भेट

भेट

माणसातल्या बेटांचं आणि माझं अतूट अस नातं
मनातील शब्दांच भांडार कधीच नव्हतं इतकं पोरकं
बालपणीच सहवासाची मनास नकळत लागली गोडी
इयत्ता पार करता करता नकळत जमली आमची जोडी
मते पटत नव्हती तरी त्याच्याशी जुळला छान सूर
मनास हे जेव्हा कळले तेव्हा तो गेला होता फारच दूर

भेट जशी जशी लांबत गेली मनास लागली हुरहूर
आणि तो परतणार नाही हे ऐकून सुटले दुःखाचे काहूर

तरी मन मला न जुमानता रोजच वाट पहात बसतं
गत जीवनाच्या आठवणीत बुडून दुःखानेच खचतं
येतात दुःखाचे कढ अन होतो ह्दयी अश्रूंचा प्रपात
डोळे घट्ट मिटले तरी संपतच नाही ती भयाण रात्र
सारच संपलं असं वाटत असतांना होतो त्याचा आभास
त्याचत्याच आठवणीत गुदमरून कोंडतो अजाणता श्वास

एकदा तरी त्याने भेटावे हा आजही मनास आहे ध्यास
अन जागेपणीच स्वप्न त्याच्या मिठीत मी हा क्षणीक भास

आता सगळच शांत निवांत अंतरीक्षातील पोकळीचा आभास
कित्येक रंगाच्या जीवन प्रवासात माझा नितळ कोरा कॅनव्हास
डोळ्यात अश्रू गोठले की मी भरतो त्यात विरहाचे फिकट रंग
आठवण उखडून फेकावी पण मन अजूनही त्याच्या प्रीतीत दंग
समोर अवचित तो दिसतो पण आता आतून होत नाही आनंद
गात्र सारीच बधिर वेदनेने पण त्या घुसमटीची नाही मुळीच खंत

मी तीच आहे की माझे पिशाच्च, क्षणभर ओळख पटत नाही
तो अगदी समोर पण मन बहरत नाही, सूडाने पेटतही नाही

सोबत नसूनही इतके दूरवर आलो, हे आता खरं वाटत नाही
सत्य स्वीकारून त्याचा गुन्हा विसारण्यास मन धजत नाही
शहाणे बहुदा यासच म्हणत असावेत घट्ट मनाचा निर्धार
त्याच्या सावलीलाही मी केले कधीच माझ्या मनाचे बंद दार
शोधणार नाही पुन्हा नव्याने कुणाची सोबत,नकोच आधार
प्रेम करणे जीव लावणे हा नसे व्यवसाय वा नफ्याचा व्यापार

जीव कुणावर इतका खरच लावू नये की जीवच पडेल गहाण
आपणही हाडामांसाचे आहोत याचे हरपू देऊ नये कधी भान

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “भेट

 1. विजय सावंत
  विजय सावंत says:

  सर आपण छान लिहिलय, एवढं लिहिण्याचं बळ माझ्यात नाही, आपणांस खुप खुप शुभेच्छा.
  धन्यवाद.
  आपला विजय सावंत.

 2. Mangesh kocharekar
  Mangesh kocharekar says:

  सावंत सर धन्यवाद.
  दिसा माजी काही लिहावे,म्हणून मी लिहितो.
  आपण प्रोत्साहन देता,तिच लिखाणाची उर्जा.

Comments are closed.