किंमत फक्त दोनशे
कोकणात गणपती उत्सव मोठा सण, तिथे दिवाळी सणाला खूप महत्त्व नाही. गणपती उत्सव संपता संपता हळवी भात पिकून तयार होतात. पाऊस कमी कमी होत जातो आणि पाखरं ह्या पिकल्या भातावर डल्ला मारायला भरारत असतात. किती पाखरं, दोन, चार, दहा, वीस, अगणीत. इतर वेळेस या पाखरांच्या किलबिलाटाचं कौतुक वाटत पण आता तिच पाखर छळवाद वाटतो. सकाळी उजाडले की सुरवात करतात आणि अव्याहत त्यांची या भाताच्या दाण्यांसाठी पळापळ सुरु असते. कितीही पिटाळली तरी मुजोर कामगारा सारखी पुन्हा पुन्हा येत असतात. आधी एकटी दुकटी आणि नंतर थव्याने. ही पाखर हे भाताचे दाणे घरट्यात नेऊन ठेवतात. खूप राग येतो तेव्हा मी पोकळ लोखंडी पाईप बडवत बसतो. पाखर घाबरल्याच नाटक करत झाडावर पळून जातात आणि वाजवणं बंद केलं की तितक्याच धिराने पून्हा येतात.
माकडांचही तेच. ती पूर्ण कळपाने येतात, त्यातलं एखादे माकड आधी “रेकी” करत आणि कुणाची जाग नाही पाहताच विशिष्ट आवाजात आपल्या मित्रांना बोलावत. ही माकड “पास ऑन” चा खेळ खेळत भाताची कणसे झाडावर पोच करतात आणि एखाद्या बेचकीत अडकवून ठेवतात. जाग लागली किंवा त्यांची पाठ काढली की काही सेकंदात झाडावर उंच जाऊन बसतात. कितीही हाकलली तरी त्यांचा त्रास संपत नाही. कुत्रा भुंकून त्यांना पिटाळून लावतो पण आता माकडांना कळलं आहे की कुत्रा झाडावर चढू शकत नाही. कुत्रा इरेला पेटतो आणि झाडाखाली बसून राहतो. मग कधी माकड ची ची ची चित्कार करत निघून जातात तर कधी कुत्रा कंटाळून घरी ओसरीला येऊन बसतो. कधी कधी गणपती गेले आणि दसरा सरला तरी पाऊस पाय काढून घ्यायच नावच घेत नाही. पिक पिकून तयार असते. नजर टाकावी तिथे पिवळे पिक जमिनीवर लोळण घ्यायला आतूर झालेले दिसते आणि शेतकरी मात्र चिंतीत असतो. गेले चार दिवस सकाळ पासूनच आभाळ भरून येत होत. आमच्या शेतात सुवर्णा, चिंटूक आणि पार्वती अशा तीन वाणांच भात लावलं होत आणि पार्वती भात कापणीला तयार झाल होतं त्याला आठ दिवस झाले होते. पाऊस अजूनही वेड्यासारखा बरसत होता आणि असाच कोसळत राहिला तर हाता तोंडाशी आलेले पिक जाईल ही चिंताही होती. मी पाखरांना सूss, हुर्रss हॅट म्हणत हाकलत असताना “ती” आली. तिने आमच्या पडसर कोपऱ्यात म्हशी सोडल्या होत्या आणि सहज गप्पा मारायला म्हणून ती आली. तिने माझ्या बायकोला हाक मारली, “गो संगीता, काय करतं, पिऊक पाणी दी गे बाय.” माझ्या पत्नीने पाणी दिले. “गे मामी बरी व मा वायच ‘च्या’ देव काय?” “देतस तर दि, व्हयोच असा काय नाय, निघताना घेतललय, आताशी खाण्यावर वासनाच रवलीहा नाय, आता खूप हां, पोरा खूप करतत पण विच्छा नाय.”
बायकोने चहा आणि चिवडा आणून ठेवला. “घे गे मामी. माका नको गो बाय, हो चिवडो? “गे मामी घेवन तर बघ, घरी केललो चिवडो आसा, बघ कसो झालोहा.”
“गे बाय, तेवा तुझ्या आवशीकडे मागूनव खाल्ला,मागाक लाजाकव नाय, ती बिचारी देय, उगाच खोटा सांगूचय नाय. घराकडे मिळा नाय म्हणान कौतुक, आता नातू खूप काय माय घेऊन येतत, आये ह्या घे,आये ता घे पण इच्छाच रवलिहा नाय गो, त्याका काय करू?”
तिने चहाचा कप धुवून आणला, चिवड्याच्या डिशला हातही लावला नाही. तस बायको पुन्हा म्हणाली, “गे तो चिवडो खा,दुकानचो नाय हा, मी बनवन हाडलय, वायच खाऊन तरी बघ.” मग मात्र तिने तो चिवडा संपवला. आता दिवस बदलले आणि आता या कशाची गरज मला नाही हे तिला दाखवायचे असावे. आजही ती आमची शेती खंडाने करत होती आणि पुरेसे भात पिकवत होती पण त्या बदल्यात दोन खंडी भात देतांना मात्र तिचा मुलगा कुरकुर करत होता. दुसऱ्याला देतांना फारच थोड्या व्यक्ती सढळ हाताने देतात.
आधी ती खाली लादीवर बसली होती,अचानक ती सोफ्यावर बसली. “गो ss दिवस काय तशेच रवणत नाय, आधी रवाक झोपडी नाय होती, गावकराच्या मांगरात मी रवय तुका ठाऊक आसा मा. शेणातलो किडो शेणातच नाय रवणा.” ती सूचक बोलली कोणती म्हण कुठे वापरायची हे ज्ञान तिला व्यवहारी जगाने शिकवले. “खरा आसा तुझा, कोणाचेच दिवस तसेच रवणत नाय. खय असतत तुझे नातू?” हिने विचारल. तिला तेच अपेक्षित असावं, “थोरलो औषधाच्या खूप मोठ्या दुकानात हा, कळव्याक आणि न्हानगो कणकवलीत भुशारी दुकानात. सवताच्या पायावर उभे आसत. थोरलो माका किती काय औषधा आणता, ब्लेड प्रेशर हा माका त्याचे गोळये, आणिकव कसली औषधा आणता. मोबाईल घेऊन दिलो हा. मी काय कोणाक फोन करणय नाय, इलो तर आपलो घेतलो. दिसभर वाजत असता काय काय सांगतत, हय कळता कोणाक? येसफेस बोलतत नायतर, हिंदीत बोलतत. मी काय शाळेत जावक नाय. म्हणजे चवथी तागयद जाय,मगे बापाशीन धाडूक नाय. शाळा शिकान काय करणार होतय? मरां देत. मी संध्याकाळी साडेसाताक थोरल्या नातवाचो फोन येता तो घेतय. न्हानग्यान कणकवलीक जावयेवक स्कुटर घेतलीहा. घरातव पैसे देतत.” “बरा झाला,तुझ्या झिलाक मदत झाली मुलांची, नायतरी एकटो काय करतलो? तरी तुझी सुनबाय बरी हा,घोवाक मदत करता. मी बगतय.कामक बरी हा.” सहानुभूती म्हणून ही म्हणाली.
“गो, चडवा, मी लगीन करुन इलय तेवा तेरा वर्षाचा होतय, माका कायेव कळा नाय, आता लगीन थोर वयात करतत. ह्यानी माका भाकरी करुची शिकवली, माझ्या परास पंधरा वर्षांनी मोठे होते. माका काय इला नाय की आऊस बापूस काडीत. मी उलट उत्तर करुक नाय, भय वाटा.”
ती सोफ्यावर मागे रेलत म्हणाली. हळूहळू ती वातावरणात समरस होत होती. सामाजिक समानता येण्यासाठी आर्थिक उन्नती गाठवी लागते हे त्या अशिक्षीत बाईने चाणाक्षपणे टिपले असावे. “मामा तसो बरोच होतो. तुझ्यावर त्याचो जीव होतो. तुझ्यासाठी खुप करी स्वभावाक बरो होतो, हय काय दिला की माझ्या आईक म्हणा, बाई, मी हय नाय खाणय, घराकडे नेतय,पोरा वाट बघीत असतली आणि मगे माझी आई टोपात घालून देय. मी लहान होतय तेवा, माका कमरेवर घेऊन नाचवी. तोंडाक गाळी होते पण प्रेमळ होतो.” ही म्हणाली.
“होय गो होय, आमका दिल्या शिवाय बिचाऱ्यान कधी घास खाऊक नाय, माझे हाल करूक नाय, सवता राबून काय मिळात ता घराकडे आणी. पण तसलोच तरकटी होतो. डोक्या बिघडला तर कायेव करीत, एकदा लावणी करताना माका चाय आण म्हणान सांगल्यांनी. मी आपला चाय घेवन इलय तर चाय थंड झालो म्हणांन तोच चाय चो कप डोक्यावर फेकल्यानी, बापाशीवरसून गाळीव घातल्यानी . ही बघ ही खूण हा. असलो संतापी स्वभाव .चाय थंडगार म्हणान संताप केल्यानी.” ती भुतकाळात शिरली होती. तिच्या समोर तिचा नवरा तरळत असावा.
“ता काय आमका ठावक नाय? आमची आई त्याच्यावर नेहमी रागावी, रे सखारामा, मेल्या ती लहान पोरगी. तु वयान घोडो, तिका समजून सांग. मारझोड करून तुझो संसार कशी करतली? तिची आवस लहान वयात गेली, बापूस दारूडो तिका दाखवतलो कोण?” माझ्या बायकोने आपल्या आईची आठवण सांगीतली. “व्हय गो, मी अगदीच न्हान,माका साडीव नेसूक येय नाय,आपण नेसून दाखवीत. माझा लगीन झाला ताव असाच झाला. एक दिवस आमी भावंडा शेजराक खेळत होतो, तवसर कोणी तरी हाक मारीत इला, रखमे तुका बापूस साद घालता, बेगीन जा, कोणीतरी पावणे इलेहत. मी आपली घराकडे गेलय,मी फ्राँकात होतय. मी घराकडे पोचलय तर बापूस म्हणालो चाय ठेव. मी चाय ठेवलय. त्यांका आणून दिलय. त्यांच्या बरोबर हे बसलेले होते. हाप पॅन्ट आणि शर्ट.”
“मामा स्वतः इलो होतो काय तुका बघूक? ” हिने विचारल.
“व्हय तर काय! माका काय कळत नव्हता, ह्येंची दशा होती, दाडीची खुट्टा वाढलेली, गबाळो शर्ट, अवतार झाललो. तो कशाक इलो ताव माका ठावक नव्हता. नंतर आमच्या दूरच्या भावाशीन माका सांगला, “गो रखमे, काल तुमच्या घराक कोण इललो त्याका बघलस मा?” मी म्हटलय कित्याक? त्याका बघून मी काय करू? तर म्हणता तुझ्या बापाशीन त्या बाप्याक तुका दोनशी रुपयाक विकल्यान.” “मामी काय पण काय सांगतस? तुका विकून टाकूक तू काय वस्तू आसस?” बायको म्हणाली.
“गो, खरा ताच सांगतंय, माका खय काय कळा? मी त्या भावाशीक झोडलंय, सांगलाय पुनः माजी मस्करी करता कामा नये. तर म्हणता माका मारून काय फायदो, जा तुझ्या बापशीक जावन विचार.” मी विचारूक घराकडे गेलय तर तो दारातच पडलेलो. सुद्दीत नव्हतो. तरी पण रागासरशी त्याका खेचीत घरात नेलय. कपळावर कळशी ओतलय, तसो तिरमिरत उठलो. माझे केस धरून वडल्यान. मी त्याका हासको देवन पाडलय आणि विचारलय खरा सांग, “तु माका दोनशी रूपयाक विकलस काय?”
माका बोललो, “तुका घरात ठेवन काय करु? गावड्याचा पन्नास रूपये कर्ज झाला हा,ता कसा फेडू? सखाराम बरो हा,कष्टाळू हा, तुका सुखात ठेवीत.” त्याच्या बोलण्यावर संताप इलो, गो दारवेचे पैसे भागवण्यासाठी सख्या बापाशीन दोनशी रूपयात माका विकल्यान. हो विचारव करूक नाय आवशी वेगळा ह्या न्हान पोर मी दुसऱ्याक कसा देव? बापूस कसलो कसाई मेलो.” ती डोळ्यात पाणी आणून सांगत होती. थोड्या थोड्या वेळाने पदराने डोळे पुसत होती. जणू तो प्रकार आत्ता घडला असावा अस मनाला वाटलं. गडकरींच्या एकच प्याला ची सुधाकर आणि सिंधूची गोष्ट तर ऐकत नाही ना असच मला वाटत होत. माझ्या पत्नीने तिच्या शेजारी बसून तिच्या पाठीवरून हात फिरवला. “गे मामी, तुझ्या बापशीक कोणी विरोध कसो नाय केलो? आणि तु तरी लग्नाक तयार कशी झालं?” हिच इमोशन जाग झालं. स्टोरी सस्पेन्स वळणावर होती.
मिया काय करतलय? बापूस म्हणालो, माझो शब्द गेलो हा, मोठो हरिश्चंद्राचो अवतार. म्हणालो तू लगीन नाय केलस तर मी बावीत उडी घेवन जीव देतलय. गोss माझ्या पाठीवर दोन भावंडा होती. आऊस कधीच मेललली. कोणाक सांगू? आपणच बाजारात जावन साड्ये,चोळी, काकणा, एक ट्रंक, असा काय काय घेवन इलो आणि सातेरीच्या देवळातत भटान पाच रूपयात लगीन लावल्यान. बामण तो, पण त्याकाव अक्कल नाय, येद्या न्हान पोरग्याचा लगीन लावताना त्याका धिर कसो झालो? त्याकाच ठाऊक.
घराकडसून आमी पायी चलतच या गावात इलव,ना गाडी, ना वरात. घराक कोण येक पावणे रावणे नाय होते. हय इलय आणि पाँटभर रडलय. त्यांनीच पिठी भात केलो आणि वाढलो. रात्री कुशीक घेवन निजले. फाटफटीक उठवल्यानी आणि म्हणाले, बामणाकडे कामाक जातलय, तु हय एकटा बसान काय करतल? माझ्या बरोबर चल. न्हालय आणि इलय. त्या दिसापासून हो अवाठ माझो झालो. काय सांगतलस अंगावर पडला का कायेव करूचा लागता. पन्नास वर्षा झाली असतीत लग्नाक. पण त्यांनी संसाराक खूप म्यानत केल्यानी. पोटी फुटासर राबले. मी पण त्यांची हयगय करूक नाय. आजारी झाले तेवा गोव्यापासून इलाज केलय पण आविष्य तितक्याच, काय करूया? आता खुप हा पण माणूसच रवलो नाय.” तिने पुन्हा पदर डोळ्यांना लावला. तुझ्या आवशीन त्यांका जमीन देवची कबू्ल केली होती आता आऊसच रवाक नाय. ते व गेले कोणाक सांगतलवं “
स्टोरी संपवता संपवता तिने जमीन न दिल्याचा सल बोलून दाखवला होता. चाळीस,पन्नास वर्षांपूर्वी हिच्या आईने काही कुळांना घरासाठी आणि कसायला जमीनी दिल्या होत्या. त्या कुळकायद्याने त्यांच्या नावावर करून दिल्या होत्या. आता तिला देण्यासाठी मोकळी जमीन आमच्याकडे नव्हती. त्या जोडप्यांनी आमच्याकडे फुकट काम केल नव्हते. हिची आई काहीही देतांना त्याला चार मुलं घरी आहेत. दोन दोन घास त्यांच्या वाट्याला यावेत याच हिशेबान देई. तरीही संधी मिळताच तिने रडगाण गायलं.
मामीच्या लग्नाची कर्म कहाणी आणि दोनशे रूपयांची सत्य कथा, खर तर स्टोरी संपलीच होती. या पुढची कथा आमच्या अवठात घडली होती. आमच्या कासाच्या पुढे गावकरांच्या जागेत तो खोपीत रहात होता. आधी आमच्याकडे मजूरी करत होता. नंतर आमची शेती खंडाने करू लागला. एक दिवस तो रहात असलेली खोप जळली, कोणी म्हणत मामाला कोण्या शहाण्यान सल्ला दिला, खोप जळाली तर सरकार तुला घर बांधून देईल आणि तस घडल. खरं, खोट ईश्वर जाणे. ग्रामपंचायतीने घर जळाल्याचा पंचनामा करून त्याला घर बांधायला मदत केली. थोड फार लाकुड सामान आम्ही दिलं. पण त्याने संसार मात्र एक नंबर केला. दोनशे रूपयाला विकत आणलेल्या बायकोला त्याने आपल्या मुली प्रमाणे जपले. तिला चार मुल झाली. थोरला माझ्या बायकोच्या वयाचा होता. त्यांनी पन्नाशी कधीच पार केली होती. मधला आजारपणात वारला होता आणि दोन मुलींची लग्न झाली होती. सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या मधून ती मोकळी झाली असली तरी तिच्या मनावर झालेली जखम ओलीच होती. कधीतरी ठसठसून येत होती.
मी दुरून सहानुभूतीने तिच्याकडे पाहिलं. खूप सुख दुःख तिन पचवलं होतं. मनात खदखदत असणारी वेदना बोलकी झाली. आज ती सत्तर वर्षांच्या आसपास किंवा मोठीच असावी. अजूनही गुर चारायला घेऊन येते. मुलाच्या संसाराला हातभार लावते. तिने तंबाखूची डबी काढून तंबाखू मळला आणि तोंडात टाकला. आपण बाई माणूस आहोत,तंबाखू खाणे योग्य नाही असला विधिनिषेध तिच्याकडे नाही. नवरा खातो म्हणून ती तंबाखू खायची,पान ही खायची पण तो कधी ओरडला नाही.
तो तसाही एकटाच होता. या गावात उपरा आला होता. मजूर म्हणून आला. अगोदर लोकांच्या घरीच रहायचा. गावकराचा एक पडीक मांगर होता. शेतीच्या टायमाला वापरायचे, त्यांनी त्या मांगरातली एक पडवी त्याला रहायला दिली. वय वाढल तशी कधीतरी जाणीव झाली स्वतःच घर हव. त्याने तिथेच मेहनत करून खोप काढली. मग त्या घराला घरपण आणणारी बाई हवी. लोक म्हणाले,”एकटो किती वर्षा रवशीत, लगीन कर.” तो म्हणाला, “माका कोण चेडू देईत, ही खोपव गावकरांच्या मालकीची, उद्या लात घातल्यानी त खय जाव.” गावकरला दया आली म्हणाला, “रे सखारामा, तु या खोपीतच रव, मी तुझ्या लग्नाची व्यवस्था करतय माका चार झिल तू पाचवो. मी मेलय आणि झिल मुंबयसून नाय इले त अग्नी दी. जमात तशी माका शेताक मदत कर. हे पाचशे घे.” आंधळा मागतो एक डोळा, याच फावलं. गावकराचे पाय धरत म्हणाला, “नाना तुमचे उपकार विसराचय नाय, मी माझ्या बापाशीक बघूकव नाय, तुमी माका बापाच्या जागी.”
गावकरांनीच हे स्थळ दाखवलं. व्यवहार ठरला. मुलीचा बाप दारूड्या. मडके विकत घेतलं तरी आपण चार वेळा आलटून पालटून पाहतो. पण सखारामला घर ना दार तो काय पाहणार, त्यात वय वाढलेलं. दुरूनच मुलगी बापाने दाखवली. याला पसंत पडली. तिच्या पसंतीचा विचार याला शिवलाही नाही. दोनशे रूपयात सौदा पक्का झाला. रक्तामांसाची मुलगी विकताना तिच्या बापाने व्यवहार पाहिला. दोनशे रूपयात दारूपाई झालेल कर्ज फेडून मुलीच लग्नही लावून दिलं. पण त्या नंतर तिने बापाच तोंड कधीही पाहिल नाही. तो गेल्याचा निरोप आला तेव्हा सखारामच तिला जबरदस्तीने घेऊन गेला. शेवटचे पाणी तिने बापाला दिले तरी बापाने आपले कर्ज फेडण्यासाठी दोनशे रूपयात आपल्याला विकले हे ती विसरू शकली नाही. आज पन्नास वर्षांनी तिला ते अचानक आठवलं.
खपली धरलेली जखम भळभळत वहात राहीली. आता ना बाप राहिला होता ना नवरा, पण नवऱ्याने तिच्यावर प्रेम केलं. शक्य ते सुख दिल. आणि निघूनही गेला. दोनशे रुपयांची खरेदी मात्र तिच्या स्मरणात राहिली. कधीतरी तिनेही सखारामला, आपल्या नवऱ्याला विचारलं असावं, “माका दोनशी रूपयात विकत घेतलास, ता मी गाय होतय का म्हशीचा रेडकू?” सखाराम खो खो करत हसत म्हणाला, “तुका काय कमी पडला म्हणान विचारलस? माका नाय तर अजून कोणाक, बाप तुका देऊन टाकणार होतो ह्या नक्की, मी घेतलय.” अर्थात तेव्हा रेडकू तरी दोनशेत येत होतं की नव्हतं ईश्वर जाणे. पण तिची खरेदी दोनशे रूपयात झाली होती हे निखळ सत्य. आता तिची ही कथा नातू आपल्या मुलांना सांगतील तेव्हा नक्की म्हणतील आज्याने एक चाँकलेटचे पैसे देऊन आजीला विकत घेतली. असो भारतात गुलाम विकत घेतले जात होते पण बायको विकत घेतल्याच उदाहरण आमच्या अवाठात घडल होत याच्यावर विश्वास कसा ठेवावा पण ते सत्य होतं. जीची खरेदी झाली ती आमच्या समोर अगदी जीती जागती बसली होती.