षोडसी

षोडसी

टपटप, टपटप, कौलावरती, पागोळ्याला धारा गळती
पागोळ्याचे अंगणी पाणी, आणि वृंदावनी आली भरती।

झाडावरती लटकले मोती, वा-यासंगे हळुहळू डुलती
नटखट वारा झोंबे सोबत, फांदीवरून हळू निखळती।

फुलांस लगटूनी थेंब चमकती, हळूच फुलांचे ओठ चुंबती
अळवाच्या पानावर जमले, हिरवे पाचू, माणिक मोती ।

झाडांच्या खोडावरुनी धावत, बिलगत बिलगत पाणी गाते
झाड मोहरले त्या स्पर्शाने, कळ्या-फुलांतून प्रसन्न हसते।

रस्त्यावरती षोडस तरुणी, केसांमधून निथळे पाणी
तंग चिपकली चोळी अंगात, लाजूनी तिची मुडपे जिवणी ।

तिच्या रूपाला वीज भाळली, अवनी मधूनी चमकत गेली
झाडावरूनी टपकले पान, स्पर्शाने ती क्षणिक दचकली।

पाऊस, वारा, खट्याळ नखरा, तिज अंगाशी छेडत गेला 
ओलेता पदर घट्ट शरीरा, तरी त्याने हवेत उडवला।

त्या रमणिला पाहूनी झाडे, निःश्वास टाकूनी हायऽऽ म्हणाली
संगत करण्या त्या रूपड्याची, चार पावले तीही धावली।

ती बावरली त्या चाळ्याने, भरभर, भरभर पाय उचलले 
हाय नशीबा त्या नख-याला मी सोडता कितीक मुकले ।

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “षोडसी

 1. Maitrai Tendolkar
  Maitrai Tendolkar says:

  Very nice

 2. सागर सिद्धू पाटील
  सागर सिद्धू पाटील says:

  खुपचं छान कविता आहे सर

 3. Archana Kulkarni
  Archana Kulkarni says:

  नेहमी गंभीर विषय हाताळणारे तुम्ही,आज हा विषय देखील खूपच कुशलतेने हाताळला.
  खूपच छान…!जवाब नहीं…ज्ञ।

 4. Kocharekar mangesh
  Kocharekar mangesh says:

  Thanks for shairing your views.

Comments are closed.