भेटेल देव कोठे?

भेटेल देव कोठे?

“महेश तुझ्यासाठी घर दार सगळं सोडून मी आले, मी तुला लग्नापुर्वीच म्हणाले होते माझ्या कुटुंबात मला कोणाची लुडबुड नको आणि तू तसे कबूल केले होते तरीही तुझ्या आईला घेऊन..”
“का? तुझी आई, तुझी आत्या आणि तुझा भाऊ येऊन राहीला तर चालतो पण माझी आई आली तर तुला अडचण होते? ते काही नाही, माझी आई इथेच राहणार, तुला पटो किंवा न पटो.”
“तु काय बोलतोस तुला कळतंय का? तिथे त्यांची काय आबाळ होती? दर महिन्याला आपण पैसे पाठवत होतो, तु स्वतः भेटून येत होतास, शेजारी मदतीला होते मग असं अचानक त्यांना इथं आणण्याचा हेतू?”

“मंजिरी, ती माझी आई आहे, तिलाही एकटीला कंटाळा येऊ शकतो. आपल्या नातवाना भेटावस वाटतं.तू याचा कधी विचार केलास? तुला माझ्या गावी यावं अस नाही वाटत, आमच्या समाजाबाबत तुझ्या मनात अढी आहे मान्य, पण म्हणून माझी आईही तुला चालणार नसेल तर – माझी आई आहे, तिला हवं तेव्हा मी आणू शकतो हे घर जितकं तुझं आहे, माझही आहे. मला कोणाची परवानगी घेण्याची गरज वाटत नाही. तिने मी जिवंत असतांना एकटीने का राहावं? आता ती म्हातारी झाली. तिलाही कुणाच्यातरी सोबतीची गरज आहे. त्यामुळे यापुढे ती इथेच राहणार हे लक्षात घे.”

“अरे मी कामावर जाऊन त्यांचं नाही करू शकत. तू समजून का घेत नाहीस. आपली मुलंच आपण शेजाऱ्यांकडे ठेवतो. मग तुझ्या आईला वेळेवर जेवण खाणं, त्यांची उठबस कोण करणार? एक तर त्यांना ब्लॉकमध्ये राहण्याची सवय नाही. कोणी परकी आलं आणि आईने चुकीने दार उघडलं तर काय प्रसंग ओढवेल कल्पना आहे तुला? “माझी आई सुशिक्षित नसली तरी तिला भल्या बुऱ्याची चांगली समज आहे. तिची आपल्याला मदतच होईल. ती आपल्या मुलांना सांभाळेल. त्यांना काय हवेनको ते पाहिल. तुझ्यासारखं नाही जमलं तरी ती नियमित मुलांची काळजी घेईल.”

त्याची आई निमुटपणे सुनेचा आणि मुलाचा संवाद ऐकत होती. गेले दहा मिनीट ती आपल्या पिशवीसह दरवाज्याकडे उभी होती. नक्की काय करावं तिला सूचत नव्हते. तिची ती अवस्था पाहून महेश आईवरच ओरडला. “माय तिथं का उभी राह्यली जाय घरात, पिशवी ठेव, हिथ बाथरूम हाये, साबूण लावून हात पाय धू.”

तिने सोबत आणलेली पिशवी सोफ्यावर ठेवली,तशी मंजीरी ओरडली, “अगं, काय करतेस तू, शी शी शी ,ती मळकी पिशवी सोफ्यावर कुठे ठेवतेस? खाली ठेव. सोफा घाण होईल ना?” त्याची आई सुनेच्या शाब्दिक हल्ल्याने कावरीबावरी झाली. सोफ्यावरची पिशवी तिने पटकन उचलली आणि एका कोपऱ्यात ठेवली. येताच क्षणी आईचा त्याच्या समोर झालेला अपमान त्याला सहन होणे शक्यच नव्हते. महेश पुढे सरसावला,त्याने सणसणीत चपराक बायकोच्या कानशिलात ठेवून दिली, “भ्यांचोद, माझ्या आईला बोलतेस पुन्हा एक शब्द बोललीस तर सगळे दात हातात देईन.”

“महेश, तू माझ्यावर हात उचललास, रानटी कुठला. स्वतःला सुशिक्षित म्हणवतोस पण तुझ्या जातीवर गेलास ना? बायकोवर हात उचलतोस? याचे परिणाम फार वाईट होतील. तू तुझ्या अशिक्षित आईला इकडे घेऊन येणार हे माहिती असतं तर मी कधीच तुझ्याशी लग्न केल नसत. I hate you. मी माहेरी चालले, मला न्यायला येऊ नकोस. माझी वाटही पाहू नकोस.”

“जा जा, माझ्या आईला बोललेलं मला खपणार नाही. माझी आई अशिक्षित असली तर तिला माणुसकी आहे. माणसावरच नाही गुराढोरांवर ती प्रेम करते आणि तू शिकुनही अडाणी. सरळसरळ माझ्या आईचा अपमान करते. जरा स्वतःला विचार, तू केलस ते योग्य की अयोग्य?”

त्यांच्या या वागण्याने म्हातारी बिचारी गांगरून गेली. तिला कळेना तिने असा कोणता गुन्हा केला की ज्यासाठी सुन तिचा ऐकेरीत उल्लेख करत होती. तिला महेशच वागणही आवडलं नव्हतं, बायकोवर हात टाकणं तितकच अमानुष वागण होतं. ती महेशवर ओरडली,”महेश शिकला सवरला तू तिला शिवी घालताना तुझी अक्कल काय शेण खाती? बायकोवर हात उचलण्याआधी विचार तरी कराय हवा होता. तिच्या मनाला काय वाटंल?”

“आई तिला चांगली भाषा नाही कळत, तसं झालं असतं तर मी हात का उचलला असता? लातो के बुत बातोसे नही मानते!” “तु काय सांगतोस ते काय बी माझ्या ध्यानात येत नाही. मला फकस्त इकतच कळतं तू अस कराय नग होत. तिने तुजी जात काढली काय ऱ्हाल?” “आई तु मनाला लावून नको घेऊ,तिला तिच्या जातीचा गर्व आहे पण तीच माझ्यावर प्रेम करत होती. तीच मला लग्न करूया म्हणाली.”

मंजीरीने कपाट उघडत दोन तीन साड्या आणि ड्रेस बॅगमध्ये टाकले आणि ती काही न सांगता तरातरा बाहेर पडली. चार पावले जाताच ती माघारी फिरली आणि तिने मोबाईल घेतला, कामावर जायची पर्स खांद्याला अडकवली आणि ती जायला निघाली. सासू दाराजवळ उभी राहात म्हणाली, “पोरी भरल्या घरातून निघून जाऊ नगं, मी हिथ राहणं तुला पसंत नसल तर मी आल्यापावली जाते पर तू घराभाहेर पडू नग. पोरांचा इचार करं. आपल्या बारीक बारीक चुकांमुळे पोरांना भोगाय लागू नये.”

तिने सासूला जोराने बाजूला ढकलून दिले. “हं जा तिकडे, आल्याय मला शहाणपण शिकवायला. तुमच्यामुळे माझे नवऱ्याशी भांडण झाले. गप्प तिथे पडून राहायचं तर इथे माझ्या संसारात बिब्बा घालायला आल्याय. शहरात राहण्याची लायकी आहे का? माझी वाट अडवू नको.” सासू दरवाजावर आपटता आपटता वाचली. महेश आईवरच वैतागला.

“आई ss,जाऊ दे सांगितले ना, त्या हलकट बाईला नको अडवूस, स्वतः कमवते,फार घमेंड हाय, मी पण बघतो किती दिवस कोण माहेरी ठेवते ते? जा जा खुशाल जा.कोणी बोलवायला येणार नाही.” “आर,काय बोलतोस बायकोला? जरा लाज शरम बाळगं, काय बी वंगाळ बोलू नाई. तिनं चुक केली म्हणुन तू बी करशीला त फरक काय ऱ्हायला?” “ती तुला काय पण बोलते तरी तिचीच बाजू घेतेस?” “अरे पोरा रागाला डोळ नसत्यात मान्य पण तू असलं वंगाळ बोलाय लागला त लोकं बी बोलत्याल. मंग तिचा मान ऱ्हाईल का?”

ती खरंच निघून गेली. जातांना तिने दरवाजा धाडकन आपटला. आई त्याचा हात धरत म्हणाली, “महेश पोरा, जा बाबा जा, बेगीन जा,जा तिला परत बोलीव.लोक तुला हस्त्याल, तु शिकलला हाईस आणि बायकोला घराभाहेर काढतो, शोभत न्हायी तुला.” “आये, ये समदं उलट हाये,मी कवा बाहेर काढली? सवता गेली. माझी आय तिला नको झाली. इतकी घमेंड असलं त जाऊ दे की तिच्या घरी. आमच्या डोक्याला ताप नकोच नको.” “अरे अस म्हणू नये,ती ह्या घरची लक्ष्मी हाय, मपले दिवस तिह्यामुळे पालटले अस तूच म्हणतो ना, मंग असा येडेपणा बरा न्हायी.जा बाबा जा, तिची समजूत घाल आणि तिला परतवून आण.”

“तु म्हणतीस म्हणून मी जातो, पण तिला कुणी जायला सांगितलं नाही. ती स्वतः गेली. ती गेली तर काय फरक पडलं? तिची कटकट सहन करण्या पारिस गेली त गेली. आई! कुणी बेल वाजवली तरी या भोकातून पाहिल्याशिवाय आणि मी दिसल्याशिवाय दार उघडायचं नाही. आलोच पोरांना घेऊन.”

महेश तिला पहायला खाली गेला, त्याच्या आईला सगुणा जाधवला प्रश्न पडला, का म्हणून आपण मुंबईत आलो. आपल्या येण्यान घर फुटत असेल तर इथ येण्याला अर्थ काय? त्यापेक्षा गावी आपल्या माणसात होते ते का वाईट होतं? शेजारी असले तरी जिवाभावाचे होते. अन इथ मुलाची बायको एखांद्या भिकारणीला वागणूक द्यावी तशी वागणूक देती. न्हाय इथ अजाबात थांबायच न्हाय. मन सुनेच्या शब्दांनी तुटून गेलं होतं.

दुसरीकडे, महेश अस्वस्थ होता, बायको नेमकी कुठे गेली असावी याचा शोध घेत होता. त्याची नजर रस्त्यावर भिरभिरत होती. बाजूनी जाणाऱ्या रिक्षेवर तो नजर ठेवून होता. त्याला माहिती होत की ती अस अचानक माहेरी जाण्याच डेरींग करणार नव्हती. तस केल तर मेहूणा अचानक का आलीस? म्हणून भंडावून सोडणार होता. त्याने आजुबाजुला शोध घेतला पण तिचा पत्ता नव्हता.

थोड्या वेळाने मुलं शनिवार, हाफ डे म्हणून शाळेतून परतणार होती आणि मंजीरी घरी नाही पाहून त्याला ममा कुठे गेली? म्हणून सतावणार होती. तो शाळेची बस नेहमी थांबते त्या थांब्यावर गेला. मंजीरी उलट्या दिशेने तोंड करून उभी असलेली दिसली. म्हणजे ती माहेरी जाण्याऐवजी मुलांना न्यायला आली. ती सासूला घाबरवू पहात होती की मग बिल्डिंग मधून खाली उतरताना तिचा निर्णय बदलला तिचे तिला ठाऊक.

तो काही न बोलता तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. तितक्यातच स्कुल बस आली. मुल खाली उतरत ओरडली,” हेs ss , पप्पा गावावरून आला. मुलांचा गलका आणि गाडीच्या ब्रेकचा आवाज ऐकून ती वळली, तिने त्याला पाहिलं. मुलं जवळ येण्यापूर्वी तो म्हणाला, “गुपचूप घरी चल, वाटेत तमाशा नको. मुलं असतांना काही बोलू नकोस.” ती त्याच्याकडे विस्फारलेल्या नजरेन पाहात राहिली. “मम्मा, आज तुम्ही दोघेही आलात. बर झालं, आज शाळेतून वर्क बूक दिली आहेत. माझी सॅक जड झाली आहे सॅक घेऊन माझी पाठ दुखायला लागली.” मीनल म्हणाली. “पप्पा माझी सॅक पण भारी जड झाल्याय, मला पण वर्क बुक दिली आहेत. टीचरने मंडेला सिक्स हंड्रेड आणायला सांगितले आहेत.” महेंद्र म्हणाला.

चौघही घरी आली. लिफ्टच दार उघडता उघडता मीनल म्हणाली, “पप्पा तु स्वीट कॉर्न घेऊन आलास ना?” “हो तर, मी स्वीट कॉर्न तर आणला आहेच पण मी peanut आणि sugarcane पण आणलाय!.” पण तू त्याच शेल काढून देशील ना? I can’t chew it with a shell.” “नक्की देणार पण आधी, कंटाळा न करता Finish your homework.” ते घरी पोचले तस त्यांनी ‘की’ ने दार उघडले. दाराचा आवाज ऐकून मुलांची आजी समोर आली. मुलं आत येताच आजीला पाहून ओरडली.
“हे आज्जी,” दोघांनी आपल्या खांद्यावरच्या सॅक सोफ्यावर भिरकावून दिल्या आणि तिचे हात धरून ओरडत म्हणाले, “आज्जी आली,आज्जी आली.” तिने दोघाना जवळ घेतले तसे मंजीरी किचनमध्ये जाता जाता म्हणाली,”आपल्या मोतोश्रीना स्वच्छ साडी नेसायला सांगा. नाहीतर मुलांना काहीतरी आजार होईल.” “सुनबाई, साडी स्वच्छच हाय. तूच तर ह्यो रंग पसंत केल्ता. तवा म्हणलीस गावाकडे असेच कलर बरे, आता तुच याला खराब म्हणत असशील तर .. . ..?”

ती काही न बोलता स्वंयपाक घरात निघून गेली.महेश तिचा अविर्भाव पहात राहिला. एकंदरीत ती म्हातारीला इथ राहू देणार नव्हती. मुलं मात्र आजीसोबत एकदम खूश होती. “आजी तू इथेच का रहात नाही? गावी का राहते?” “पोरांनो तिथ मपल घर हाय, वावर हाय, गुरढोर हाईत त्यानला कोण बघल? हित मला करमायच न्हाई, तुमी शाळला जात्याल तुमची आई, बा हाफिसात जातील मंग म्या एकटीन कस रहायचं?”तिचं बोलण ऐकून मंजिरीला हायसे वाटले, म्हणजे आपण दिलेला डोस लागू पडला तर, ती मनातच म्हणाली असावी. पण बाहेर मुलांनी मात्र कल्ला केला, “ते काही नाही. आता तू इथेच रहायचे, परत तू गावी गेलीस तर आम्ही बोलणारच नाही.” दोघ एकत्रच म्हणाले. ती मिनलच्या गालावरून हात फिरवत म्हणाली, “मिनल बेटी मी हिथ राहावं अस तुला वाटतयं ना मंग आता नाही हो जाणार. कोणी काही म्हणलं तरी नाही जाणार. पर एक डाव जाऊन गुरढोर कोणला तरी देऊन टाकय पायजे म्हंजी मला व्याप न्हाय राहाणार.”

“पण तू कशाला जातेस? आमचे पप्पा जाऊन देऊन येतील सगळी गुरढोर.” “बर मी त्याला तस सांगत्ये, पण माझी एक शर्थ हाय, तुम्ही माझं ऐकल पायजेल. येळेवर शालेचा अभ्यास करायचा, उगाचच हट्ट बी न्हाय करायचा. हाय कबूल?” “इतकच ना ? मग मी ऐकीन की तुझं. मी बालोपसानेला आईंच्या मंदिरात जाते. तिकडच्या मावशी सांगतात ते मी सगळ ऐकते. त्या मावशी मला चॉकलेट देतात आणि म्हणतात,Good Girl. आज्जी तुझं मी ऐकल की तू मला काय देणार?” “देईन हो,छान पैकी,भाकरी आणि ठेचा बनवून देईन, नायतर डिंक लाडू बनवून देईन.”
“पण मम्मा आम्हाला पिझ्झा नाहीतर बर्गर मागवते. तुला बर्गर मागवता येत नसेल तर मी शिकवीन की. तुझ्याकडे paytm आहे ना?” “ते आणि काय असतय? मले बरगर काय म्हणतीस ते नाही ठाव.” “अग आज्जी, बरगर नाही बर्गर, म्हणजे ना मोठा ब्रेड असतो आणि त्यात व्हेजिटेबल आणि चिज असत. सॉस असतो. मम्मा ने मागवलं की मी तुझ्यासाठी मागविन मग तुला कळेल?पण आपल्या गावी बर्गर नसतो का?”

“बरगर , बेरेड असलं काय बी नसतं. ज्वारी,बाजरीची भाकरी नी ठेचा नायतर शेंगाची चटणी. ते बी नसलं त मंग कांदा न भाकरी. हे बग आता गप्पा लय झाल्या. अदुगर कापड बदल नाय त तुझी आय माझ्यावर कावल.” “आज्जी तु कधीकधी काय बोलतेस तेच कळत नाही, ‘कावल’ म्हणजे काय?” “म्हंजी,आय रागावर येल आनी मला बोलील.” “अग, रागावेल म्हणं, आम्ही कस बोलतो तस बोलायचं.,” “अगं पोरी,गावाकडं असच बोलत्यात, आता सुद् कस बोलायच ते तू शिकीव मग मी बी बोलीन. समद कळतय की, तुमच्या सारख बोलाय येत न्हाई ते. पर बघून बघून येईल मला.”

“Minal,go and wash your hands, go, you can talk with granny afterward.” महेश रागावला. “कशापाई पोरीवर रागावतो? तिचं खरचं हाय की मपल्याला तिच्यावानी सुद् बोलाय न्हाय येत पर जमल लवकर.” महेंद्र अगोदरच हातपाय धुवून आला होता. आपल्या खेळण्यातल्या मोटारी घेऊन तो खेळत होता.

मंजीरी हॉलमध्ये आली तिने सासूला चहा दिला. महेशकडे पहात तिने त्याला चहा घेणार का विचारले तस तो आश्चर्याने म्हणाला, “म्हणजे तू माझ्यासाठी चहा केला नाहीस? आई आणि मी तुझ्या समोर एकत्रच आलो ना?” “ठिक आहे मी तुलाही आणते, उगाचच एवढ रागवायची गरज नाही. मला वाटलं थोड्या वेळाने जेवायचच आहे म्हणून मी.. ” “याच्यातला घे की रं पोरा, मला तरी कपभर कशाला पायजेल? थोड्या वक्तान जेवायचच आहे.” “हे बघा, आज गुरूवार आहे, मला ‘आईंची’ पुजा करायची आहे. पोथी वाचायची आहे, कुकर लावलाय, तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर. नीट लक्ष ठेवा नाहीतर कुकर जळेल.” “मंजीरी हे बघ आम्ही रात्री घरून फारस न जेवताच लवकर निघालो होतो. मनमाडला सबंध ब्रिज ओलांडून याव लागतं. गाडी वेळेत आली असतघ तर चुकली असती आईला भुक लागली असेल तेव्हा पुजा लवकर आटोपती घे. “

“महेश, मला पुजेसाठी अर्धा तास लागतो. तुला माहिती आहे. तोपर्यंत थांबण्यापेक्षा तुच डाळ फोडणीला घातलीस तर तुम्ही लवकर जेवू शकाल, माझ झाल की मी नंतर जेवेन.” महेशची आई ते ऐकून भांबावली, “कमाल आहे बाईची, चक्क नवऱ्याला रांदाय सांगते.” ती हळू आवाजात पुटपुटली पण तोवर मंजीरी स्वयंपाक खोलीत पोचली होती. मुल हॉलमध्ये खेळत होती. महेशने गावावरून आणलेला ऊस तुकडे करून मुलांच्या समोर ठेवला आणि तो स्वयंपाक घरात गेला. मूलं, दाताने ऊस सोलायचा प्रयत्न करत होती पण त्यांना जमत नव्हता.

महेशच्या आईने घरातून विळी आणून त्यावर उसाचे कठीण साल काढून त्याचे छोटे तुकडे केले. मूल आवडीने ऊस चोखू लागली. थोड्या वेळाने घरातून फोडणी दिल्याचा आवाज आला पाठोपाठ छान हिंगाचा गंध दरवळून गेला. “पोरानो तुमचा बाबा स्वयंपाक कराय गेलाय काय? छान घमघमाट आला.” “आज्जी, आमचे पप्पा सुंदर जेवण बनवतात त्यांना तू शिकवलस का?”शीतलने विचारल. “म्या? नाही तर, तो होस्टलात राहाय होता, तिकडच शिकला असलं. पर तुझा बाबा रोजच जेवण करतो का?”
“रोज मम्मा करते,पण मम्माला बापूच्या प्रवचनातून यायला उशीर झाला तर पप्पा बनवतो. आम्ही लहान होतो तेव्हा पप्पाच आम्हाला भरवायचा.” मीनल म्हणाली. “धन्य हाय तुझ्या बा ची, तो बाईवानी समद करतो आणि तुझी आय मंदिरात जाऊन बसते. घरातलं बघायच का? देवाच्या नांदी लागायचं कळाय नग का?”

“आज्जी तु बडबडू नको मम्मा ने ऐकल तर तुझं काही खरं नाही. उगाचच ऐकून घ्याव लागेल. तु ऊस सोलतेस तर विळीवर लक्ष दे, ऊस सोलून देतांना बोललीस तर हात कापेल.” “न्हाय र पिल्ल्या , म्या डोळे मिटून बी विळीवर कांय पण कापती, सवय झाली की काय बी न्हाय होत.” “तूला डोळे मिटून कस काय दिसते. तुला ऊस छान सोलता येतो. मम्मा, पप्पालाच ऊस सोलायला सांगते. तो सुरी घेऊन ऊस कापतो आणि सोलतो सुध्दा. तिला तुझ्यासारखा ऊस सोलायला का नाही येत?” मीनलने विचारल. “अरे पोरा, ती शेहरात वाढली, हित ऊस कधीतरीच आणत्यात, तिला सवय न्हाई , म्हणून नाही येत, मला कुठ गॅसवर रांदाय येत? मला कुठ तुमच्या वानी सुद् बोलता येत. पान्यात पडलं की समदं आपणच येत.”

“आज्जी रांदाय म्हणजे काय ग?” “अग तुम्ही जेवण करत्यात त्याला आमी रांदण म्हनतो. आमची गावची भाषा हाये, गावाकडं समदी भाषेत बोलतात, तुमच्यावानी शुद बोलाय आमास्नी लय वखत लागलं. तुझी आत्या तिकडं पुन्याला ऱ्हात्ये ती बी तुमच्यावानी सूद बोलते.”

“महेश,अरे आईला म्हणावं थोडं हळू बोला, मला डिस्टर्ब होतंय. धड पोथी वाचून होत नाही.” “ठीक आहे, मी मधल दार लावून घेतो मग तुला नाही ऐकू येणार,आणि तु लक्ष देऊही नको. ती मुलांबरोबर बोलते तिला कस सांगू हळू आवाजात बोल.” ती उत्तर न देता पोथी थोड्या मोठ्या आवाजत वाचू लागली तस आज्जी काय बोलते ते मुलांना नीट ऐकू येई ना. मीनल तिथूनच ओरडली,”मम्माss, जरा हळू वाच आज्जी आम्हाला गावच्या गंमती जमती सांगतेय. तुझ्या पोथीमुळे आम्हाला नीट ऐकू येत नाही.” आज्जी मुलांकडे पहात म्हणाली, “मीनल अस बोलू नये, तुझी मम्मा देवाची पोथी वाचतीया मग आपण नंतर गप्पा मारल्या तर चालल की.तवा आता तुमचा काय अभ्यास असल तो आपटून टाका. दुपारच्याला तुमाला गावच्या गंमती जमती सांगते.”

महेशने मुलांना जेवायला हाक मारली,” मीनल तुम्ही हात स्वच्छ धुवून आज्जीला घेऊन जेवायला या. मम्माच होत आलं की ती बसेल.” मुल आणि आजी स्वंयपाक खोलीत आली.तिथल्या डायनिंग टेबलावर महेशने सर्वांची ताटपाणी आणि स्वयंपाक घेतला होता.मुलं येताच महेशने आईला आणि मुलांना पोळी भाजी वाढली. आज्जी म्हणाली. “मुलांना जेवू दे, पर मी मंजीरी सोबत थांबते की, तू बी घे जेवून.” मंजीरीने सासूचे बोलण ऐकले असावे,ती थोड वाचतावाचता म्हणाली, “माझ्यासाठी कोणी थांबण्याची गरज नाही. I will manage myself.” महेशच्या आईने ते ऐकल आणि म्हणाली,”काय म्हणते रे ती, इंग्रजीत काय सांगते तू शिकलेली हाईस पर ,आमाला कुठ कळत? माणसान दुसऱ्याला समजल अस बोलावं.”

“महेश, त्यांना म्हणावे,मला त्यांच्याशी बोलायची इच्छा नाही. माझ्या बरोबर जेवायला थांबायची गरजही नाही.” मंजीरी म्हणाली. महेशला काय बोलाव सूचेना. मीनलच म्हणाली, “पप्पा, मम्मा अस का बोलते?आजीशी मम्मा भांडली का?” मीनलला काय सांगावे, महेशला कळेना. तो म्हणाला, “मम्मा आजीशी का भांडेल?आजीने तिच काय केलय. तुम्ही दोघांनी जेवून घ्या, आई तू पण ये आपण जेवू, तिला जेवायच असेल तेव्हा जेऊ दे.” तिलाही भूक लागलीच होती. अगदी नाईलाजाने ती जेवायला आली पण डायनिंग टेबलवर बसायला ती तयार नव्हती. आजपर्यंत खुर्चीवर बसली नव्हती. जेवतांना अंगावर पडेल याची तिला भिती वाटत होती. महेशने तिच्या पायावर एक टॉवेल टाकले आणि म्हणाला, आई बिनधास्त जेव तु. सांडल तर या टॉवेलवर सांडेल, तुला सवय व्हायला हवी.

मूल कोबीची भाजी खायला कंटाळा करत होती म्हणून त्याने जॅम आणून दिला. थोड्या वेळाने मुल आणि आजीच जेवण झालं तस महेशने टेबल आवरलं. मुलं आपला होमवर्क करण्यासाठी बेडरूममध्ये गेली. आज्जी महेशला म्हणाली, “महेश, भांडी बाथरूममध्ये घासली त चालल का? मी घासून ठेवते.” तस महेश म्हणाला,”आई, भांडी घासायला बाई येते ती घासेल, तु फक्त आराम करायचा.”

मंजीरी देवाच वाचता वाचता, म्हणाली, “अरे महेश, सकाळची थोडी नाश्त्याची आणि चहाची भांडी आहेत.ती मला उद्या सकाळी लागतील.आपल्या बाई सकाळी उशिरा येतात.” महेशच्या आईला तिचं बोलण समजलं,ती घासायला उठणार इतक्यात महेश हाताने खुणावत तिला म्हणाला, “मंजीरी, चार भांडी लागणार तर तू घासून घे. तुला वेळ नसेल तर तस सांग मी थोड्या वेळाने घासीन.” “आज शनिवार आहे, आज आधी प्रवचन आणि नंतर भजन आहे, मी आत्ता जेवेपर्यंत उशीर होईल मग मला नाही घासायला होणार. आईंना सांग नाही तर तू घास.”

माहेशचं डोकं तापलं पण मुलांसमोर तमाशा नको म्हणून त्याने स्वतःला आवरलं, “ठीक तुला सकाळला हवी ती भांडी वेगळी ठेव. मी घासेन नंतर.” त्याची आई ऐकतच राहिली, ती पुटपुटत म्हणाली, “आरा रा रा ,पुरुष हाय ना तु? आपल्यात घरचा माणूस भांडी न्हाय घासत. अन ही एवढ्या दुपारच्याला कुठशी निंघाली?” तो तिला तोंडावर बोट ठेवत खुणेन चूप रहा म्हणाला, मग म्हणाला, “आई, तू सतरंजी टाकून जरा पड, रात्री गाडीत दगदग झाली. निवांत पड म्हंजी बर वाटेल.” “कायला पडू? मी घरी असतांना पुरूषांनी भांडी घासलेली मला न्हाय चालणार.”
महेशने पुन्हा तिला मानेन नको नको खुणावल पण ती ऐकायला तयार नव्हती. “एवढ पान खाती, आनी भांडी घासून टाकते. हाय काय त्यात?” तिने चंची उघडुन पानाचा तुकडा काढला आणि चुना लावतच होती इतक्यात मंजीरी हॉलमध्ये आली, महेशच्या आईकडे पाहून म्हणाली, “आई तुम्ही तंबाखू पान खाता, मला हे नव्हतं माहीत.” “जेवल्यावर वाईच पानं खाची संवय हाय,लय वर्ष झाली, महेशचा बा होता तोच द्याचा आवडीने.” “शी शी शी,अहो तुम्ही पान खायला लागल्यावर पुरती वाटच लागली म्हणायची. उद्या आपल्या मुलांनाही सवय लागेल.” “सुनबाई तु म्हणतीस तस काय बी होणार नाय,मी समाजविन त्यानला.” “मंजीरी, माझ्या आईच्या प्रत्येक गोष्टीत तुला बोलायलाच हवं का?” “अहो हे घाण्यारडे व्यसन या घरात कस चालेल? उद्या मुलांनी अनुकरण केलं तर कोण जबाबदार?” “मंजीरी गावातील स्त्रीपुरुष दोघानाही पान खाण्याची सवय असते, त्याला तु व्यसन म्हणायची की आणखी काय तो तुझा प्रश्न पण आपली मुलं समजूतदार आहेत ती असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही घेणार. मला खात्री आहे.”

“महेश, तु बाहेर सिगरेटी ओढतोस, पानही खातोस, तु स्वतःची गॅरेंटी देवू शकत नाही,मुलांची खात्री कसली देतोस? ती तर खूप लहान आहेत. चांगल काय आणि वाईट काय त्यांना कुठे कळते.” “मंजीरी मला बोलायला लावू नकोस,तू सुध्दा लग्नाच्या जेवणानंतर किंवा बाहेर जेवायला गेल्यानंतर मसाला पान खातेसच ना?” “अहो आपल्या आईची बाजू घ्यायची म्हणून काही आरोप कराल का? मसाला पान आणि तंबाखू पान काही फरक आहे की नाही? मला नाही चालणार.” “तुझ म्हणणं एकदम दुरूस्त, उंद्या पासून मी ह्ये पान सोडलं पर तू सुदा मंदिरात भजनाला नाही जाचं, आमच्या गावात फकस्त पुरूष मंडळीच भजनाले जातात.कोणतीबी बाय भजनाला न्हाई जात. बाई माणूस भजनाला गेलं त घरातल काम कोणी कराचं. एखांदे वेळेस घरातल काम आवरून जाया हरकत न्हाई पर बापयावर काम सोपवून कायला जा च?”
“माझ्यावर तुमची जबरदस्ती का? घर माझं आहे मी हवं तस वागेन, प्रवचनाला जाईन नाहीतर भजनाला जाईन, तुमचा मुलगा मला पोसत नाही. मला बोलण्याचा तुम्हाला तर अधिकार नाहीच नाही.” ती तयारी करून न जेवता तरातरा निघून गेली.

“अग म्या काय चुकीच सांगते का?तिथ परवचन ऐकूनबी आपलं वागणं सुदारत नसल तर काय उपेग परवचनाचा? आजीचे हे शब्द तिच्या कानावर पडलेच नसावेत कारण त्या आधीच लँच लागल्याचा आवाज आला. ती उशीरानेच घरी आली. महेशन पिठ मळून ठेवलं होतं. सकाळची भाजी आमटी होतीच. ती सकाळी झालेल भांडण विसरली होती. आल्या आल्या तिने देवाकडे दिवा लावला. मुलं आपल्या मित्रांसोबत बिल्डिंगखाली खेळत होती. महेशने हाक मारताच दोघही आली. मम्मा आली आहे समजताच त्यांनी हातपाय धुतले आणि पर्वचा म्हटली.

“मम्मा आम्हाला खायला दे मगाशी आम्ही तसेच खेळायला गेलो. पप्पा झोपला होता.आज्जी चहा करून देणार होती पण तिला गॅस पेटवता नाही आला तर म्हणून आम्ही नको म्हणालो.” मंजीरीने त्यांना फरसाण खायला दिल तस ती एका जागेवर बसून खाऊ लागली. नातू काय खातात ते आज्जी पहात होती. मीनलने ते पाहिल आणि मंजीरीला म्हणाली,” मम्मा,आज्जीला खायला दे की. तिला भूक लागली असेल.” “तुझ्या पप्पानी तिला चहा दिला तेव्हा दिलं असेल की?” महेश चिडला, “हे बघ आम्ही फक्त थोडा चहा घेतला. तुला तिला खायला द्यायचं असेल तर दे, नाहीतर मी देईनच, मला सारख मध्ये आणायची गरज नाही.” “तू घरात होतास ना? मग प्रत्येक गोष्ट मी केली पाहिजे असा आग्रह का? मी माझ्या सोबत किल्ल्या नेत नाही ना?” महेश मंजीरीच बोलण ऐकून चिडला, “तुला आजपर्यंत कुठेही जातांना अडवल नाही. म्हणशील तस वागू दिलं. तुझ्या प्रत्येक हो ला होकार दिला. तर आज तू माझ्या आईला चांगल काय आणि वाईट काय शिकवू लागलीस. मुलांसमोर तिने पान खावू नये हे अगदी बरोबर पण तुझी सांगण्याची पध्दत ठिक होती का? वडिलधाऱ्या माणसांचा अनादर, हेच तिथ प्रवचनात शिकतेस का?” “अरे महेश तिच बरोबरच हाय की, म्याच पागल झाले होते. बर मंजीरी, आजपासून पान टाकल. पुन्यांदा कधी बी न्हाय खानार. पर एक शर्थ हाये, तु बी उठसूट परवचन ऐकाय न्हाय जायचं. घरी बसून पुजा केली तरी चालतयं की. पोरानला घरीच बापयावर सोपवून का म्हणून जायचं? तुझ्या देव्हाऱ्यातला देव काय वायळा आहे का?” “हे बघा मला शिकवायचा प्रयत्न करू नका, मला काय हव ते मी करणार, इथे रहायच असेल तर गुपचूप रहावं लागेल. उगाच मला सल्ले देत बसू नका.” आज्जी आणि आईच पुन्हा भांडण झालं तशी मुल कावरी बावरी झाली.

