व्यक्त मी अवक्त मी

व्यक्त मी अवक्त मी

या विषयावर लिहिण्यापूर्वी, मी मलाच विचारले, व्हावे का व्यक्त? गेल्या वर्षी एका मुलीने महाराष्ट्रातील राजकीय घटनेबाबत एक पोष्ट शेअर केली आणि आमच्या अति तत्पर पोलीस खात्याने तीला अटक केली. आपले मत मांडणे, व्यक्त होणे हा गुन्हा कसा ठरू शकतो? देशाचा सार्वभौमत्वाला धक्का पोचत असेल कुणी देशाच्या संरक्षण विषयक गुपितांचा जाहीर उल्लेख करत असेल किंवा कुणाची बदनामी करणारा मजकूर छापत असेल, समाजमाध्यमावर टाकत असेल तर त्याची कृती शिक्षेस पात्र आहे. पण एखाद्या निर्णया विषयी मत व्यक्त करणे, एखाद्या व्यक्तीच्या जाहीर भाषणात केलेल्या विधानास असहमती दर्शवणे किंवा त्यावर टीका करणे हा कोणत्या कलमाने गुन्हा ठरतो? सामाजिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीने टीकेला रास्त उत्तर द्यावे किंवा कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई करावी पण उगा दहशत माजवू नये किंवा पद आहे म्हणून कायद्याचा गैर वापर करू नये.

एखाद्या व्यक्तीवर झालेली टीका ही राजकीय वैमनस्यातून झाली आहे असं न मानता त्यातून सुधारणेला वाव आहे असे मानले तर कटुता नष्ट होईल. दुसऱ्या व्यक्तीने केलेली टीका ही पुढील वाटचालीसाठी हितकारक ठरू शकेल. आजही काही समाजात, कुटुंबात महीलांना विचार स्वातंत्र्य नाही. त्यांनी चौकटीच्या बाहेर येऊन बोलण त्यांच्या घरातच मान्य नाही समाजाला मान्य होण फारच दूर. भारतातील उच्चभ्रू कुटूंबात देखील स्त्रीयांच्या बोलण्यावर मर्यादा असतात मग राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातील स्थिती बोलायलाच नको. अफगाणिस्तान येथील महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल न बोलणच योग्य. पूणे येथे शिकणारी एक अफगाण महिला वृत्तपत्रात म्हणते आता आमच्या स्वतंत्र जगण्याच्या आशा संपल्या. त्यामुळे मी शीर्षक लिहून किती तरी वेळ To be or not to be ह्या संभ्रमात घालवली, पण “निश्चयाचा महामेरू सकल जनांचा आधारू श्रीमंत योगी.” अस स्वतः स्वतःसाठी म्हटलं आणि व्यक्त होण ही तर काळाची गरज आहे असं स्वतःला बजावून लिहिण्यास प्रारंभ केला.

मी भारताचा नागरिक आहे, संविधानाने प्रदान केलेले अधिकार आणि स्वातंत्र्य उपभोगाणे माझा अधिकार आहे. ज्या घटना मी पाहतो, ऐकतो त्या घटना पाहून किंवा घटनेची माहिती ऐकून कधी मला दुःख होते तर कधी आनंद होतो. अर्थात त्या घटनेकडे मी कसा पाहतो, त्या घटनेकडे पाहण्याचे माझे संदर्भ काय आहेत त्यावरच, मला आनंद होतो, दुःख होत, राग येतो की तिरस्कार वाटतो, घृणा उत्पन्न होते की दया येते हे ठरते.

मला विचार स्वातंत्र्य मिळाले म्हणून मी काही बोलू लागलो, दुसऱ्या व्यक्तीच्या, किंवा समाजाच्या भावना दुखावल्या तर ते क्षम्य नाही याची जाण नागरिक म्हणून असलीच पाहिजे तरच नागरिकांचे अधिकार मी वापरू शकेन. मी लिहितांना हेच भान असणे,जपणे योग्य ठरेल. व्यक्त होण्यात किंवा सामाजिक कार्याच्या उत्थापनासाठी मी विचार मांडेन तेव्हाही भाषेत अश्लीलता येणार नाही किंवा कमरेखाली वार करणारे असभ्य शब्द मी वापरू नये याची जाण असणे गरजेचे आहे.



affiliate link

माझे विचार हे माझ्या मनोविकारांवर अवलंबून असतात. शत्रूचा सैनिक मारला की मला आनंद होतो आणि आपले सैनिक धारातीर्थी पडले तर दुःख होत. म्हणजेच माझ्या भावना संदर्भित असतात. सैनिकाला वीरगती प्राप्त झाली तर सैनका बद्दल आदर वाढतो आणि त्याच्या कुटुंबाबाबत सहानभूती वाटू लागते. हे सगळे मनाचे खेळ किंवा मनोव्यापार आहेत.कोणी मला मारले तर मी त्याची मानगूट धरतो त्याला ठोसा लगावतो, त्याने मला पुन्हा मारले तर मी पुन्हा त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. कोणी मला अपशब्द वापरला तर मी माझ्या पद्धतीने त्याला प्रतिकार करतो उत्तर देतो. म्हणजे मी व्यक्त होतो. व्यक्त होणं ही मानवी स्वप्रेरणा आहे.पण मी कश्यावर? कोणत्या गोष्टीवर व्यक्त व्हावे?

ज्या गोष्टी माझ्या विचारांच्या, आकलन शक्तीच्या आणि अधिकार क्षेत्राच्या पलीकडच्या आहेत त्यावर मी व्यक्त होणे योग्य आहे का? मनात गैरसमज, अपसमज, चुकीचे संदर्भ, चुकीची आणि अवास्तव माहिती गृहीत धरून अशा अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीवर व्यक्त होण स्वतःसाठी, समाजासाठी, आदर्श आणि योग्य नव्हे.

आपण ज्या नगरात राहतो, आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो. त्या नगरातील प्रश्न हे माझे प्रश्न झाल्याशिवाय, त्या प्रश्नांच्या मुळाशी गेल्याशिवाय त्याचे निराकरण करणे तितके सोप्पे पडणार नाही. माझ्या घरावर, घरातील व्यक्तींवर जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम किंवा आपुलकी मला इतर नागरिकांविषयी वाटते का? त्यांच्या गरजेला, प्रसंगात मी धावून जातो का? इमारतीचे आवार अस्वच्छ असू नये यासाठी जशी मी काळजी घेतो, तशीच काळजी मी नगर स्वच्छ राहण्यासाठी घेतो का? की माझ्या घरातील कचरा शेजारच्या सोसायटीच्या भिंती जवळ टाकतो? माझ्या नगरातील प्रश्नाबाबत मी नगरसेवक किंवा नगरपालिका अधिकारी यांच्याजवळ सामाजिक प्रश्न निर्भिडपणे मांडू शकतो का?

स्वच्छतेसाठी मी कोणाशी बोलतो?कोणत्या भाषेत बोलतो, माझ्या आवाजाची पट्टी काय आहे? म्हणजेच मी व्यक्त होताना कोणती सीमा गाठतो? त्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? त्याची कशी प्रतिक्रिया उमटते किंवा येते? हे सारे महत्वाचे ठरते. तुमची देहबोली, भाषा आणि आणि तुमची लेखणी हे प्रभावी हत्यार आहे त्याने समोरच्या व्यक्तीवर वार करायचा की त्याच्या संवेदना जागृत करायच्या ते ही तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून व्यक्त होण ही नाजूक पण प्रभावी जाणीव किंवा गोष्ट आहे. तशीच व्यक्त होण ही समशेर आहे. अर्थात कोणत्याच गोष्टीबद्दल काही फरक न पडणं, किंवा त्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही असे भासवणे हे स्वतःसाठी आणि सिस्टीम साठी किंवा देशासाठी घातकच.

व्यक्त होण ही भावनामय अशी मानसिक गरज आहे, एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते परंतू ते तिला व्यक्त करता आले नाही तर तिच्या भावना तुमच्या पर्यंत पोचणार नाही आणि तुमच्याकडून तिला प्रतिसाद मिळणार नाही. परंतू तिच्या हावभावातून तिच्या वागण्यातून ,स्पर्शातून तुम्हाला योग्य संदेश पोचत असेल तर “शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.” अशी सुरावट मनातही उमटेलही पण इतका वेळ आपल्याला आहे का? कदाचित तो पर्यंत वेळ आणि संधी निघूनही गेली असेल.





आता, चिठ्ठी पाठवण्यासाठी “कबुतर जा जा जा.”, म्हणण्याचे दिवस नाहीत, पत्र पाठविण्याचा जमानाही फार मागे पडला, आताच्या आठ दहा वर्षांच्या मुलांना पत्र, आंतरदेशीय या गोष्टी माहितही नसतील. मोबाईलची कळ दाबताच राग, लोभ, घृणा, मत्सर, तुम्ही मेसेज किंवा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे सहज पोचवता.

आर. के. लक्ष्मण,शंकर, बाळासाहेब ठाकरे, बी.व्ही. राममूर्ती, मारिओ मिरांडा, सुधीर तेलंग, व्ही.टी. थॉमस, एन.के.रंगनाथन असे अनेक व्यंगचित्रकार आपल्या रेखाटनातून व्यक्त होत आणि भल्या भल्या राजकारण्यांना फटकारत. आज हातात मोबाइल आल्यापासून अशी कितीतरी व्यंगचित्रे आणि ट्विट भल्या भल्यांची झोप उडवत आहेत. सावधान आपण टाकलेला किवां पूढे पाठवलेला मेसेज किवां आपले ट्विट किती महागात पडू शकते याची कल्पना असलेली बरी. याचे कारण प्रत्येक मेसेज आणि ट्विटवर सायबर क्राईम विभागाच लक्ष आहे. न जाणो त्या मेसेजमुळे कोणत्या कलमानुसार आपल्यावर कारवाई होईल?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झाला आणि काय व्यक्त करावं ह्याला घरबंध नाही राहिला की कुणाची “राणावत” होते तर कुणाचा “गोस्वामी” होतो. व्यक्त होताना दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावून कोणता असुरी आनंद मिळतो ईश्वर जाणे. म्हणून कोणत्या भावना व्यक्त कराव्या? कोणत्या ठिकाणी किंवा माध्यमावर कराव्या ह्याची समज असणे अत्यन्त गरजेचे आहे. हाती व्यासपीठ, मोबाईल किंवा लेखणी मिळाली म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापायी काहीही बरळू नये,लिहू नये किंवा क्लिप पोस्ट करू नये. काही गोष्टी अव्यक्त राखण्यात मान ,सन्मान आणि गंमत असते. तुम्ही चार भिंतीत कसही वागलात तरी तेच आचरण चौराहेपर अयोग्यच. तसच तुमच्यात आणि क्ष व्यक्तीत कसेही खाजगी संबंध असले तरी त्याची जाहीर वाच्यता करू नये. हा विधीनिषेद कळला नाही की गोची होते.

पद मिळाले की अधिकार प्राप्त होत नाही तर कर्तव्य पदरी येते याची जाण न बाळगता बोलण्याचा आणि स्वैर वागण्याचा अधिकार प्राप्त झाल्याप्रमाणे वागले की लोकोपवादाला तोंड द्यावे लागते. प्रसंगी पाय उतार व्हावे लागते. नजीकच्या काळात पोलीस खात्यात घडलेल्या घटना हे त्याचे ठळक उदाहरण आहे.व्यक्त होत असतांना अन्य कोणाला अडचणीत आणत आहोत याचे भान जपणे गरजेचे असते.

दुर्दैव ते हेच की थोडी प्रसिद्धी मिळाली की बोलण्याचा अधिकार प्राप्त झाल्याप्रमाणे नेते बोलू लागतात, यातूनच, “पाणी मी कुठून देऊ, लघुशंका करू का?” असे बोलले जाते, ते माध्यमावर दाखवले जाते, केवळ टी आर पी वाढवा असा प्रयत्न. सगळा गोंधळी कारभार. अधिकाराच्या पदावरून घोषणा करतांना “हमने ये निर्णय लिया है । या शब्दाचा वारंवार प्रयोग केला जातो खर तर “सरकारने” अशा आशयाने तो “हमने” असतो परंतु त्या “हमने” शब्दात “मै” चा अहंकार लपला असावा असा संशय घेण्याला जागा असते. त्यामुळे समाज माध्यमावर टीका होणे अपरिहार्य ठरते कारण कोणी एक व्यक्ती कोणता निर्णय घेत नाही.



affiliate link

शासनात कार्यरत अधिकारी किंवा मंत्री अथवा कोणीही उच्च पदस्थ पदरचे काही देत नाही. या वक्तव्यावर लोकांनी आक्षेप घेतला तर त्याचे खंडन करण्यात शक्ती खर्च करावी लागते. म्हणून जेवढे पद मोठे, व्यक्त होताना किंवा बोलतांना तेवढी जबाबदारी मोठी अन्यथा, “ये सहाब कूच भी बकते है!” असा टोला हाणाला जातो. महाराष्ट्रात तिघाडी सरका स्थापनेत संजय पॅटर्न राबवला गेला असा समज आहे, खर तर तो पावर पॅटर्न होता. पण हाती लेखणी मिळाली आणि ते घडून आल. कधीतरी महाभारत वाचतांना संजय उवाचं अस वाचलं होत पण कधीतरी, हे वारंवार ऐकायला मिळेल अस वाटलं नव्हत, “कालाय तस्मे नमः”महाभारत सिरियल मध्ये “मै काल हू” अशी सुरवात होती ती भविष्यवाणी असावी.

व्यक्त होताना काय काय बोलाव, काय सांगाव किती अधिकारवाणीने सांगाव? हे ठरवता आल नाही की पंचायत होते. आपलं मायबाप सरकार म्हणजे ट्रायपॉड, तीनही पाय जमीनदार नीट लागत असूनही प्रत्येक पायाला वाटत माझ्यामुळेच सर्व मंगल कुशल आहे.धोरण ठरवताना एकत्र बसूनही घोषणा करतांना प्रत्येक पाय वळवळ करु लागतो आणि मीच आधी घोषणा केली पाहिजे अशा भ्रमात बोलायला जातो आणि काय धोरण ठरल तेच नेमक विसरून नको ते जाहीर बोलतो. अस व्यक्त होण्याची किंमतही मोजावी लागते. जाहीर केलेली घोषणा हा आमच्या सरकारचा निर्णय नव्हता अस सांगून स्वतःची फजीती पाहतांना काळीज गेंड्याच्या कातडीच असाव लागत. तरीही आमच सरकार सुरक्षीत आहे अस वांरवार तिन्ही पक्ष एकमेकांना आठवण करत असतात. न जाणो कोणी विस्मरणात जायचा आणि नंतरचा शपथविधी अगदी मध्यरात्रीच व्हायचा. त्यांच्या सरकारचे त्रीकूट म्हणून विरोधी पक्षातर्फे तीन व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्त होत असतात कधी दादा बोलतात तर कधी फडणवीस भविष्य आणि भवितव्य कथन करतात. तर कधी प्रविण दरेकर सोज्ज्वळ शब्दात भडीमार करतात.सोमय्यांना व्यक्त होण्यासाठी सतत नवनवीन विषय मिळतच असतात. कोणीच मागे रहात नाही.

