गुंता सुटेना मनीचा

गुंता सुटेना मनीचा

गुंतलो विचारात काही कळतही नाही, अजाणता ग्रासून राही
मुक्ती न यातून कुणा कधीही, हे ज्ञान मज गर्तेत खेचून नेई

सारी अस्वस्थता इथे ,अनिश्चितता, मनी विचारांचाच कल्लोळ
किती पोचते शरीराच्या सिपियुकडे? बुध्दीभ्रम, वैचारिक गोंधळ

काही सेंकदही नाही स्थिरता, सदैव डोळे अज्ञाताच्याच शोधात
सतत बदलते समोरचे दृष्य, नाहीच पोचत जाणिवेच्या कोषात

मनी सतत भ्रम पेरत कुणास ठाऊक, नक्की हाती काय गवसते?
इतके सारे पेलणेही अवघड, वाटते खरचं तर अज्ञानात सुख होते

माहितीचा खजिना, शोधता येतो, मात्र नित्य नव्याचा नको हव्यास
काहीच नीट माहिती नसताना, एक व्हिडीओ पहात मांडतो कयास

कर्तव्य पदच्युत होऊ नये म्हणून कृष्णाला सांगावी लागली गीता
अर्जुन रथात बसूनच ऐकत होता, तुम्ही अफवेवर का विश्वास ठेवता?

कोणताही संदेश अथवा, चित्रफीत पाहून आपण इतके अधीर होतो
काय खरे? कांय खोटे माहीत नसतांना एक क्लिक पाठवून देतो

तुमचा संदेश काही सेकंदात सरकत सरकत हजारो मनात शिरतो
कशाची पडताळणी नाही, कोणा सोज्वळ व्यक्तीला उध्वस्त करतो

हाती आहे साधन म्हणून बुद्धी गहाण टाकून नका रे करू वापर!
जे पाहाल त्याला काय आधार हे समजून उमजून घेणं हा संस्कार

दर सेकंदास काही नवीन दिसेल इतकी त्या राक्षसाची नको मैत्री
सांगा सततच डोळ्यांना राबत ठेवलं तर नीट झोप येईल का रात्री?

शिकले सवरले आहात चांगलंवाईट ओळखण्याची वाढवा क्षमता
ज्याने तुमच्या मन, बुध्दीच्या शेतात विषच उगवेल असे का पेरता?

शोध लागल्याने मोकळा वेळ तर मिळाला पण गोतावळा हरवला
सुप्रभात,नमस्ते, हरी ओम,Good morning हा पोकळ सोहळा

तुम्हाला काही झाल्यास विचारा स्वतःला किती भेटीस येतील?
की गेट वेल सुन चा मेसेज पाठवून स्वतःची सुटका करून घेतील

तेव्हा शेकडो मोबाईल मित्र चळवळ बंद,हवा जिवाभावाचा मित्र
शहरात असाल तर आठवून पहा आईच कळकळीच एक पत्र

गाव सोडून शहरात येतांना सगळेच बंध तोडले मनी असेल हुरहूर
अजुनही कुणासाठी कधीतरी काळीज तुटतं जी राहिली कोसो दूर

शोधून पहा जपून ठेवलेली तुमच्या मित्रमैत्रीणीची एखादी चिठ्ठी
लिहीतांना अश्रूंने धुसर झालेले शब्द आठवा आवंढा निशब्द ओठी

भावना विरहित जगणे देऊ सोडून पुन्हा नव्याने उघडू मनाची कवाडे
अज्ञात मित्रमैत्रीणींनो बांधूया एक घरटे या परतून पुन्हा सारे

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar