ती, ती, आणि ती
तिचं माझं जन्म -जन्मांतरीच नातं होतं
तिनेच तर हा देह पोसला, आटवूनी स्व रक्त
माझे गुद्दे, लाता खाऊनही, ती गोड गोड हसत होती
जन्म होताना, यातना होऊनही, उरी कवटाळत होती
माझ्या पोटची भुक भागवण्या, तिची चोळी भिजत होती
मला शांत, निवांत, झोपता यावं म्हणून रात्र जागत होती
माझ्या सुखसमाधानाचं मागणं, ईश्वराला मागत होती
माझे हट्ट पुरवता यावे म्हणून, नेहमीच घामानं भिजत होती ||
ती, माझा भाऊ भाऊ म्हणून, मला सोबत सदैव नाचवत होती
कधी दूध भात, तर कधी खिमट, आई होऊन भरवत होती
मी कुठे धडपडलो, तर रडवेली होत, माझी समजूत काढत होती
स्वतःच्या दप्तराचे, ओझे वागवत, माझ्यासह दप्तर उचलत होती
माझे पाय, चिखलाने माखले, तर आपल्या ओढणीने पुसत होती
माझी चूक, आपल्या माथी घेऊन, माझा मार वाचवत होती
रक्षाबंधन, भाऊबीजेला, मला सजवून ओवाळत होती
चुकलो की, कान पिळून “नको ना रे अस वागू” रडून सांगत होती॥
ती अर्धांगिनी, घराची स्वामींनी, मला देवपण देत होती
माझा तोकडा संसार तिच्या कष्टाने सजवत होती
नाही रुसणं, नाही मागणं, गरिबीत चांदणं शिंपत होती
माझ्या असंख्य चुकांची झळ, हसत हसत सोसत होती
शांत संयमी वागणं तिचं, अंगणीची तुळस शोभत होती
साध्वी प्रमाणे तेजस्वी चेहरा, ती सावित्री दिसत होती
मुलांच्या बाबतीत शिस्त राखत, निगुतीने त्यांना घडवत होती
माझ्या संकटात, माझ्या दुःखात माऊली बनून जोजावत होती॥
किती रूपे पहावी तिची, ती नारी, लक्ष्मी,आदिमाया जगत्जननी
ती अंबिका, अंबालिका, महिषासुरमर्दिनी, संकट ताराया कात्यायनी
ती गंगा, नर्मदा, जमना, यमूना, गोदावरी, वाहे अनंत रुपे घेऊनी
ती भीमा, वेणा, सिंधू, सरस्वती, कोयना, भागवी तृष्णा, कृष्णा होऊनि ॥
ती माझी आई, ताई, पत्नी माझ्या जीवनासाठी संजीवनी
अनंत रूपे तिची, तीच पणती, ज्योती, तम हटवी जीवनातूनी
Wah! Apratim 👌👌
Dhanywad.
स्त्री चे खूप सुंदर वर्णन
Dhanyawad Mitra
खुप सुंदर
Kishor Dhanyawad.
स्त्रीची रूपे अनेक. आपण तींन रूपात बाचं व्यक्त केलंय. छान आहे. असेच लिहीत रहा
Dhanywaad Madam.