तुझी आई
आज तू सहजच बोलून, दुखावले माझ्या मना
तुला कळलेच नाही मुली, किती झाल्या जखमा
आठव बरे ते दिवस, अन रोजचाच तुझा बहाणा
पायाची घडी,पोटाचा पलंग, मी होतो तुझा दिवाना
तुझे हास्य,तुझे चाळे, तुझी छबी तुझे डोळे
देत मुखी दूध भात, दाखविले तुज नभ निळे
तुझ्या साठी घोडा घोडा, भिजतसे पावसात
तुझ्यासाठी जागी रात्र,वारा घाली जड हात
तुझ्या निद्रेसाठी जागी, थकली जरी,जड गात्र
झोप तुला यावी नीट, आम्ही पाहिली मध्य रात्र
तुझ्या नसे डोळा निज, आई करी ईश्वर धावा
जड झाले डोळे तरी, पदराने ती घाली हवा
पाहिले पाऊल टाकले, ती पाहुनी हरखून गेली
सांगण्यास तुझ्या बाबाला, दारामध्ये खोळंबली
तुझ्या हाती देऊनी पाटी, दिवा लावला तिने देव्हाऱ्यात
गणपती “ग” पासून सुरवात, पाटीवर गिरवला तुझा हात
दिवस आला सोनियाचा, तू शाळेत पाठीस पाटी
आनंदली माय तुझी, डोळ्यात अश्रू, हसू ओठी
स्वप्ने तीच्या मनातील, तुझ्या मध्ये तिने पाहिली
अन पाहता पाहता, तू नकळत मोठी गुणी झाली
आईस हवी सखी, मैत्रीण, परी आता ना तुज जवळी वेळ
अजूनही ती आईच आहे, तूच भावविश्व, तूच तिचे बाळ
Too good sir
धन्यवाद