केंद्रात तरी योग्य धोरण राबवल जावं, महाराष्ट्र सरकारच्या अगदी उलट. तिथं व्यक्त होण्याच स्वातंत्र्य अगदी सिमीत, “मै कुच नही कहूंगा और तुम्हे कुच केहनेकी जरूरत नही.” जिथे, त्यांनी बोलावं, खरं काय ते सांगाव यासाठी सगळी वर्तमानपत्र आग्रही असतात आणि वाहीन्या बाईट मिळवण्यासाठी आसुसलेले असतात तिथे हे कट्टी घेतल्या प्रमाणे का वागतात? ते कदाचित त्यांना माहित नसाव. ज्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत अशा अनेक विषयात त्यांनी चुप्पी साधली आहे. हे कोणते गोड बंगाल आहे ते दिदीनांही माहीत नसाव. जिथे आवश्यक नाही तिथे हे भरपूर बोलतात आणि जिथे खरच स्पष्टपणे यांनी सांगाव चुप्पी तोडावी असे वाटते तेव्हा हे “मौनम् सर्वार्थ साधनम्” अस व्रत असल्या सारख एकदम शांत बसतात, हेच खटकतं.





सर्वच गोष्टींचा खुलासा करावा असा कोणी आग्रह धरणार नाही, जसे पी.एम.केअर फंड, लोक यासाठी पिच्छा पुरवतात, “बोलो बाबा बोलो, निर्मला ताई बोलो जीएसटी हिसाब कब दोगे?”, खर तर आपली बाजू स्वच्छ असेल तर सांगून मोकळ व्हाव, उगाचच गैरसमज वाढवू देऊ नये तरीही जर तुमचा धोरणात्मक निर्णय असेल तर नका सांगू पण सामाजिक असमतोल, कलम ३७१ हटवणे, सर्जिकल स्ट्राईक, नागरिकत्वाचा कायदा त्यातील सुधारणा अशा अनेक विषयांवर कोणतेच भाष्य करत नाहीत तेव्हा संशयाने लोक बोलू लागतात.

“बोला की साहेब! जळमटं वाढली की त्याचे काळे डाग कपड्याना लागतात. जळमटं स्वच्छ केली की प्रकाश वाढतो स्पष्टता येते. साहेब असे अनेक विषय आहेत लोकांना उत्सुकतता आहे. तुम्ही बोललात तर तुमच्या वरचा विश्वास दृढ होईल वाढीला लागेल. गरज नसलेल्या विषयावर बोलण्यापेक्षा भावनात्मक विषयांवर बोला. मौन सोडा व्यक्त व्हा. काही आक्षेप सरकारवर आहेत त्याला उत्तर द्या. सर्जीकल स्ट्राईक खरा की खोटा? जुने चलन व्यवहारातून अचानकपणे काढून टाकण्याचा निर्णय हा चुकीचा होता कि नव्हता हे मान्य करा त्यामुळेच अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आणि लोकांचे रोजगार बुडाले असा समज आहे तुम्ही उत्तर द्या, पण सगळ्यांनी जंग जंग पछाडून काहीच उपयोग झाला नाही. हमे कुछ सफाई देनेकी जरूरत नही है जनता जानती है।। करोना काळात अनेक राज्याच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी करोना प्रतिबंध नियम न पाळता सभा भरवल्या. हजारोंच्या संख्येने लोक सभेस आले. निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का? कोणी बोलायला तयार नाही. जणू निवडणूक होणे हा जीवन मरणाचा प्रश्न असावा.

खरच या निवडणूका तात्काळ घेणे गरजेचे होते का? या निवडणूका पुढे ढकलणे शक्य नव्हते का? करोनावर नियंत्रण आणताना आपल्या नागरिकांना लस देण्यापुर्वी तीच लस इतर देशांना देऊन काय साध्य केले? केवळ चांगुलपणा मिळवलात आणि आपल्या नागरीकांचा हक्क हिरावून त्यांना मरणाच्या दारी आपण उभे केले ती जबाबदारी कोणाची? म्हणजेच जे लाखो जिव उपचार वेळत न मिळाल्याने वारले त्याची जबाबदारी नक्की कोणाची? अन्नधान्य वाटप करतांना ते योग्य व्यक्तीना मिळण्या ऐवजी सरसकट जनतेला वाटल्यामुळे ज्यांना गरज नाही अशा व्यक्तीना अन्न फुकट वाटल्यामुळे जनतेचा कर रुपी पैसे फुकट गेले त्याची जबाबदारी कोणाची? गरज नसतांना केवळ स्वतःच्या प्रचारासाठी आपण याचा वापर केला हे खरे का?

पेट्रोलची एका महिन्यात पंधरावेळा दरवाढ करणे खरच गरजेचे होते का? केवळ या आणि अन्य अशाच ऊपायातून पैसा उभा करण्यापेक्षा जर योग्य प्रकारे करसंकलन झाले. तसेच डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, लेखापाल रोखीने व्यवहार करणारे मोठे व्यावसायिक जेथे काही किंवा बरेच व्यवहार रोखीने होतात व ते कोणत्याही कर संकलन टप्प्यात येत नाही त्यांचे व्यवहार वेळोवेळी तपासले तर त्यांच्याकडून कर जमा होईल ते ही कर संकलन कक्षेत येतील आणि सरकारी खजिन्यात राशी जमा होईल. त्यांच्या प्रामाणिकपणाचा सुर्य कधीउगवेल याची काय हमी? पण त्यांच्या व्यवहारावीषयी कोणी बोलते का? म्हणजे सगळेच भोग मध्यम वर्गीयांच्याच वाट्याला का? कोणी बोलणार नाही.



affiliate link

याचे वास्तव आम्ही अनुभवले म्हणूनच म्हणत आहे. एका वकील महाशयांनी आमच्या पाच सहकारी शिक्षकांची याचीका दाखल करतांना प्रत्येकी रू ५०,०००/ खर्च येईल असे सांगितले. याचीका दाखल झाली.एकाच कारणास्तव पाचही कर्मचारी न्यायालयात गेले होते त्यांची याचीका एकत्र होती तरीही त्यानंतर या वकील महाशयांनी शेवटच्या सुनावणीपूर्वी पून्हा प्रत्येकी पन्नास हजार मागितले मुख्य म्हणजे या बाबत कोणतीही पोचपावती नव्हती. हे उदाहरण याच साठी सांगितले की अशा बाबतीत कोणी व्यक्त होत नाही आणि या धेंडावर कारवाई होत नाही. कायदा फक्त गरीबांना शिक्षा देण्यासाठी वापरला जातो. ज्यांचे वर्चस्व चालते ते कायद्याला फाट्यावर मारून आपला व्यवहार करत असतात आणि तरीही व्यक्त व्हायचं नाही म्हणजे गुलामगिरीच. व्यक्त झाल तर कोणीतरी दुखावणार, कायद्याची भाषा सांगणार ज्याचा सल फक्त गरीब समाजालाच किंवा जे अधिकारावर किंवा सत्तेत नाही त्यांना होणार हा पायंडा असल्याने सामान्य व्यक्त होत नाही तर कुढत राहतो.

टॅक्सचा धाक गरिबाला, कित्येक डॉक्टर, पेशन्ट जवळून रोख पैसे घेतात. त्याची पोच पावती देतही नाहीत. काही निष्णात डॉक्टर मंडळींची तपासणी फी दोन तीन हजार असते, मागितली तरच पोच पावती दिली जाते पण कोण्या डॉक्टर वरती कारवाई झाल्याचं ऐकलं आहे का? यावर कोणी बोललं तर सत्य परिस्तिथी समजून घेण्या ऐवजी त्याच्यवर कारवाई होते.

सध्या विरोधी पक्षात, सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था आहे, बुजुर्ग कपिल सिब्बल बोलायला गेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना धुतले. पायलट विमान घेऊन बाहेर पडलेच होते कसे बसे पुन्हा विमान परतवण्यात मॅडम यशस्वी झाल्या. शिंदीया सरकार ग्वाल्हेर मुक्कामी गेले ही पडझड थोपवावी की सरकारवर चुकीच्या़ धोरणा करीता टीका करावी हे समजत नसल्याने आणि मुलाचे बस्तान बसवता येत नसल्याने बाई शांत शांत, आरोग्याचा प्रश्न आहेच. “अव्यक्त मी, समजून घ्या मम वेदना.” अस बाईंनी म्हणायच आणि युवराजांनी सभेत राणाभीमी थाटात बोलायच हे ठरलेलच आहे म्हणूनच आजही त्यांचा अध्यक्ष ठरत नाही. राष्ट्रीय पक्षाकडे एक लायक, समाजप्रीय जबाबदार व्यक्तीची उणीव भासावी हे ही शोभणार नाही.

“हम ने ये करके दिखाया”, “हम कर रहे है”, “हमे करना है” हम करके दिखायेंगे , राजा सगळ कर पण तूम्ही सांगता, त्याच प्रमाण करा. ते द्या, केलेल्या गोष्टींचा उल्लेख जरूर करा . जाहीर झालेल्या गोष्टी सामान्य जनतेला मिळत नसतील तर जनतेने व्यक्त व्हायच, की नाही? ते सांगा. त्यांनी बोललेल्या गोष्टींची वाच्यता करायची चोरी, कोणाच्या भावना दुखावल्या जातील आणि कोणत कलम लागेल याची खात्री नाही. जर एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असेल तर कलमांची कमतरता नाही.

तिथ उघड उघड स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते की काय अशीच स्थिती. ऊत्तर प्रदेश सरकार असो की बिहार, हरियाणा असो की आसाम, जर वरदहस्त असेल तर पदावरील व्यक्तीच्या आचार आणि विचार आणि त्यांच्या स्वातंत्र्याला लगाम कोण घालणार? निरंकुश सत्ता म्हणजे पिसाळलेला हत्ती, त्याच्या पायाखाली कोण तुडवल जात याची त्याला कल्पनाही नसते. म्हणून व्यक्त होताना लोक भीतीने गोठले आहेत पण ही सशक्त लोकशाहीची थट्टा आहे. हे चांगले नाही.

उच्च पदस्थ अधिकारी हा समतोल विचार करणारा हवा, भविष्याचा वेध घेणारा आणि राग, लोभ, क्रोध यावर विजय मिळवलेला हवा. तो ज्या गोष्टी अधिकाराने जनतेपूढे मांडतो ज्या गोष्टी जनतेला देतो तो अधिकार जनतेमुळे मिळालेला आहे या वास्तवाचे भान त्याला हवे. “अहंकाराची बाधा न हो कदा काळी आणिक भुमंडळी सुखी असो.” ही भावना रोमा रोमात असणारा हवा. ” मै तो फकीर हू, कभी भी चल पडूंगा.” या वाक्यात अहंकार नको तर सेवा, त्याग, समर्पण हवे. अन्यथा फकीरांच्या वाट्याला उपहास आल्याची उदाहरणे अनेक आहेत. आमचे कित्येक बाबा तिहारची हवा खाऊन आलेले आहेत त्यांच्या फकीर, साधू शब्दातला फोलपणा त्यांना आणि जनतेलाही कळला आहे. काल एक जेष्ठ व्यक्ती भेटली म्हणाली जो आपल्या वेदना कोणाकडे मांडत नाही योजना कुणाला सांगत नाही आणि सुख दुःखात स्थिर रहातो तो साधू पदाला पोचतो.



affiliate link

भगवी वस्त्रे घालून जर अहंकार जाळता आला नाही. त्या भगव्या आडून चुकीची धोरण राबवली गेली तर त्याचा साधूपणा समाजासाठी अव्यक्तच राहीला. वस्त्रालंकार किंवा प्रवचन यामधून व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून व्यक्त होणे कधीही साजरे तेव्हा व्यक्त होतांना समाजापेक्षा आणि अर्थात देशापेक्षा मी मोठा नाही ह्या भावनेचा आदर करून व्यक्त व्हा तर तुमच्या देहातील अव्यक्त देवाची लोक पूजा बांधतील. संतपद तेव्हाच मिळते जेव्हा ते मिळण्यासाठी सोस कुणी करत नाही.

गाडगेबाबांना संतपद समाजाने दिले. ते त्यांच काम करत राहिले. त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली हेटाळणी आली तरीही ते आपले विचार कृतीतून मांडत राहिले. मदर तेरेसा यांनाही संतपद समाजाने किंवा चर्चने दिले. त्याही पिडितांची सेवा करत राहिल्या. तेव्हा भगवी किंवा श्वेत वस्त्रे परिधान करून कुणी साधू बनणार नाही. तो आचरणाने बनेल. आज डॉक्टर बंग, डॉक्टर कोल्हे, डॉक्टर आमटे हे परिवार काम करत आहेत. टीका टिप्पणी होत राहते. गरज असेल तेव्हा लोकांच्या शंकांचे निरसन करावे लागते. जन निंदा टाळायची असेल तर चारित्र्यावर डाग पडू नये म्हणून कठोर परीक्षा दयावी लागते. राम त्यापासून पळ काढू शकला नाही, सामान्य माणसाची काय कथा. गोर गरीबांची सेवा करून तो संतपदी जाईल. पण संतपदी गेल्यानंतरही टिका होत रहाते. ही टिकाही स्थितप्रज्ञ राहून तुम्हाला स्विकारता येते का? किंवा तुमच्या आचरणावर टिका करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही न रागावता समजावून सांगू शकता का? तरच तुम्ही संतपदी पोचाल, तरच तुम्ही करत असलेल्या सेवेला महत्त्व येईल.

तेव्हा व्यक्त होणं ही लहान थोर, गरीब ,श्रीमंत, शिक्षित, नावसाक्षर प्रत्येकाची भावनिक गरज आहे. व्यक्त होण्यामुळे संभ्रम दूर होतील. आपल्या बद्दल क्लिमिश नाहीसे होईल.हा केवळ आशावाद नाही तर ही सत्यता आहे. म्हणून व्यक्त होताना कुणाच्या भावनांचा अनादर करू नका. कोणाला हीन लेखू नका, कुणाची पुज्य स्थळे, व्यक्ती यांच्यावर टीका, टिप्पणी टाळा. आपल्या व्यक्त होण्यामुळे कोणा निरपराध व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत, त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची सामाजिक किंवा राजकीय मानहानी होणार नाही.त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. परंतु चुकीचे निर्णय, चुकीच्या चालीरीती, चुकीचे समज ह्यावर चर्चा आणि टीका आवश्यक आहे. त्यावर व्यक्त झालं तरच सुधारणेला वाव राहील.

“निंदकाचे घर असावे शेजारी.” असं म्हणूनच चालणार नाही तर शेजारी निंदा का करतो ते समजूनही घ्याव लागेल, गरज भासल्यास जशास तसा ठोसा ही द्यावा लागेल अर्थात बळाचा नव्हे तर विचारांचा ठोसा. पण उठसूठ कुणाही बाबत केवळ टिका करावी म्हणून व्यक्त होण चुकच कारण दुसऱ्या व्यक्तीवर टिका करतांना आपल्या पायाखाली काय जळत याची कल्पना अनेकदा नसते . असो माझ्या विचारांवर लेखणीतून व्यक्त होण्यास हरकत नाही. गैरसमज नसावा लोभ आहे तो वाढावा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “व्यक्त मी अवक्त मी

  1. Sagar Sidhu Patil
    Sagar Sidhu Patil says:

    खरे आहे सर आजच्या वर्तमान काळात तुमचा लेख तंतोतंत जुळतो. आजही डॉक्टर लोक कॅश मध्येच पैसे घेतात. चेक नको म्हणतात.

  2. zovre lioptor

    I have not checked in here for a while as I thought it was getting boring, but the last few posts are great quality so I guess I?¦ll add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂

Comments are closed.