द सकाळी बाहेर पडलात तर मातीचा वेगळा गंध तुमचे देहभान हरविल्या शिवाय राहणार नाही. घराबाहेर दहा मिनिटे फिरून आलात तरी पावसाचे वातावरण आणि आभाळात सुरू असलेला ढगांचा कडकडाट आणि विजेचे तांडव यांचे संगीत तुमचे मन प्रफुल्लीत नक्कीच करेल. थोडा मोठा पाऊस असेल आणि हातात छत्री असेल तरी तिरक्या येणाऱ्या सरी तुम्हाला भिजविल्या शिवाय राहणार नाहीत, मोठ्या पावसाचे  रस्त्यावरून वाहणारे पाणी तुमच्या पायांना सुखद गुदगुल्या केल्याशिवाय रस्ता ओलांडणार नाही. तुम्ही छत्री बंद केली तर तो तुम्हाला अवचित गाठून भिजवणारच असा हा कृष्णा सारखा नटखट पाऊस तुम्हाला नक्कीच आनंद देईल. अर्थात पावसाचा कंटाळा नसेल तर, जोडीला पावसाचे दूत बेडुक, रातकिडे यांच संगीत अगदी सकाळीही तुम्हाला सोबत कारायला सज्ज असते. याच वेळी नुकतीच कात टाकलेला नाग राज तुमच्या दृष्टीस पडला तर भीतीने तुमच्या अंगावर येणारे शहारे किंवा रोमांच एक वेगळी अनुभूती तुम्हाला देऊन जाईल. 





पावसाच्या ऋतूत सकाळी शहरा बाहेर पडलात तर चहूकडे हिरवळ तुमच्या स्वागताला सज्ज असते. तेव्हाच जर वाऱ्याची झुळूक त्या हिरवाई वरून मायेचा हात फिरवून जातांना पाहण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले तर मन आनंदून जाईल ती सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जगण्याचा वेगळा आनंद देऊन जाईल आणि तुम्ही त्या रानाच्या, हिरव्यागार शेताचा डौल पाहून निसर्गाच्या प्रेमात पडाल.

 दिवाळी आली की हवेत गारवा असतो, चालणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर झोप पूर्ण झाल्याने गोडवा असतो, शिशिर असेल तर हलकासा दव पडत असतो. झाडांच्या पानावर दवबिंदू मिरवत झाडं, रवीराजाच्या आगमनाची वाट पहात खोळंबलेली असतात. सूर्याचे कोवळे किरण जेव्हा त्या दव बिंदूवर पडतात तेव्हा ते हिऱ्या सारखे चमकू लागतात त्यातून बाहेर पडणाऱ्या किरण शलाका प्रिझम मधून परावर्तित झाल्या प्रमाणे भासतात. 

थंडी गहिरी झाली की झाडे थंडीची पानगळ करून तुम्हाला सावध करतात आणि चैत्र असेल तर झाडांची पालवी तुम्हाला नेत्रसुख देते. पक्षी घरटे सोडून अन्नाच्या शोधार्थ निघालेले असतात आणि निघतांना चिव चिवाट करून आपल्या पिल्लांचा निरोप त्याची चोच आपल्या चोचीस घासून घेत असतात.तर काही पक्षी आपल्या मित्रांना उंच आवाजात  साद घालून बोलवत असतात. 

वसंत ऋतूत कोकिळेचा पंचम ऐकण्याचे भाग्य शहरातील फार थोड्या मंडळींना लाभते. आमच्या परिसरात पक्षी निवास करू शकतील अशी जांभळाची, वडाची, विलायती चिंच,सुरू अशी झाडे मोठ्या संख्येने आहेत परिणामी पक्ष्यांच्या वसाहती या झाडांवर आहेत. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर पक्षी किलबिल करत असतात.

