चिखल
मला आवडतो पाऊस चिखल तुडवण्याची मला हौस
अहो खऱ्या अर्थानं चिखलच करतो तुमची वास्त पुस्त||
कधी चपलात कधी बुटात, कधी कानातही शिरतो
कधी शर्टवर, कधी बॅग वर धुतल्या नंतर उरतो||
रस्त्यावर चिखल असतो म्हणून आपण सावरून चालतो
खरं तर चिखलच आपल्याशी स्नेहान रस्त्यात बोलतो||
एकटेच तुम्ही चालतात यात काही आहे का मजा?
चिखल अंगावर पडला तर न बोलता टाकता येते रजा||
चिखल म्हणजे नव्हे काटा जो पायात खोल बोचेल
पावलांना विचारा पावसात चिखला विना त्यांना आवडेल||
सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना कुठे आहे प्रेम
उन्हात किती पाय पोळेल याचा नाही नेम ||
चिखलाच्या रस्त्याचं तुमच्याशी असते नाते
म्हणून चिखलात पदो पदी पाऊल अडखळते||
गवाकडल्या पाय वाटेवर पांदिमध्ये पहावा चिखल
पाय रुतल्यास लावावं लागतं दहा हत्तीचं बळ||
पांदणीच असते तुमच्या येण्यावर अलोट प्रेम
तुमच्या पाऊलाचे ठसे जपणे हाच तिचा नित्य नेम||
शेतामध्ये रोप लावताना चिखलात रोवावे लागते
तिथेच हस्त स्पर्शाने रोपाचे मातीशी नाते जुळते||
गोव्यात मातीच्या स्पर्शासाठी खेळतात माणसं काला
आपण मात्र चिखल लागताच उगाच काढतो गळा||
चिखल म्हणजे खरं तर मायेचा वात्सल्य पूर्ण हात
आयुष्यात एकदातरी मुक्त रांगावे त्या चिखलात||
चिखल चिखल म्हणूनही कुणी मुरडू नये नाक
चालणाऱ्या माणसाला हवा थोडा वडिलकीचा धाक||