श्रद्धा वालकरच्या निमित्ताने

श्रद्धा वालकरच्या निमित्ताने

गेल्या आठवड्यात श्रध्दाच्या हत्येची बातमी ऐकली आणि अंगावर काटा उभा राहिला, ज्या थंड डोक्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन ते नोएडा सारख्या गजबजलेल्या शहरातील एका भागात नष्ट करण्यात आले हे ऐकता आफताब याची जेवढी निंदा करावी तेवढी थोडी. श्रध्दाच्या भावाने आणि वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये कंम्पेंट नोंदवून बरेच महिने झाल्यानंतर आफताब पुनवाला याला संशयित म्हणून अटक झाली पण पोलीस त्याला या गुन्ह्याबद्दल शिक्षा देण्यात यशस्वी होतील? आजही काही अरब देशात बलात्कार करणाऱ्या नराधामला ठेचून मारण्याची जाहीर शिक्षा दिली जाते आणि भारतातील कायदे आणि पोलीस पुरावे गोळा करण्यात पुढील पंचवीस वर्षे घालवते. आफताब पुनावालासारखे गुन्हेगार पुरेशा पुराव्या अभावी जामीन मिळवून पुन्हा नवीन सावज हेरायला मोकाट सुटतात. ज्या कुटुंबातील मुलगी गेली त्यांना न्याय कोण देणार? या प्रकरणी आफताब दोषी आहेच यात शंका नाही पण या तरुण मुली या समाजकंटकांच्या जाळ्यात अडकतात त्याला कारण आहे चंगळवाद. मौजमजा करण्यासाठी तरुण मुली आणि अर्थात मुलं परिणामाची फिकीर न करता कोणत्याही थराला जातात हेच ते दुर्दैव.

मोबाईलवर दाखवल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरील शॉर्ट फिल्म बघून अनेक तरुणी वाहवत जातात आणि त्या फिल्ममध्ये चित्रित केलेलं जीवन आपण जगावं,जीवनात मौज करावी, स्वप्न पूर्ण करावी म्हणून कोण्या सोम्यागोम्याच्या मोहाला बळी पडतात. “तो” आपण किती श्रीमंत आहोत, याचं नाटक चांगलं वठवतो आणि ती हुरळून जाते. त्याच्या खोट्या प्रेमात स्वतःला गुंतवून घेते. त्याचा शेवट तिच्या दुर्दैवी हत्येत किंवा आत्महत्येत होतो. गेल्या वर्षभरात अशा पस्तीस घटनांची नोंद झाली,मरणारी मुलगी हिंदू की अन्य धर्मीय हे क्षणभर बाजू ठेऊन विचार केल्यास भयानक वास्तव नजरेस येते. उत्तर प्रदेश किंवा मध्यप्रदेश येथे मुलींना फूस लावून किंवा पळवून नेऊन लग्न केल्यानंतर तिचे धर्मांतर केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत, “लव्ह जिहाद”, खरे की खोटे? हा ही प्रश्न बाजू ठेऊन विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती ही की, सुशिक्षित, सोज्वळ आणि रुबाबदारपणाचा बुरखा पांघरून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे नराधम समाजात मोकाट वावरत आहेत, ते कोणत्या धर्माचे वा जातीचे हा प्रश्न नंतरचा, पण दुर्दैवाने मुली त्याच्या रुबाबदार बोलण्याला आणि श्रीमंतीच्या खोट्या भपक्याला मुली भुलत आहेत. आपणहून जीव धोक्यात टाकत आहेत.

मुलांच्या बोलण्याची, उमद्या लकबीची, तिच्यासाठी मॉलमध्ये केलेल्या महागड्या वस्तूच्या खरेदीची, मोठ्या हॉटेल मधील पार्टीची छाप तिच्यावर अशी पडते की ती दिवाणी होते. त्याच शिक्षण काय? तो करतो काय?त्याचे आई वडील काय करतात? एवढे पैसे कुठून खर्च करतो?
याची कोणतीही शहानिशा करण्याची गरज तिला भासत नाही. त्याच्या प्रेमाचं गारुड तिच्या मनावर अस काही चढत की ती घरातील जेष्ठ व्यक्तींचा सल्ला जुमानत नाही, आपण स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सज्ञान आहोत, होणाऱ्या परिणामाला सामोर जाण्याची बुद्धी आणि कुवत माझ्याकडे आहे अस पालकांना ठणकावून सांगते आणि स्वतः नको त्या ज्याळ्यात गुरफटून जाते. कुटुंबाबरोबर कटुता घेतल्याने परतीचा रस्ता बंद होतो आणि एकाकी जीवन सुरू होतं, ज्याचा शेवट श्रद्धा वालकरसारखा भयानक होतो. ही क्रूरता या मुलांच्या मनात कुठून येते? या पूर्वीही श्रद्धाला मारहाण केल्याचा तक्रार पोलीस ठाण्यात तिने केली होती. किती निष्ठुर आणि निर्दयीपणे आफताबने श्रद्धाला जीवनातून संपवले ते पाहता त्याच्या मनात गुन्हेगारी विचार किती खोलवर रुजले होते ते जाणवते. गेल्या दोन तीन दिवसांपासून तिच्या बाबत तपास यंत्रणा जी माहिती देत आहे ती प्रचंड संतापजनक आहे या मुलींनी वसई पोलिस ठाण्यात या आफताब बद्दल लेखी तक्रार देऊन तो आपले तुकडे तुकडे करून ठार मारणार आहे असे सूचित केले होते तरीही त्या तक्रारी बाबत पोलीस यंत्रणा थंड राहिली आणि या घटनेचा शेवट तिच्या हत्येत झाला.

कोणताही धर्म, कोणताही पंथ दुसऱ्या व्यक्तीचा जीव घ्या शिकवत नाही पण हा कट्टरपणा इतर धर्मापेक्षा मुस्लिम धर्मात का जाणवतो? तेच कळत नाही,नक्कीच इस्लाम आणि प्रेषित महंमद पैगंम्बर यांची ही शिकवण नव्हे मग हा दुष्ट विचार या तरुण मुलांच्या मनात येतो तरी कुठून? मदारशामधून याचं बाळकडू पाजलं तर जात नाही ना? सर्व सामान्य शाळा उपलब्ध असताना अशा मदरशांची गरज काय? जर या मदारशात धार्मिक शिक्षण, उर्दू भाषा किंवा तत्वज्ञान याच ज्ञान दिल जात असेल तर ठीक पण चुकीचं शिक्षण दिल जात असेल आणि धार्मिक कडवटपणा जोपासला जात असेल तर ते त्वरित थांबवलं पाहिजे. या मदरशांना सरकारने अनुदान देण थांबवावं किंबहुना त्यांना चोरमार्गाने आर्थिक मदत मिळत असेल तर त्यावर बंदी घालावी. अन्यथा लहान मुले आणि तरुण पिढीला चुकीचे धार्मिक शिक्षण मिळाल्यास भविष्यात धार्मिक दंगे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुलींच्या अल्लड वागण्याचा आणि तिच्या अवाजवी अपेक्षांचा गैरफायदा घेऊन जे गुन्हे करतात त्यांना त्यांच्या जवळच्या महिला आप्तांच्या बाबतीत हीच घटना घडली तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? जेव्हा ही मुलं अन्य मुलींशी “लिव्ह इन रिलेशन” मध्ये जातात. मुलींना आपला धर्म स्वीकारायला भाग पडतात,इतकंच नव्हे तर बुरखा किंवा अन्य कपड्यांची जबरदस्ती करतात. तेव्हा मुलींनी सावध पवित्रा घ्यायला नको का? प्रेम करण्याचं नाटक वठवून तिचं लैंगिक शोषण करायचं आणि तिची कोंडी करून तिला धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचं हा धार्मिक कडवटपणा येतो कुठून? दुर्दैवाने मदारशातुन दिलं जाणार धार्मिक शिक्षण त्याला धर्मांध बनवत असेल आणि गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळवत असेल, इतर धर्माचा अनादर शिकवत असेल तर ती बाब खरच खूप गंभीर आहे. मुस्लिम धर्मातील विचारवंतांनी यावर विचार केला पाहिजे. तुमच्या धर्माची आणि समाजाची कोणती प्रतिमा तुम्ही समाजापुढे ठेऊ इच्छिता? त्याचा विचार करा.

श्रध्दाच्या या प्रकरणाने मला चाळीस पन्नास वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवली. ज्या मुलीबद्दल मला अचानक आठवण झाली ती आज ती या जगात नाही, पण तिच्या हिमतीला दाद द्यायची की तिच्या वर्तनाला दोष द्यायचा याबद्दल गेल्या पन्नास वर्षात मी विचारही करु शकलो नाही. बहुधा तेव्हा बोर्डाच्या परीक्षेत ती शाळेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांत आली होती आणि स्वतः ठरवून डीएड पूर्ण करून शिक्षिका झाली होती. तिच्या नशिबाने तिला तात्काळ झेड पी मध्ये प्राथमिक शिक्षिकेची नोकरी लागली. काही महिन्यांनी, एक दिवस सर्वत्र बातमी पसरली तिने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पर धर्मीय मुलाशी पालकांच्या परवानगी शिवाय पळून जाऊन लग्न केले. तेव्हा तिचा निर्णय हा धक्कादायक होता.ग्रामीण भागात तर अतिशय क्रांतिकारी होता. बरं ज्या मुलाशी तिने लग्न केलं तो काही सरकारी किंवा खाजगी कंपनीत हुद्द्यावर नव्हता. तरीही त्याने तिच्यावर छाप पाडली हेच आश्चर्य, त्याची कमाई जेमतेम कुटुंबाच भागू शकेल इतकी असावी. त्याचा व्यवसाय टपरीछाप दुकानात चालत होता आणि तिची सरकारी नोकरी अशा या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा झाली नसती तरच नवल.

पण आंतरधर्मीय लग्नानंतरही तिच्या बाबतीत काही चुकीचे घडल्याचे ऐकायला मिळाले नाही. तिचा ना सासारी छळ झाला. ना दोन कुटुंबात हाणामाऱ्या झाल्या, ना तिला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती झाली. तेव्हा माध्यमे मर्यादित असल्याने ती बातमी गावापुरती राहिली. त्याचा उद्रेक हा गावापुरता राहिला. आता आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम विवाह करून, महिना दोन महिन्यात जसा छळ सुरू होतो किंवा मुलींचा हकनाक बळी जातो तसा, ना कोणाचा बळी गेला ना गावाने त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला. अर्थात वेगळ्या धर्माच्या मुलाशी लग्न केल्याने दोन कुटुंबात काही काळ वितुष्ट आलं पण तिला बाळ झाल आणि सगळ सुरळीत सुरू झालं.

आज तिचा मुलगाही विवाहित आहे. खरं तर गेल्या तीसचाळीस वर्षात एक दोन वेळा ती ओझरती दिसली, कधी काळी आम्ही एकाच वर्गात होतो म्हणून कधी दिसली तर दुरून हात करत होतो. कामाच्या गडबडीत प्रत्यक्ष बोलण झालंच नाही. जेव्हा रिटायर झालो आणि शाळेतील सर्व मित्रमैत्रीणी समाज माध्यमातून जवळ येण्याचा विचार करत होतो तेव्हाच ती या जगातुन परतीच्या प्रवासाला गेली होती. त्यामुळे तिचा अनुभव कळू शकला नाही.

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात कुर्ला येथे आंतरधर्मीय विवाहित मुलीची जाळून हत्या बातमी वाचली आणि गेले काही दिवस श्रद्धाचे पस्तीस तुकडे केल्याचे वाचनात येत आहे. अंगावर या क्रूर घटनेने काटा उभा राहिला आणि अचानक तिची आठवण झाली. पंचेचाळीस वर्षांपूर्वी तिने आंतरधर्मीय लग्न करूनही ते निभावल हे आज खर वाटत नाही. करोनाकाळातच ती दोन वर्षांपूर्वी ती वारली होती तेव्हा ग्रुपवर RIP संदेश टाकण्यातच मी धन्यता मानली होती.

चाळीस वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्नाला विरोधच होता पण पत्नीचा बळी घेण्या एवढा कडवटपणा नात्यात नव्हता मग आजच नेमक अस काय घडतय आणि ही मुल हिंसक का वागू लागली? हा हिंसकपणा त्यांनी कुठून आत्मसात केला. चित्रपट आणि ओटीटी प्लँटफॉर्म यांचा प्रभाव तर यांच्यावर नाही ना?

कालपरवा वसईत आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याने स्वागत सोहळा आयोजित केला होता. या स्वागत सोहळ्याचे निमंत्रण व्हाट्सआप ग्रुपवर फिरत होते. श्रध्दाच्या उघड झालेल्या घटनेने समाजात जी प्रतिक्रिया उमटत होती त्या प्रसंगाने तो त्यांना रद्द करावा लागला. पक्षाचे नेते आणि वर्तमानपतत्रे आंतरजातीय विवाह किंवा आंतरधर्मीय विवाहांना धार्मिक रंग देतात आणि समाजात तेढ निर्माण करतात. आपण विशिष्ट जातीधर्माचे कैवारी आहोत असा आव आणत त्या घटनेला नको तेवढे महत्त्व देतात. माध्यमे आपला टीआरपी वाढवण्यासाठी बातमीत रंजकता निर्माण करतात आणि सामाजिक तेढ वाढवतात, ती होऊ न देणे चांगल्या माध्यमांची जबाबदारी आहे.

पत्रकारिता इतक्या खालच्या थराला गेली आहे की एखाद्या घटनेची दाहकता वाढवता यावी या करता त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रेक्षकांना दाखवून आणि उगाचच न निर्माण झालेला प्रसंग घडला असता अशी कल्पना करून मुलाखत घेतली जाते. त्याच्यां तोंडी स्वतःचे शब्द घालून वाचक आणि प्रेक्षकांना संभ्रमित अवस्थेत नेण्याच काम व्हिडीओ जर्नालिस्ट करतात. हे वेळीच थांबवण गरजेचे आहे. निकोप पत्रकारिता समाज घडवते आणि बेफाम पत्रकारिता समाज बिघडवते आणि बुडवते.

दुसऱ्या एका प्रकरणी, माझ्या मित्राच्या बहिणीने कॉलेज पूर्ण होताच पळून जाऊन विवाह केला दोन कुटुंबात प्रचंड वितुष्ट आले. कोर्ट कचेऱ्या झाल्या. ती सज्ञान असल्याने कोर्टाने तिच्या लग्नास पालक आक्षेप घेऊ शकत नाहीत असा निर्णय आणि निर्वाळा दिला. एकाच गावात राहिले तर वाद होणारच म्हणून ती शहर सोडून निघून गेली. काही वर्षे मित्राच्या आई वडिलांनी तिची तिची दाद फिर्याद घेतली नाही पण तिच्या पतीच अकस्मात निधन झालं आणि मग मात्र मित्राचा परिवार तिच्या मदतीला धावून गेला. जावेच लागले, त्या मुलीला तिच्या सासरच्या मंडळींनी कोणतेही साह्य करण्याचा मोठेपणा दाखवला नाही. मुलींनी हे समजून घेतलं पाहिजे, तुमचे आई बाबा हेच तुमच्या कठीण प्रसंगात तुमची काळजी घेण्यासाठी धावून येतात.

काळ निघून गेला की मनावर झालेल्या जखमा हळूहळू बुझून जातात. सांगण्याचा मुद्दा इतकाच की ऐतिहासिक काळातील दिल्लीत अकबर बादशहा-जोधा असो असो की पुण्यातील पेशवे-मस्तानी. दोन वेगळ्या धर्मीतील मुलामुलींच्या लग्नाला तेव्हाही समाजमान्यता नव्हती आणि आजही नाही. पुरुष आंतरधर्मीय लग्न करूनही मानाने जगतात पण आजही स्त्रीया भरडल्या जातातच. तेव्हा जी प्रेमप्रकरणे झाली त्यांनी सर्व संकटाचा सामना करत आपले प्रेम जपले, अजरामर केले पण आज नक्की काय सुरू आहे? मुली खोट्या वैभवाला आणि भपक्याला भुलतातच कशा? प्रेमात पडण्यापूर्वी त्यांची वैचारिक क्षमता आणि बुध्दी कुंठित का होते? समाजात घडत असलेल्या अशा अनेक घटना ऐकल्यावर, पाहिल्यानंतर स्वतःच्या जीवनाची शोकांतिका का करून घेतात?

आजतागायत दोन भिन्न धर्मीय मुलांची लग्न झाली तेव्हा सामाजिक बहिष्कार किंवा मुलगा अथवा मुलीच्या कुटुंबातील लोकांना माराहाण अशा अनेक घटना घडल्या आणि निष्पती स्त्रीला त्या त्या काळात दोन्ही घरांनी चुकीच्या नजरेनेच पाहिले. घडल्या प्रसंगाला ती एकटी जबाबदार नसतांना अन्याय मात्र तिलाच सहन करावा लागला. मग राजा भारमलची बहिण असो की अन्य कोणी, तिला कुटुंबात मिळणारी वागणूक आणि दर्जा नाकारले गेल्याचीच उदाहरणे जास्त आहेत.

बाजीराव मस्तानी प्रकरणी मस्तानीला आयुष्यभर मानसिक हेटाळणी सहन करावी लागली. असं असलं तरी त्यांच्या जगण्याच्या पध्दतीत त्यांना फरक करावा लागला नाही. मुघल सलतनीत राहुनही जोधा कृष्ण उपासना करू शकत होती. कदाचित हे उद्दातीकरण खोटं असू शकेल पण ते पसरवण्यात त्यांना यश आलं.

उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा ह्या राज्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात, आंतरजातीय विवाहावर जाचक बंधने आहेत. मुलीनी जर परधर्मातील मुलाशी प्रेम केल हे पालकांना कळाले तरी जन्मदाते पालक त्या मुलीच्या जीवावर उठतात. एकतर बळजबरीने तिचे अन्य मुलाशी लग्न लाऊन देतात किंवा मुलीने पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिचे आयुष्य संपवून टाकतात. तिला स्वतःच्या जीवनाविषयी निर्णय घेण्याचा, स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार ते देत नाहीत.यदाकदाचित मन मोठ करून पालकांनी अशी अनुमती दिली तर समाज त्या कुटुंबाला वाळीत टाकतो. म्हणूनच पालक भिन्न धर्मिय लग्नाला किंवा आंतरजातीय विवाहाला अनुमती देत नाहीत. मुलं सज्ञान असतील तर पालकही त्यांच्या लग्नाला विरोध करू शकत नाहीत. तरीही समाजाला जर असे आंतरजातीय विवाह मान्य नसतील तर अगदी कोर्टाने संरक्षण दिले तरी त्यांच जगणं सुकर नसते. धर्माविषयी एवढा कडवटपणा या राज्यात दिसतो. गुजरातही याला अपवाद नाही .

गेल्या काही वर्षात जग छोटं होत गेलं. शहरातील वास्तव्य आणि शिक्षण व नोकरी यांच्या ठिकाणी सहज होणारी ओळख वा संपर्क यामुळे दोघ वेगवेगळ्या कारणांमुळे एकमेकांना भेटू लागले. शिक्षणामुळे आणि वाचनामुळे शहरातून जातिभेद वा धर्मभेद तुलनेने कमी झाला आहे. त्यामुळे शहारात आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढले आहे. काही मोजके उदाहरणे सोडली तर समाजही अशा घटना स्विकारू लागला आहे. स्त्री ही कुटुंबातील मालकी हक्काची वस्तू नाही तिचा निर्णय घ्यायला ती समर्थ आहे हा विचार वाढीस लागतो आहे.

गेल्या काही वर्षात प्रेमविवाह करून वर्षभरात घटस्फोट घेतलेल्या जोडप्यांची संख्या वाढत आहे.अर्थात सर्व धर्मात आणि जातीत हा प्रकार होत आहे. अगदी एकाच समाजातील मुला-मुलीचा प्रेमविवाह विवाह झाल्यानंतर तो टिकेल याची शाश्वती कमी याचे कारण दोघांमधील वैचारिक मतभेद, परस्परांविषयी असलेले गैरसमज आणि संशयी वृत्ती आणि जीवनशैलीत फरक.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न असेल तर दोन घरातील मुलामुलींच्या आचारविचार आणि संस्कार यात फरकही पडतो. मुली आर्थिक दृष्टीने स्वावलंबी असल्यास विचार जुळले नाही किंवा तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मुलांकडून गदा येत असेल तर विभक्त होणं पसंत करते. संसारात खुरटत जगण्यापेक्षा आणि मानसिक आणि शारीरिक छळ होण्यापेक्षा सांमजस्य दाखवत अलिप्त होणे योग्य या निर्णयाप्रत मुली येतात. आर्थिक दृष्टीने स्वावलंबी असल्याने तिला हे शक्य होते पण अशिक्षित किंवा स्वावलंबी नसणाऱ्या स्त्रियाना हे स्वातंत्र्य नसते. पालकच तिने नवऱ्याशी जुळवून घ्यावे म्हणून आग्रही असतात.
याचा परिणाम नवऱ्याचा अन्याय सहन करत ती त्याच्या सोबत शरीराने राहते पण जगणे असाह्य झाले की स्वतः चे जुवन संपवून टाकते. पालकांनी आपल्या मुलींसाठी नवरा पाहताना मोठे घर, श्रीमंत स्थळ, नावलौकिक न पाहता मुलाचा स्वभाव, त्याचे शिक्षण, त्याची समज पाहुन विचार पुर्वक निर्णय घेतला गेला पाहिजे. केवळ मुलाची श्रीमंती, मुलीच्या संसाराला स्थिरता देऊ शकणार नाही.तर त्याची आपल्या सहचरणीला समजून घेण्याची संमजस भूमिका स्त्रीला सुख देऊ शकेल.

स्त्रीवर होणारा अन्याय हा आंतर जातीय किंवा धर्मीय लग्नामुळेच होतो, अमुक धर्मात होतो आणि त्या धर्मात होत नाही किंवा या जातीत होतो आणि त्या जातीत होत नाही अस मुळीच नाही.कुटुंबाने भिन्न जातीय किंवा धर्मातील लग्नाला मान्यता दिली किंवा स्विकारलं तरी सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली समाज त्या लग्नाला स्विकारत नाही. धार्मिक कार्यात त्यांना सहभागी होऊ देत नाही. स्वतःच्या जाती-धर्मात परंतु पालकांच्या अनेच्छेने, मुलाचा सामाजिक स्तर न पाहता लग्न केले तरी पालक नाराज होतात. त्या मुलीला वा मुलाला आपल्या कुटुंबातील संपत्तीत कोणताही हक्क किंवा अधिकार मिळू नये या साठी ते दबाव आणतात.

जोपर्यंत पती पत्नीमध्ये सांमजस्य असत तो पर्यंत कौटुंबिक विरोधाची धार बोथट असते. कौटुंबिक छळ वाढला तर जोडपे घर सोडून दूर जाऊ शकते. सामाजिक बंधनांचा तात्काळ काही परिणाम जाणवतही नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष नवराच छळ करू लागतो किंवा कुटुंबाची बाजू घेतो तेव्हा मुलीचे जीणे हराम होते. अशिक्षित घरात या घटना मोठ्या प्रमाणात घडतात पण शिक्षीत कुटुंबात सुनेवर कटू प्रसंग ओढवतो तेव्हा आश्चर्य वाटते. सुशीलकुमार शिंदे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी पन्नास वर्षांपूर्वी जे धाडस दाखवल आणि त्यांच्या पालकांनी त्यांना सक्रीय पाठींबा दिला ते नक्कीच समाज परिवर्तनासाठी चांगले पाऊल ठरेल.

आज मराठी किंवा हिंदी सिरीयलमध्ये किंवा चित्रपटात काम करणाऱ्या मुली, डॉक्टर या व्यवसायात असणारे तरूण तरूणी किंवा अगदी पत्रकारिता क्षेत्रातील तरुण, तरूणी कामानिमित्त बराच काळ एकमेकांच्या सहवासात असतात. त्यामुळे त्यांची मैत्री होते. व त्या त्याच क्षेत्रात काम करणारा आपला जोडीदार निवडतात या मागे उद्देश असतो की त्यांनी तिच्या अडचणी समजून घ्याव्यात. तिच्या कामाच्या वेळा, टिकून राहण्यासाठी त्यातील स्पर्धा आणि आव्हाने त्याच्याही परिचयाची असतात. मात्र संमजस भुमिका नसेल आणि शिक्षण, नोकरीतील हुद्दा वा उत्पन्न यांच्यात तफावत असेल तर अनाहूतपणे दोंघापैकी एक याचा उल्लेख घरगुती भांडणात करतो आणि मतभेद उघड्यावर पडतात. “अति परिचयात अवज्ञा” या उक्तीप्रमाणे त्यांच्यातील उणीवा एकमेकांना प्रकर्षाने जाणवू लागतात मग वेगळे होण्याला पर्याय उरतच नाही.

शारीरिक आकर्षणाने जेव्हा दोघे जवळ येतात तेव्हा फार काही विचार केलेला नसतो. तिचे सौंदर्य तर त्याची निर्भीड आणि झोकून देण्याची वृत्ती किंवा सांपत्तिक स्थिती ही बलस्थाने असतात. समान विचार किंवा समान ध्येय किंवा समान आव्हाने यामुळे ते एकत्र आलेले असतात. तेव्हा त्यांनी त्यांच्या जाती किंवा धर्माचा किंवा संस्कृतीचा विचार केलेलाच नसतो. “समान शीले व्यसनेषु सख्यम” या न्यायाने ते जवळ आलेले असतात.आधी आकर्षण मग एकमेकांना वाटणारा आदर किंवा त्यांच्या भुमीकेला वाहिन्यांवर मिळणारा प्रतिसाद किंवा त्यांच्या क्षेत्रातील कार्यपद्धती यामुळे ते जवळ येतात. पण ही ओढ दिर्घकाळ टिकेल की कसे? हे माहिती नसते. कालांतराने एकमेकांना जोडीदारातील उणिवा दिसू लागतात. भांड्याला भांडं आपटू लागत. मीच का? याचं उत्तर सापडेनास होतं. त्याच्या किंवा तिच्या सवयी खटकू लागतात. त्यांची संस्कृती आणि घरातील वातावरण भिन्न असेल. त्यांच्यात परस्परांतील विश्वासाचे नाते नसेल तर त्यांचे असे लग्न किती काळ टिकेल? हे सांगणे तसे अवघड.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “श्रद्धा वालकरच्या निमित्ताने

  1. गोविंद सामंत
    गोविंद सामंत says:

    👌👍

    1. YESHWANTRAO TAHASHILDAR
      YESHWANTRAO TAHASHILDAR says:

      आजकालच्या मुलामुलींची वास्तविकता दाखवणारा अप्रतिम लेख

      1. Mangesh kocharekar
        Mangesh kocharekar says:

        तहसीलदार अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    2. Mangesh kocharekar
      Mangesh kocharekar says:

      सामंत अभिप्रायाबद्दल धन्यवाद. दर गुरुवारी मी
      लेख किंवा कविता पोस्ट करतो. आपणास त्या पोस्ट कशा वाटतात जरूर कळवा. जरी आवडली नाही किंवा आक्षेपार्ह वाटली तरी नक्कीच कळवा. आपल्या अभिप्रायाचे स्वागतच असेल.धन्यवाद

Comments are closed.