मंद मंद वारा पांथस्तावर झाडांच्या चवऱ्या ढाळत असतो. झाडावर कुठेतरी असणारा मधाच्या पोळ्यातून गोड वास आसमंतात भरून राहिलेला असतो.अश्या वातावरणात सकाळी तुम्ही दहा मिनिटे जरी फिरलात तर मन प्रसन्न होईल आणि दिवसासाठी ऊर्जा स्रोत मिळेल,म्हणून भल्या सकाळी उठून  चालण्या सारखे सुख नाही.

ऋतुचक्र जसं बदलत राहील तश्या तुमच्या झोपेच्या वेळा आणि झोपेची एकूण वेळ याच कोष्टक बदलत राहील. पावसात किंवा दाट थंडीत जशी गाढ झोप तुम्हाला लागेल आणि झोप पूर्ण झाल्याचा आनंद तुम्हाला या काळात मिळेल तसा आनंद तुम्हाला ग्रीष्मात मिळणार नाही. त्या नुसार थंडीत झोप थोडी जास्त लागते पण उन्हाळ्यात अगदी वातानुकूलित बेड रूम मध्ये झोपला तरी झोपेचा हिवाळ्यातील आनंद मिळणार नाही. म्हणूनच कोणत्या ऋतूत किती आणि कसा व्यायाम करावा ते शरीर तुम्हाला सुचवत असते आपले काम शरीराला प्रतिसाद देणे इतकेच आहे असे मला वाटते. तर थंडीचा मोसम सुरू आहे, Global Warmin मूळे ऋतुचक्र विस्कटले आहे थंडीच्या मोसमातही थंडी पडेलच सांगता येत नाही. पण घरा बाहेर पडलोच नाही तर थंडी आहे की नाही कसे कळणार? खरं ना!





कोणी या मॉर्निंग वॉक साठी विशेष पोशाखात तर कोणी रात्री झोपताना घातलेल्या कपड्यावर ह्या वॉक साठी बाहेर पडलेले दिसेल. कोणी गर गर हात फिरवत चालतांना तर कोणी जोराने टाळ्या वाजवत जातांना दिसेल. कोणी शुजसह,कोणी सँडल घालून तर कोणी स्लिपर घालून चालतांना दिसेल. अगदी अनवाणी चालणारे गृहस्थही तुम्हाला दिसतील. व्यक्ती तितक्या प्रकृती.

बरेच सिनियर सिटीझन नव्या कोऱ्या ट्रॅक शु, बर्म्युडा, टी शर्ट आशा पेहरावात असतात. बहुदा मुलांनी बाबाला हे बर्थडे गिफ्ट किंवा Retirement Gift देऊन गबाळे फिरू नका असा दम भरलेला असतो. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ते टी शर्ट च्या बाह्या वर करतात तर कधी वाकून वा उंच जागेचा आधार घेत shoes चे लेस बांधण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या सोबत महिलाही टी शर्ट आणि बर्म्युडा पेहरावात  चालत असतात. या सर्व Second Inning साठी बाहेर पडलेल्या जेष्ठ मित्रांची  चालताना शरीराची होणारी हालचाल पाहण्या सारखी असते. कोणाचे हात रस्त्याला समांतर हलत असतात तर कोणाचे हात रस्त्याशी लघुकोन करावा अश्या अविर्भावात तिरके हलत असतात. काही बाबा लोक आपल्या पिल्लाला जबरदस्तीने घेऊन आलेले दिसतात त्यांना लहानपणी  पहाटे उठण्याची हौस होती की न कळे, मात्र ते मुलाला स्वतः सोबत आणून नवीन पायंडा घालू इच्छितात. 

एक आज्जी हातात आकडा असलेली काठी घेऊन रस्त्याच्या कडेस असलेल्या बंगल्यातील फुलझाडांचा हिशोब पुरा करत असतात. फुलांची पिशवी साडीस खोचलेली असते. त्या पिशवीत नाना प्रकारची वेग वेगळ्या बंगल्यातील फुले कुजबुजत असतात आणि आजीच्या चिकाटीच्या कौतुक करत असतात. त्यांचं  चालणं, उंच टाचा करून भिंती पल्याड  डोकावण असे अनेक व्यायाम प्रकार होतात आणि बिन पैशाची फुलेही घरी पोचतात. त्या देवाला फुले वाहतात पूण्य मात्र बंगले मालकांच्या खात्यावर जमा होत असावं. नाहीतरी बंगले मालकांना इतकी फुलं हव्यात कशाला असा पोक्त विचार आज्जी करत असतात.

जो तो आपल्या मस्तीत रस्त्यावर बागडत असतो. बाजूने वाहने दुधाच्या, ब्रेडच्या गाड्या आणि पाव विक्रेते सायकल दामटत किंवा स्कूटर वरून जात असतात.गाड्यांची रहदारी धीमी चालू असते. मोजकी दुधवाले, पान पट्ट्या,आणि किरकोळ पाव, बिस्किट विकणारी दुकाने उघडण्याच्या तयारीत असतात. माझ्या सारख्या फिरणाऱ्या हौश्या लोकांची पाय गाडी एका ठराविक मार्गाने चालत असते. कुणी आस्ते कदम,तर कोणी धावण्याच्या शर्यतीत पळल्याप्रमाणे तर कोणी कोणाला तरी गाठायचं आहे अश्या जोमात चालत असतो, पळत असतो.





ह्या चालण्या पाळण्याची तऱ्हा विचित्र असते कुणी पोहताना पाणी कापावे तसे कपड्यावर सप सप आवाज करत चालत असतो,इतर लोकांनी नोंद घ्यावी, महोदय मार्गात आहेत असे सुचवायचे आहे की काय असे वाटते. कोणी मोठ्या आवाजात टाळ्या वाजवत जात असतो,कोणी मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावून आपली आवड जगाला कळवत असतो तर कुणी स्वतः गाणी गुणगुणत असतो. कोणी Good Morning,कोणी जय श्री राम, कोणी स्वामी हो, अश्या वेगवेगळ्या कोड मध्ये संवाद साधत असतात.  तर कोणी, राम राम करून स्वागत करत असतो. “साहेब आज उशीर झाला का?” असा प्रश्न पाळतीवर असल्या प्रमाणे  विचारून त्यांना माझं लक्ष आहे बरं असं सुचवत असतो.

महिला गप्पांच्या मुडमध्ये असतात, किती वाजता उठले आणि काय काय आवरून आले ते मैत्रीणीला सांगत असतात. तर कोणी काय नवीन खरेदी केली आणि किती फायदा झाला त्याची सुरस कथा रचून सांगत असतात. तर कुणी आमच्या ह्यांना प्रमोशन मिळालं म्हणत मैत्रिणी कडून अभिनंदन वसूल करत असतात. पिकनिक कधी काढायची यावर वाटेत चर्चा होते. तर कधी मुलांच्या शाळे बाबत तक्रार चालू असते एक मॅडम म्हणतात, “काय शाळा आहे मुलांची?  कधी Class Teacher रजेवर, तर कधी subject Teacher, अभ्यास कसा पूर्ण करणार?” दुसरी म्हणते Mhaths काय शिकवतात ते मुळीच कळत नाही. आणि हो कित्ती होम वर्क देतात ? कधी पूर्ण करणार?मुलांचा होमवर्क आपल्याला पूर्ण करावे लागते तर कुणी “online education” च्या नावाने आपले दुःख व्यक्त करत असते,”ही मुलं घरी असल्या पासून एकही सीरियल नीट पाहता येत नाही थोडया थोडया वेळाने यांचे Online वर्ग सुरू असतात आणि कार्ट मला Home Work  लिहून घ्यायला सांगते. आणि आमचा विनोद जरा सुद्धा लक्ष  देत नाही, म्हणतो, “बंटी तुझ्याकडे चांगला बसतो,कसली जबाबदारी त्याला नको.”  तिसरी  कुणी आपली शेजारीण किती लबाड आहे आणि रोज काही ना काही निर्लज्ज पणे कशी मागते त्याची सुरस कथा ऐकवत असते तर चौथी आमचे शेजारी कित्ती चांगले आहेत गावा वरून आले की भेट आम्हाला पहिली मिळते हे आनंदाने मना पासून सांगत असते.ऐकावं ते नवलच अशी स्थिती असते. यासाठी कानात इअर फोन आणि मनात संवादाचा आनंद इतके पथ्य पाळावे लागते.

कॉलेज तरुणांची वेगळी टीम वेगळ्या कैफात जॉगिंग करत असते. वाटलं तर अगदी जीव तोडत पळतात आणि वाटलं तर उगाचच रेंगाळत कुणाची वाट पहात थांबतात. त्यांचं गॉसिप वेगळच असते. गॉसिप कसलं तो असतो हास्यस्फोट एकमेकांना टाळ्या देत आणि मिठी मारून आनंद व्यक्त करत त्यांचा संवाद सुरू असतो. तरूण, तरूणी काल काय धम्माल केली आणि मित्राला किंवा मैत्रीणीला कसा बकरा बनवलं, ,काल प्रोफेसर कसे blank झाले आणि back bencher कसे फिदीफिदी हसत होते हे भल्या  मोठ्या आवाजात discuss करत होते. एखादा college टीचर किंवा प्रॉफेसर जात असेल तर मुलं काशी खिल्ली उडवतात ते नक्की ऐकत असेल.  अर्थात सर्व फ्रेश मुडमध्ये असतात आणि माझ्या सारखा पाठीमागून ऐकणारा त्यांचे किस्से ऐकून मनातच हसत असतो. किती गमती जमती अनुभवायला मिळतात .

प्रत्येकाच्या कपड्यात ऋतुमानानुसार बदल होत असतो,एक काका चक्क बनियान आणि हाफ पॅन्ट याच अवतारात फिरत असतात. कोण काय म्हणेल याची पर्वाच नसावी अशा बेफिकिरीत मस्त चालत असतात. हिवाळा आला की रंगी बेरंगी स्वेटर बाहेर पडतात, कोणी पूर्ण शरीर झाकून घेतो कोणी कान टोपी,कुणी मफलर अश्या भिन्न वेशात बाहेर पडतात.बायका स्कार्फ बांधून बाहेर पडलेल्या दिसतात. तर उन्हाळा आला की शुभ्र  सूती कपडे रस्त्यात आपली ओळख सांगू लागतात.आता मास्क लावून फिरावं लागत असल्याने बऱ्याचदा समोरची व्यक्ती ओळखण्यात गोंधळ होतो आणि अगदी ओळखीचे देखील एक मेकांकडे संशयाने पाहतात न जाणो हाक ओळखीच्या व्यक्तीला हाक मारावी आणि गैरसमज व्हायचा .

कोणी रस्त्याचा एखाद्या कोपरा पकडून तिथेच सिट अप्स मारत असतो तर कुणी पिटी चे हात करत असतो. काही श्री आणि सौ जोडीनेच निघालेले असतात आणि घरातील मुलांच्या तर कधी दिर जाव किंवा नणंद यांच्या तक्रारी “ती” दबक्या आवाजात सांगत असते. तो जमेल तसे तिचे सांत्वन करत असतो तर क्वचित प्रसंगी त्याचा वरचा सूर लागतो मग ती घाबरून आजूबाजूला पहाते तर कधी हाताचा इशारा करत दटावते. कोणी सकाळीच देवाला साकडं घालून कामाला लावतो. काही देव वेडे, रस्त्यावरच्या प्रत्येक मंदिराच्या पायरीवर डोकं टेकवून भक्तांची पायधूळ घरात नेतात.





काही काका लोक एकत्र जमून हातवारे करत हास्य क्लब चा फील आणतात. तरुण मुले आणि मुली महापौर चषक जिंकण्याची तयारी करावी त्या प्रमाणे एक पाय पुढे ठेऊन On Your Mark Set Go गो अस म्हणत पळून पून्हा त्याच जागेवर येतात. काही इतक्या वेगाने पळतात की अंगभर घाम निथळत असतो, आणि ते धापा टाकत निथळणाऱ्या घामाकडे कौतुकाने पहात असतात.कोणी म्हणत ते मुलींना  इंप्रेस करण्यासाठी उगाचच पळतात. एक गुजराती मुलगा दर पन्नास फूट चालून गेल्यावर रस्त्याला स्पर्श करून नमस्कार करतो. सुरवातीस माझा समज झाला की त्याचे रस्त्यावर काही पडले असावे नंतर पाहिले तर त्याच वाकून नमस्कार करणे अव्याहत सुरू होतं. बिच्चारा काय खुळ त्याच्या डोक्यात असावं तोच जाणे.

हे असे मॉर्निंग वॉक चे अनेक प्रकार पाहिल्यास संभ्रमित व्हायला होतं,यातला कोणता प्रकार आपल्याला जमेल. सकाळी News Paper आणि दूध टाकणारे यांचा निराळाच मॉर्निंग वॉक चालू असतो बिचारे चार चार जिने चढून जाऊन पेपर वा दूध ग्राहकाला देऊन पुन्हा दुसरी, तिसरी अश्या किती इमारती चढतात आणि उतरतात त्यानाच माहीत. त्यांचा किती किलोमीटर मॉर्निंग वॉक होतो तेच जाणे, त्यावरून आठवले, स्थूल असणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर Diet सांगतात त्या ऐवजी त्यांना चार,सहा इमारतीत वरच्या माळ्यावर पेपर,दूध टाकण्याची सक्ती उपाय डॉक्टर सुचवतील तर त्यांना वेगळ्या Diet ची गरज भासणार नाही. महिन्या दोन महिन्यात तो वा ती सड पातळ होईल.

काही शरीराने स्थूल व्यक्ती मुंगीच्या वेगाने रस्त्यावर चालत असतात ते डॉक्टर किंवा घरातील कुणी सांगितलं म्हणून सोपस्कार उरकत असतात मग त्यांच्या आकार मानात बदल कसा व्हावा ? पण “जॉगिंग केलं बुवा हुश्श!” असा खाक्या असतो. अर्थात त्यांना या व्यायाम प्रकारची गोडी लागली तर उशिराने का होईना त्यांची शरीर बोली नक्की बदलेल ह्यात शंका नाही.

Helth Band आल्या पासून लोक जास्त Health cousious  झाले आहेत असे म्हणण्यास वाव आहे. लोक, किती झोपलो? किती चाललो? किती calories खर्च केल्या ? Heartbeat किती ? वजन वाढले तर नाही ना? हे सारख तपासत असतात आणि सगळ अजून तरी नॉर्मल आहे हे   पाहून समाधान व्यक्त करतात किंवा Hart rate वाढला तर शंका आल्यास डॉक्टर गाठून शहानिशा करून घेतात. डॉक्टर अनेक Medicine देणार तुम्ही ती घेणार त्याचे side effects भोगावे लागणार.हे चक्र चुकवावं अस प्रत्येकास  वाटत असते आणि खरंच  आपण तंदुरुस्त राहावं अस वाटत असते म्हणूनच आजची तरुणाई जास्त जागरूक आहे ही चांगली गोष्ट आहे. चांगला पायंडा तरूण पिढी घालत आहे आणि या पूढील लहान मुले त्यांच अनुकरण करुन आरोग्य दृष्ट्या सजग होतील,सुदृढ होतील आणि सशक्त, निरोगी  भारताचे सुजाण नागरिक बनतील.

इतर कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “मॉर्निंग वॉक

  1. Harshada Mishra
    Harshada Mishra says:

    Beautiful article sir!

  2. Archana Kulkarni
    Archana Kulkarni says:

    खूप छान…! किती सोप्या भाषेत सांगितले आहे सर्व…!

  3. Kocharekar mangesh
    Kocharekar mangesh says:

    Thanks Kulkarni Mam, Harshada Mam.
    Thanks for ur complement.

Comments are closed.