आप्पा माफ करा

आप्पा माफ करा

करोना संकट संपूर्ण जगावर लादले त्याला दोन महिने होत आले, दरम्यानच्या काळात कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचे संदर्भ बरेच बदलले. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या संक्रमणाच्या धोक्यास सामोरी जाऊ नये या करीता जास्तीतजास्त काळजी कुटुंबातील सदस्य घेऊ लागले. घरात स्वच्छतेचे महत्त्व वाढले. आहाराच्या सवयी बदलल्या, घरातील लहान-मोठे सगळेच थोडाफार व्यायाम करून आपली रोगप्रतीकार क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करू लागले. घरातील वयोवृध्द व्यक्तींच्या खोकण्या-शिंकण्याकडे यापूर्वी कोणी गांभिर्याने पहात नसे, “बाबांचं हे नेहमीचच, सर्व औषध चालू आहेत पण ते पथ्य पाळतील तर ना!” हा जुना संवाद आता बोलण्यातुन नाहीसा झाला आणि बाबा खोकतायत, शिंकतात याची कुटुंबात चर्चा होऊ लागली. लग्न झाल्यामुळे दूर राहणा-या बहिणीला किंवा विभक्त राहणा-या मुलांना बाबांच्या खोकल्याची, शिंकण्याची आणि अंगात कणकण असल्याची बातमी त्वरेने उर्वरीत मंडळींकडे पोहोचू लागली. हाय अलर्ट कुटुंबातील नातेवाईकांकडे जाऊ लागला. नेहमीच्या फॅमेली डाॅक्टरना फोन केला तरी ते उपलब्ध नाहित असे उत्तर मिळू लागले. डाॅक्टर येत नाही म्हटल्यावर  घरातल्या मंडळींची चिंता वाढू लागली. अशाच एका घरात आजोबांचा नेहमीचाच खोकला चर्चेचा विषय झाला कारण होतं वर्तमानपत्रात आलेली बातमी. वर्तमानपत्रात लहान मुले व वयस्कर माणसे करोना संसर्गाला लवकर बळी पडू शकतात असा उल्लेख होता. त्या वाक्याचा खरा अर्थ लहान मुले व वृध्द यांना संसंर्गाची बाधा होऊ शकते असाच होता, तथापि अतिशिक्षीतांनी त्याचा चुकिचा अर्थ काढला आणि नांदत्या घरात अनर्थ सूरू झाला.

फाटक आजोबा यांच वय अंदाजे पंचाहत्तर असावे. ते शासन नोकरीतुन निवृत्त झाले त्याला सतरा-अठरा वर्षे लोटली. निवृत्त होण्यापुर्वी त्यांनी घरातल्या ब-याच जबाबदा-या स्वत: पार पाडल्या. कुटुंबासाठी साधा पण ऐसपैस बंगला बांधला, मुला -मुलींची लग्नेही पार पाडली. तरीही घरात लागणा-या रोजच्या भाज्या, दुध व किराणा तेच आणत होते. गेले दोन वर्षे त्यांना वयानुसार कधी सर्दी तर कधी खोकला असा त्रास होतच होता परंतू हा करोना भारतात शिरला आणि मुलांनी वडिलांचं बाजारात जाणच बंद करुन टाकल. त्यांना नेहमी प्रमाणे थोडी सर्दी होती पण वर्तमान पत्रात आलेल्या करोनाच्या लक्षणांचा कुटूंबानी चांगलाच धसका घेतला आणि त्यांच्या नेहमी होणा-या सर्दीकडे मुले गंभीरतेने पाहु लागली. त्यांना स्वतंत्र खोलीची योजना मुलांनी केली. लहान  मुलांना आजोबांच्या खोलीत जायचं नाही म्हणून तंबीही देऊन ठेवली. त्यांच्या पत्नीला, नातवंडांच्या आजीला आप्पांपासुन थोडी दुर राहीलीस तर बरं अशी सुचना देऊन थांबले नाहीत तर तिला मास्क बांधण्यासाठी सावधही केले. आजीला कळेना ती मुलांना म्हणाली “अरे संदेश, आज त्यांना नव्याने का सर्दी झाली, मग हे वेगळ्या खोलीत का ठेवायचं त्यांना, तुम्हाला वेड तर लागलं नाही ना? त्यांच्याच घरात त्यांच्यावरच बंधन!”

मधला मुलगा संतोष आईकडे येत म्हणाला अगं आप्पां थोडे दिवस वेगळे राहिले तर कुठे बिघडतय, घरातच तर आहेत. काय आहे आई घरात लहान मुले आहेत, जर चुकूनही आप्पा आजारी पडले तर आजार संपूर्ण घरात पसरेल म्हणूनच सावधगिरी, आप्पा आम्हाला नको का आहेत? पण थोडी सावधगिरी घेतली तर कुणाचच नुकसान नाही. शेवटी नाईलाज म्हणून आप्पांना वेगळ्या खोलीत ठेवण्यास ती सहमत झाली.ज्यांच्या सोबत गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे संसार केला, ज्यांनी संसाराची सगळी दु:खे स्वत: पेलली त्यांना स्वत:च्या घरात वेगळे ठेवतांना तीला किती दु:ख झाले असावे?

तरीही केवळ मुलांसाठी ती शांत राहिली. बाईला पत्नीची भूमिका घ्यावी की आईची याची निवड करणे शक्यच नसते, दोन्ही नाती तिच्याकरता तेवढीच महत्त्वाची आणि नाजुक असतात. म्हणूनच इच्छेविरूध्द ती आप्पांपासून दूर पाच फुटांवर तोंडावर रुमाल बांधून बसू लागली. म्हातारी माणसं संक्रमणाला लवकर बळी पडतात म्हणून आजोबांना पाहण्याची जबाबदारी मोठ्या मुलान , संदेशने  घेतली होती. त्यामुळे त्याची पत्नी मात्र नाराज होती. घरात दोन दिर आणि जावा असुनही सारी जबाबदारी ह्यांचवरच का ? तिचा प्रश्नच सोप्पा आणि साधा होता. मधल्या मुलाने संतोषने बाबांची करोना टेस्ट करून घ्यावी म्हणून आग्रह धरला होता. लहान मुलगा सिध्देश तारेच्या कुंपणावर बसून गंमत पहात होता.बाबा या अतीदक्षता विभागाला कंटाळले होते. त्यांनी एक दिवस दुपारी जेवणानंतर कुटूंबातील सर्वच सदस्यांना बोलावणं धाडलं तसं आजीने गळा काढला. “काय झालं यांना?”

सर्व साशंक नजरेनं एकमेकांकडे पाहात होते. सगळे कुटुंब त्यांच्या भोवती जमल्याचे पाहुन त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“गेले आठ दिवस तुम्ही माझी ज्या पध्दतीने सेवा करित आहात ते पाहुन माझे मन भरून आले आहे.आणि मी असा निर्णय घेतला आहे की तुम्हां भावाभावातील सौहार्दाचे संबंध कायमचे बिघडण्यापेक्षा मी हाॅस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन करोना टेस्ट करून घ्यावी, माझ्याच घरात मी उपेक्षित म्हणून जगण्यापेक्षा संकटाचा सामना करून निर्दोशित्व सिध्द करायच ठरवलंय.  मला कुणाची परवानगी आणि कुणाचीही सहानुभूती नको आहे. माझा निर्णय ठाम आहे त्यामुळे या विषयावर चर्चा नको.”

 “त्यांच ठाम मत ऐकताच पत्नी हेलावली, “अहो मी तुमच्या पासुन दुर बसल्याय म्हणुनच ना तुम्ही रागावलाय?, मला माफ करा, पून्हा नाही हो असं वागणार. मला मेलीला काय कळतंय पण मुलं म्हणाली म्हणून मग” तीच वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ते म्हणाले, “तुझं तरी काय चुकलं, शेवटी माणुस एकटा येतो आणि एकटाच जातो, तुझ्यावर नाही हो रागावलो आणि मुलांवरही नाही.परिस्थितीच तशी आहे त्याला तू काय करणार?”

बाबांचं ऐकुन संदेश त्यांच्यावर रागावला, “हे हो काय आप्पा! कोण तुम्हाला असं म्हणाल का की ,तुम्ही करोना पाॅसेटिव्ह आहात, उलट आपला आरोग्य विभागच सांगतोय म्हाता-या व्यक्तींची काळजी घ्या  म्हणुनच ना तुमची आम्ही काळजी घेतोय सगळे, यात कोणाचं काही चुकत असेल तर बोला, उगाच नको तो आग्रह का धरता.”

  “संदेश तू माझी सेवा उत्तम करतोस परंतू केवळ एका व्यक्तीमुळे, जिचं जगुनही पूर्ण झालं तिच्यामुळे पूर्ण कुटुंबाला संकटात टाकणं मला कुटूंब प्रमुख म्हणुनही शक्य नाही, मी सांगतो तसे करा अन्यथा मला स्वत:लाच फोन करून कळवावे लागेल.”

 संतोषला बाबांचे म्हणणे मान्य होतेच. तो म्हणाला, “दादा, आप्पा सांगत आहेत त्या प्रमाणे टेस्ट करून घेणे योग्यच नाही का? आपण तशीही त्यांची योग्य काळजी घरी घेऊच असे ठाम म्हणता येत नाही, शिवाय घरात लहान मुलेही आहेत, एकदा बाबांनी करोना टेस्ट करून घेतली म्हणजे कुटुंबावर टांगती तलवार नाही. मला तरी त्यात काही चुकीचे वाटत नाही.” त्याच्या ठाम बोलण्यावर आप्पा मनापासुन हसले. “पाहिलंस, असं हव, ना भावनीक बंध ना निर्णयात खळखळ., संतोष तू फोन करून ऍम्ब्युलन्स मागव आणि कुणिही माझ्या बरोबर येण्याची गरज नाही माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे”

त्यांच्या त्या परखड बोलण्याने कुटूंबातिल सगळेच चपापले. संतोषच्या पत्नीने त्यांना हाॅस्पिटलमध्ये रहावे लागले तर असावेत म्हणून काही कपडे आणि टूथ पेस्ट, साबण इत्यादी तयारी करून दिली. त्यांची पत्नी  रुक्मिणी त्यांच्याकडे पहात म्हणाली “मी पण येते की आपल्या बरोबर, आपली सोबत करायला.” ते हसले, “मी काही कुठे टूर ला जात नाही , तू कशाला त्रास करुन घेतेस. केवळ माझी आणि कुटूंबाची खात्री व्हावी, बाप करोनाचा पेशंट नाही एवढं कळलं तरी घरावरील मळभ दुर होईल. तेव्हा कुणालाच त्रास घेण्याची गरज नाही.मी येतो.”

ऍम्ब्युलन्स आली आणि रुक्मिणीने डोळ्याला पदर लावला, आप्पा  अगोदरच तयार होते, त्यांनी बायकोकडे पहात सांगितलं “वाईट वाटून घेऊ नको स्वत:ची काळजी घे.” ते ऍम्ब्युलन्समध्ये बसले. त्यांच्या सोबत संदेश, त्यांचा मोठा मुलगा बसला. त्याच दिवशी त्यांची पहिली टेस्ट झाली. वडिलांची सगळी सोय व्यवस्थित झाली याची खात्री झाल्यावर त्यांच्या पाया पडुन त्यांचा निरोप घेऊन तो संध्याकाळी घरी आला. घरातले सगळेच त्याची वाट पहात होते. आईने त्यांच्याकडे चिंतेने पाहिले तसं तिच्याकडे पहात तो म्हणाला आप्पांना काहिही झालेलं नाही तरीही त्यांची swab टेस्ट केली आहे त्याचे रिपोर्ट दोन दिवसांनी मिळतील, मग डाॅक्टर त्यांना ट्रिटमेन्टची गरज आहे की नाही ते ठरवतील तू ऊगाचच काळजी करू नको.”

इतके सांगितल्यानंतरही ती रात्री जेवली नाही. दूस-या दिवशी तिने हाॅस्पिटलला येण्याचा आग्रह धरला तिला समजावता समजावता संतोषच्या डोळ्यात पाणी आले. “आई आप्पांना खरंच काही झालेलं नाही केवळ उगाच रिस्क नको म्हणून —.” त्यांचे बोलणे ऐकुन ती रागावली उद्या मलाही नेऊन हाॅस्पिटलमध्ये भरती कराल! तुम्हाला ना बापाची माया ना दया, जन्म देणाऱ्या बापालाच—“

तिला पूढे बोलवेना, संदेशने तिला थोपटले, नातूही तिची समजूत घालत म्हणाला, “आज्जी 

नको ना रडू, आजोबा लवकरच घरी येतील मी नक्की सांगतो. तू बाबांवर रागावलीस तर त्यांनी काय करायच? नको ना रडु.” संदेश तिची समजूत काढून निघुन गेला. दुस-या दिवशी संदेश ही टेन्शनध्येच होता. डाॅक्टरनी त्यालाही बजावले होते, जर आप्पांच्या रिपोर्ट पाॅसेटिव्ह आला तर त्यालाही रिपोर्ट काढुनी खात्री करावी लागणार होती. संध्याकाळी पाच वाजता रिपोर्ट आले आणि त्याला डाॅक्टरनी बोलावल तेव्हा त्याच्याही छातीत धडधडत होत. आप्पा पाॅसेटिव्ह असले आणि आपल्यालाही इन्फेक्शन झाले तर? तो कन्सल्टिंग रुममध्ये गेला तेव्हा डाॅक्टर उभे राहिले त्यांचा हात हातात घेत म्हणाले, “आपटे काॅग्रेच्युलेशन्स, रिपोर्टर नेगेटिव्ह आहेत,तुम्ही वडिलांना नेऊ शकता. सेफर साईड  तुम्ही पून्हा आठ दिवसांनी एक swab टेस्ट करून खात्री करून घ्या, तो पर्यंत त्यांना वेगळे राहू द्या. यू मे गो, आय वील आस्क टू प्रीपेअर यूवर बील, आय वील नाॅट सजेस्ट न्यू  मेडिसिन्स, यू मे कंटीन्यू व्हाट ही इज हॅविंग.ओके.” तो कन्सलटींग रुम मधुन बाहेर पडला तो थेट आप्पांच्या स्पेशल रुम मध्ये गेला.

आप्पा टी.व्ही.वर बातम्या पहात होते. त्यांच्या चेह-यावर प्रश्र्नचिन्ह होते. त्याने आप्पांचा हात हातात घेतला व थोपटत म्हणाला, “आप्पा, रिपोर्ट नाॅर्मल आहेत थोड्या वेळाने आपण घरी निघायचं” आप्पा त्यांच्याकडे पहातच राहिले. आप्पानी अग्नीपरीक्षा पार केली होती. संदेशने हाॅस्पिटलचे बील भरले थोड्या  वेळातच ते घरी पोचले.संदेशने घरी येत असल्याबद्दल कळवले होते. त्यांची गाडी बंगल्या समोर पोचली, दारात रूक्मिणी आरती घेऊन उभी होती. तिने त्यांना ओवाळले, सर्वांनी टाळ्या 

वाजवुन स्वागत केले. आप्पांनी कुटूंबाची परीक्षा जिंकली होती. ते त्यांच्या नेहमीच्या खोलीत जाणारच होते तेव्हा संदेश त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, “आप्पा एक आठवडा तुम्ही थोडे वेगळंच रहाव असे डाॅक्टरांनी सूचवल आहे. मलाही तीच सूचना आहे.” आप्पांचे पाय त्याच्या शब्दांनी तिथेच थीजले. अजुनही आप्पांची सत्व परीक्षा बाकी होती तर. ते मुलाकडे एक नजर टाकत आपल्या खोलीत निघुन गेले. कधी सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली होती, आज कलीयुगात त्यांना समाजासाठी नव्हे तर आपल्याच आप्तांसाठी परीक्षा द्यावी लागत होती. ते मुलांकडे पहात हसले “खरं आहे तुझं, जोपर्यंत डाॅक्टर माझं पूर्ण निर्दोषित्व सिध्द करत नाही तोपर्यंत मी स्वतंत्र नाही हे मी विसरलोच होतो.”

ते खोलीत गेले आप्पांच्या पाठमो-या आकृतीकडे संदेश पहातच राहिला. तो ही आप्पांबाबत निर्णय घ्यायला स्वतंत्र नव्हता. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती”  हेच  खरं.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar