राणीची आई भाग 3

राणीची आई भाग ३

राणीची आई भाग १भाग २ वाचा.

मी तिला म्हणालो, “अग जरा हळू चालव, कुठे तरी पडशील आणि मलाही —–’  एवढं म्हणेपर्यंत मी तिच्या पाठीला चिकटलो. गाडी स्पीडब्रेकरवरून जम्प करून गेली. ती म्हणाली “अरे घट्ट धरून बस की, लाजतोस कसला?” च्यायला ही भलतीच डेअरिंगबाज निघाली. कॉलेज जवळ आले, तसं मी बाईक उभी करण्यासाठी रिक्वेस्ट केली पण तिने बाईक थेट कॉलेज गेट जवळ थांबवली. तिच्या बाईक वरून उतरतांना बऱ्याच जणांनी पाहिले, मलाच चोरट्या सारखे वाटले. काही क्लासमेट भेटून म्हणाले, “मान गये उस्ताद, तिने लिफ्ट दिली ठीक झालं, पण पोरगी बाईक चालवते आणि तू पाठी बसतो. तिला सांगायचं होत, बाईक मी चालावेन, अरे आपल्याला काय आयडेंटिटी आहे की नाय!” मला बोलायला जागाच नव्हती, त्यांना कसं सांगू की मला बाईक येत नाही. च्यायला ही मुलगी मूर्ख आहे, आत्ता हा विषय कॉलेज मध्ये होईल.

मी लॅब गाठली, माझा exam number आणि time table यांचा फोटो काढला. आता लॅब असिस्टंटला गाठून जर्नल ताब्यात घ्यायचं आणि तडक घर गाठायचं असं ठरवलं. मी लॅब मध्ये गेलो तर ती तिथेच उभी होती.लॅब असिस्टंट, ठाकूर एक एक विद्यार्थ्याला जर्नल देऊन सही घेत होता, या काळात जर्नल हरवण्याचे आणि चोरी होण्याचे प्रकार होत असतात म्हणून त्याच्या अनुभवानुसार तो काळजी घेत होता. प्रितम तिची जर्नल घेऊन वळली तशी तिची नजर माझ्यावर गेली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली “मी कॅन्टीन मध्ये आहे, भेटू तिथे”. आता ही बया तिथे का बोलावते, जावं की निमूट घरी, असं माझ्या मनात आलं तरीही मी काही बोललो नाही. पाच दहा मिनिटांनी माझी जर्नल मिळाली. मी बाहेर पडणार इतक्यात अभय आला, “अरे स्नेहल इतक्या लवकर आलास, मी स्टॉप वर शोधत होतो, मला वाटलं मागे असशील म्हणून एक बस सोडली, कॉल करणार होतो, म्हटलं जाने दो, कॉलेज मध्ये भेट होईलच. बरं आता निघायची घाई करू नको, मला calculation जरा समजाऊन सांग, आपण कँटीनला बसू, चालेल ना?” त्याच लांब लचक वाक्य संपत नव्हतं. मी त्याला लवकर निघणार असल्याचे म्हणालो. तस मस्का मारत म्हणाला “Yaar, बस का, जा की थोड लेट, तुझा नंबर कोणी काढून नाही घेत, केलीस मदत तर उपकार होतील.” मी जास्त काही बोलण्याचा प्रश्न नव्हता. मी “Ok, Come I will be there.” असं म्हणत वाट धरली.

मी कॅन्टीन मध्ये पोचलो, ती माझीच वाट पहात होती, ती मला पाहून गोड हसली, मी बसता बसता तिला म्हणालो, “मला भूक लागली आहे, मी tiffin आणलाय तू माझ्या बरोबर खाणार का?”, “Off course, का विचारतोस, तुला नाही द्यायच का?” मी काही न बोलता टिफीन उघडला, बटाट्याची भाजी आणि पोळ्या आजीने दिल्या होत्या. “मी काय आणलय माहित आहे? अळूवड्या, तुला आवडतात का?” मी हसलो, “प्रितम कमाल आहे तुझी, अळूवड्या, आणि आवडतात का? माझ्या समोर ठेवल्यास ना तर तुला एकही मिळणार नाही”. “मग खा की, तुझ्यासाठीच आणल्या मी खाईन घरी, आईने खूप बनवल्यात, काल Birthday होता ना!” मी उभे रहात तिला Shake Hand केल, “Many Many Happy Returns Of The Day, belated”. इतर मुलं माझ्याकडे पाहू लागली तसं मी भानावर आलो. मी अळूवडी खायला सुरवात केली, ती माझ्याकडे पाहत बसली, तसं मी हसून म्हणालो  “तुला भूक नाही का? तू नाही खाणार? घे की,तो अभय रानडे इथे येणार आहे, तो आला ना, की तुला काहीही राहणार नाही”. ती माझ्यावर रागावत म्हणाली, “का बोलावलस त्याला, तुला माहित आहे ना,तो मला नाही आवडत.” ” अग मी कुठे बोलावलं? तोच म्हणाला, त्याला काही difficulty आहे, थोडी मदत कर, नाही कस म्हणणार”. तिने माझा टिफीन घेत पोळी भाजी खायला सुरवात केली, मी तिला ऐकू जाईल अशा आवाजात सांगितले, “तुला अभय नाही आवडत ना,मग तू जा, आपण नंतर भेटू,तो आला की काही तरी कमेंट करणार आणि तू उगाच माझ्यावर रागावणार, Are you getting me, please.”  “मी का जाऊ?, तु त्याला काही तरी कारण सांगून फुटव की. मलाही तुला काही difficulty  विचारायची आहे”. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाहिले. तिने माझा टिफीन घेतला आणि सर्व अळूवड्या माझ्या टिफीन मध्ये ठेऊन ती निघाली, तसे मी तिचा हात धरुन म्हणालो “खा की थोडं,उपाशीच जाणार आहेस का? मग कशाला आणलास डबा. मला कळतय तू रागावलीस Very Sorry Prit I will call you, Okay?” 

तिने कशी बशी एक पोळी आणि अळूवडी खाल्ली आणि सॅक पाठीवर घेऊन ती निघाली. दोन तीन वेळा तिने  माझ्याकडे वळून पहिले. मी तिथूनच तिला Flying Kiss दिले. ती गेली तेव्हा तिला पाठमोरी मी पाहताच राहिलो, तिचे केस मानेच्या हालचाली सह डुलत होते, तिच्या चालीत एक ऐट होती.मी नको तितका तिच्यात गुंतत आहे असे मला वाटू लागले. खरं तर तिने माझ्या Physics च्या पुस्तकात ठेवलेल्या पिंपळ पाना विषयी तिला रागवायचे ठरवले होते, पण तिला पाहिले आणि तिच्यावर रागवायचे विसरून गेलो.

ती बाहेर पडली आणि अवघ्या दोन मिनिटात अभय आला, आल्या आल्या त्याने शिवी घातली, ” ***** काय हलकट आहेत लेकाचे,यांच्या पार्श्वभागावर फटके मारले पाहिजे.” मी त्याला शांत करत विचारलं “अरे अभय झालं काय? कोणावर एवढं रागवालास?” “अरे आपला लॅब असिस्टंट, म्हणाला तु जर्नल घेऊन गेलास, पुन्हा कशी मागतो?” “बरं मग!” “अरे माझ्या नावापुढे कोणी भलत्या मुलांनी सही केली होती. ******* माझ्याशी वाद घालत बसला, मी माझी ID वरची सही दाखवली तेव्हा ताळ्यावर आला, म्हणतो शोधून ठेवतो थोड्या वेळाने ये. झाला ना लोचा, आता तो जो पर्यंत जर्नल देत नाही, मी अडकलो ना!” “बरं अभय तू पोळी खातोस का?” “अरे! स्नेहल तू खाऊन मोकळा झालास, तुला अस नाही वाटलं की थोड थांबूया मित्रासाठी?”

“Sorry दोस्त मला जोरात भूक लागली होती. ह्या दोन अळूवड्या तुझ्यासाठी ठेवल्यात घे की. तू आणला ना टिफीन, काय दिले आईने?” मी  त्याला विचारले. “अरे Yaar मी नाही आणलं काही, आपण मागवू काही तरी, काय सांगू? पॅटीस चालेल?” “अरे, माझ पोट तट्ट भरलं, तुझ्या पुरतं मागावं, आणि हे बघ तुला काय difficulty आहे ती सांग मी solve करून ठेवतो, तुला नंतर explain करेन, चालेल ना?” 

अभय ने त्याला आपली वही दाखवली  integration चे दोन-तीन प्रॉब्लेम होते, अभय नाष्टा करतांना  मी  त्याला फॉर्म्युलासह स्टेप्स दाखवल्या आणि प्रॉब्लेम  Solve केले. अभयचं खाऊन होताच तो पुन्हा माझ्या पाठी लागला, “हां, आत्ता सांग हा फॉर्म्युला का घेतला, तुला कसं कळतं की हाच formula apply होणार आहे? , “अभय, अरे सरावाने कळतं, तू तेच किंवा त्याच पद्धतीची examples सोडवली की तुलाही प्रॅक्टिस होईल Don’t worry, तू हेच example सोडवून बघ, जमतंय का? It’s not that difficult”. अभयला ते example सोडवता आलं.तस तो म्हणाला,” Yaar, स्नेहल, तु सोबत असला की जमतं आणि एकटा बसलो की लोच्या होतो.काय magic आहे कळत नाही.”  “अरे magic कसलं, डोंबलाचं, तू उगाचच घाबरतो, मग तुझा कॉन्फिडन्स जातो, बास्स, That’s it. बरं मी निघतो भाई, मला उशीर झाला तर आजी काळजी करेल, ती काकांना फोन करेल आणि काका मला, चल भेटू पुन्हा”.

 मी सॅक पाठीवर टाकून निघणार होतो इतक्यात अभयने मला थांबवलं, “अरे स्नेहल आज प्रितम कशी नाही आली?”  मला कळेना काय उत्तर द्यावं, खोटं बोललो आणि ती बया दिसली असेल तर म्हणेल मित्राशी खोटं बोललो. “ती आली असेल पण मला नाही दिसली, तुझ्यासाठी मी इथे थांबलो, येवून गेली असेल तर कसं कळणार?” मी स्वर शांत ठेवत म्हणालो.” अरे Yaar, कमाल आहे, वो आये और तुम्हे मिले बिगर ही चली गई, ये तो मुमकिन नही. “मी अभयवर रागावलो, “अरे ती नाही भेटली, तिची मर्जी, मी काय तिची मनधरणी करू का?” “देखो मिया ,तुझे उससे प्यार हुवा है, वरना तुम इतना गुस्सा नहीं करते, अब तो कुबुल करो,ये सच है ना?” आता या महामानवाला काय म्हणावं?, मी रागानेच म्हणालो “तुला काय समजायचं ते समज आणि कृपा करून डोक खाऊ नको, हे बघ अभय तुला माझी परिस्थिती मी सांगितली. मी तिच्या मागे लागलो तर काका, काकू मला घरातून हाकलून लावतील”. “Sorry Yar, चुकलं माझं, पुन्हा नाही विचारणार”. 

मी माझी सॅक उचलली आणि वाट धरली. मी घरी पोचलो तेव्हा साडेचार वाजले होते. आजीने मला पाहिलं आणि म्हणाली “किती उशीर केलास? मी आत्ता तुझ्या काकूला फोन करून सांगणार होते, मला मेलीला तो सूनबाईचा नंबर तेवढा लक्षात आहे. जा हात पाय धू आणि चहा घ्यायला ये”.  मी आपल्या खोलीत गेलो. राणीची आई, माझी पुस्तकं पहात होती, मला आश्चर्य वाटलं, “काय पहात असेल ह्या पुस्तकात, की मग काही शोधते आहे,ते पिंपळपान हिने पाहिलं तर नाही ना?” भलत्यासलत्या शंका मनात येऊ लागल्या, “राणीची आई, तु काय करतेस इथे? काही हवंय का तुला?” तिने हसून नकार दिला.

मी चहा घ्यायला किचन मध्ये गेलो, तसं ती माझ्या मागोमाग आली, आजीने मला आणि तिलाही चहा दिला. समोर चिवड्याचा डबा ठेवला, “स्नेहल,चिवडा खाऊन पहा,राणीच्या आईने बनवलाय बरं”. मी चिवडा खाऊन पाहीला, खूप स्वादिष्ट होता.मी चिवडा छान असे खुणेने सांगितलं. ती हसली. मी माझ्या खोलीत आलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, ही शर्विका आणि संजू यांची खोली लावत असेल का? 

मी अभ्यास करायला बसलो, माझं लक्ष मोबाईलवर गेलं, प्रितमने  WhatsApp केला होता, घरी आल्यावर फोन कर, मी रागाने तो delete केला.परीक्षा आठ दिवसांवर आली होती, आत्ता फालतू टाईम पास करून वेळ वाया घालवणे योग्य नव्हते. मी दार लोटून घेतले आणि अभ्यासाला लागलो.

रात्री जेवण उरकल्या नंतर मी मोबाईल स्विच ऑफ केला आणि  अभ्यासाला लागलो. सकाळी मी  उशीराने  उठलो तेव्हा माझ्या लक्षात आले की पुस्तके अंथरुणात पडली होती.बहुदा काका किंवा आत्याने लाईट काढली असावी. मी फ्रेश होऊन आलो तेव्हा राणीची आई माझं अंथरूण आवरत होती. मला पाहून ती हसली. मीही हसलो, “तु का अंथरूण आवरते? मी आवरलं असतं की, तू रात्री लाईट काढलीस का?” ती हसली. मानेन होय म्हणाली. राणीच्या आईला कुणाशी बोलतांना आपण पाहिले नाही पण ती देवासमोर बसून काहीतरी गुणगुणते म्हणजे तिला बोलता येते. मग ती बोलत का नाही? माझ्या मनात विचार चालू असताना आजीने चहासाठी हाक मारली. मी चहा घेऊन आलो आणि अंघोळीसाठी गेलो तर राणीच्या आईने तिथे कपडे तयार ठेवले होते. अंघोळ करताना मी विचार करत होतो राणीची आई नक्की आपल्याला वाटते तशी खुळी नाही आणि ती आपली काळजी घेते तशी संजू आणि शर्विका यांची का घेत नाही? आपल्यावर तिचा इतका जीव का? कितीही मनाला बजावले तरी हा विचार झटकून टाकता येत नव्हता. मी अभ्यास सुरू केला, निग्रहाने मी सकाळपासून  एकदाही मोबाईल उचलला नव्हता. आता ही मी मोबाईल फोन स्वतः पासून दूर silent  मोड वर राहू दिला. Maths आज पूर्ण करायचं असं ठरवून मी बसलो होतो.

 बारा-साडेबारा पर्यंत मी सलग अभ्यास करत होतो इतक्यात मला कालच्या प्रसंगाची आठवण झाली.  प्रितमला करावा का फोन? मी स्वतःशी पुटपुटलो. मी मोबाईल उचलला तर सकाळ पासून प्रितमने तीनवेळा फोन केला होता. अभयने मेसेज पाठवून माफी मागितली होती. मी खोली बाहेर कुणी नाही याचा कानोसा घेत प्रितमला फोन केला, मोबाईल खूप वेळ वाजून बंद झाला. “बया रागावली की काय?” मी मोबाईल ठेवला इतक्यात रींगटोन वाजला. “हां, बोल, काय म्हणतेस , मी आता तुझा miss call पहिला?”  “काय?, फोन का नाही केला?  “अग, आता केला ना, मी तुला सांगितलं ना, अभ्यास करतांना मी मोबाईल silent ठेवतो म्हणून, फोन घेत राहिलो तर अभ्यास कधी करू? बरं, आता केला आहे ना, सांग की काय सांगतेस ते. काय? काल वाट पहात होतीस फोनची, का बाई? बाई नाही,तर काय म्हणू ? “प्रीत” अरे वा! बरं प्रीत म्हणेन ओके, पण आता ठेवतेस ना मोबाईल, तुझा अभ्यास झाला वाटत? काय ? अजून नाही, मग, कर की आणि मलाही करू दे,  By Prit, See you”. मी मोबाईल ठेवला. तिने पुन्हा call केला पण मी मुद्दामच फोन घेतला नाही. मी मला कंट्रोल करत होतो.अभ्यास सोडून ह्या गोष्टी परवडणार नव्हत्या.

मी कानोसा घेतला, भावंड शाळेत आणि सर्व मोठी माणसे कामावर गेली होती.आजी जेवण करत होती आणि राणीची आई बहुदा तिला मदत करत होती. मी मोबाईल पाहीला एक वाजला होता. आता जेवून शांत अभ्यास केला पाहिजे No mobile, nothing, Love is not my destination, ह्या प्रितमच्या जाळ्यात अडकून मला माझ भविष्य आणि काका काकूचा विश्वास गमवयाचा नव्हता. अजूनही माझा कोऽहं चा शोध संपलाच नव्हता. मनावर संयमाचा अंकूश ठेवणे गरजेचे होतं.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar