माझ्या बद्दल कोणी काही लिहेल या भ्रमात मी कधीच नव्हतो, कसे असणार? काय माझे कर्तृत्व जेणेकरून कोणी काही लिहावे? पण मी गेल्यावर काय!  कोणी माझी आठवण ठेवेल की नाही याचा विचार मनात आला आणि मनाशी ठरवलं,आपणच आपल्याबद्दल चार ओळी लिहून ठेवाव्यात. कुठून सुरुवात करावी? काय काय लिहावं? काय टाळावं? असा सगळा जांगडगुत्ता होताच, म्हणजे लिहून सांगण्यासारखे आणि लोकांनी वाचण्यासारखे काही आहे की नाही हे ठरवण्यात बराच वेळ गेला. निर्णय होत नव्हता पण लिहिले तर पाहिजे, म्हणून स्वतः हट्ट केला तेव्हा जमेल तसे लिहावे म्हणून सुरवात केली. मी किती वर्षांचा असताना वडील वारले ते नीट आठवत नाही पण लहानपणी घरी सुबत्ता होती, वडील बँकेत अधिकारी होते एवढं ऐकून होतो. घरी खूब माणसांचा राबता होता, पै पाहुणे भरपूर. त्यांची उठबस करण्यात आई आणि आजीचा वेळ जायचा. आम्ही म्हणे जमीनदार, शेकडो एकर जमीन नावावर होती पण ती कुठे हे मी अगदी घोडा झालो तरी माहीत नव्हतं. मी पाच भावंडांच्या पाठीवर शेंडेफळ त्यामुळे सर्वांचा लाडका आणि दुर्लक्षित. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? लाडका पण दुर्लक्षित!

तसं त्या काळी कोणतेच पालक आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती विचारत नव्हते. मुलगा नक्की कोणत्या इयत्तेत हे सुद्धा नीट आठवत नसे, कोणी त्यांना माझ्या इयत्तेविषयी विचारले की ते मला हाक मारून सांगत, “इकडे ये,आपल्या पाहुण्यांना तुझी इयत्ता स्वतः च्या तोंडाने सांग.”

यातली खरी गोम हीच होती की सहा मुलांपैकी कोणते मूल कोणत्या इयत्तेत हे त्यांना आठवत नसे. उगाच शोभा करून घेण्यापेक्षा आम्हाला तोफेच्या तोंडी दिले की ते नामानिराळे. मग मी येऊन माझे नाव, इयत्ता, शाळा असे सांगितले आणि पाहुण्यांना नमस्कार केला की वडिलांना हायसे वाटे, पण कधी कधी पाहूणा नको तो प्रसंग आमच्यवर आणत असे, “हू, काय नाव म्हणालास? त्या नावाचा अर्थ माहीत आहे का? हू, जरा एकोणीस चा पाढा म्हणून दाखव पाहू!” असे अडचणीत टाकणारे प्रश्न विचारावे असे त्या पाहुण्याला का वाटे देव जाणे? असली कुबुद्धी त्यांची दुसरे काय. त्यांनी असे प्रश्न विचारले  की आमचा पंचनामा ठरलेला, मी काही बोलत नाही हे पाहिलं की वडील ओरडून म्हणत,  “अरे दगडोबा, नुसता षंढासारखा का उभा? शाळेत जातोस की हजामत्या करतोस?”  आमचा पंचनामा सुरू असताना आतल्या खोलीतून, अरे रे! असे ऐकू येई. शेवटी त्या पाहुण्याला दया येई “साहेब नका रागावू, बहुतेक मला पाहून भीतीने तो विसरला असावा असू द्या, बाळा पुढच्या वेळेस न भीता सांग हो, हे घे खाऊ.” असे म्हणत एक ग्लुकोज बिस्कीट पुडा हातावर ठेवीत. मी नको नको असे म्हणत पाठी सरकण्याचे नाटक करत असे, ते हात ओढत माझ्या हाती तो बिस्कीट पुडा ठेऊन म्हणत, “वाटून खा हो!”  जणू त्यानां माहीत असावं की मी तो बिस्कीट पुडा एकटाच गट्टम करणार आहे. तर असा मी. 





माझी थोडीशी ओळख एव्हाना झालीच असेल.असो! तर टेकू लावत लावत मी दहावी पार केली, काठावर का होईना पण पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो.मला याचा कोण आनंद, पण हा आनंद मला लाभावा अशी दैवाची इच्छा नसावी कारण माझ्या इयत्ता पूर्ण होण्याच्या  दरम्यान वडील हे जग सोडून निघून गेले होते आणि घराची सूत्रे मोठ्या भावाकडे गेली होती. “आमचा विकास एकदाचा पास झाला.”,असे म्हणत त्यांनी आमच्या वाडीतील सर्वांना पेढे वाटले. कदाचित हे नक्षत्र पास कोठचे होते अशी शंका त्याच्या मनी असावी पण पास झालो हे सत्य होते, दोन विषयात कृपांक होते ती बाब वेगळी. चला सुटलो यांच्या जाचातून असे मला मनोमन वाटले. पूढे काय? हा प्रश्न माझ्या मनात आला, माझ्या थोरल्या बंधूंनी मला काही न विचारता माझे ऍडमिशन कीर्ती कॉलेजमध्ये घेऊन टाकले आणि म्हणाले, “विकास,पुढच्या सोमवारी कॉलेज सुरू होईल तू सकाळी सात वाजता तेथे जा, बाकी सगळे तुमचे प्राचार्य सांगतील.”

मी त्या प्रमाणे गेलो. मला कशासाठी प्रवेश घेतला आहे हे सुद्धा नीट ठाऊक नव्हते ते विचारावे याची तसदी मी घेतली नव्हती. कॉलेजमध्ये जाण्याचा उत्साह होता कारण कॉलेज म्हणजे धम्माल हे समीकरण डोक्यात होते, मी एका मोठ्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी बसतात म्हणून बसत होतो. एक दिवस आमच्या वर्गावर उपप्राचार्य आले आणि त्यांनी फळ्यावर Biology अस लिहिलं आणि तोंडाचा पट्टा सुरू केला किती वेळ ते cell cell अस बडबडत होते. फळ्यावर आकृती काढून त्याच्या भागांना नाव देत होते, काही वेळानी मला ही आकृती मी यापूर्वी पहिल्याच आठवलं ती वनस्पती पेशी होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की बहुदा हे महाशय जीवशास्त्र शिकवत असावेत, मला तशीही विज्ञानाची भीती वाटे, थोड्या वेळाने ते आमच्या बाका शेजारी आले. माझी वही त्यांनी पहिली, आणि म्हणाले, “Hi! You have not drawn the diagram, is their any thing wrong with you?” मी कसे बसे “नो सर .” म्हणालो. त्यांनी माझ्या  वहीची पाने चाळून  पाहिली. मी त्यावर माझ्या नावा व्यतिरिक्त काही लिहिले नव्हते. त्यांनी मला उभे केले, माझ्याकडून प्रवेशाची receipt मागितली मी ती दिली,  ते भयंकर संतापले .”Stand up, get out of my class.” मी माझी वही घेऊन बाहेर पडलो. माझ्या प्रवेशाची पावती त्यांच्याकडे होती. माझे काय चुकले ते मला कळेना. “This Art student wants to learn Bio.” असं ते म्हणाले. वर्ग खो खो हसत होता. मी वर्गाबाहेर पडलो ते पुन्हा कॉलेजच तोंड पहायचे नाही ठरवून.

दोन दिवस मी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडून ठरल्या वेळी घरी येत होतो पण हे अस फसवणे मला पटेना, मी घडला प्रसंग मोठ्या बंधुला सांगितला, त्यांनी ऑफिसमध्ये दांडी मारून माझ्या उपप्राचार्यांची भेट घेतली तेव्हा घडला प्रकार त्याच्या लक्षात आला. माझा प्रवेश आर्ट शाखेसाठी झाला होता, मी बिनदिक्कत Science division मध्ये वर्गात बसत होतो. मोठ्या बंधूनी माझी समजूत काढली पण मी स्पष्ट नकार दिला. झाले, आमचे शिक्षण तिथेच थांबले. वडील बंधू यांनी समजूत घातली. माझी काही चूक नसताना अपमान झाला होता तिथे मला पुन्हा जाणे नव्हते.





मोठ्या बंधूनी हात टेकले, त्या नंतर गेले कित्येक वर्षे मी मिळेल ती नोकरी केली. कधी traval agent, कधी cashier तर कधी बँड मास्तर, कुठेही माझे बस्तान नीट बसले नाही. आता स्थिर होणार ,जम बसणार असे वाटत असतांना काही विपरीत घडून मी पुन्हा शून्यावर आलो, नियतीने माझ्याशी सापशिडीचा डाव अनेकदा खेळला तरीही मी हार मानली नाही. एक नोकरी गेली की माझ्या जनसंपर्कामूळे आठवड्याभरात दुसरी मिळतही असे अर्थात पगार किती, किती वेळ काम करावे लागेल या संबधी काही निश्चित नसे पण रिकामा तर नाही, कुठेतरी अडकून आहे म्हणून कोणी घरून फारशी चौकशी करत नसत. माझं तारूण्य, नोकरी शोधणे, पून्हा शोधणे या शोधात संपलं. कोणावर प्रेम जडलं नाही, कोणत्या भांडवलावर प्रेम करणार? ना चेहरा होता ना चांगली नोकरी. लग्नाचा विषय अनेकदा घरी निघाला पण माझंच ठिकाणावर नसताना कुणाचे जीवन संकटात टाकावे असे वाटले नाही.

 नशिबाने की माझ्या कर्माने मी बे चा पाढा गिरवत राहिलो.  माझी कमाई कधीच इतकी नव्हती की मी माझा स्वतःचा, कुटुंबाचा विचार करू शकेन पण सुरवातीपासूनच माझ्यात दुसऱ्यासाठी धावून जाण्याची वृत्ती होती ती मात्र कधीच नाश पावली नाही. जेव्हा मला पोटापुरती नोकरी होती तेव्हाही माझ्याकडे मदतीची याचना करत अनेकजण येत आणि मी त्याच्या मदतीसाठी धावून जाई. खिशात पैसे असतील आणि कोणी मागितले तर मी देऊन मोकळा होई. ते परत मिळतील की नाही याचा विचार न करता मी देतो याबद्दल प्रत्येकाचे मी अनेकदा ऐकले, तरी व्यवहारी शहाणपण मला आलेच नाही.

कोणी कुठे प्रवेश हवा म्हणून कोणी घरची परिस्थिती गरिबीची असल्याने शालेय साहित्य हवे म्हणून तर कोणी उपाशी असल्याने किंवा मुंबईत आधार नसल्याने मदत मिळावी म्हणून मला गाठत आणि जो पर्यंत त्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत माझ्या पायाची भिंगरी मला शांत बसू देत नसे. माझा मित्र परिवार समाजातील सर्व थरात सर्व राजकीय पक्षात होता अनेकदा या मित्रांसाठी मी त्यांच्या गरजेला धावून जात असल्याने आणि कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करत असल्याने मी जेव्हा अन्य कोणा साठी मदतीची याचना केली तेव्हा ते माझ्या मागे उभे राहिले.

त्यांनी केलेल्या मदतीवर मी अनेक गरजू मुले आणि कुटुंबे यांच्या उपयोगी पडलो. हीच काय ती माझ्या आयुष्याची पूंजी. अनेक मुले माझ्या नावावर एखाद्या स्टॉलवरून काही खात, त्याचे बिल मी भरत असे. हा माझा कोणिही नात्या गोत्याचा नसे पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहिले की मला उपासपोटीही बरे वाटे. हा सिलसिला आज पर्यंत सुरू आहे.

ज्या मुलांना मी शिक्षणासाठी मदत केली, त्यांच्या नोकरीसाठी कोणाकडे शब्द टाकला अशी कित्येक मुले आजही माझ्या संपर्कात आहेत. माझी खुशाली ते घेत असतात. अनेक मुलांच्या लग्न कार्यात मी हजेरी लावली आहे. ही मुले जेव्हा आपल्या पत्नीसह माझ्या पाया पडतात तेव्हा आपण आपला संसार थाटू शकलो नाही तरी कित्येक मुलांचे संसार थाटण्याला हात भार लावू शकलो या बद्दल नक्कीच समाधान वाटत पण हे समाधान बेगडी आहे कारण त्या समधनाच्या तळाशी खोलवर जिवंत जखम आहे. आजही आपल्या चांगल्या प्रसंगात मुले आठवण ठेऊन बोलावतात हेच संचित.  





मी कुणासाठी किती पैसे खर्च केले, कुणाकुणाला जेवू खाऊ घातले त्याचा हिशेब केला नाही कारण ते माझे व्यसन होते. मी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हे सारे करत होतो. किती विद्यार्थ्यांच्या हितचिंतकांच्या अंत्ययात्रेत मी सहभागी झालो त्याची नोंद मी ठेवली नाही. कारण हे विद्यार्थी माझ्या रक्तामासाचे नसले तरी माझ्या जीवनातल्या एका प्रसंगाचे काही क्षणाचे सोबती होते. त्यांनी मला सोबत केली होती मी त्यांना सोबत करणे हे माझे कर्तव्य होते. परिस्थितीशी झगडून उभी राहणारी मुले हे उद्याचे स्वप्न होते.

अनेकदा माझ्या चरित्र्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, मी मदत करून मुलांचा गैरफायदा घेतो असा आरोप माझ्यावर झाला मात्र मी कधीच असले अंबाटशौक केले नाहीत.माझ्या मनाने मी निष्कलंक होतो त्यामुळे मी कधीच असल्या आरोपाची भीती बाळगली नाही. काही प्रतिष्ठित लोकांनी मला जामीनदार करून कर्ज घेऊन त्याचा भरणा केला नाही आणि मी कर्ज थकल्याने जेलची हवा चाखली.

असे बरे वाईट अनुभव पदरी घेऊन मी आजही उभा आहे. कोणीही हाक मारो, मी मदतीसाठी उभा आहे तेच माझे व्यसन आहे. कुणाला दारू, कुणाला गुटखा, कुणाला विडी काडी मला माणुसकीचे व्यसन आहे. मला समज आल्यापासून गेल्या पाच दशकात प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना यांच्या जडणघडणीचा मी अव्यक्त साक्षीदार. त्यांचा हरकाम्या म्हणून मी राबत आलो कोणतीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी ही सोईस्कर वापर करून घेतांना माझीही काही अडचण असेल, मागणी असेल,अपेक्षा असेल, असे कधी लक्षात घेतले नाही. मला तोंड उघडून सांगता आले नाही.

माझे घरातले अस्तित्व हे इतर भावंडासाठी असेच  असावे. मी काय करतो कोणी विचारले नाही. दरमहा मी घरात काही पैसे दयावे अशी मागणी केली नाही. घरातील कोणतीही जबाबदारी सोपवली नाही. उलट मी न मागता मला दर महिन्याला खर्चाला पैसे मिळत होते. कितीतरी ड्रेसपीस माझ्यासाठी आणून ठेवत होते आणि मी ते शिवून वापरावे म्हणून तगादा लावत होते. पण मी घालत असलेले कपडे सुस्थित असल्याने नवीन कपडे शिवून घ्यावे असे मला वाटत नव्हते. एखादी व्यक्ती म्हणेल,  सर्व तर तुला मिळत होत मग तुझं दुखणं नक्की काय होत? कदाचित माझी व्यथा मांडण्यात मी तोकडा पडत असेनही कारण कोणाकडे व्यथा मांडावी ते मला ओळखता आले नाही आणि ज्याच्या खांद्यावर मान टाकून मोकळे हृदन करावे अशी व्यक्ती जीवनात आलीच नाही. माझी आई मला कुकुल बाळ समजत आली, तीच वागणूक घरातील सर्वांनी मला दिली.

मी सगळ्यात लहान असल्याने सुरवातीस त्यांच्या प्रेमाने मी सुखावत होतो पण ते सुख नंतर टोचू लागलं. एखादी गोष्ट मी करतो अस म्हणण्याचा अवकाश, आई पासून ते बहिणी पर्यंत नन्नाचा पाढा वाचत. भरारी घ्यावी असे अनेकदा वाटले पण पंखात बळ असूनही मायेपोटी मी उडू शकलो नाही. मी व्यवसाय करतो असे म्हणत मी टूर एजन्सी काढण्याचा प्रयत्न केला तो भावंडांनी हाणून पाडला मग दुधाची एजन्सी मला मिळत होती, त्या साठी गाळाही कमी भाड्यात मिळत होता पण दूध डेरी आपल्या बापजाद्यांनी कधी चालवली होती का? असा सवाल पुढे करत त्याला नकार दिला मग शेवटचा प्रयत्न म्हणून कॅटरिंग सुरू करतो म्हणालो, तर ब्राह्मण काय भांडी घासणार की खरकटी काढणार म्हणत माझे पाय खेचले. असलं कसल त्यांचं  प्रेम जे मला उडू देत नाही.कायम स्वरूपी त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर मी जगाव अशी त्यांची इच्छा आहे की कसे ते कळेना.





आता मी निवृत्तीच्या पलीकडॆ आहे. म्हणजे मी आता काही करावं तर ती उमेद आज राहिली नाही मात्र आजही माझी समाजसेवा सुरू आहे. जे मला जमेल ते मी करत रहातो. बऱ्याचदा पदरमोड करायला पैसे नसतात पण अचानक कुणाला लहर येते आणि तो माझी सोय करून जातो. गेले अनेक वर्ष मी पायपीट करून नाती जोडली आहेत.

शरीर किती साथ देईल ते माहीत नाही मात्र जो पर्यंत माझे हे सेवेचे व्यसन सुरू राहील तो पर्यंत माझे अस्तित्व असेल याची मला कल्पना आहे. माणसांच्या गोतावळ्यात मी श्वास घेतो आनंदी राहतो. जर हा गोतावळा नसेल तर माझे काय होईल या विचारानेच मला थकवा येतो.

कधी अचानक मी गेलो तर चार दोन चुकचूकतील, कोणी माझ्या अंतयात्रेत सहभागी होतील किंवा कोणी बरा होता बिचारा पण अगदीच अव्यवहारी असही म्हणतील याची मला जाणीव आहे. पण माझ्या आयुष्यात आलेले मित्रवत मंडळींना माझी ओळख नीट व्हावी अशी चुटपुट मला होती म्हणूनच कधी नव्हे ते एकटाकी लिहण्याचा प्रपंच मांडला. खरच आश्चर्य वाटते, कोणताही उद्देश, कोणतेही ध्येय न बाळगता आणि न गाठता माणूस जगू शकतो?त्याच्या जीवनाचे फलीत काय? पण माझ्या सारखेच कोणतेही सबळ कारण नसताना माणसे जगतात आणि मरतात त्यांची चरित्र लिहिली जात नाही आणि कोणी नोंद ठेवत नाही पण त्यांच्या जगण्याला त्यांच्यापुरता अर्थ नसला तरी स्वार्थ नसतो हे कळाव म्हणूनच मी सामान्य असूनही “असामी” बनून लिहीले गोड मानून घ्या. एवढा माझा परिचय मित्रांसाठी पुरेसा असावा कारण मी असा असामी.

Tags:

6 Comments

 1. I am really impressed with your writing skills and also with the layout on your weblog.
  Is this a paid theme or did you modify it yourself?

  Either way keep up the nice quality writing, it is
  rare to see a great blog like this one today.

 2. छान लिहिले आहे.सामाजातले निरीक्षण चांगले असले तरच काल्पनिक पात्र इतके चांगले रंगवता येते.

 3. I have been surfing online greater than 3 hours lately, yet I by
  no means found any attention-grabbing article like yours.
  It’s pretty value enough for me. In my opinion, if all
  site owners and bloggers made excellent content as you probably did, the web can be much
  more useful than ever before.

 4. Hi there! I know this is sort of off-topic but I had to ask.
  Does managing a well-established blog like yours take a lot of work?
  I am brand new to blogging however I do write in my journal everyday.
  I’d like to start a blog so I can share my own experience and feelings online.

  Please let me know if you have any kind of
  suggestions or tips for new aspiring blog owners.
  Appreciate it!

 5. I really like what you guys tend to be up too.
  Such clever work and exposure! Keep up the very good works guys I’ve added you guys to my
  personal blogroll.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *