बदलत आहे भारत ,बदलीली आहे तरूणाई
आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा आमचे पालक आमच्या अभ्यासाबद्दल खुप जागरूक होते असं काही म्हणता येणार नाही.कितीही टक्के गुण मिळाले तरी एक पालूपद होत,”जर चांगले अक्षर काढले असते तर पाच दहा टक्के नक्की वाढले असते, पण अक्षरच कोंबडीचे पाय! मग शिक्षक काय करतील? डोक आपटेल यांच्या समोर!”
अर्थात आम्ही बोर्डाच्या परीक्षेत साठ-पासष्ट टक्के गुण मिळवले तरी तो तसा कौतुकाचा विषय नव्हता. माझे वडिल ज्यांना आम्ही काका म्हणत असू गुणपत्रिका पाहुन नेहमी प्रमाणे म्हणाले “अक्षर चांगले काढले असते तर पाच टक्के नक्की वाढले असते.” त्याच शाळेत १९७६ साली कपाशाच्या भाऊराव पाटलांची मुलगी दहावी एस.एस.सी.पास झाली तर ते तिचा निकाल घ्यायला घोडागाडी घेऊन आले होते.
मुलीला त्यांनी हार घातला होता. नंतर आम्हाला समजले तीला अडोतिस टक्के गुण होते.त्या क्षणी मुलीला जो आनंद झाला असावा त्याच कोणत्याच शब्दात मोजमाप करता येणार नाही.मुलीने जे गुण मिळवले त्याने कदाचित भाऊराव समाधानी नसतीलही पण त्यांनी मुलीच्या आनंदावर विरजण घातलं नाही. त्यांच्या कृतीने निर्माण झालेल्या उर्जेने भविष्यात मोठी उंची गाठण्याची प्रेरणा मुलीला मिळाली असावी.
एकुणिसशे साठच्या दशकात संयुक्त कुटुंब व्यवस्था प्रचलित होती, घरात आजी-आजोबा , चुलते ,काकी, अविवाहित आत्या असा मोठा गोतावळा असायचा, पालकांना सरासरी चार मुले असायची आणि आईला मुलांना कुरवाळत बसायला त्यांचे लाड करायला वेळही नसायचा.परिणामी मुलांच्या संगोपनाकडे आई किंवा वडिल यांना लक्ष देण्याएवढा वेळ नसायचा.
मुल कधी आजीकडे तर कधी काकीकडे निवांत असायचं .लाड करण्याची सोयच नव्हती आणि त्यातही चिडीला आलं तर आजी म्हणायची
“यशोदे जर ह्या चिंत्याकडे बघ गं,” आईला तेवढा इशारा पूरे असायचा ती हातातल काम तसंच टाकुनी असला एक धपका कारट्याच्या पाठीत घालायची की ते कारट दुसरा फटका पाठीत पडू नये म्हणून जीव घेऊन पळून जायच.अशा कौटुंबिक वातावरणात वाढल्याने मुलांना सगळं सहन करण्याची आणि नकार पचवण्याची सवय व्हायची. अशी मुलं जीवनातल्या कोणत्याही प्रसंगाला ताकतीने तोंड द्यायची . आत्महत्येचा विचार मनात येण शक्यच नव्हतं.मुंबंईत एका, दहा बाय वीसच्या खोलीत दोन तीन जोडपी रहात होती.त्यांच्याकडे नवीन घर घेण्याएवढे पैसेही नव्हते आणि घरातील मोठ्यांना ते मान्यही नसायचे. यदाकदाचीत कोणी विषय काढला तर म्हणायचे “मेलेल्या याच घरात तुझा आणि पाच चार बहिणिंचा जन्म झाला ना, आमचे कुठे अडले” मात्र काळ सरकला आणि स्वतंत्र विचारांची पिढी जन्माला आली शिक्षणाने नवं विचार त्यांच्या मनात रूजू लागले.
कालांतराने तरूण जोडप्यांना हवा असणारा मोकळेपणा संयुक्त कुटुंबात मिळेनासा झाला.
अस मन मारून एकत्र राहण अवघड वाटू लागल.
गृहिणी शिकल्याने कुटुंबाची गरज म्हणुन नोकरी करू लागली.पुरेसे पैसै हाती आल्याने शहराबाहेर खोली घेणे परवडू लागल. कुटुंबाला मोकळेपणा आणि स्वतःच अस्तीत्व मिळाल. हळू हळू विभक्त कुटुंब पध्दती रूढ झाली.
कुटुंबाचा आकार कमी झाल्याने घराची टाप-टीप वाढली,घरातील ऐहिक सुखसाधने वाढली मात्र कौटुंबिक जिव्हाळा कमी झाला.तरूण जोडप्यांना जेष्ठांच्या दडपणाखाली संसार करणं जड वाटू लागलं ,स्वतःच्या स्वतंत्र संसारचा स्वप्न ,”आम्ही दोघं राजा राणी ” चा ध्यास यापाई विभक्त कुटुंब व्यवस्थेचा विस्तार झाला.प्रत्येक कुटुंबात एकच मुलं आणि त्या मुलाला केंद्रस्थानी मानुन घरातील निर्णय यामुळे मुलं एककल्ली बनले.मी, माझे, मला, आग्रह किंवा हट्ट करताच पालकांकडुन मागणी मान्य करणे यामुळे मुलं जास्त अहंकारी बनली.आपण आपल्या मुलांना सहजपणे मागेल ते देऊ शकतो अशी खोटी कुस्तीची व्याख्या या मुळे मुलांचा आत्मविश्र्वास चुकिच्या पध्दतीने जोपासला गेला.शेजारच्या किंवा आपल्याच नात्यातील कुटुंबाशी सधनतेची केलेली स्पर्धा यामुळे मुलं हेकेखोर स्वभावाची आणि आत्मकेंद्री बनली परिणामी मागणी पूर्ण झाली नाही किंवा त्यासाठी पालकांनी उशिरा नर्णय घेतला तर घरातुन निघुन जाण्याची धमकी, शिक्षण पुर्ण न करण्याची धमकी किंवा आत्महत्या करण्याची धमकी पालकांना मिळू लागली.ऊगाच समाजात गाजावाजा नको म्हणुनही आई पुढाकार घेऊन प्रसंगी नव-याची समजुत काढुनी किंवा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जावुनही मुलांची मागणी पूर्ण करतात आणि मुलांसमोर चुकिचा पायंडा पाडतात.
जर घरात नवरा किंवा बायको यांच्यात एकमत नसेल तर मुलं या स्थितिचा अचुक फायदा उचलून आपले म्हणणे रेटुन माध्यमं करून घेतात.वास्तवता मुलांच्या भविष्याच्या दृष्टिने पालकांनी मुलांची चुकिची बाजू मान्य करणे किंवा त्याला उत्तेजन देणे हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिने अतिशय घातक असते.
ज्या मुलांना नकार पचवता येत नाही अशी मुले मनाने कमकुवत बनतात कोणत्याही संकटाचा सामना करायला धावत नाहित आणि आपण अयशस्वी ठरतो हे लक्षात आल्यास आत्महत्येसारखा चुकीचा मार्ग अवलंबणार म्हणुनच तरूण होणा-या मुलांना डोळसपणे सहकार्य करा केवळ भितीपोटी त्यांचा हा लढा होकार भरू नका अन्यथा तुमचे मुल जगातील संकटे पेलण्यास समर्थ ठरणार नाही.तुम्ही त्यांच्या अवाजवी मागण्या मान्य करायच्या कि समजुत घालत त्यांच्या चुकिच्या निर्णयास होकार न भरता त्याला योग्य मार्गदर्शन करायचे हा निर्णय तुमचाच आहे.
आम्हाला मिळाले नव्हते मात्र आम्ही मुलाला काही कमी पडू देणार नाही ह्या खोट्या अहंकारापाई मुलाचे आयुष्य आणि तुमची ब-याच वर्षांची मेहनत वाया घालवू नका. मुलं तुमचे निर्णयही तुमचा .आंधळे नव्हे डोळस प्रेम करा.