पॉवर डील

पॉवर डील

पृथ्वीवर पडणारा सूर्य प्रकाश म्हणजे ऊर्जेचा अक्षय स्त्रोत. कुठून बरे ही ऊर्जा निर्माण होते? चार हायड्रोजन एकत्र येऊन एक हेलियम अणू तयार होतो आणि केंद्रीय संयोग होत असतांना प्रचंड उष्णता मुक्त होते.प्रकाश उर्जा बाहेर पडते, सतत याच पध्दतिने चार हायड्रोजन एकत्र येऊन एक हेलियमची निर्मीती ही शृंखला अभिक्रिया अविरत चालत आहे. यात मुक्त होणारी ऊर्जा, असा हा प्रवास सतत सुरू असतो.हे सततच ऊर्जा उत्सर्जन म्हणजे आपला तप्त वायू गोल सूर्य.

प्रभाकर, दिनकर, रवि अशा कितीतरी नावाने आपण त्याला पुजतो. पण खरे तर तो फक्त एक तप्त वायूचा गोळा. ह्या तप्त गोळ्यांनी साऱ्या विश्वाला ऊर्जेचा स्रोत दिला. विश्वाची, या चराचराची निर्मिती केली. हे आहे त्या विधात्याचं आपल्यासाठी पॉवर डील. हे पॉवर डील स्वतःसाठी डील बनवणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. जेवढी उर्जा सूर्य बाहेर टाकतो त्याच्या पाच टक्के उर्जेचा वापर मानवाला करता आला, तरी हे विश्व उर्जासंपन्न होइल आणि कोळसा, पेट्रोल, किंवा अणू इंधन यांचा वापर टाळता आला नाही तरी निश्चित कमी करता येईल व उर्जेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ.

आपल्याकडे कौशल्य असेल तर ही ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी शक्य होईल आणि ऊर्जेसाठी परावलंबित्व कमी करता येईल. निर्माण हा शब्दच इतका शक्तिशाली आहे त्याच्या विचारानेही ऊर्जा मिळते. सूर्य हासुध्दा अणूरूप अशा हायड्रोजन आणि हेलियम याचाच चमत्कार आहे. याचाच अर्थ विश्वाला प्रकाश आणि ऊर्जा देणारा सूर्य हाच बिंदुरुप आहे अस म्हटलं तर वावगं ठरू नये. चराचरातील कोणत्याही सजीवाची निर्मिती आणि त्या पाठची ऊर्जा ही बिंदुरुप आहे. एका पेशीला ऊर्जा पुरविणारा mitocondriya आणि त्याच्या निर्मितीतील DNA, RNA चे रेणू  यांचं नातं समजून घेतलं की विश्वाच्या निर्मितीचे बिंदुरूप स्वरूप समजण्यास मदत होईल..





भल्या मोठ्या शरीराची हालचाल कोण नियंत्रित करत? तर एक श्वास. जो वर श्वास चालू आहे तो वर जीवन आहे म्हणजे श्वास हा ही ऊर्जेचा स्रोत आहे. तीच शरीराची बॅटरी चार्ज करणारी ताकद आहे. एका श्र्वासाने आहे आणि नाही यातलं अंतर कापता येतं. या श्र्वासाची ताकद ज्याने ओळखली त्याने आपल्या जीवनाचं रहस्य जपलं अस म्हटलं तर वावग ठरू नये. जोवर ह्रदयाची स्पंदन आहेत, जोवर नाडीचे ठोके नियंत्रीत आहेत आणि रक्तात ऊर्जा आहे तोवर जीवनाची शाश्वती आहे म्हणजे जीवनाची सत्यता श्वासात आहे. ई सी जी च्या लाटा जोपर्यंत स्क्रीन वर योग्य संकेत देत राहतील तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. ही लाट थांबली की जीवनाची गती थांबली अन् विचारांची गतीही थांबली. पॉवर संपली अस म्हणा हवं तर. पद, पैसा, प्रतिष्ठा ह्या स्पंदनाला नियमित ठेवू शकणार नाही, म्हणजे हे जीवनाचं डील विकत घेता येत नाही, उसनं मागता येत नाही किंवा कुणाला बक्षीसही देता येत नाही.

संत महात्मे सांगतात “याची डोळा पाहिले म्या मरण,सुखाचा सोहळा झाला ग माये”. मरणारा माणूस स्वतःच मरण कसं पाहील? वृत्ती आणि निवृत्ती यातलं अंतर ज्यांना कापता येतं  ते संत महात्मे. ‘आहे आणि नाही’ यांनी ज्यांना फरक पडत नाही ते महात्मे. संध्याछाया, जरामरण हे विषय ज्याना भिववीत नाही ते महात्मे, त्यांची आध्यात्मिक पॉवर नक्कीच थोर. “सुखाचा सोहळा झाला गे माये” या वृतींने जे जगतात त्यांना दुःखाचे चटके सहन करण्याची क्षमता देवाने दिलेली असते. त्यांचे विचार सूक्ष्मात पोचू शकतात, त्यांची वृत्ती विरक्तीकडे झुकलेली असते. मायेचे पाश त्यांनी दूर सारलेले असतात. “पिंडी ते ब्रम्हांडी” चा साक्षात्कार त्यांना झालेला असतो, म्हणूनच चरचरात प्रत्येक जीवात मी आहे म्हणण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो. त्यात अहंकार नव्हे तर आश्र्वस्थता  असते, “मी तुझ्या पाठीशी आहे तु चालत रहा” चा नारा असतो. एक व्यक्ती अवघ्या मानवजातीला वैचारिक ऊर्जा देऊ शकतो, ही शब्दरूपी ऊर्जेची किमया आहे.

दादा धर्माधिकारी यांचा ‘स्वाध्यायी गट ‘ हे ह्या शब्दरूप ब्रह्माचे उदाहरण. त्यांनी हाक दिली की त्यांचे सहकारी एका विशिष्ट उद्देशाने कामाला सुरुवात करतात. प्रत्येक जण हा फक्त स्वाध्यायी असतो. हीच ती शब्दांची ताकद. हेच ते शब्दब्रह्म. या शब्दात ताकद आहे, नादात ताकद आहे. वीजा कडाडल्या की नभोमंडळ गर्जू लागतं. त्या आवाजाने निर्माण होणारी कंपन काळजाचा थरकाप उडवतात. किती ताकद आहे त्या वीजांच्या नादात! ढग म्हणजे बाष्प, पाण्याचा रैणव अवस्थेतील पुंजका. हे रेणू किती सूक्ष्म, तरीही अनेक रेणू एकत्र येऊन बनलेला ढग, सृष्टी हरीत करु शकतो किंवा ढगफुटी झाली तर एखादं गाव नष्ट करु शकतो. तेव्हा आपल्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना येते. “कण कण मे भगवान” असं उगाचंच धाडसाने म्हटलेल नाही.





एका थेंबाची ताकद किती प्रचंड! रासायनीक प्रक्रियेत एक अणू किंवा रेणू केवढी उलथापालथ घडवू शकतो. उदासिनीकरण प्रक्रियेत शेवटच्या एका थेंबाने रासायनिक द्रव्याचे उदासिनीकरण होते. यापूर्वी या क्रियेत किती द्रव्य उदासिनीकरण करण्यासाठी वापरले ते महत्त्वाचं असलं तरी शेवटच्या थेंबाने किमया घडवून आणली. सुवर्णतुला करतांना शेवटची अशर्फीच तराजूला नम्र व्हायला भाग पाडते. विद्युत मंडलात बसवलेली अतिशय नाजूक कळ बाॅम्बचा विस्फोट घडवून आणते. ही कळ दाबण्यासाठी लागणारा कालावधीही फक्त काही सेकंदाचा, पण तिने घडवलेलला उत्पात हजारोंचे संसार उध्वस्त करु शकतो. कण आणि क्षण म्हटल तर अगदीच स्वल्प. तरीही त्यांची शक्ती त्याचा परिणाम हा “न भूतो न भविष्यती” असा अतिविशाल आणि व्यापक.

मातीचा कण दिसायला किती छोटा,किती सूक्ष्म. परंतू असे करोडो कण एकत्र आले की माती, मातीने भूमी, शेत तयार होत. शक्तीच रूपही असेच सूक्ष्म. पण म्हणून कुणी त्याच अस्तित्व नाकारत नाही. श्वास घेणं ही नित्याची क्रिया, कोणी म्हणेल, “श्वास काय? रोजच घेतोस थोडा वेळ थांबलास तर काय बिघडणार आहे?” चालेल? ऊर्जेचे तसेच आहे तिची स्थित्यंतरे होतच असतात. ती अक्षय आहे असं आपण म्हणतो तरी तिचे रूप, स्थिती, स्वरूप सातत्याने बदलत असते. मात्र ऊर्जा हाच जीवनाचा मुलाधार आहे.

सूर्याचे तेज त्याच्या किरणात आहे तर ऊर्जेचे रूप त्याच्या परिणामात आहे. आपण एखाद्या व्यक्तीचं, शक्तीचं अस्तित्व तेव्हाच मान्य करतो जेव्हा तो त्याच्या किंवा कुणाच्या उपयोगी पडतो, किंवा त्याला उपद्रव पोहोचवतो. ही शक्ती आणि तिचा परिणाम आपल्याला ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे. शरीरातील पेशींचे कार्य उर्जेमार्फत चालू असते. चयापचय क्रियेत निर्माण होणारी द्रवे रक्तात शोषली जाऊन ऊर्जा साठवली जाते. जेव्हा आपण निद्रिस्त असतो तेव्हाही ऊर्जेचा वापर होत असतो, परंतू जेव्हा शरीराकडून विविध कामे पूर्ण करून घेण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते तेव्हा आपल्याला अधिक ऊर्जा अन्नाची गरज भासते. बेडूक शितकाल आणि उष्णकाल समाधीमध्ये स्वतःला जमिनीत खोल गाडून घेतो, आणि साठवलेल्या मेदाचा उपयोग करून जगतो. समाधी अवस्था म्हणजे काय ते त्याच्याकडून शिकावं. साधू अनेक दिवस अन्नाशिवाय कसे राहू शकतात त्याच गूढ, स्वनियंत्रणात लपलं आहे.

जर स्वतःच्या श्वासावर नियंत्रण असेल तर चांगलं पोहणारा पाण्याखाली दोन चार मिनिटे सहज राहू शकतो आणि सततच्या सरावाने तो हा कालावधी वाढवू शकतो. शरीरधर्मावर नियंत्रण असेल तर माणूसही काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो ह्यात दुमत नसावे. जैनधर्मीय अनेक जण एकवीस दिवस अन्नाशिवाय केवळ पाण्यावर राहतात. याचाच अर्थ शरीरात साठवलेली ऊर्जा योग्य प्रकारे वापरली तर दीर्घ काळ उपयोगात आणता येते. आपण ऊर्जेचा वापर करतो त्याच बील भरतो पण आपल्या शरीराने निर्माण केलेल्या ऊर्जेचे बील कधी भरले आहे का? आपल्या भौतीक गरजा नियमित वाढतच असतात परिणामी  जास्त ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जास्त संसाधनांचा वापर आपण करतो.

व्यवहारात जो जास्त ऊर्जेचा उपयोग करतो त्याची समाजात पत आहे असे मानले जाते. तो सधन आहे असे मानले जाते. गेले अनेक वर्षे पाऊस अनियमित पडत आहे, आपल्या देशात जिथे प्यायला पाणी पुरत नाही तिथे वीजनिर्मिती करिता पाणी कुठून उपलब्ध होणार? कमी पाण्यात पिके घेणे,घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणे, भूमीवर पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवून, जमिनीत जिरवून भूमीअंतर्गत  पाणीसाठा वाढवणे असे अनेक उपाय करून संकट कमी करता येईल. प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा, खरंच आपल्याकडे हा दृष्टीकोन आणि इच्छाशक्ती आहे का? सकारात्मक विचार करणे हा ही उर्जेचा स्त्रोतक की.आपल्या सकारात्मक विचारांनी काही चांगले घडत असेल तर ते डीलच आहे.





ऊर्जा म्हणजे केवळ वीज, द्रव किंवा वायू  इंधन नव्हे, तर इच्छाशक्ती सुध्दा माणसाचे इंधनच आहे. जर योजक चांगला असेल तर उसाचे पाचड किंवा उसाची मळी या पासून इंधन निर्मिती करता येईल,  कापूस किंवा मका पीक घेतल्यावर राहिलेले त्याचे धडस याचा वापरही इंधन म्हणून होईल. आपले गडकरी साहेब ऊसाच्या मळीपासून इथेनाॅल तयार करुन पेट्रोलसह वापरण्याचा सल्ला नियमित देत असतात. केंद्रसरकारने ग्रामीण भागात एल.पी.जी. दिल्याने ग्रामीण भागातील महिलांची स्वयंपाक बनवण्याची सोय केली हे स्तुत्य. पण जर आहेत ती संसाधने वेगाने वापरली, तर पुढच्या पिढीसाठी काही शिल्लक राहील का? हा खरा प्रश्न आहे.

टी.व्ही.वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीत लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, “मी मोठा झालो की सायकल फॅक्टरी काढीन”. वडील विचारतात “तुला सायकल फॅक्टरी का काढायची आहे?” मुलगा धाडसाने म्हणतो “आपली गाडी आत्ता थांबली असूनही तुम्ही तिच इंजिन सुरू ठेवता, असं केलत तर मी मोठा होई पर्यंत पेट्रोल शिल्लकच राहणार नाही, खरं ना!” जाहिरात मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालणारी आहे.

आपल्याला निर्माण होणाऱ्या उर्जेविषयी आणि तिच्या पारेषण विषयी  माहिती आहे  ना! एक युनिट म्हणजे १००० वॉट एवढी ऊर्जा एक तास उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे १० किलो कोळसा व १००० लिटर पाणी यांचा वापर होतो. असं असूनही आपण निष्काळजीपणा दाखवत वीज वापरतो. लग्नसमारंभात केलेली रोषणाई डोळे दिपवून टाकणारी असेलही, पण जेवढी वीज रोषणाईसाठी वापरली तिचा गैरवापर टाळता आला तर दूर खेडेगावातील वस्तीला महिनाभर वीज पुरू शकेल. आम्ही सत्ता आणि पैसा यांनी एवढे उन्मत्त झालो आहोत की आम्हाला झोपडीत राहणारे गोर गरीब अंधारात राहतात हे दिसतच नाही.

जेव्हा मी पॉवर डील असा शब्द वापरतो तेव्हा पॉवर याचा अर्थ केवळ ऊर्जा इतकाच नाही तर त्याचा अर्थ सकारात्मक ऊर्जा, डील याचा अर्थ व्यवहार किंवा व्यवसाय असाही नव्हे त्याचा अर्थ संबंध. म्हणजेच पॉवर डील हा श्रीमंत व्यक्ती करिता सत्तेचा, सामुग्रीचा, शक्तीप्रदर्शनाचा खेळ आहे. शक्तीप्रदर्शन हा ही व्यवसाय आहे.समोरच्या व्यक्तीला निष्प्रभ करून स्पर्धेतून बाहेर फेकणे हा ही एक श्रीमंतांचा खेळ आहे. अवघे दोन ते पाच टक्के सत्ताधीश उर्वरित ९५ टक्के लोकांचं जगणं कुरतडून टाकणार हा कसला खेळ?

असलेल्या नैसर्गिक साधनांचा वापर स्वतः साठी तसेच पुढील पिढ्यांसाठी योग्य प्रकारे कसा करावा याचा वस्तूपाठ पॉवर डील च्या श्री खैरनार महाशयांनी  घालून दिला आहे. ही व्यक्ती सोलापूर येथील ग्रामीण भागात जन्मली. वडील शेतकरी, कुडाच्या घरात राहीले पण मनात उंच स्वप्न आणि ध्येयापर्यंत जाण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी असेल तर काय करू शकेल याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही कंपनी.

एका ध्येयासक्त माणसाचं स्वप्न नाशिक रोडवर दिमाखात उभं आहे. अंदाजे एक हजार स्थानिक कामगारांना रोजगार ते पुरवतात आणि मुख्यतः म्हणजे “टाकाऊ पासून सुबक टिकाऊ”, टाकाऊ पासून नव निर्मिती हा वसा घेत त्यांनी जगण्याची दिशा ठरवली  आहे. या कंपनीत ते विद्युत वाहिन्यांच्या स्ट्रक्चर निर्मीती करतात. थर्मल पॉवर  केंद्रात कोळसा जाळल्या नंतर उरणारी fly ash वापरून त्या पासून सहज बांधता येतील अशा घरांच्या निर्मीती करता सुटे भाग बनवतात. मुख्य म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार पुरवतात. त्यांचे कौशल्य वाढावे यासाठी प्रयत्न करतात.केवळ स्वतः ची उन्नती न करता समाजाचे मी देणे लागतो या विचाराने अनेक नवउद्योजकांना प्रोत्साहन देवून ते स्वतःचा उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त  करतात. अशी माणसे विरळाच.

अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम |

सदा लोकहिते मुक्ते  रत्नदीपा इवोत्तमा ||

या सुभाषिताप्रमाणे त्यांचं जगणं हे केवळ समाजासाठी असते. कोणी स्तुती करावी अशी त्यांची अपेक्षाही नसते. ते निर्मोही असतात. आपल्या कामात प्रामाणीकपणे व्यस्त असतात. शेकडो करोड रूपयांचा उद्योग सांभाळत असूनही आपल्या समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांचा साधेपणा आणि उच्च विचार मनाला भावतो. अशा उद्योगी व्यक्तीच्या सहवासात काही वेळ घालवण्याची संधी आम्हाला लाभली.त्यांचे विचार ऐकून आपल्यातील प्रत्येकांनी त्यांचे विचार अल्प  स्वल्प प्रमाणात आचरणात आणले तर भारत नक्कीच आत्मनिर्भर होऊन शकेल असे वाटते.

“कण कण मे भगवान” म्हणायला काय लागत? पण ह्या कणाला “भगवान” कोणी बनवायचा? तो कण तुमच्यासाठी समृध्दी कशी आणेल हा विचार तुम्ही केला तरच त्याला अर्थ अन्यथा सारेच व्यर्थ. आपण पायाला कचरा लागला की  घरात ओरडतो, “कचरा नाही काढला का? नुसता पायाला लागतोय”. पण त्या कणांच सामर्थ्य कळतंय कुणाला! ज्या वेगाने आम्ही खनिज वापर करत आहोत तो वेग इतका भन्नाट आहे की एक दिवस मातीच संपून जाईल.हा विनोद नव्हे, सत्य आहे. मग मातीशिवाय पीक घेता येईल?

 ही माती विटांसाठी वापारा, धातू मिळविण्यासाठी, की अन्य कारणांसाठी, आज शहरात माती जशी दुर्मिळ आहे तसे भविष्यात ग्रामीण भागात झाले तर? अन्न मिळेल, वस्त्र मिळेल. इतर गरजा भागवता येतील?  कदाचित म्हणालही खोटी भीती का दाखवता राव? मी सांगतो ते फक्त डोळ्याने दिसत तितकंच. कदाचित याहूनही गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल. आजही शहरात एखाद गुलाबाच रोपट लावयाच झालं तर वीस-पंचवीस रुपये देवून किलोभर माती घ्यावी लागते, खरं ना!

दोस्तहो “माती” सुधा संपत्ती आहे हे लक्षात घ्या. खेड्यात सुंदर काळी माती आहे, लाल माती आहे, मुबलक पाणी आहे. त्याने रडत बसायचं की या साधनांचा योग्य वापर करत, श्रमाने मळा फुलवायचा? कुणी तरी येईल आणि मदत देईल या खोट्या भ्रमात राहण्या पेक्षा “अपना हाथ जगन्नाथ.” असं म्हणत त्या मातीत सोनं पिकवल तर? क्रयशक्तीचा योग्य वापर जोवर  होणार नाही तोपर्यंत अनुदान दिलं तरी भागणार नाही. शेती आणि मार्केट यांचं व्यवस्थापन योग्य असेल तर गरिबी वाऱ्याला उभी राहणार नाही.सामुदायिक शेती, यांत्रिकीकरण, माती, पाणी, खत, कीटकनाशक आणि घ्यायचं पीक यांचं व्यवस्थापन योग्य असेल तर शेतीही किफायती होईल. घरातल्या प्रत्येकाने जर समंजसपणा दाखवला आणि कोणत्याही कामासाठी सहभाग दिला तर प्रत्येक कामासाठी मजूर नेमण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी पारंपरिक विचार हद्दपार केले पाहिजेत. आज गावाकडे अनेक सधन कुटुंबातील पुरुष आणि महिला शेतीवर जात नाहीत. त्यांना आपल शेत माहितही नाही. केवळ घर आणि संसार या व्यतिरिक्त त्यांचा वावर नसतो. हेच बदलणं गरजेचं आहे.





सहकाराची सुरवात घरापासून होणे गरजेचे आहे. जर ही समज प्रत्येकाला आली तर घर, गाव, खेडं आपली उन्नती झपाट्यानं करू शकेल यात वादच नाही.

मी म्हणतो ते पॉवर डील हे “संघटन मे शक्ती है.” या अर्थी सुद्धा आहे. प्रत्येकाने सहभाग नोंदवला तर काय अशक्य आहे? “कण कण मे भगवान” प्रत्येकात ईश्वर आहे त्याचा साक्षात्कार घडून येण्याची वाट पाहू नका. तो तुम्ही घडवा. यापुढे प्रत्येक गोष्ट सकारात्मक पहा.

मी मातीच उदाहरण याअर्थी घेतलं की मुळात माती हाच उत्पतीचा स्रोत आहे. “मातीतून जन्मलासी मातीत मिसळणे आहे”. अस म्हणताना माती हवी ना? मग दहन करा, दफन करा किंवा अन्य काही. माती हवी. माती साठी शुध्द निती हवी, दृष्टीकोन हवा,   विचार हवा आणि सहभागही  हवा.

म्हणून भविष्यात जास्त जागरूक नागरिक होऊ. माती, वीज, पैसा, वेळ ही सर्व शक्तीची रूपे आहेत. फाजील आत्मविश्वास न बाळगता डील यशस्वी केलं तर पुढची पिढी दुवा देईल. जगायला ऊर्जा हवीच ना?  ऊर्जेचा कोणतं रूप जगण्यासाठी आवश्यक असेल ते आत्ता नाही सांगता येणार पण सावध तो सुखी, खरं ना? देशात आता नवनिर्मितीचे आणि स्वदेशी तंत्राचे वारे वाहत आहेत. जर मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेची निर्मिती केली तर कार्बन उत्सर्जन कमी करता येईल आणि प्रदूषणही कमी होईल.

माझ्या माहिती प्रमाणे सॅरस सोलर ही कंपनी पाचशे मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प पालघर येथील शहापूर मध्ये उभारत आहे. असाच पाच हजार मेगवॉट चे दोन सौरऊर्जा पश्र्चिम बंगालमध्ये लवकरच कार्यरत होत आहेत. गेल्या पाच सहा वर्षांत एल ई डी दिव्यांच्या वापर वाढला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होत आहे. अशा नवनवीन साधनाने ऊर्जा बचत केली तर पुढील काळात आपण स्वावलंबी होऊ. कोळशाची आयात कमी होईल. परदेशी चलन वाचेल आणि आपले डील हळूहळू यशस्वी होईल.

 पॉवर डील या संकल्पनेचा अर्थ समजून घ्या. पृथ्वी, आकाश, जल, तेज, वायू ही पंचमहाभूते. ही पंच तत्वे म्हणजे ऊर्जा. आत्ता तुम्हीच ठरावा ह्या पंच तत्वाना  कस वश करायचं. ठरवणार ना? 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “पॉवर डील

  1. विभावरी सतीश दामले
    विभावरी सतीश दामले says:

    लेखाची संकल्पना खूप आवडली. पण विषय निरुपणाच्या नादात बरंच बरंच विषयांतर होत गेलं असं वाटतं.
    पंचमहाभूतांचा नि संसाधनांचा किती आत्मीयतेने विचार करताय हे मात्र समजतं य.
    टिपणी न आवडल्यास क्षमस्व.

Comments are closed.