दुपारी सासूने चंची खरोखरच कचऱ्याच्या डब्यात टाकली होती. मंजीरीने पाहिले होते तरी आता पुन्हा खात्री करून घेतली. मंजीरीपुढे हे आव्हान होतं. तिच्या मनात वादळ सुरू होत. जर तिने सासूच ऐकल तर तिचा मानसिक अहंकार दुखावणार होता पण नाही ऐकल तर सासू जिंकणार होती. तिच्या मनाची खूप घालमेल झाली. गेले बारा वर्ष म्हणजे एक तप ती बापूंच्या भजनाला जात होती. कलावती आईच्या मंदिरात सेवा करत होती. खर तर बापूंचा विषेश अनुग्रह तिला लाभला होता.आता या अनुग्रहाच्या शिदोरीवर अहंकारावर विजय मिळवता येतो का हाच तर प्रश्न होता. आजी तिच्या जवळची तंबाखूची पानाची चंची कचरा डब्यात टाकून मोकळी झाली होती.

तिला आश्चर्य वाटलं केवळ या घरात अशांती आणेल म्हणून सासूने एका मिनीटात निर्णय घेऊन अमलात आणला आणि आपण? ना आपल्या क्रोधावर अंकुश ठेवू शकलो ना स्वार्थावर, मग आपल्या भक्तीचा उपयोग तो काय? विचारा सरशी ती उठली तिने अगरबत्ती पेटवून बापूंच्या फोटोसमोर लावली आणि ती डोळे मिटून शांत बसली. मम्मा बसली म्हणून मूलही तिच्या बाजूला शांत बसली.

मंजीरीने बापूंच्या फोटोसमोर ध्यान लावलं पण नजरेस तर फक्त सासूच दिसत होती. इतकी ती सासूच्या कृतीने झपाटली होती. आपण फारच शूद्र विचारांच्या आहोत याची जाणीव तिला होत होती.आपण घराबाहेर पडू नये म्हणून समजूत घालणारी आणि आपल्याला अपशब्द वापरला म्हणून मुलावर रागावणारी सासू. आपल्या मुलांना प्रेमाने जवळ घेणारी सासू. तिला फक्त ती आणि तीच दिसत होती. अवघ्या दोन चार तासात सासूने स्वतःचा जो परिचय करून दिला तो थक्क करणारा होता.

महेश घरात कुकर लावायला गेला. थोड्या वेळाने ती उठली आणि सासूचे पाय धरत म्हणाली,”आई मी चुकले.
इतके दिवस नियमित बापूंच्या भजनाला जाऊनही मी माझा अहंकार घालवू शकले नव्हते. मी तुम्हाला ओळखू शकले नाही. तुमचे खरे आहे. बापू म्हणतात देवाला शरण जाण्यासाठी कुठे जायची गरज नाही. तो तुमच्या घराच्या चिल्ल्यापिल्ल्यात आहे तो घरातील वृद्ध आई बाबा सासु सासरे यांच्यात आहे. तो शेजारी असणाऱ्या वयोवृद्ध माणसात आहे. त्याला पाहायचं तर आधी अहंकार जाळा. प्रेमाची ज्योत उजळा भक्तीचा कापूर पेटवून सुगंध मनाच्या अंधाऱ्या कोनाड्यात पसरा.”

महेशच्या आईने तिला जवळ घेतले. “सुनबाई उठ तुझी काय बी चुकी न्ह्यायी, कंदी कंदी मानुस वरच्या वागण्याला फसतो. त्याला वाटत माह्या नंदरेला दिसत तेच खरं. आपल्या घरची मानस चुकली तरी तो पदरात घेतो पर दुसरं कोणी काय सांगाय गेलं तर त्याला त्यो शहाणपण वाटतं. तुला लवकर कळालं हे बेस झालं”

महेशलाही आश्चर्य वाटलं आपली बायको इतक्या झटपट बदलेल याची त्याला अजिबात खात्री नव्हती. तो मंजीराला म्हणाला.”तू हे खरच सांगतेस की तुझा काही डाव आहे. एवढ्या सहज तू हार मानणार नाहीस मला खात्री आहे.” “हे बघ,लवकरच मुलांना सुट्टी पडतेय आणि आपण या वर्षी कुलूमनालीला जायच ठरवले होते. आई आल्यामुळे घरी लक्ष देण्याचा प्रश्न आपोआपच सुटला. मग थोड कॉप्रोमाइज मी पण करायचं ठरवलं आहे.” कुलू मनालीला म्हणजे पिकनिकला जायच आहे ऐकून मुलं एकदम खूश झाली. आणि पिकनिक पिकनिक म्हणत ओरडत दुसऱ्या खोलीत पळाली. “अच्छा,म्हणजे बाईसाहेबांचा असा प्लॅन आहे तर,म्हणजे हे सहज नव्हे तर गरजेतुन आलेलं शहाणपण आहे. ठीक आहे.निदान त्या निमित्ताने का होईना तुला सासूला समजून घेता येईल.पण गरज सरो आणि वैद्य मरो अस करू नको म्हणजे झालं “महेश म्हणाला.

“आई तु चार आठ दिवस एकटी रहाशील का?”महेशने विचारले. आई एकदम गोंधळली, “असा डाव होता होय रं तरी म्हणल आयवर एकदम इतक प्रेम कुठून आलं? मला यासाठी मुंबईत आणलय व्हयं रं. जा जा कुठबी जाय,लेकरा बाळांना कुठतरी हवा पालटाय नेल पायजेल त्या शिवाय ती हुशार कशी होतील? आणि हे पाय, तू आलास का आठ पंधरा दिवसान मला गावकडं पोचत कर. असल बेगडी जीवन तुमच तुमालाच लख लाभ. मपल गावच बरं.” “आई पण तुम्ही खरं सांगताय ना? मग आम्ही आठ दिवस नसलो तर तुम्ही घर सांभाळाल ना? मी शेजारच्या वहिनीनां लक्ष ठेवायला सांगते.”

“सांग पोरी सांग, देवानच तुला बुध्दी दिली असल. घरच्यांना प्रेम दिल तरी पांडुरंग खूश होतो मग ती आपली माणस असो की घरातली गुर वासरं. ती मुकी असली तरी नदरेन आपल माणूस ओळीखतात. तुला आपल्या नवऱ्यावर प्रेम करता आल की तुला बी काय कमी पडाच न्हाई. कोणचा बापू नको की आई नको. आपलं जीवन आपणच घडवावं.

आमचा गाडगे बाबा सांगायचा माणसात देव बघा मंदिरात देव न्हायी तर धोंडा असतो. मी बी भजन ऐकलं हाय माझा बाबा म्हणे, “बाप्पो काहे दगडाला म्हणता देव, त्या देवाला उठून उभ राहता येत का राव? का त्याले बळेच उचलून घ्यावं, तुमच्या मदतीला मारील का धाव? नाही मागितलं, फुलांचे हार, नको चंदन, बळी, का करीता उठाठेव? मन साफ असलं तर देवाला घरातून नमस्कार केला तरी बी पुरतो. तुला माझ्या कापडाची लाज वाटती. पण आमचा गाडगेबाबा तर फाटक कपडे घालून गंदगी साफ करायचा. तरी तो संत झाला. त्याची कापडं कोणी पायली का? न्हायी
विचार शुद्ध हवे. तो दिन दुबळ्यांची सेवा करून मोठा झाला. दिन दुबळ्यांना उठतं करावं,त्यांच्या सेवेच व्रत घ्यावं, देव घेईल पघा धाव अस तो म्हणायचा.

“मग तू तरी घरात पोर टाकून बापूंच्या भजनाला धाव का घेती. घरात नवरा आला त त्यायला पोरांसाठी जेवण कराय लागतं, तू उसरान कवा बी येते ,तुच सांग हे बराबर हाय का?” “आई तुम्ही अगदी बरोबर बोललात मी नक्की यापुढे काळजी घेईन. तुमचा पेहराव आणि माझ्या मनात असलेली अढी यामुळे तुमच्या बद्दल चुकीचा ग्रह केला. म्हणून सकाळी मी रागाने बोलले मला माफ करा. तुम्हीच मला बापू आणि आईंच्या स्थानी आहात मला पदरात घ्या.

“उठ मुली उठ,चूक झाली अस खरंच वाटत असंल तर सावध हो. घरावर लक्ष ठेवा. माह्या मुलाले तु काम सांगते याच वाईट न्हायी वाटलं, वाईट याच वाटलं की तू सवता या वेळात देवाच्या नांदी लागून वेळ फुकट घालवते, तेवढ्या वेळात तु नवरा आणि तुझ्या मुलांना दिला तर ती बी आनंदी राहतील. पोरी संसार केला म्हणजे माहेरचेबी आले न सासरचे बी आले. ते परके तर मग नवरा तुझा कसा ग?”

सासूचे बोलणे ऐकून मंजिरी गपगार झाली. मंजीरीने सासूच्या पायावर लोळण घेतली. ती ‘बापू’ आणि ‘आईंच्या’ सेवेचे भ्रमजाल स्वतः भोवती निर्माण करून नवऱ्यावर सतत अन्याय करत होती. यामुळेच त्याला व्यसनही लागले. तो सिगारेट पितो त्याचा वास सहन होत नाही अस म्हणत तिने त्याला दूर ठेवले होते. शरीराने आणि मनाने देखील. यामुळे त्यांच्यातील दूरावा दिवसेंदिवस वाढत गेला.

तिला बापूंच्या भजनाला वेळेवर जायला मिळावे, बापूंच्या भक्त परिवाराच्या सानिध्यात रहाता यावे. तेथील आपले महत्त्व वाढावे, मानसन्मान मिळावा म्हणून तिचा आटापिटा सुरू होता. ती रस्त्याने जाऊ लागली की तिच्या सांप्रदायातील महिला तिला नमस्कार करू लागल्या. आपण बापूंच्या खऱ्या शिष्य हा मनातील भाव आणि त्याच बरोबर अहंगंड निर्माण झाला. घरातील नवऱ्याची किंमत कमी झाली. घरी यायला उशीर झाला तरी त्याबद्दल कधी नवऱ्याकडे दिलगिरी व्यक्त करावी असेही वाटेनासे झाले. तिच्या अनुपस्थितित तोच मुलांची आई आणि बाप भूमिका बजावू लागला.मुलांना शेजारच्या काकूंच्या भरोशावर सोडत होती त्या ही त्यांच्या अनियमित येण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करू लागल्या.

भविष्यात या सर्वांचा काय परिणाम काय होईल याची तिला जाणीव नव्हती. पण आता तिला पटले की आधी घर संसार आणि नंतरच देवाचा मनात संचार. मंजीरी आणि आई मधला संवाद महेश मुकाट्याने ऐकत होता. गेल्या अनेक वर्षात जे त्याला जमलं नव्हते ते अशिक्षित आईने करून दाखवले होते.
लेको देव शोधत इतस्त फिरू नका, तुमच्या कौटुंबिक भूमिका प्रामाणिक उद्देशाने स्वीकारल्या तरी देव अंतरी जागृत होईल शेवटी चांगल्या कृत्यानी माणसाला देवत्व प्राप्त होतं, मंदिरात हजेरी लावून नाही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar